सोशल मीडियावरचं गाजलेलं... (बालाजी सुतार)

बालाजी सुतार majhegaane@gmail.com (९३२५०४७८८३)
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

शेवटची ओळ
शेवटची ओळ लिहून लेखकाने पेन बाजूला टेकवलं आणि खुर्चीच्या मागे रेलून एक अशक्त आळस झाडला. मग हाताची बोटे एकमेकांत गुंफून ती मोडली, तेव्हा कडाकडा आवाज निघाला. देह सैल सोडून मेंदूतला कोरा अवकाश भोगत ओसरीबाहेरच्या लख्ख चकाकत्या उन्हाकडे पाहत तो डोळे शेकून घेत राहिला बराच वेळ. समोर अंगणातल्या झाडाखाली काही चिमण्या ठुमकत होत्या आणि सुन्नाट उन्हाने चिडीचूप झाडाची निश्‍चेट स्तब्ध पाने. उष्ण हवेचे काही दुबळे झोत. एकाएकी लेखकाला वाटलं, की अशाच एका स्तब्ध दुपारी हातातून निसटून गेलेला सावळ्या मनगटावर हिरवे चुडे ल्यालेला तो हात आता कुठे काय करत असेल?

अभावितपणे लेखकाने पुढ्यातला कागद जवळ ओढला आणि त्याच्या घड्या घालून विमान तयार केलं. मग आपल्या म्हाताऱ्या हातातली शक्ती एकवटून ते हवेत फेकलं. अंगणातल्या उन्हात दोनेक गिरक्‍या घेऊन ते खाली पडलं तेव्हा चिमण्या धास्तावून उडून गेल्या. ते पाहताना लेखकाने खुर्चीच्या पाठीवर मान टाकली आणि डोळे मिटून घेतले. ऐन बहरात विरून गेलेल्या चुड्यातला हिरवा रंग त्याच्या पानगळल्या डोळ्यांत उतरत असतानाच पुढचा एक श्‍वास घेणं त्याच्याकडून राहून गेलं. सुन्न दुपारी सावळ्या मनगटावरच्या एका हिरव्या चुड्याच्या आठवणीत विरघळत लेखक कणाकणाने मरून गेला.

शेवटी, कशाचीच कल्पना नसलेली एक माशी उन्हं कलेस्तोवर त्याच्या नाकावर उठबस करत राहिली.
- लिहिण्यातून

टॅग्स