छोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

bhagyashree bhosekar-bidkar
bhagyashree bhosekar-bidkar

मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि दुसरीकडं प्रेमाचा गुंता सोडवणं अशा दोन पातळीवर लढणाऱ्या दोघांची गोष्ट ही सिरीज मांडते. घराचा शोध या विषयातले एकेक कंगोरे मांडतामांडता त्यावर खुसखुशीतपणे भाष्य करणाऱ्या या सिरीजविषयी...

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. मुंबईसारख्या शहरात अन्न आणि वस्त्र हे तरी त्यातल्या त्यात लवकर उपलब्ध होऊ शकतात; पण निवारा मिळणं फार कठीण. असं म्हणतात, की मुंबईत सर्वात कठीण गोष्ट कोणती तर घर शोधणं/मिळवणं! त्यात स्वतःच घर अशी कल्पना असेल तर मग अजून कर्मकठीण. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज "मुंबापुरीमधला घरशोध' या कल्पनेवर आधारलेली आहे. दोन तास वीस मिनिटांची ही सिरीज नेटफ्लिक्‍सवर तूम्ही पाहू शकता. नेटफ्लिक्‍सवर नुकत्याच आलेल्या "सॅक्रेड गेम्स', "लस्ट स्टोरीज' या वेब सिरीज खूप गाजल्या. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही सिरीज या सगळ्या वेब सिरीजच्या आधी आली होती आणि तिलादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

संजय चक्रवर्ती हा इंजिनिअर झालेला मध्यमवर्गीय घरातला मुलगा एका बॅंकेत आयटी डिपार्टमेंटमध्ये काम करतो. त्याचं त्याच्या बॉससोबत म्हणजेच राशी मॅडमसोबत "अफेअर' सुरू आहे. "अफेअर' कसलं एकतर्फी प्रेम म्हणता येईल- कारण राशीची त्याच्यामध्ये कसलीच भावनिक गुंतवणूक नाहीये- उलट ती संजयला एखाद्या नोकराप्रमाणं वागवतेय. राशी एक विवाहित स्त्री असून, तिचा पती सध्या भारतात नसल्यानं ती संजयकडं नवऱ्याची उणीव (शारीरिक) भरून काढणारी एक संधी या दृष्टीनं पाहतेय. ती संजयला हाक मारताना पण "स्लेव' अशी हाक मारते. संजय हा कामात मेहनती मुलगा आहे. त्याचं स्वप्न आहे राशीशी लग्न करायचं आणि स्वतःच्या घरात संसार थाटायचा. संजय सध्या त्याच्या आई-वडिलांसोबत रेल्वे क्वार्टर्समध्ये राहतोय- जिथं त्याला कसलीही स्पेस नाहीये आणि ही स्पेस मिळवण्यासाठीच त्याची धडपड सुरू आहे. आता हिरॉईनबद्दल जाणून घेऊयात. करिना डिसूझा ही मुलगी संजय जॉब करतोय त्याच बॅंकेत जॉब करते. ती आपल्या विधवा आईसोबत मुंबईतल्या एका ख्रिश्‍चन चाळीत राहतेय. ही चाळ अत्यंत जुनी झाली असून, हे घर कधीही पडू शकतं आणि मग आपण काय करणार याची सततची चिंता करिनाच्या आईला लागून राहिलेली असते. करिना एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे ज्याचं नाव आहे सॅम्युअल अर्थात सॅम. करिनाचंदेखील एक स्वप्न आहे की सॅमसोबत लग्न, स्वतःचं छोटंसं का होईना घर, बाहेर दोघांच्या नावाची पाटी आणि आईला आत्तापर्यंत जे सुख मिळालं नाही ते द्यायचं- आईला कॅनडात सुखाचं जीवन जगायला पाठवायचं! सॅमचं कुटुंब मात्र सुखवस्तू कुटुंब आहे, त्याला करिनाची घालमेल समजू शकत नाहीये. त्याला वाटतं करिनानं हे घराबिराचं स्वप्न सोडून द्यावं. बॅंकेची फुटकळ नोकरीही सोडून द्यावी. तिनं फक्त माझं ऐकावं, पार्ट्या एंजॉय कराव्यात आणि जे अर्थातच करिनाला मान्य नाहीये.

... तर "आपलं स्वतःच घर असावं" असं कॉमन स्वप्न असणारे संजय, करिना एका पार्टीत भेटतात. डान्सच्या निमित्तानं त्यांची एकमेकांशी ओळख होते. हळूहळू मैत्रीदेखील होते. मग एकमेकांच्या रिलेशनशिपमधल्या निगेटिव्ह बाजू समोर येऊ लागतात. दरम्यान एक जाहिरात निघते, सरकार विवाहित जोडप्यांसाठी "जीवनसाथी' ही योजना राबवू पाहत आहे- ज्यात विवाहित जोडपी स्वतःचं घर घेऊ शकतात आणि तेही कमी किंमतीत. ही जाहिरात संजय आणि करिनाच्या मनात भरलेली असतेच; पण त्याचे पार्टनर्स मात्र या योजनेत जराही रस दाखवत नाहीत. उलट संजयचं राशीसोबत आणि करिनाचं सॅमसोबत ब्रेकअप होतं आणि मग संजय आणि करिना या स्कीमकडं हताशपणे पाहत बसतात. मग संजयच्या डोक्‍यात कल्पना येते, की आपण दोघं (संजय आणि करिना) या स्कीमसाठी अप्लाय करू आणि पुढचं पुढं पाहू. समजा ऍप्लिकेशन नाकारलं गेलं, तर निदान आपण आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न तरी केले ही भावना मनात राहील. सुरुवातीला करिना यासाठी तयार होत नाही; पण मग मात्र तीही यासाठी तयार होते.

आता इथवर कथेचा प्रवास साधा आणि सरळ आहे; पण पुढं मात्र कथा वेगवेगळी वळणं घेते. संजय, करिना स्कीमसाठी अप्लाय करतात, ते घर मिळवण्यासाठी कागदपत्रांचा "जुगाड'ही करतात. हे करताकरता त्यांच्यामध्ये भावनिक गुंतवणूक निर्माण होते; पण त्यांचे पूर्वीचे पार्टनर्स पुन्हा त्यांच्या आयुष्यात या ना त्या कारणानं येत राहतात- ज्यामुळं गुंता अधिक वाढतो. यामुळं संजय, करिनाच्या नात्यातला विश्वास डळमळीत होऊन हे नातंदेखील तुटण्याच्या मार्गावर येऊन पोचतं. मग घर महत्त्वाचं की आपलं एकमेकांवरचं प्रेम? मुळात आपण घराच्या स्वप्नासाठी एकमेकांवर प्रेम करतो का?... या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची संजय-करिनाची धडपड एकूणच कथेचं महत्त्व वाढवते. हा गुंता सुटतो का? संजय, करिनाचं नातं पुन्हा जुळतं का? या नात्यावर त्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? आणि त्यांच्या घराच्या स्वप्नाचं काय होतं?... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेब सिरीज पाहून मिळवणं इष्ट ठरेल.

संजयची मुख्य भूमिका विकी कौशल या गुणी अभिनेत्यानं केली आहे. "मसान', "राझी', "संजू' अशा अनेक चित्रपटांमधून उत्तम काम केलेला विकी कौशल या वेब सिरीजमध्येही मध्यमवर्गीय, स्वप्नाळू मुलगा म्हणून शोभून दिसतो. करिनाची मध्यवर्ती भूमिका केलीय अंगिरा धर या अभिनेत्रीनं. टीव्हीवरच्या अनेक टीव्ही जाहिरातींत, वेब सिरीजमध्ये काम केलेली ही अभिनेत्री करिनाच्या फ्रेश लूकमध्ये सुंदर दिसते, तिच्या डोळ्यांत घराचं स्वप्न सतत दिसतं. इतर मुख्य पात्रं म्हणजे संजयच्या आईची भूमिका करणाऱ्या सुप्रिया पाठक ("खिचडी' फेम हंसा भाभी) आणि करिनाच्या आईची भूमिका करणाऱ्या रत्ना पाठक या बहिणींनीदेखील सुंदर अभिनय केलाय. टिपिकल ख्रिश्‍चन बोलणाऱ्या आणि आपली मुलगी एका हिंदू मुलाशी लग्न करू पाहतेय म्हटल्यावर टेंशन घेणाऱ्या रत्ना पाठक "ब्लॉसम आंटी' म्हणून शोभून दिसतात, तर त्याउलट हा त्या दोघांचा विषय आहे आणि आपल्याला इतकी गोरी सून मिळणार म्हणून खूश होणाऱ्या सुप्रिया पाठक संजयची आई म्हणून वातावरणातला ताण हलका करतात. रेल्वेमध्ये अनाऊन्सरची नोकरी करणाऱ्या; पण गाणं गाण्याची खूप आवड असलेल्या- संजयच्या वडिलांची भूमिका केली आहे रघुवीर यादव यांनी.
कथा टिपिकल बॉलिवूड प्रेरित असली, तरी त्यातलं नावीन्य, सरप्राईज एलिमेंट टिकून राहिल्याचं जाणवतं. शेवटच्या अर्ध्या तासात कथेचा थरार एका वेगळ्याच वळणावर पोचतो आणि प्रेक्षकांना धक्के मिळतात. अशी सुंदर कथा लिहिली आहे उत्तम अभिनेते आनंद तिवारी आणि "पर्मनंट रूममेट्‌स' फेम सुमित व्यास यांनी. सिरीज दिग्दर्शित केलीय आनंद तिवारी यांनी. काहीतरी हलकंफुलकं आणि चांगलं पाहायचं असेल, तर "लव्ह पर स्क्वेअर फीट' नक्कीच बघितली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com