कलाकृतींच्या निर्मितीची वेधक कहाणी

book review
book review

कलाकृतींच्या निर्मितीची वेधक कहाणी

चित्रपट, नाटकं, गीतं अशा वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकार उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करतात. त्या कलाकृतींचे एकेक पापुद्रे उलगडून पाहणं हा रसिकांसाठी जितका सुंदर अनुभव असतो, तितकाच त्यांच्या निर्मितीचा पट माहीत करून घेणं हाही उत्तम अनुभव असतो. दुर्दैवानं अनेक कलाकार हा निर्मितीचा प्रवास मोकळेपणानं सांगत नाहीत. असंही म्हणता येईल, की ते त्या कलाकृतीच्या निर्मितीनं इतके झपाटलेले असतात, की त्या प्रवासाकडं त्यांना तितकं तटस्थपणे बघता येत नाही. काही कलाकारांना मात्र असं ‘आत-बाहेर’ करणं जमतं. त्यातून ते कलाकृतीच्या निर्मितीची प्रक्रियाही उलगडून पाहतात, दाखवतात आणि मग ही प्रक्रियासुद्धा उत्तम कलाकृती बनते. प्रसिद्ध अभिनेता आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा-चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध भावे यानंही कलाकृतीच्या निर्मितीच्या दस्तावेजीकरणाचं हे महत्त्व ओळखलं आणि ‘घेई छंद’ हे पुस्तक लिहिलं. ‘कट्यार’ हे नाटक आणि ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार’ हे चित्रपट यांच्यावर, त्यातल्या निर्मितीच्या क्षणांवर त्यानं प्रामुख्यानं लिहिलं आहे. त्याचा भर अर्थातच ‘कट्यार’ हे नाटक आणि चित्रपट यांच्यावरच आहे, कारण त्यांची सगळी धुरा त्यानं दिग्दर्शक या नात्यानं सांभाळली. ‘बालगंधर्व’ चित्रपटात तो केवळ अभिनेत्याच्या रूपात दिसत असला, तरी प्रत्यक्षात त्या चित्रपटाची कल्पना सुचण्यापासून चित्रपटाला मूर्त रूप देण्यापर्यंत त्याचा सिंहाचा वाटा आहे. ‘लोकमान्य’ चित्रपटात त्यानं बाळ गंगाधर टिळक यांची चरित्रभूमिका खूप अभ्यासपूर्वक आणि समरसून साकारली. त्यामुळं या चार कलाकृती त्यानं जाणीवपूर्वक निवडल्या आहेत.
सुबोधनं या पुस्तकात केलेलं सगळं कथन खूपच रंजक आहे. एक तर ते ‘सुबोध’ आहेच, शिवाय त्यानं एकेक गोष्ट, प्रक्रिया सहजपणे उलगडून दाखवत प्रवास मांडला आहे. त्यामुळं हा सगळा प्रवासच खिळवून ठेवतो. व्यावसायिक नाटकाकडं वळण्यापासून ‘कट्यार’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर त्यानं प्रांजळपणानं लिहिलं आहे. काही व्यक्तिरेखांचा ‘आवाज’ न मिळणं, भूमिकेच्या अंतरंगात जाता न येणं, मूळ कल्पनेबरहुकूम गोष्टी जुळून न येणं, निर्मितीची गणितं जुळून येण्यात वेळ लागणं, योग्य कलाकार-तंत्रज्ञ न सापडणं अशा किती तरी गोष्टींना त्याला वेळोवेळी सामोरं जावं लागलं. त्यानं त्या सगळ्यांविषयी सांगताना कुठंही आडपडदा ठेवलेला नाही. या कलाकृती तयार होत असताना ‘एका वेळी एकच’ अशा पद्धतीनं त्याचं काम सुरू नव्हतं. नाटक सुरू असताना मालिकांचं काम सुरू असायचं, चित्रपट करत असताना नाटकांचे प्रयोग असायचे, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना अभिनेता म्हणूनही स्वतःचा शोध सुरू असायचा. ही सगळी गुंतागुंतही त्यानं मांडली आहे. हा गुंतागुंतीचा प्रवास सुरू असताना सुबोधला वेगवेगळ्या मनोवस्थांतून जायला लागलं, चिडचिड झाली, नैराश्‍य आलं, वादाचे प्रसंग आले, आनंदक्षणही मिळाले. या सगळ्यांतून कलाकृतींना शेवटापर्यंत नेण्याचं अवघड काम त्यानं कसं केलं हेही पुस्तकातून समजतं. एक कलाकार म्हणून प्रवास करताना माणूस म्हणून तो कसा विचार करत होता, हेही त्यानं छान पद्धतीनं उलगडून दाखवलं आहे. 
‘पुरुषोत्तम’ ते ‘लेकुरे’ नाटकांपर्यंतचा सुरवातीचा प्रवास, संगीताचा ‘छंद’ जडणं, ‘कट्यार’ नाटक बसवतानाची प्रक्रिया, बालगंधर्वांच्या आयुष्यावरचं पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर अभिराम भडकमकर यांच्याकडून संहिता लिहून घेऊन निर्माता मिळवण्यापर्यंतचं झपाटलेपण, बालगंधर्वांची भूमिका सापडण्यापर्यंतची अस्वस्थता, वजन कमी करण्यापासून भावनिक आंदोलनं झेलण्यापर्यंतची कसरत, लोकमान्यांची भूमिका करतानाचा विचार असे सगळे भाग जमून आले आहेत. ‘कट्यार’ चित्रपटात सचिन, शंकर महादेवन यांची दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी निवड का केली, गाणी घेताना जुन्या आणि नवीन गाण्यांबाबत त्याचे विचार काय होते, कॅमेरामनची मदत दिग्दर्शनात कशी झाली, पटकथालेखक म्हणून प्रकाश कपाडियाच का हवे होते, सूत्रनिवेदिका म्हणून रीमा लागूंची निवड कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सांगताना सुबोधनं त्यांच्यामागची कारणमीमांसा खूप छानपणे उलगडून दाखवली आहे. 
पुस्तकात काही किरकोळ त्रुटीही जाणवतात. ‘कट्यार’ नाटक, ‘बालगंधर्व’ चित्रपट यांचा प्रवास त्यानं निवांतपणे उलगडून दाखवला आहे, मात्र, ‘लोकमान्य’ चित्रपट आणि ‘कट्यार’ चित्रपट यांचा प्रवास दाखवताना गती जरा जास्त झाली आहे, असं वाटतं. सुबोधनं यात लपवून काही ठेवलेलं नाही हे खरं असलं, तरी विशेषतः ‘कट्यार’ चित्रपटाचा भाग आणखी नजाकतीनं उलगडून दाखवता आला असता. अर्थात हे खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे. तेवढा किरकोळ भाग वगळता बाकी हा पुस्तकाचा सगळाच प्रयत्न खूप स्तुत्य वाटतो. पुस्तकाचा दर्जा चांगला आहे आणि योग्य ठिकाणी पेरलेल्या छायाचित्रांमुळं कथनाला वजन आलं आहे. पुस्तकाबरोबर ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार’ या चित्रपटांच्या डीव्हीडीही असल्यामुळं त्या कलाकृतींचा पुनःप्रत्ययही घेता येईल. सुबोधनं अगदी योग्य वेळी कलाकृतींच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं ‘डॉक्‍युमेंटेशन’ केलं आहे. अभय इनामदार यांनी शब्दांकनाचं काम सुयोग्यपणे केलं आहे. सुबोध भावेमध्ये एक लेखकही दडला आहे, हे त्याचा हा सगळा प्रवास वाचताना नक्कीच जाणवतं; पण ‘घेई छंद’ या पुस्तकाच्या निमित्तानं सुबोध पहिल्यांदाच लेखक म्हणून प्रत्यक्षपणे समोर आला आहे. हा लेखक यापुढंही वेगवेगळ्या ‘भूमिकां’त दिसत राहील अशी आशा!

राळ व डिंक संशोधन संस्था

आपल्या देशात राळ, डिंक आणि लाख या वनस्पतीजन्य पदार्थांवर संशोधन करणारं एक विज्ञानक्षेत्र झारखंडची राजधानी रांचीच्या उपनगरात आहे. प्राचीन काळापासून या पदार्थांचं व्यवहारातलं महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारनं १९२० मध्ये समिती नेमून अहवाल मागवला होता. त्यानुसार १९२४ मध्ये या पदार्थांच्या उत्पादकांची एक संघटना निर्माण होऊन ‘भारतीय लाख संशोधन संस्थे’ची पायाभरणी झाली. १९३१ ला कार्यरत झालेली ही संस्था अल्पावधीत जागतिक संस्थांशी जोडली गेली. पुढं १९६६ मध्ये या संस्थेची फेररचना होऊन ‘भारतीय लाख संशोधन संस्था’ या नावानं ती आयसीएआरच्या अखत्यारीत आली. अलीकडं २००७ मध्ये विस्तार होऊन या संस्थेचं नामकरण ‘भारतीय नैसर्गिक राळ व डिंक संशोधन संस्था’ (आयआयएनआरजी) असं झालं आहे. राळ, डिंक आणि लाख या पदार्थांच्या अनुषंगानं संबंधित वनस्पतींवर सर्वंकष संशोधन करत उत्पादनवाढीबाबत प्रक्रिया-तंत्रज्ञान विकसित करणं आणि माहिती-ज्ञानाचं शेती-अन्न-औषध व उद्योग-व्यवसायांसाठी हस्तांतरण करणं हा आयआयएनआरजीचा उद्देश आहे.
आयआयएनआरजीमध्ये संबंधित पदार्थांसंदर्भात उत्पादन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान असे प्रमुख विभाग आहेत. यांमध्ये संबंधित वनस्पतींचा शोध घेणं, त्यांचं मूल्यमापन करणं, तसंच गुणवत्ता तपासण्यापासून उपयोजना शोधत शाश्‍वत प्रकारचं जतन करण्यासंदर्भात विविध संशोधन प्रकल्प कार्यरत असतात. संशोधनासाठी असलेली खास जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा व जनुकीय भांडार इथं असून, राळ, डिंक आणि लाख या पदार्थांचं एक खास संग्रहालय हे इथलं वैशिष्ट्य ठरावं. १० हजार पुस्तकं, २० हजार नियतकालिकं व पाच हजार अहवालांचं समृद्ध ग्रंथालय इथं आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि खासगी संस्थांना बरोबर घेऊन आयआयएनआरजी माहिती आणि तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी खेड्यापाड्यांपर्यंत अनेक उपक्रमांचं आयोजन करत असते. 
आयआयएनआरजीमध्ये राळ, डिंक आणि लाख या वनस्पतीजन्य पदार्थांच्या लागवडीपासून तंत्रज्ञान-प्रक्रियांसाठी प्रोत्साहन देण्यापासून मार्गदर्शन करण्यासाठी अल्पकालीन प्रशिक्षण आयोजित केलं जातं. कृषी, वन, पर्यावरण, जैवविज्ञान, तसंच जैवतंत्रज्ञान आणि संबंधित विज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच तंत्रज्ञांसाठी इथं संशोधनापासून कार्यक्षेत्र उपलब्ध असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com