ते जीवनदायी झाड (भारत सासणे)

ते जीवनदायी झाड (भारत सासणे)

कुणीतरी एखादं रोप लावतं...रुजवतं...हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातं. त्याचं झाड बनतं. कालांतरानं झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जाते... मात्र त्या व्यक्तीनं मागं ठेवलेलं ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्‍वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होऊन होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत ! केवढ्या मोठ्या ‘हिरव्या आनंदा’ला मुकतात ती माणसं...

 मी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडूलिंब नव्हे. आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. लसलशीत हिरवंगार आणि चैतन्यमय. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त. सगळा आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून-करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडं शुष्क कोरडी जमीन. घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे.

खरं तर भिंतीच्या उंचीचं झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली ‘काळीभोर सावली’ असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान-मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं, की या झाडाखाली गोगलगाईंची वस्ती आहे. इतक्‍या मोठ्या आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं, की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच; परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबरटेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता.
लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्‍चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काड्याकाड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं, की गुंजांच्या डोळ्यांची, लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं.

चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. जणू गातं-बहरतं संगीतमय झाड!  तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. त्या सगळ्याचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्‍वासनाचं, विश्‍वासाचं ठिकाण झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्‍वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्‍वासन ‘कंठोकंठी’ दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्याथव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं.

झाडाखाली मुंग्याचंही एक वेगळंच विश्व होतं. अनेकरंगी किडेसुद्धा त्या दलदलीत होते. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. झाडावर खारीची वस्ती तर होतीच; पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवनप्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही; परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. ही फुलं चिमुकली, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्‍वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक. फुलचुखे चिमुकले पक्षी आणि भुंगे. एका छोट्या फांदीवर मधमाश्‍यांचं पोळंही रचलं जाऊ लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं; पण त्या माश्‍यांनी कधी कुणाला दंश केला नाही.

‘सजीवांसाठी जीवनदायी केंद्र’ अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं; पण इतकंच नव्हे तर, माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होत होती.
ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त-मोकळं झाड. त्या झाडाला तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजुषीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत, लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होतं...सगळ्यांसाठीच!

म्हणजे असं की, माणसं, पशू-पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्‍वासन आणि जगण्याचा दिलासा...

इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्य घराची हकीकत मी सांगतो आहे, ती एक जोडइमारत होती. ट्‌विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते, त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होतं. मात्र, त्यांच्या अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली, संत्रस्त वाटत. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे; परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी ‘हिरवा आनंद’ पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्‍वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. जो माणूस एखादं झाड जगवतो, तो निसर्गात एक ‘हिरवा चमत्कार’ रुजवत असतो. हे लिंबाच झाडच बघा ना! ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं, ती बाई इथून निघून गेली होती; परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्यामागं ठेवून गेली. दरवर्षी, दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार. फुलं येत असणार. घमघमाट दरवळत असणार आणि मग एक आख्खा फलोत्सव...फळांचं लगडणं...हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या-नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो; पण शेजारची ती माणसं...? ती अनेक वर्षं त्या घरात राहत आलेली होती; परंतु न त्यांनी ते ‘हिरवं कौतुक’ पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस-अंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशीच वाटत राहिली मनानं. त्याउलट ते झाड.  

ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा ‘हिरवा संदेश’ दूरवर पोचवणं यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितिक्षम होत असावं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्‍वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत! आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत.
- त्या जीवनदायी झाडानं आपल्या ‘हिरव्या भाषे’त मला असं बरंच काही काही सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com