...त्यापेक्षा स्वातंत्र्यच चांगलं! (भारत सासणे)

...त्यापेक्षा स्वातंत्र्यच चांगलं! (भारत सासणे)

गरीब लेखक उठला. त्यानं पायांत चपला सरकवल्या. तो हसून त्या दोन्ही लेखकांकडं पाहात राहिला आणि म्हणाला, ‘‘एकूण तुमचं बरं चाललं आहे... पण माझंही काही वाईट चाललेलं नाही...गळ्यात साखळी अडकवून घेण्यापेक्षा आणि एखाद्या गुरूच्या घराची किंवा मठाची राखण करण्यापेक्षा उपेक्षा परवडली... त्यामुळं निदान आत्म्याचं स्वातंत्र्य तरी अबाधित राखता येईल...’’

इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकाच्या आधीच ही आश्‍चर्यकारक बोधकथा इसापनं आपल्याला सांगून ठेवलेली आहे. आजसुद्धा या कथेतला बोध अत्यंत समर्पक असा आहे. या कथेचं हे आधुनिक रूप....एका गावात एक गरीब लेखक राहत होता. गरीब म्हणजे स्वभावानं गरीब. आपलं लेखनाचं काम निष्ठेनं पूर्ण करण्याकडं त्याचा कल असायचा. त्यामुळं तो लेखकांच्या टोळ्यांमध्ये कधी सामील झाला नव्हता. त्याऐवजी, त्याचा स्वतःचा एकांडा असा लेखनाचा प्रवास चालू ठेवण्यावर त्याचा विश्‍वास होता. संख्येनं अतिशय थोडे असे गुणग्राहक रसिक त्याचे चाहते होते आणि त्यांच्यामध्ये या गरीब लेखकाला अतिशय मान होता. मात्र, साहित्यविश्‍वातले प्रस्थापित असे मोठे-मोठे सन्मान आणि पारितोषिकं त्याला प्राप्त झाली नव्हती. तरीही तो समाधानी होता. तथापि, काही एक उदासीनता त्याच्यात निर्माण झाली होतीच.
एकदा त्याला ‘साहित्यनगर’ या प्रसिद्ध शहरातून ‘चुकून’ बोलावणं आलं. चुकून एवढ्यासाठी म्हणायचं, की त्याला यापूर्वी कधी बोलावणं आलं नव्हतं. साहित्यविश्‍वातल्या घडामोडी घडवणाऱ्या साहित्यनगरीत जाण्यासाठी गरीब लेखक नाही म्हटलं तरी उत्साही झाला होताच. मजल दरमजल करत तो साहित्यनगरमध्ये येऊन पोचला.

त्याचं स्वागत करण्यासाठी एकच कार्यकर्ता उपस्थित होता. सुकलेल्या फुलांची माळ घाईघाईनं त्याच्या गळ्यात घालून कार्यकर्त्यानं लेखकाचं स्वागत केलं. कार्यकर्त्याचं नाव माधवराव असं होतं. माधवराव लेखकाचे कडवे असे वाचक आणि चाहते होते. लेखकाला स्कूटरवर बसवून माधवरावांनी त्यांना सभागृहाकडे नेलं. सभागृह छोटंसं, दुर्लक्षित आणि उदास असं होतं. श्रोतृवर्गाची संख्या फक्त आठ होती आणि त्यापैकी दोघं खुर्च्या लावणारे होते. तेही नंतर उठूनच गेले. लेखकानं विचलित न होता, शांतपणे सहा श्रोत्यांसमोर आपल्या लेखनाची भूमिका प्रामाणिकपणे मांडली आणि साहित्यविषयक गंभीर असं व्याख्यान दिलं. या शहरात लेखक मंडळींच्या आपापल्या टोळ्या असून, आपल्या या छोट्याशा साहित्य मंडळाकडं कोणाचंच लक्ष नसतं, अशा स्वरूपाची तक्रार माधवरावांनी केली. लेखकानं ऐकून घेतलं; पण प्रतिक्रिया दिली नाही. उलट म्हटलं, ‘‘तुमच्या साहित्यनगरामध्ये लेखक रामराव आणि श्‍यामराव राहतात, असं मी ऐकून आहे...त्यांना मला भेटता येईल का?’’
माधवराव दचकले. म्हणाले, ‘‘त्यांचे लेखनक्षेत्रातले गुरू आज याच नगरात आलेले आहेत...त्यामुळं ते दोघं त्यांच्या दिमतीला असतील...त्यातून तुमच्यासारख्या लेखकानं त्यांच्यासारख्यांना भेटून काय उपयोग? निष्पन्न काहीच होणार नाही! तरी पण तुम्ही म्हणताच आहात, तर मी तुम्हाला त्यांच्याकडं नेऊन सोडतो... मी मात्र थांबू शकणार नाही...’’

अशी चर्चा झाल्यानंतर माधवरावांनी लेखकाला स्कूटरवर बसवून रामराव-श्‍यामरावांकडं नेऊन पोचतं केलं. अर्थात दोघांना आधीच फोनवर कल्पना दिली होती. रामराव-श्‍यामरावांनी लेखकाचं स्वागत केलं आणि म्हटलं, ‘‘आज आमचे गुरू आले आहेत... त्यांच्याबरोबर आमची सखोल अशी चर्चा सुरू होती... पण तुम्ही आला आहात, हे समजल्यानंतर वेळात वेळ काढून आम्ही आलो!... तुम्हाला भेटून आनंद झाला...’’

लेखकसुद्धा आनंदी झाला होताच. चहापान करताकरता तो भिंतीवरच्या कपाटांमध्ये ठेवलेल्या लठ्ठ आणि मोठमोठ्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या पारितोषिकांकडं कौतुकानं पाहत राहिला. मग म्हणाला, ‘‘तुमचं बरं चाललंय असं दिसतंय...हे मोठमोठे पुरस्कार, हे सन्मान! त्यातून वेगवेगळ्या साहित्यपत्रिकांमधून तुम्हा दोघांची होणारी चर्चा याचा मला नाही म्हटलं तरी थोडा हेवा वाटतोच...नाही तर आम्हाला कोण विचारतो?’’
रामरावांनी हसून म्हटलं, ‘‘पण तुमचा विशिष्ट असा चोखंदळ वाचकवर्ग आहे...आणि तुम्हाला त्या वर्तुळात मानसुद्धा आहे...’’
श्‍यामरावांनी म्हटलं, ‘‘तुम्ही आमच्या गुरूकडं आलं पाहिजे भेटायला!...नंतर तुम्हालासुद्धा पुरस्कार मिळू शकतील...’’
लेखकाला आश्‍चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘‘खरं म्हणता? पण मी भेटून काय होणार आहे?’’
‘‘तुम्हाला सार्वत्रिक मान्यता आणि मोठमोठे सन्मान मिळतील...’’
‘‘पण मला काय करावं लागेल?’’
‘‘काही नाही!...आमचे गुरू ‘शतकातले सर्वांत श्रेष्ठ आणि एकमेव असे कादंबरीकार आहेत,’ असं म्हणायचं... गुरूंसमोर आणि नंतर गावी गेल्यानंतरसुद्धा! ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या लेखांमधून हेच मत मांडत राहायचं... आणि...’’ लेखकाला अतिशय आश्‍चर्य वाटलं. तो दोघांकडं, भिंतीवर लावलेल्या सन्मानपत्रांकडं आणि कपाटातल्या लठ्ठ पुस्तकांकडं पाहत राहिला. मग त्यानं विचारलं, ‘‘आणि काय?’’
श्‍यामरावांनी हसून म्हटलं, ‘‘आणि गुरूंच्या विरोधात कोणी काही बोललं, तर प्रतिवाद करायचा...तसंच गुरूंनी केलेली विधानं नेहमीच बरोबर असतात, असं सांगून समर्थन करायचं...बसल्या जागी हे सगळं केलं, की आपोआपच पारितोषिकं प्राप्त होतील...’’
त्याच वेळेस एक कार्यकर्ता दोन पुस्तकं घेऊन आला. त्यानं ती पुस्तके टेबलावर ठेवली आणि निघून गेला. रामरावांनी हसत हसत; पण नम्रपणे म्हटलं, ‘‘आमच्या दोघांच्या नव्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत... त्या तुम्हाला भेट द्यायच्या आहेत...कृपया स्वीकार करा...’’

श्‍यामरावांनी दोघांचे दोन लठ्ठ ग्रंथ म्हणजेच कादंबऱ्या गरीब लेखकाला भेट दिल्या आणि हात जोडून नमस्कार केला. गरीब लेखक कादंबऱ्या चाळू लागला. चाळता-चाळता म्हणाला, ‘‘अहो, पण या दोन्ही कादंबऱ्या तुमच्या गुरूंनीच लिहिल्यासारख्या वाटतात...तीच भाषा, तोच प्रभाव, तीच शैली!’’
‘‘अगदी तसंच नाही! पण आमच्या गुरूंची शैली ही अंतिम असून, अभिव्यक्तीचा तोच खरा मार्ग आहे...’’
रामरावांनी घाईघाईनं विषय बदलून म्हटलं, ‘‘मग चलायचं ना त्यांच्याकडं? एक अनौपचारिक सभासुद्धा आहे लेखकांची...त्यामध्ये तुम्ही गुरूंच्याबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे झालं...’’
गरीब लेखक उठला. त्यानं पायात चपला सरकवल्या. तो हसून त्या दोन्ही लेखकांकडं पाहत राहिला आणि म्हणाला, ‘‘एकूण तुमचं बरं चाललं आहे...पण माझंही काही वाईट चाललेलं नाही...गळ्यात साखळी अडकवून घेण्यापेक्षा आणि एखाद्या गुरूच्या घराची किंवा मठाची राखण करण्यापेक्षा उपेक्षा परवडली...त्यामुळं निदान आत्म्याचं स्वातंत्र्य तरी अबाधित राखता येईल...’’
इतकं बोलून आणि नमस्कार करून गरीब लेखक शांतपणे बाहेर पडला. रामराव आणि श्‍यामराव यांचे चेहरे उतरून गेले.

* * * * *
इसापनं सांगितलेली प्राचीन बोधकथा अशी आहे -
- एकदा एक रानकुत्रा अर्धपोटी आणि हलाखीच्या अवस्थेत भटकत असताना त्याची भेट दोन पाळीव कुत्र्यांबरोबर झाली. दोनही कुत्र्यांची पोटं भरलेली होती आणि ते सुदृढ होते. ते सुखात राहत असल्याचं दिसत होतं. रानकुत्र्यानं म्हटलं, ‘‘तुमचं बरं चाललं आहे असं दिसतं...तुमची पोटं भरलेली आहेत...खायलाही मिळत असेल...माझं मात्र तसं नाही...मी इथं-तिथं भटकत मिळेल ते खातो...मला तुमच्यासारखा सन्मान काही मिळालेला नाही...’’

एका कुत्र्यानं म्हटलं, ‘‘आम्ही आमच्या मालकाकडं काम करतो...त्याच्या घराची राखण करतो...त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्यावर भुंकतो...त्याचं समर्थन करतो...त्या बदल्यात आम्हाला पोटभर जेवण मिळतं आणि सन्मानसुद्धा मिळतो...तूही आमच्या मालकाकडे चल...ते तुला नोकरी देतील...किती दिवस असा भटकत राहणार आहेस? तुला सुख मिळेल...’’
रानकुत्र्याला सल्ला योग्य वाटला. तो म्हणाला, ‘‘चला तर मग!...’’
आणि मग तिघंही शहरातल्या मालकाच्या वाड्याकडे चालायला लागले. चालता-चालता रानकुत्र्याचं दोन्ही पाळीव शहरी कुत्र्यांच्या गळ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, ‘‘पण तुमच्या दोघांच्या गळ्यावर या खुणा कसल्या?’’
एका कुत्र्यानं हसून म्हटलं, ‘‘अरे, त्या तर साखळीच्या खुणा आहेत...अनेकदा आम्हाला बांधून ठेवलं जातं...’’ रानकुत्रा चालता-चालता थबकला आणि म्हणाला, ‘‘गळ्यात साखळी बांधून घेण्यापेक्षा उपाशी राहून भटकत राहिलेलं काही वाईट नाही...निदान आत्म्याचं स्वातंत्र्य तरी अबाधित राहील...तुमची गुलामगिरी तुम्हालाच लखलाभ होवो...’’
आणि मग रानकुत्रा एकटाच पुन्हा रानाकडे निघून गेला.

...राजनिष्ठा ही एकमेव निष्ठा मानली जाण्याच्या काळात इसापनं स्वातंत्र्याची महती गायलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्यांची आणि गळ्यात साखळी बांधून घेणाऱ्यांची संख्या तेव्हाही कमी नसणार. आजदेखील अशांची संख्या कमी नाही. इसापनं सांगितलेली ही बोधकथा आजसुद्धा बोलकी आणि मर्मावर बोट ठेवणारी आहे.
...म्हणून तर ही प्राचीन बोधकथा आधुनिक संदर्भात मी सांगितली तुम्हाला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com