शोध इंदिरा गांधींचा..

Indira Gandhi
Indira Gandhi

भारताच्या धुरंधर राजकारणी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच संपले आणि म्हणावे तसे कार्यक्रम  महाराष्ट्रात वा भारतात घेण्यात आले नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात १९६६-१९८४ (१९७७-१९८० वगळून) भारतावर
दिर्घकाळ परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले. ख-या अर्थाने आजच्या भारतावर त्यांच्या राजकारणाची जबरदस्त छाप पडलेली आपल्याला पाहायला मिळते. अलीकडे अभ्यास न करता कोणत्याही नेत्यांबद्दल बोलण्याची फॅशनच सुरू झालेली असल्यामुळे
तरूणांना फारसे काही माहिती नाही, असा निव्वळ आरोप करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांचे अज्ञान, गैरसमज दूर करण्यासाठी शैक्षणिक संस्था म्हणून व अध्यापन क्षेत्रातील एक व्यक्ती वा संस्था म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे या भावनेतून डॉ. अभय दातार, डॉ. अशोक सिद्धेवाड आणि प्रस्तूत लेखक यांच्या चर्चेतून या व्याख्यानमालेला मूर्तरूप आले.

एकतर इंदिरा गांधी ह्या पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना अभ्यासाला, दुसरे म्हणजे त्यांचा हा जन्मशताब्दीचे वर्ष, तिसरे सातत्याने केवळ फेसबुक व व्हाटस्अपवर विसंबून राहणारी मुक्त अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर जन्माला आलेली पिढी, यामुळे काहीतरी ह्या काळाबद्दल मुलांना सांगितलंच पाहिजे ह्या दृष्टीने वक्ते व सहा दिवस सलग मुलांना खिळवून ठेवतील असे वक्ते शोधणे, असे विषय त्यांना देणे, त्यासाठी नीटनेटके नियोषयांची निवड करण्यात आली. याशिवाय मुलांचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे, हा उपक्रम आपलाच आहे ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी असाही एक उद्देश या उपक्रमामागे होता. मुलांना नीट ऐकण्याचे संस्कार केले पाहिजेत, त्यानंतरच त्यांना चिकित्सकपणे विचार कसा करावा हे सांगता येईल हाही एक उद्देश होता.

यानंतर वक्त्यांशी संपर्क साधला. आपल्याच परिचयातील पण अभ्यासपूर्ण मांडणी करतील अशी आपल्याला खात्री असलेले, मानधन वा प्रवास भत्त्यासाठी अडून न बसणारे मित्र वर्तुळातील मंडळी निवडायचे ठरले. जेणेकरून नियोजनातही काही
कमतरता राहीली तर त्यांना अधिक खंत वाटू नये ही त्यामागची प्रांजळ भावना. सर्वांना संपर्क साधला. विषय ठरवला, दिवस ठरवला. हा उपक्रम लोकांना कळावा म्हणून एक नीटनेटके पोस्टर बनवले, काही निवडक लोकांसाठी पत्रिका छापून घेतल्या. मुलांची बैठक घेऊन दररोजचा दिनक्रम निश्चित केला. कार्यक्रम सुटसुटीत व्हावा, मुलांचा सहभाग वाढावा म्हणून सुत्रसंचालन, स्वागत, आभार सगळे मुलांनीच करायचे हे ठरले. वेळ वाचावा...दुपारी मुलांना व प्राध्यापकांना जास्तीतजास्त वेळ ऐकायला व बोलायला मिळावा म्हणून नांदेड एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ब्रम्हीभूत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकूनच ठेवायचा. दोन मिनिटांचे स्वागत, तीन मिनिटांचा परिचय व सातव्या मिनिटाला वक्ता बोलायला उभा राहिलाच पाहिजे ही शिस्त ठरवली. मुलांनीच हार आणायचे, फोटोला टाकायचे, हिशोब ठेवायचा. बातम्याही त्यांनीच बनवायचे, त्यांनीच टाईप करण्याची
जबाबदारी घ्यायची, त्यांनीच बातम्या वितरीतही करायचे. दररोज उपस्थिती लावणा-या श्रोत्यांचीही नोंद घेणारी स्वतंत्र यंत्रणा विद्यार्थ्यांनीच केली. त्यासाठी सगळ्यांचे सूक्ष्म नियोजन करून देण्यात आले. मंचावर एकच खुर्ची, फक्त वक्त्यासाठी. खबरदारी
म्हणून उत्तम आवाज देणारी ध्वनीक्षेपण यंत्रणा उत्तम राहील याची काळजी घेण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम कॅमेराबंद व्हावा, हा एक ऐतिहासिक दस्तावेज होऊ शकतो म्हणून चित्रीकरणाचा आग्रह धरणारे विजय होकर्णे व त्यासाठी खर्चाची चिंता करू नका म्हणून शुभेच्छा देणारे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांच्या शब्दामुळे आमचा उत्साह द्विगुणीत झाला.

किती विद्यार्थी येतील, वक्ते कसे परफॉर्म करतील, पेपरमध्ये बातम्या येतील का, मुले नीट सहकार्य करतील का, प्रशासन आपली दखल घेईल का असे नाना प्रश्न आमच्या समोर होते. आणि एका उपक्रमाचे नियोजन झाले. इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी
निमित्त सहा दिवशीय व्याख्यानमाला...ही कोणत्याही पक्षाशी, संघटनेशी वा विचाराशी संबंधीत नसून वा विरोधात नसून निखळ अभ्यासपूर्ण कार्यक्रम व्हावा, मुलांना इंदिरा गांधींच्या काळातील विविध पैलूंचा अभ्यास व्हावा व त्यांच्या उदात्तीकरण व
राक्षसीकरण ह्या दोन्ही टोकाचा विचार न करता मुलांनी देश म्हणून आपण कोणत्या स्थितीतून जात होतो याचा परिचय व्हावा या शुद्ध हेतूने हा उपक्रम आम्ही राबवला. ही व्याख्यानमाला तसे तर काहीच नाही पण एक सकारात्मक बदलाचा एक क्षुल्लक कण
म्हणून आम्ही त्याकडे पाहतो.

दि. ५ फेब्रु. रोजी डॉ. दत्ताहारी होनराव यांनी ‘इंदिरा गांधी आणि आणीबाणी’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. एक उत्तम वक्ता, अभ्यासक, वाचक व आणीबाणीसंबंधीत आस्था असलेला हा वक्ता होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते श्री. सदाशिवराव पाटील होते. आजची वर्तमान स्थिती आणि आणीबाणीच्या काळातील परिस्थिती याचा संदर्भ जुळवत, आणीबाणीच्या
काळाची पार्शभूमी, न्या. सिन्हांचा निकाल, जयप्रकाश नारायण यांची सर्वोदयवादी चळवळ, गुजरातमधील नवनिर्माण चळवळ, संपूर्ण भारतातील अराजकसदृश्य परिस्थिती, दररोज होणारे संप, मोर्चे, बंद, रस्ता रोको, चक्का जाम यामुळे जनता अस्थीर असे वातावरण निर्माण झालेले होते. या कठीण प्रसंगी आणीबाणी हीच कशी अपरिहार्य होती. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर कसे अत्याचार झाले, लोकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच कसा करण्यात आला, इंदिरा गांधींचा वीस कलमी कार्यक्रम, संजय गांधींचा पाच कलमी कार्यक्रम राबवण्यात झालेला आततायीपणा यावर प्रकाश टाकत त्यांनी आपला विषय फुलवला.

दि. ६ फेब्रु. रोजी डॉ. अभय दातार यांनी ‘इंदिरा गांधी आणि काँग्रेस’ हा विषय मांडला. त्यांच्या व्याख्यानाचा एवढा प्रभाव पडला की आम्ही भारावून गेलो. नेहरू काळातील काँग्रेस, इंदिरा गांधीनी केलेला बदल त्यानंतर राजीव गांधींच्या नव्या टीमने
घेतलेले निर्णय, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळातील काँग्रेस आणि व्याख्यानाच्या शेवटी आजच्या मोदी सरकारची वाटचाल इंदिरा गांधीच्याच दिशेने कसा जात आहे यावर वेळीच जर बदल झाला नाही तर मग भवितव्य कठीण आहे असेच ते सांगत होते. त्यांच्या मांडणीतील सुसुत्रता, परखडपणा, नर्मविनोद, खोचा, सत्तरच्या दशकातील नावांची जंत्री आणि नियोजीत वेळेच्या आत संपण्याची कसोटी या सगळ्याच बाबतीत ते सरस ठरले आणि श्रोत्यांना त्यांनी अजून काही वेळ बोललं पाहिजे असं वाटत असतानाच त्यांनी समारोप केला.

दि. ७ फेब्रु. रोजी प्रा. विठ्ठल दहिफळे यांनी ‘इंदिरा गांधींचे परराष्ट्र धोरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. पं. नेहरूंनी घडवलेली परराष्ट्रनीति आणि इंदिरा गांधींनी व्हिएतनामच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या अन्न मिळवण्याच्या
प्रयत्नातून परराष्ट्र धोरणाला आकार दिल्या गेला. शीत युद्धाच्या संदर्भात रशिया व अमेरिकेच्या संदर्भात भारताच्या वतीने इंदिरा गांधींनी अत्यंत नेमकी, राष्ट्रोपयोगी भूमिका कशी घेतली यावर भाष्य केलं. 

८ फेब्रु. रोजी डॉ. बालाजी चिरडे यांचे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या विषयावर व्याख्यान झाले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर शिखांचा व पंजाबी भाषिक लोकांच्या प्रश्नाचा संदर्भ देत, जर्नैलसिंग भिद्रनवालेच्या उदयाच्या पूर्वीचा पंजाब व नंतरचा पंजाब असे काळाचे स्पष्ट विभाजन करून अकाली दल, कमाल जमीन धारणा कायद्याचा परिणाम, बेकारीमुळे निर्माण झालेले प्रश्न, अकाली दलाला आव्हान देण्यासाठी केलेले काँग्रेसचे राजकारण, चंदीगढवरून शिखांचा असंतोष, आनंदपूर साहीब ठरावापासून पालटलेली
स्थिती आणि भिंद्रनवालेंचा उदय याचा परस्पर संबंध काय होता हे स्पष्ट करून ऑपरेशन ब्लू स्टारची अपरिहार्यता का होती व प्रत्यक्ष ती रोमहर्षक पद्धतीने कशी अमलात आणली गेल्या साद्यंत इतिहास श्रोत्यांसमोर मांडला.

आणि ९ फेब्रु. रोजी डॉ. विशाल पतंगे यांचे ‘इंदिरा पर्वातील धोरणेः काही आंतर-संबंध’ या विषयावर बोलताना हरित क्रांती, धवल क्रांती, उपग्रह क्षेत्रातील क्रांती यांचा व लोकशाही बळकटीकरणाचा संबंध त्यांनी उलगडून दाखवला. १९६६ ते १९८४
या प्रदीर्घकाळातील असंख्य निर्णयांचा धांडोळा घेत घेत काही निर्णयाची विस्तृत माहिती आकडेवारीसह सादर करून ख-या अर्थाने हरित क्रांती व धवल क्रांती या दोन क्रांत्यानी देश पालटला, समृद्ध झाला. ही घटना अत्यंन महत्वाची असून
नवस्वतंत्र भारताने जर लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला नसता तर लोकांना साम्यवादी सत्तेचे आकर्षण वाढले असते व लोकशाहीचा गळा घोटला गळा घोटला गेला असता असे प्रतिपादन डॉ. पतंगे यांनी केले.

दि. १० फेब्रु. रोजी डॉ. विश्वाधार देशमुख यांनी ‘पं. नेहरू-इंदिरा गांधीः बाप-लेकीचे अनोखे नाते’ हा श्रोत्यांसाठीचा पूर्णतः नवीन विषय मांडला. आशय, मांडणी दोन्ही अंगाने हे व्याख्यान श्रोत्यांना खुप आवडले. १९२२ ते १९६२ पर्यंत पिता-पुत्रींमध्ये कसे
पत्रव्यवहार केले जात होते हे सांगून पत्रांचे इंदिरा गांधींच्या वयोमानपरत्वे विविध टप्पे पाडून वक्त्यांनी मांडली केली. प्रौढ इंदिरा गांधींचे वैचारिक भरणपोषण पं. नेहरूंनी कसे केले, विविध भाषा शिकण्याचा आग्रह, विविध धर्मांचा व संस्कृतींचा अभ्यास
करण्याचा त्यांचा अट्टाहास हा इंदिरा गांधींना कसा श्रीमंत करीत गेला हे उत्तमपद्धतीने मांडले. एक मुलगी पित्याच्या उतरत्या वयात त्याची माता कशी बनते हेही यानिमित्त पुढे आले. तसा हा विषय मांडण्यासाठी कढीण होता, पण डॉ. देशमुख हे फर्डे वक्ते, लाघवी भाषा, ओजस्वीवाणीच्या बळावर संपूर्ण सभागृह त्यांनी जिंकला.
एक आठवडाभर असा उपक्रम घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न. सर्व दिवसांतील श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय. आमचा मुख्य लाभधारक गट विद्यार्थ्यांचा होता. त्यांना या बाबी ऐकवणे, विविध पैलूंतून कसे पाहता येते हे दाखवणे हा उद्देश त्यामागे होता.
प्रत्येक व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरासाठी काही वेळ राखीव ठेवण्यात आला होता. यामुळे श्रोत्यांचा सहभाग वाढला. या चर्चेचा लाभ मुलांना झाला. शिवाय शेषराव मोरे यांच्यासारखी अत्यंत चिकित्सक व अभ्यासू व्यक्ती, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. शेख हसीना यांच्यासारखी दीर्घकाळ शासकीय सेवेत काम करून निवृत्त झालेल्या प्राध्यापक याशिवाय शहरातील विविध महाविद्यालयात अध्यापन करणा-या प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची उपस्थितीही अत्यंत लक्षणीय होती. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सगळी भावी अ्धिकारी मुलेही या उपक्रमात सक्रिय सहभागी झाली होती.

या उपक्रमाची खरी धुरा सांभाळली आमच्या विद्यार्थी मित्रांनी.... युवराज मुंडेंवर समन्वयाची सर्व जबाबदारी सोपवलेली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली. विठ्ठल मनुरकर, दिगंबर कपाटे, सिद्धार्थ एंगडे, अजय राठोड, अतुल शिंदे, संतोष शिंदे, श्रीराम मोटरगे, श्रीनिवास श्रीरामे, ज्ञानेश्वर जहिरे, कालीदास वाघमारे, वैशाली पोधाडे, क्रांती रायबोले, सुहासिनी कांबळे, सुमित्रा कांबळे, रोहिणी सानवणे, पूजा भुस्कटे यांनी हा उपक्रम यशस्वी केला.

शेवटी माझ्या महाविद्यालयाचं प्रशासन, ज्या काळात लोक विशिष्ट विचार वा पक्षांना बांधून घेतलेले असताना स्वामीजीच्या कॉलेजमध्ये मुक्तपणे कोणत्याही विचारांची चर्चा, चिंतन व टीका करण्याचा हक्क दिला त्या स्वामीजींची पुण्याई व डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या प्रेरक शब्दांमुळे हा उपक्रम अधिक चांगला झाला.

शेवटी या व्यासपीठाचे गांभीर्य जाणून घेऊन सर्व वक्त्यांनी आपला विषय अत्यंत ताकदीने उभा केला. एकाच नांदेडसारख्या शहरात इंदिरा गांधींवर बोलण्यासाठी पाच-सहा वक्ते मिळावेत ही आजच्या परिस्थितीत सुखावह बाब आहे. एखाद्या उपक्रमातून अनेक बाबी साध्य होतात. एक टीमवर्क म्हणून डॉ. अभय दातार, डॉ. विश्वाधार देशमुख यांनी सिंहाचा वाटा उचलला जन्मशताब्दी हे निमित्त होते या निमित्ताने आपण मुलांसाठी काहीतरी भरीव करू शकतो हे समाधान अधिक महत्वाचे होते.

असेच उपक्रम अन्य शहरांमधून व्हायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com