स्वागत नव्या पुस्तकांचे

सुरेंद्र पाटसकर
रविवार, 23 एप्रिल 2017

अफलातून मेंदूची रंजक माहिती

अफलातून मेंदूची रंजक माहिती

आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्‍नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार करायला सुरवात केली, तर मेंदूची कार्यं पाहिली, की चक्रावून जायला होतं. अजूनही मेंदूबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नाही. जी आहे तीही मेंदूलाच मुंग्या आणणारी; पण त्याबाबत उत्सुकता-आकर्षण वाढवणारी आहे. आपल्याला अगदी लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात; पण काल-परवा घडलेल्या घटना अनेकदा आठवत नाहीत. काही वेळा तर अगदी १०-१५ मिनिटांपूर्वी घडलेली घटनाही लक्षात राहत नाही. स्मरण आणि विस्मरणाचं केंद्रही आहे आपला मेंदूच! विश्‍वनिर्मितीच्या शोधाचं आव्हान जेवढं अवघड, तेवढंच अवघड मेंदूच्या मुळाशी जाणं आहे. 

मेंदूच्या विविध कार्यांची ओळख ‘अफलातून मेंदू’ या पुस्तकातून डॉ. अनिल गांधी यांनी करून दिली आहे. मेंदू व मनाची रचना, कार्य, विकार यांची सविस्तर चर्चा डॉ. गांधी यांनी आपल्या पुस्तकातून केली आहे. मेंदू हे बुद्धिमत्तेचं केंद्र आहे; पण बुद्धिमत्ता म्हणजे काय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. आधुनिक जगातला सर्वांत बुद्धिमान माणून म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मेंदूचे तुकडे करून जतनही करण्यात आले आहेत. त्यांचा अभ्यास अजूनही शास्त्रज्ञ करत आहेत. ‘सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल समस्या समजून घेण्याची, नवीन गोष्टी पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता’ अशी व्याख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ५२ शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये केली. काहींनी यात स्मरणशक्तीचा अंतर्भाव केला. बुद्धिमत्तेचं प्रमुख नऊ प्रकारही करण्यात आले. या सगळ्याचा हेतू मेंदू समजून घेणं असाच होता. एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतरही मेंदूचं आपल्याला संपूर्ण आकलन झाल्याचं म्हणता येत नाही. मेंदूचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. तोपर्यंत झालेल्या ‘संस्कारा’च्या शिदोरीवर मेंदू आयुष्यभर काम करतो, असा दावाही संशोधकांनी आता केला आहे. 

संगणकासह सर्व शास्त्रीय शोधांचा जनक हा मानवी मेंदूच आहे. मानवी मेंदूतली ‘न्यूरल नेटवर्क’सारखी रचना अत्याधुनिक संगणकात केल्यानं त्याचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. भाव-भावना, अनुभवाधारित निर्णयक्षमता संगणकाला साध्य होऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी माणसाची सर त्याला येणार नाही. मानवी मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’च्या पद्धतीनुसार मेंदूचा अभ्यास सुरू आहे; पण हा अभ्यासही अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपलं शरीर हे एका वाद्यवृंदासारखं आहे, असं गृहीत धरलं, तर त्याचा संचालक मेंदू आहे. संचालकाकडून चुकीच्या सूचना गेल्या किंवा संचालकाचा तोल गेला, की संपूर्ण शरीराचा तोल ढासळणारच. शारीरिक क्रियांखेरीज सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा या सर्वांचा कर्ताकरविता मेंदूच आहे. 

डॉ. गांधी यांनी पुस्तकाची सुरवात ‘मेंदूवर घाला’ या विषयापासून केली आहे. आधुनिक साधनांद्वारे मेंदू ‘हॅक’ करता येऊ शकतो का, हा याचा मध्यवर्ती विषय. त्यानंतर मेंदूची रचना, एकपेशीय जिवाणूंपासून वनस्पती, प्राणी व मनुष्य यांच्या मज्जासंस्थेची उत्क्रांती, अर्भकाच्या मेंदूची वाढ अशा सर्व विषयांचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. माणसाच्या अथांग मनाचा थांग घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. त्यात लेखकानं शिक्षण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ‘वेदना सखी तू, नसे वैरिणी,’ अशा विचारांतून वेदना असली, तरी ती एक संवेदना आहे, हे उत्तमरितीनं समजावून सांगितलं आहे. मेंदूच्या आजार आणि विकारांवरही सविस्तर चर्चा केली आहे. गंभीर आजारांची माहिती देत असतानाही ती कुठंही फक्त शास्त्रीय न ठेवता सर्वसामान्यांना समजू शकेल, अशा भाषेत लिहिली आहे. धर्माची निर्मिती, उत्क्रांती, मोक्ष यांच्या चर्चेबरोबरच प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्यांचे अनुभव; बौद्ध भिक्‍खूंच्या मेंदूचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेला अभ्यासाची माहिती देतानाच धर्म आणि शास्त्र यांची सांगड कशी घालता येते, यावर डॉ. गांधी यांनी भाष्य केले आहे. 
शास्त्रीय अचूक माहिती देताना ती कंटाळवाणी होणार नाही, याची दक्षता लेखकाने घेतली आहे. प्रत्येकाला आपल्या मेंदूची किमान माहिती तरी असली पाहिजे. ती मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. वैद्यकीय सामान्यज्ञान आणि माहितीचा संगम पुस्तकात आहे. सकारात्मक जीवनशैलीसाठी अंतर्दृष्टी या पुस्तकाद्वारे जागृत व्हावी, ही अपेक्षा!

------

जिवाभावाच्या ‘माणसां’चं मनोज्ञ चित्रण

विजय तरवडे हे नाव मराठी वाचकांना अपरिचित नाही. ‘माणसं’ हा त्यांचा व्यक्तिचित्रसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये पूर्वी प्रकाशित झालेल्या लेखांचं हे संकलन आहे.

‘माणसं’मध्ये एकूण ५० व्यक्तिचित्रं आहेत. त्यातली शेवटची १२ जिव्हाळ्याच्या, अंतःकरणातल्या व्यक्तींची आहेत. आधीची ३८ व्यक्तिचित्रं ही परिघावरच्या, कमी-अधिक परिचयाच्या माणसांची आहेत. त्या दृष्टीनं या संग्रहाचे दोन भाग पडतात.
व्यक्तिचित्रं ५० असली, तरी हे पुस्तक आकारानं भलंमोठं नाही. मूळ लेखन सदराच्या साच्यातलं असल्यामुळं लेख छोटेखानीच आहेत. तरवडे यांची नोकरी एलआयसीची. साहजिकच बदल्यांच्या निमित्तानं ठिकठिकाणी फिरवणारी. अशा नोकऱ्यांमध्ये माणसांचे अनंत नमुने पाहायला, अनुभवायला मिळतात. प्रत्येक गावचं पाणी वेगळं. अर्थात अशा परिस्थितीतही ‘जळी कमळपात्रा’सारखी अलिप्त, कोरडी राहणारी माणसं खूप असतात; नव्हे, तशीच जास्त असतात. मात्र, तरवडे त्यांच्यापैकी नव्हेत. सूक्ष्म निरीक्षण, अप्रतिम विनोदबुद्धी आणि भाषेवर प्रभुत्व हे त्यांचं मूळचं भांडवल त्यांना चांगला लेखक बनवायला पुरेसे आहेच. त्यात समृद्ध वाचनाची भर. त्यामुळं हे छोटे लेख चांगले उतरले नसते तरच नवल. पहिल्या भागात चित्रित झालेली बहुसंख्य माणसं त्यांना नोकरीच्या निमित्तानं ठिकठिकाणी, ऑफिसात, प्रवासात भेटलेली आहेत. काही मित्रमंडळी आहेत. त्या त्या माणसांचा आवाका अर्थातच या छोट्या लेखांमध्ये मावणारा नाही; पण तरवडे यांची निरीक्षणशक्ती त्या त्या माणसातलं वैशिष्ट्य नेमकं हेरून अशा प्रकारे त्यावर प्रकाशझोत टाकते, की त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सारांश वाचकाला कळून जावा. ते जे एकेक वैशिष्ट्य त्या माणसाला इतरांहून वेगळे बनवतं, ते तरवडे यांनी नेमकं पकडलेलं असतं. कुणाचा इरसालपणा, कुणाचा फुकटेपणा, कुणाचा खोडसाळपणा, कुणाचा स्त्रीलंपटपणा, कुणाची दिलदार वृत्ती, निरपेक्ष मदत करायचा स्वभाव, कुणी खोटारडं, तर कुणी प्रामाणिक... मनुष्यस्वभावाचे असे अनेकानेक नमुने. वाचताना वाचकाला मनमुराद हसू यावं. कधी खिन्नही यावी, तर कधी प्रसन्नताही. यातले बरेच लेख प्रसंगवर्णनाच्या किश्‍शांच्या स्वरूपातले आहेत; पण ‘किस्से सांगणं’ हा या लेखांचा उद्देश नाही, तर व्यक्तिमत्त्वचित्रण हा आहे.

संग्रहाचा दुसरा भाग आहे तो तरवडे यांच्या आयुष्यावर खोल परिणाम घडवणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचं चित्रण करणारा आहे. त्यात श्रीकृष्ण वैद्य, ग. प्र. प्रधान, स. शि. भावे असे शिक्षक-प्राध्यापक आहेत. फॅमिली डॉक्‍टर प्रधान आहेत. लेखक सुहास शिरवळकर आहेत. ज्येष्ठ वडीलधारे स्नेही लेखक-संपादक शंकर सारडा आहेत. प्रधान, सारडा आणि भावे यांच्यावर तर दोन दोन लेख आहेत. प्रा. वसंत बापटांवर स्वतंत्र लेख नसला तरी त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाच्या विलोभनीय पैलूंचं; विशेषतः प्रधान सरांवरच्या लेखातून दर्शन घडतं. लेखक जयवंत दळवी यांच्यावरही हृद्य लेख या पुस्तकात आहे. यातले एक-दोन अपवाद वगळता जवळजवळ सगळ्या व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मात्र, तरवडे म्हणतात त्यानुसार, हे सगळे जण त्यांच्या मनात जिवंतच आहेत. या सगळ्यांनी स्वल्प वा दीर्घ कसाही असो, त्यांच्या सहवासातून तरवडे यांच्या जीवनावर अमीट ठसा उमटवलेला आहे...सुंदर, स्मरणीय क्षण त्यांना दिले आहेत. या सगळ्या ‘माणसां’च्या आठवणी हळव्या करणाऱ्या असल्या, तरी ही माणसं आपल्या आयुष्यात आली, त्यांचा परीसस्पर्श झाला, आयुष्य श्रीमंत झालं ही जाणीव तरवडे यांनी छोट्या लेखांच्या मोजक्‍या अवकाशातूनही सुंदर रीतीनं व्यक्त केली आहे. या लेखांमध्ये अलिप्तता नाही, तर अंतःकरणातून उमटलेला जिव्हाळा अगदी स्पष्टपणे प्रकट होतो. त्यादृष्टीनं पुस्तकातले शेवटचे १२ लेख अधिक रेंगाळणारा परिणाम निःसंशयपणे साधून जातात. त्यातून तरवडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही जवळून परिचय होतो.
एकूण, हा व्यक्तिचित्रसंग्रह म्हणजे तुमच्या-आमच्यासारखंच एक सरळ-साधं आयुष्य जगलेला माणूसही ‘लेखकपणा’चे गुण अंगी असले तर चमकदार कर्तृत्व दाखवू शकतो, याचा प्रत्यय देणारा.

प्रा. लीना पाटणकर

Web Title: book review