सभ्यतेचे वाभाडे (सुनंदन लेले)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मात्र, गेल्या काही काळात या सभ्यतेचे वाभाडे निघताना दिसत आहेत. काही खेळाडूंचं वर्तन योग्य नाही, तर काही वेळा पंच, सामना अधिकारी यांचेही निर्णय आक्षेपार्ह आहेत. निदहास स्पर्धेदरम्यानचं बांगलादेशी खेळाडूंचं वर्तन, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कगिसो रबाडा याला झालेली शिक्षा आणि एकूणच बदललेलं वातावरण या साऱ्याचा परामर्श. 

बांगलादेशमधल्या चितगॉंगमधला 16 जानेवारी 2010चा दिवस आठवला, की अजूनही हसायला येतं. भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता. पहिला कसोटी सामना 17 तारखेपासून चालू होणार होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पाठीच्या दुखापतीनं इतकं सतावलं, की अखेर पहिल्या कसोटीतून माघार घ्यायचा निर्णय धोनीनं घेतला. उपकर्णधार सेहवागला धोनीनं निर्णय कळवला आणि कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेकरता जायला सांगितलं. मैदानावरच्या फटकेबाजीप्रमाणं सेहवागची पत्रकार परिषद नेहमीच फटाके फोडणारी असते, हे जाणून मी मुद्दाम पहिल्या रांगेत बसलो. 

पत्रकार परिषदेतली पहिली काही प्रश्‍नोत्तरं पार पडल्यावर एका बांगलादेशी पत्रकारानं सेहवागला प्रश्‍न विचारला ः ''बांगलादेश कसोटी संघाबद्दल तुझं मत काय आहे?'' 

''एकदम सामान्य संघ आहे,'' सेहवाग उत्तरला. 

पत्रकार त्या उत्तरानं चिडला आणि त्यानं उलट विचारलं ः ''क्रिकेटच्या कोणत्या क्षेत्रात सामान्य आहे?'' 

''बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व क्षेत्रांत सामान्य आहे,'' चेहऱ्यावरची रेषा हलू न देता सेहवाग म्हणाला. 

सेहवागच्या उत्तरानं बांगलादेशी पत्रकार जाम भडकले. पत्रकार परिषद संपल्यावर सेहवाग माझ्याजवळ आला आणि त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकत चालत जाताना कानात सांगितलं ः ''अच्छा किया ना...जरा उकसाया उनको. अब कल जोरमे खेलेंगे वो लोग. खुन्नस होगी तो जरा तो अच्छा खेलेंगे...वरना ये फुद्दू टीम के खिलाफ खेलने के लिये मोटिव्हेट कौन करेगा? मेरी मॉं?'' असं म्हणाला आणि हसायला लागला. 

झालं! दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत सेहवागच्या वक्तव्याला पहिल्या पानांवर स्थान देऊन भारतीय संघ बांगलादेशच्या चांगल्या संघाला कमी लेखतो, हे तिखट-मीठ लावून सांगितलं गेलं. तो सामना आपण 113 धावांनी जिंकला; पण तेव्हापासून बांगलादेश संघानं सेहवागशी पंगा घेतला. 

भारताच्या बलाढ्य संघाला 2007 साली विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या सामन्यात पराभूत केल्यावर बांगलादेशी संघाच्या आशा चांगल्याच उंचावल्या होत्या. काय माहीत नाही; पण भारतीय संघाला आपण प्रत्येक सामन्यात पराभूत करू शकतो, असं त्यांना वाटायला लागलं होतं. 2011 मध्ये विश्‍वकरंडकाच्या उद्‌घाटनाचा सामना भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान- तेसुद्धा बांगलादेशात- होणार असल्यानं उत्साहाचं एक उधाण आलं होतं. परत एकदा विश्‍वकरंडक सामन्यात बांगलादेश संघ भारतीय संघाला पराभवाचा धक्का देणार, अशी खात्री बांगलादेशी खेळाडूंना आणि चाहत्यांना वाटत होती. सामन्याच्या तयारीच्या निमित्तानं प्रशिक्षक पीटर कर्स्टननं संघाची बैठक बोलावून योजना आखताना चर्चा सुरू केली. वीस मिनिटांनंतर सेहवाग चर्चेत भाग घेणं सोडाच; पण चक्क शिट्टीवर गाणं वाजवताना बघून कर्स्टन भडकला. चर्चेत सहभागी होत नाही, लक्ष देत नाही म्हणून तो सेहवागवर वैतागला. सेहवागनं शेवटी सांगितलं ः ''2007 मध्ये घडलं, तो अपघात होता. इतकी चर्चा करायला बांगलादेश संघ महान नाही. 'जब बॅटिंग आयेगी तो बस जाओ और मारो,''' असं म्हणत सेहवाग निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सेहवागनं अशक्‍य आक्रमक भलीमोठी शतकी खेळी करून सामना सहज जिंकून द्यायला मदत केली. 

हे दोन किस्से आज आठवले, कारण बांगलादेश संघ भारतीय संघाला खास करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पराभूत करायची खुमखुमी बाळगून आहे, हे वारंवार दिसून आलं आहे. हे मान्य करावंच लागेल, की कसोटी क्रिकेटमध्ये जास्त मजल बांगलादेश संघ मारू शकला नसला, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगला खेळ करून ते कोणालाही 'नडतात.' 

जात्याच आक्रमक 
आपल्याला वाटतं, की पाकिस्तानी संघ मुळात आक्रमक आहे; पण इतकं क्रिकेट बघितल्यावर बांगलादेश संघाचा आक्रमकपणा जास्त डोळ्यात येतो. मैदानावर ते खूप आरडाओरडा करत खेळतात. बांगलादेशी भाषेत भरपूर 'स्लेजिंग' करतात. पंचांचा निर्णय जरा चुकला, की आकांडतांडव करतात. सामना मोठ्या फरकानं गमावला, तरी पंचांच्या एका चुकीनं सामना गमावल्याचं हजार वेळा बोलून दाखवतात. 

निदहास स्पर्धेतल्या शेवटून दुसऱ्या सामन्यात तोच आक्रमकपणा बघायला मिळाला. पंचांनी गोलंदाजांनी टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू 'नो बॉल' दिला नाही, म्हणून एरवी शांत असणाऱ्या कर्णधार सकीब अल हसननं तीव्र निषेध नोंदवत मैदानावरील फलंदाजांना खेळ सोडून परत येण्याचे हातवारे केले. मेहमदुल्लानं डोकं शांत ठेवून गरजेच्या धावा चोपून काढल्या आणि सामना जिंकून दिला. सामना जिंकल्यावर बांगलादेशी खेळाडूंनी 'नागीण नाच' केला, ज्याच्यामध्ये त्यांची आक्रमकता परत दिसून आली. 

अंतिम सामन्यात चांगला खेळ करून बांगलादेश संघानं भारतीय संघाला अडचणीत टाकलं असताना दिनेश कार्तिकनं अफलातून फटकेबाजी करून अशक्‍य झालेला विजय साकारून दिला. अंतिम सामना गमावला असता, तर बांगलादेश संघ तोऱ्यात फिरताना दिसला असता- जणू काही प्रत्येक सामन्यात ते भारतीय संघाला पराभूत करत आले आहेत. 

दुटप्पी अंपायर आणि सामना अधिकारी 
मैदानावरच्या गैरवर्तणुकीकडं आयसीसीचे सामना अधिकारी दुटप्पी धोरणानं बघतात आणि वेगवेगळी शिक्षा सुनावतात, हे बऱ्याच वेळा बघायला मिळालं आहे. जवळपास एकाच प्रकारच्या चुकीकरता दोन सामना अधिकारी वेगवेगळे निकष लावतात, हे मान्य करणं कठीण जातं. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत गैरवर्तणुकीच्या बऱ्याच ठिणग्या पडल्या. निदहास स्पर्धेदरम्यान बांगलादेशी खेळाडूंचं वर्तन चांगलं नव्हतं. दर वेळी पंच आणि सामना अधिकारी वेगवेगळे निकष लावताना दिसले. काही पंच आणि सामना अधिकारी जात्याच नियम काटेकोरपणे पाळणारे असतात, ते कठोर शिक्षा सुनावतात. त्या उलट काही पंच आणि सामना अधिकारी मवाळ स्वभावाचे असले, तर ते मवाळ शिक्षा सुनावतात. थोडक्‍यात सांगायचं, तर चुका काहीही केल्या, तरी शिक्षा काय मिळणार हे सामना अधिकाऱ्याच्या स्वभावावर आणि मैदानावरच्या पंचांनी नोंदवलेल्या अहवालावर अवलंबून असतं. बऱ्याच वेळा ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश खेळाडूंचं गैरवर्तन पंचांनी 'हिट ऑफ द मोमेंट' सदरात टाकून काणाडोळा केलेला मी अनेक वेळा अनुभवला आहे. 

लक्ष्मणरेषा ठरवणारे ते कोण? 
पहिला कसोटी सामना जिंकताना ऑसी खेळाडूंचं मैदानावरचं गैरवर्तन हाताबाहेर जात असताना स्पष्ट दिसत होतं. डेव्हिड वॉर्नरनं फलंदाजी करणाऱ्या क्विंटन डिकॉकला बऱ्याच वेळा टोचून बोलले. सामना जिंकल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतताना वॉर्नर आणि डिकॉकमधे बाचाबाची झाली. फलंदाजी करत असल्यानं डिकॉक मैदानावर काही बोलला नाही- कारण त्याला एकाग्रता राखायची होती. सामना संपल्यावरही वॉर्नरचे टोमणे थांबले नाहीत, तेव्हा डिकॉकनं उलट सुनावलं, तर वॉर्नरला राग आला. लक्षणीय गोष्ट म्हणजे आपल्या खेळाडूची बाजू घेताना ऑसी खेळाडूंनी सांगितलं, की 'वॉर्नरनं रेषा ओलांडली नाही... उलट डिकॉकनं सभ्यतेची रेषा बोलताना ओलांडली.' 

काही खेळाडूंशी या विषयावर बोलणं झालं असता एक जण म्हणाला ः ''मला हे कळत नाही, की सभ्यतेची 'लक्ष्मणरेषा' ठरवणारे हे ऑसी खेळाडू कोण लागून गेलं? जेव्हा कोणी माणूस कोणाला चिथावणी देतो किंवा चिडवतो, तेव्हा एक तर तो कोणत्या मुद्‌द्‌यावर चिडेल-रागावेल किंवा प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिडवणाऱ्या माणसानं त्याला चिडवलं गेलं, तर मग स्वीकारायची तयारी नको का ठेवायला? ऑसी खेळाडू अव्याहतपणे बोलत असतात- मग त्यांना चिडवल्यावर राग का येतो? ऑसी खेळाडू वाट्टेल ती वैयक्तिक टिप्पणी करतात आणि समोरच्या खेळाडूनं रागाचा भडका उडून त्यांच्यावरून किंवा त्यांच्या कुटुंबावरून बोललं, की मग त्यांना राग का येतो? रागाचा पारा चढवायला ते सतत प्रयत्न करतात हे विसरून कसं चालेल? आणि मग रागाचा भडका उडाल्यावर बोलणारा खेळाडू विवेकबुद्धी कायम ठेवून बोलेल, ही अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आहे!'' 

दुसऱ्या खेळाडूनं मत व्यक्त करताना म्हणाला ः ''पहिली गोष्ट म्हणजे कोणताही ऑसी कर्णधार गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला मैदानावर सुधारणा करायला सांगत नाही. 'स्लेजिंग' चालू असलं आणि त्याची पातळी घसरत असली, तरी बोलत नाही आणि मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, की आम्ही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही, म्हणून मोकळे होतात. पॉंटिंग वाट्टेल ते बोलायचा तेव्हा स्टीव्ह वॉनं त्याला रोखलं नाही. मग पॉंटिंग कर्णधार झाला, तेव्हा त्यानं गैरवर्तणूक करणाऱ्या मायकेल क्‍लार्क किंवा सायमंड्‌स यांना रोखलं नाही. मग मायकेल क्‍लार्क कर्णधार झाल्यावर त्यानं डेव्हिड वॉर्नरला रोखलं नाही. थोडक्‍यात काय, तर ऑसी कर्णधार झाल्यावर ते खेळाडू सभ्यतेची टोपी चढवून स्वत: बोलणं बंद करतात; पण दुसऱ्या खेळाडूच्या गैरवर्तणुकीला पाठीशी घालतात. म्हणून सभ्यतेची रेषा काय आहे, हे ठरवण्याचा त्यांना हक्कं नाही.'' 

कगिसो रबाडानं शिकण्याची गरज 
दक्षिण आफ्रिकेचा गुणवान वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आक्रमक गोलंदाज आहे, तसाच तो आक्रमक माणूस आहे. फलंदाजाला बाद केल्यावर मैदानावरची त्याची वर्तणूक चुकीच्या मार्गावर जायचे स्पष्ट संकेत भारताविरुद्धच्या मालिकेत दिसून आले होते. भडकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर त्या स्वभावाचं रूप अजून आक्रमक झालं, ज्यानं रबाडाचं गैरवर्तन नजरेत भरले. स्टिव्ह स्मिथला बाद केल्यावर रबाडानं आनंदोत्सव साजरा केला, ज्यात क्रिकेटची सभ्यता नव्हती. रबाडावर दोन कसोटी सामने गमावण्याची शिक्षा ठोठावली गेली होती- जी आयसीसीनं कमी केली. आता उरलेले दोन कसोटी सामने रबाडा खेळू शकेल. हे मान्य केलं, तरी कगिसो रबाडा आणि त्याच्यासारख्या असंख्य तरुण गुणवान खेळाडूंना मैदानावरील आपली वर्तणूक योग्य ठेवायला वेगळं मार्गदर्शन करावं लागणार आहे. 

दुसऱ्या बाजूला आयसीसीला पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाकडं आणि अहवालाकडं लक्ष द्यावं लागणार आहे. समान चुकांना वेगवेगळे नियम लावले गेले नाही पाहिजेत आणि सर्वांत मोलाची बाब म्हणजे कर्णधार आणि मैदानावरच्या पंचांनी खेळ चालू असताना परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवायला जबाबदारी घेतली पाहिजे. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे, ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे, हे नाकारून चालणार नाही; पण क्रिकेट सभ्यतेची ऐशीतैशी करणाऱ्या खेळाडूंना लगेच वेसण घातली नाही, तर खेळाची रया जाईल आणि मग ते नुकसान भरून निघणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com