जात-धर्माचे विष मुलांच्या मनात कोण कालवतेय?

जात-धर्माचे विष मुलांच्या मनात कोण कालवतेय?

एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला. 

‘शिस्त म्हणजे काय’ इथून या विषयावरील चर्चेला तोंड फुटले. वेळेवर शाळेत न येणे, वह्यांची पाने फाडून वर्गात कचरा करणे, ढकलून देणे, हाणामारी करणे किंवा इतरांना इजा होईल असे वागणे, शिव्या देणे, खोटेपणाने वागणे, चोरी करणे, झाडांची पाने ओरबाडणे, गणवेश घालून शाळेत न येणे, सांगितलेला अभ्यास/गृहपाठ न करणे... ‘शालेय शिस्ती’विषयी मुलांनी आपापले मुद्दे मांडले. मी मुलांचे मुद्दे शांतपणे ऐकून घेत केवळ चर्चेचे संचलन करत होतो. इतक्यात, शाळेची मुख्यमंत्री मयूरी उभी राहिली. जराशी तावातावानेच बोलू लागली. तिची ती स्टाइल आहे. म्हणाली, “सर, आमच्या वर्गातल्या पोरी जाती-जातीत फरक करायला लागल्याय. मधल्या सुटीत ठाकराच्या पोरी त्याच पोरींना घेऊन वेगळे खेळत्यात. आमाला त्यांच्यात खेळायला घेती नाही. मग आपल्या शाळेच्या शिस्तीला काय अर्थ उरला?”

‘शाळेची शिस्त’ या विषयावर शाळेच्या परिपाठात नेहमीप्रमाणे अगदी हलक्याफुलक्या मूडमध्ये सुरू झालेल्या या चर्चेने आता अचानक गंभीर वळण घेतले. मयूरीने चर्चेत आणलेला मुद्दा आम्हा शिक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा होता. 

आमचे ‘अपयश’ हे की शाळेतल्या मुलांत असे काहीतरी पसरले आहे, याबाबत आम्हाला काहीच माहीत नव्हते. आमच्या गावात आदिवासी आणि हिंदू राहतात. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. गावातले लोकं अगदी गुण्यागोविंदाने नांदत आलेत. यात्रा, जत्रा, सण-उत्सव, लग्न असे सगळे एकत्र येऊन साजरे करत आलेत. गावातच जन्म झालेला असल्याने लहानपणापासून बघत आलोय.

मुलींमध्ये ‘तू तू मैं मैं’ असे वातावरण तयार होण्यास कोणतेही तात्कालिक कारण घडलेले नव्हते. आधी म्हटल्याप्रमाणे याला विशिष्ट पार्श्वभूमी नव्हती. किंबहुना म्हणूनच शाळेतली लहान लहान मुलं असा काही विचार करत असतील, याचा शिक्षकांना अंदाज नव्हता. मयूरीने हे वास्तव सर्वांसमोर ठेवत त्याकडे लक्ष वेधले तेव्हा तो आमच्यासाठी धक्काच होता. बरीच चौकशी केल्यावरही या ‘रोगाची लागण’ कशी झाली हे समजेना! रोज सकाळच्या परिपाठात शाळाशाळांमधून मुले ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत...’ अशी प्रतिज्ञा घोकत असतात. पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रीय एकात्मता विषयावर भर दिलेला असतो. पाठ्यपुस्तकांतले पाठ, त्यात जाणीवपूर्वक लिहिलेल्या मुलांच्या नावा-आडनावावरून पुस्तक सर्वसमावेशक असल्याचे दिसते. याचा मतितार्थ असा की शाळा आणि शिक्षक जाती-धर्माच्या आधारे भेदाभेद करायला शिकवतात, असे दिसत नाही. मग मुलांच्या मनात हे विष नेमके कोण कालवतंय? शिक्षक म्हणून या अत्यंत संवेदनशील प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. तशी मनातली अस्वस्थता वाढतच चालली होती... काही शिक्षक मित्रमैत्रिणींना हा प्रसंग सांगितल्यावर असे समजले की, या गोष्टी त्यांच्याही शाळांत सुरू आहेत. मराठवाड्यातल्या शिक्षक मित्राने त्याच्या शाळेतला प्रसंग सांगत अत्यंत दाहक वास्तव अधोरेखित केले.

मुलांचे सामाजिकीकरण 
अलीकडेच राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटाच्या शाळा बंद करताना तेथील मुलांचे सामाजिकीकरण होत नसल्याचे कारण पुढे केले होते. आमची शाळा सव्वाशे पटसंख्येची असूनही, इथे असे काही सुरू आहे. यातून कमी पटसंख्या आणि सामाजिकीकरणाचा संबंध जोडणे किती तकलादू आहे, हे स्पष्ट होते. शिवाय मुलांचे सामाजिकीकरण केवळ शाळेत होत नसते, हेही ठळकपणे अधोरेखित होते.

खरे म्हणजे वेगवेगळ्या जाती-धर्मांची मुल शाळेत येतात. खेळतात, भांडतात, हाणामाऱ्या-धिंगामस्ती करतात, घरी जाताना सारे विसरून कट्टीची बट्टी घेत गळ्यात गळे घालतात! हेच मुलांचे खरेखुरे जगणे असते. असे असले तरी कोणासोबत दोस्ती करायची, कोणासोबत डबा खायचा, कोणाच्या शेजारी बसायचे, कोणासोबत खेळायचे, याबाबत अनेक आई-वडील मुलांना सूचना देताना दिसतात. मुलांचे असे वागणे-विचार करणे समजून घेताना या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करता येत नाही! शाळांमधले विशिष्ट सांस्कृतिक, सामाजिक वातावरण मुलांच्या वागण्यावर मोठा प्रभाव टाकते. शिवाय जन्मल्यापासून वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मुले अनेक गोष्टी ऐकतात, बघतात. घरातल्या मोठ्यांच्या चर्चा ऐकतात. मुलांचे मन टीप कागदासारखे असते. बातम्यांमधून, सिनेमांतून, मालिकांमधून अनेक इष्ट-अनिष्ट गोष्टी मुलांच्या मनावर येऊन आदळतात. मनात घर करतात.

एक आणखी पार्श्वभूमी या सगळ्याला असावी. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यात, देशात विशिष्ट घटना-घडामोडी घडत आहेत. त्यातून सामाजिक अभिसरण सुरू आहे. वेगवेगळ्या जातींचे प्रचंड मोर्चे-प्रतिमोर्चे निघताहेत. महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दलित अत्याचाराच्या घटनांत तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बरेच पुढे आहे. त्याला विविध सामाजिक पदर आहेत. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे या सगळ्याला मोठी प्रसिद्धी देताहेत. सोबत व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांत प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू असतात. विशिष्ट हेतूने लिहिलेल्या पोस्ट पुढे पाठवणे हा ‘सोशल उद्योग’ अत्यंत तेजीत आहे. अशाप्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समाजातले वातावरण मुलांपर्यंत पोचते. यातूनच कदाचित ते एकमेकांचा द्वेष करायला शिकत असले पाहिजेत.

प्रश्न असा पडतो, की शाळेने केलेले संस्कार गेले कोठे? ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...’, ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे...’, अशी प्रार्थना गीते, राष्ट्रभक्तिपर गीते सूर, ताल आणि लयीत म्हणणारी मुलं विशिष्ट परिस्थितीत संयमाच्या परीक्षेची वेळ येते तेव्हा दगड का उचलतात/भिरकावतात? जाळपोळ, हिंसा करायला, प्रसंगी एखाद्या व्यक्तीचा जीव घ्यायला कारणीभूत कसे ठरतात? समाजमाध्यमांत जात-धर्म याला धरून विषारी प्रचार कसा काय करतात? शाळा-शिक्षक तर यातले काहीच शिकवत नाहीत! असे प्रश्न शिक्षक म्हणून पाठ सोडत नाहीत. खोलात जाऊन समजून घेतल्यावर लक्षात येते, की हे संस्कार एकदम उडून किंवा विरून जात नाहीत. निर्णय घेताना कधी शाळा प्रभावी ठरते, तर कधी घर, परिसर, समाज प्रभावी ठरतात. या दोलकाची दोलने सतत सुरू असतात.

समाजात लोकं कसे वागतात, प्रतिक्रिया कशी देतात, हे सारे मुलं व्यवस्थित समजून घेत असतात. मुलांच्या मनात जन्मजात उत्सुकता, कुतूहल असते. मुलांना काय कळते, असे मोठ्यांना वाटते. खरं तर मुलांना भरपूर काही कळते, हेच मोठ्यांना कळत नाही. ही मुलांची अडचण नसून मोठ्यांचे अज्ञान आहे. समोरच्या प्रौढांना योग्य वाटेल, असे वागायचे मुलं सरावाने आणि अनुभवातून शिकतात. मित्रांमध्ये असतात तेव्हाच मुलांचे `नितळ आणि पारदर्शी' रूप दिसते!

मुलांच्या वागण्यावर कोणत्या गोष्टी प्रभाव टाकतात? माध्यमे, समाजमाध्यमे याचे मुलांच्या मनावर नेमके कोणते परिणाम होत आहेत? त्याचे समाजजीवनावर भविष्यात नेमके कोणते परिणाम संभवतात? याविषयी संशोधन झालेले नाही. ते झाले पाहिजे. पाश्चिमात्य देशांचे अनेक बाबतीत अनुकरण करण्यात आपण धन्यता मानतो. मात्र संशोधनासारख्या हव्या त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकायला तयार नाहीत. ही संशोधन संस्कृती रुजायची गरज आहे, अन्यथा भविष्यात याची मोठी किंमत मोजायची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे, हे सांगायला कोणा 'भविष्यवेत्त्या'ची गरजच नाही. आज झालेय असे की समाजासमोरच्या समस्या शिक्षणासमोरच्या समस्या नाहीत आणि शिक्षण क्षेत्रासमोरचे प्रश्न समाजाला आपल्यासमोरचे प्रश्न वाटत नाहीत. ही दरी सांधायचा आणि समकालीन प्रश्नांना, आव्हानांना भिडण्यासाठी मुलांना तयार करायचा गंभीर विचार शिक्षणातल्या आणि समाजातल्या धुरीणांना आज ना उद्या करायलाच लागेल. परिपाठात एका मुलीने उपस्थित केलेला प्रश्न वरवर फारसा गंभीर वाटणारही नाही कदाचित. परंतु त्याची मुळे खूप खोलवर गेलेली आहेत. ती शोधायला, उखडून टाकायला लागतील. त्याशिवाय तरणोपाय नाहीये.

‘निरोगी मुलं देशाची खरी संपत्ती आहे’, असे सुविचार अनेक शाळाशाळांतल्या भिंतींवर रंगवलेले दिसतात. निरोगी असणे म्हणजे इथे केवळ शारीरिक आरोग्य अभिप्रेत नाही. एकमेकांसोबत जगता आले पाहिजे. सामाजिक आरोग्य आणि सहजीवनातला सौहार्द राखता यायला हवा. तसे जमत नसेल तर कोणाला नागरिकशास्रातले नोबेल पारितोषिक मिळाले तरी त्याला काय चाटायचे? स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाहीची चिरंतन मूल्ये आहेत. त्याची जपणूक करायची शिकवण शिक्षण देते. प्रत्येकाला समानतेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलाय. मग जात, धर्म, पंथ, वंश या मुद्यांना धरून मुलांमध्ये भेदाभेद सुरू होतोच कसा? शाळेबाहेरील जगातल्या वास्तवाकडे आमच्या शाळा-शिक्षण दुर्लक्ष करताहेत, त्याचा हा परिणाम आहे की आणखीन काही? मुलांमध्ये हे सारे कोठून येतेय? असल्या प्रश्नांची मालिका संपत नाही. ती संपत नाही तोवर आमचे शिक्षण पास झाले असे कसे मानायचे?

 ९४२२८५५१५१ 
(लेखक प्रयोगशील शिक्षक असून, अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com