भाजपला पर्याय कोण? काँग्रेस ? 

bjp-congress
bjp-congress

भाजपला पर्याय कोण ? तर त्याचे उत्तर काँग्रेस असे द्यावे लागेल. महाराष्ट्राचा विचार केल्यास काँग्रेसकडे कणा असलेला एकही नेता नाही. तरीही पालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याला सर्वांत महत्त्वाचे कारण असे वाटते की ज्यांना आपण असुरक्षित आहोत असे वाटते असा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळतो आहे असे दिसते. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपणच "नंबर वन' असल्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी राज्यात खरा सामना भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. भाजपचा कडवा विरोधक म्हणून काँग्रेसलाच लोक पसंती देत असल्याचे चित्र नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. देशात भाजपचा कडवा विरोधक कोण असा विचार केल्यास अर्थात काँग्रेस असेच उत्तर मिळते. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे किंवा इतर चिल्लर पक्ष भाजपला कधीच आव्हान देऊ शकत नाहीत. दुसरी एक गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्र की शत्रू हेच कळत नाही. पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे मतदारांचाही या पक्षावरील विश्वास हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आपली ताकद या ना त्या कारणाने वेळोवेळी दाखवून दिली. काँग्रेसप्रमाणेच प्रारंभी या पक्षाकडे सर्व जातीजमातीचे लोक आकर्षित झाले होते. तेल्यातांबोळ्यांचा पक्ष म्हणून पाहिले जात होते. दुसऱ्या फळीतील जे नेते होते त्यांच्याकडे पक्षाचे शक्तीस्थळ म्हणून पाहिले जात होते. त्यामध्ये छगन भुजबळ, दिवंगत नेते आर.आर. आबा पाटील, दिलीप वळसे पाटील, दिलीप सोपल, अजित पवार आदींचा समावेश होता. काळाच्या ओघात आबांचे निधन झाले. भुजबळ तुरुंगात आहेत. काही नेते पक्षाबाहेर आहेत तर काही बिनचेहऱ्याचे नेते आहेत. वास्तविक 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली तेव्हा पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी नाही असे बोलले जात होते. पण राजकीय पंडितांचे भविष्य चुकीचे ठरले. पाच वर्षातच युतीला सत्तेवर खाली खेचण्यात या दोन्ही पक्षांना यश आले. पुढे पंधरा वर्षे आघाडीने सत्ता भोगली. मात्र आता अनेक आरोपांच्या पिंजऱ्यात या पक्षाच्या नेत्यांना उभे करण्यात विशेषत: भाजप नेते यशस्वी झाल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप झाले. या पक्षांची प्रतिमा मलिन करण्यात युती यशस्वी झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जशी आघाडी तोडली तशी युतीही तुटली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. बहुमत मिळाले नाही. शिवसेनेने पाठिंबा देण्याअगोदर राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा भाजपला देऊ केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. शिवसेनाही बॅकफूटवर गेली. इतकेच नव्हे तर या नव्या समिकरणाला विरोध करून ती विरोधीपक्षाच्या खुर्चीवर जाऊन बसली. त्यावेळी राज्यातील जनतेने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर घातकी पक्षाची उपमाही नेटीझननी दिली होती. या टीकेतून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सुटले नाहीत. 

राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच भुजबळ तुरुंगात गेले. अजित पवार, सुनील तटकरे यांची जलसिंचनप्रकरणी चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीचेच भ्रष्ट आमदार रमेश कदम तुरुंगात आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत तोंड लपवीत का होईना या पक्षाला लोकांपुढे जावे लागले. भाजप सत्तेवर आल्यापासून जितका शिवसेनेने भाजपला विरोध केला त्यातुलनेत दहा टक्केही विरोध राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही. याला दोन महत्त्वाची कारणे असू शकतात. एकतर आपण भाजप सरकारविरोधात बोललो तर लगेच मुख्यमंत्री चौकशीची फाइल बाहेर काढतात. आपला भुजबळ होऊ नये या भीती पोटीच काही मुलुखमैदानी तोफाही भीतीने गारठल्या आहेत. जर आज आरआर आबा असते किंवा भुजबळ तुरुंगात नसते तर फडणवीस सरकारला या दोन नेत्यांनी "सळो की पळो' करून सोडले असते. पक्षात काही नेते आहेत त्यांनाही उबग आली आहे की हे समजण्यास मार्ग नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रारंभी पाठिंबा दिला. नंतर टीका करण्यास सुरवात केली. हे एक उदाहरण आहे. पण अशी अनेक उदाहरणे देता येतील. जे विरोधी बाकावर बसलेले आहेत पण मुके झाले आहेत. बोलण्याचे किंवा सरकारवर तोफ डागण्यास घाबरतात. जनतेच्या दरबारात या सरकारविरोधात जनमत निर्माण करण्याची चांगली संधी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होती. पण ती त्यांनी गमावली. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना घाम गाळण्याची सवयच राहिलेली नाही. आपण शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची पोरं असल्याच्या वल्गना ते करतात. सरकारविरोधात आंदोलने, निदर्शने करायची कोणी ? ज्या महात्मा गांधीजींनी तुरुंग हे माझ्यासाठी मंदिर आहे असे म्हटले होते. त्याच गांधीजींचा वारसा सांगणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मात्र तुरुंगाच्या भीतीने घाम फुटतो हे वास्तव आहे. 

आज जर देशात काँग्रेस सत्तेवर असती आणि त्यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला असता तर भाजपने काँग्रेसविरोधात रान उठविले असते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेंबींच्या देठापासून आरोळी देत काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याची भाषा केली असती. प्रवाहाविरोधात पोहण्यासाठी जो खमकेपणा लागतो तो या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये(राज्यातील) नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे उच्चमध्यमवर्ग आजही स्वागत करीत आहे. कारण त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराविषयी प्रचंड चीड आहे. भ्रष्ट मार्गाने पैसे कमविणाऱ्यांचा काळा पैसा बाहेर आला पाहिजे असे आजही त्यांना वाटते.  पण, गोरगरीब जनतेला या निर्णयाची झळ पोचली याचे श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेता आले नाही असे म्हणावे लागेल. 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्या परिवारातील संघटनांच्या वादग्रस्त घोषणांसह काही गंभीर घटना पाहता देशात  अल्पसंख्याकासह इतर समाजही पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे हे चित्रही पाहण्यास मिळत आहे. वास्तविक राज्याचा विचार केल्यास राष्ट्रवादी नेहमीच स्वत:ला काँग्रेसपेक्षा श्रेष्ठ समजते. पण, हळूहळू या पक्षाचा जनाधार कमी होऊ लागला आहे. राष्ट्रवादीने मनसे होऊ नये याची वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा भाजपला पर्याय म्हणून लोक काँग्रेसचा विचार करतील. 

शेवटी राहिला प्रश्‍न तो भाजपला पर्याय कोण ? तर त्याचे उत्तर काँग्रेस असे द्यावे लागेल. महाराष्ट्राचा विचार केल्यास काँग्रेसकडे कणा असलेला एकही नेता नाही. प्रचारातही ढोक असताना मतदार आजही काँग्रेसवर विश्वास दाखवितात. पालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याला सर्वांत महत्त्वाचे कारण असे वाटते की ज्यांना आपण असुरक्षित आहोत असे वाटते असा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळतो आहे असे दिसते. काँग्रेसला संपविण्याची भाषा आजपर्यंत दिग्गजांनी केली पण पक्ष संपला नाही. त्याने फिनिक्‍स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. नोटाबंदीविरोधात इतर सर्वच पक्षाच्या तुलनेत काँग्रेसने जी आघाडी घेतली ती मान्य करावी लागेल. शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल असे बोलले जात होते. पण तसे झाले नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता काँग्रेस संपेल असे बोलले जात होते पण तसेही होताना दिसत नाही. कोणी कोणाला संपवित नाही नाही. काँग्रेसवर आजही लोकांचा विश्वास आहे. हेच या पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांना कळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com