नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी वेध

नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी वेध

स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं. आपलं वाढतं वय आणि प्रकृतीची होणारी आबाळ या दोन्हीहीकडं प्रसंगी दुर्लक्ष करत नेहरू देशभर विविध निमित्तांनी भटकंती करत राहिले. दुसऱ्या महायुद्धातून जग सावरत असतानाच शीतयुद्धाचे ढग अस्तित्व दाखवत होते. दुसरीकडं, ब्रिटनच्या साम्राज्यविश्‍वावरच्या, तसंच फ्रान्ससह अन्य युरोपीय देशांचा वसाहतवादावरच्या वर्चस्वाचा सूर्य अस्ताला जात होता. स्वातंत्र्याच्या हवेची झुळूक अनुभवणारे देश स्वत-चं अस्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत-च्या हातात बळ भरण्यापर्यंत प्रयत्न करत होते. पारतंत्र्याचं जोखड अनुभवल्यानं आता लोकशाहीची मूल्यं रुजवणं, त्याला कोणाचं नख लागू नये, यासाठी हे देश प्रयत्नशील होते. अशा देशांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न नेहरू करत होते. साहजिकच या प्रयत्नांच्या माध्यमातून भारतीय मूल्यपरंपरा, वैचारिकता, सहजीवनाची आदर्श तत्त्वं, अशा अनेकांचा परिचय ते जगाला करून देत होते. भौगोलिकदृष्ट्या विस्तृत आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भारताकडं जग आशेने पाहत होतं. या सर्वांचं भान नेहरू यांना होतं. त्यांची विचारपरंपरा आणि दृष्टिकोन दिवसागणिक येणाऱ्या अनुभवांतून अधिक परिपक्व कसे होत गेले आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न त्यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांनी ‘नेहरूंची सावली’ या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकाचं संपादन पी. व्ही. राजगोपाल यांनी केलं असून, त्याचा मराठीत अतिशय उत्तम अनुवाद सविता दामले यांनी केला आहे. राजहंस प्रकाशनानं सुंदर, वेधक छपाई, दर्जेदार कागद आणि बांधणी याद्वारे ते अधिक वाचनीय आणि आकर्षक केलं आहे.

खुसरो रुस्तमजी यांना १९५२ ते १९५८ या सहा वर्षांच्या देशाच्या उभारणीच्या कालावधीत मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून नेहरूंबरोबर सावलीसारखं राहण्याचा योग आला. अनेक घटनांचे ते ‘याचि देही...’ साक्षीदार असल्यानं त्यांच्या लेखनाला अन्य प्रत्यक्षदर्शी पुराव्याची गरज नाही, हे खरं. व्यक्तिगत रोजनिशी लिहिणं आणि त्यात कामकाजातल्या विविध घटनांची नोंद करण्याच्या रुस्तमजी यांच्या सवयीतून मोठा दस्तावेज नकळत निर्माण होता गेला. नेहरूंबरोबरच्या सहवासाच्या कालावधीतल्या त्यांच्या नोंदींना स्वाभाविकच ऐतिहासिक महत्त्व उत्तरोत्तर आलं आहे. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. सहा वर्षं हा कालखंड छोटा असला, तरी नेहरूंचे झंझावती दौरे, लोकप्रियता, सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रम, काँग्रेसची अधिवेशनं आणि बैठका, अनेकविध देशांचे नेहरूंनी केलेले दौरे आणि त्यांत अनेकदा त्यांच्यासोबत राहण्यामुळं रुस्तमजी यांच्या नोंदी त्या वेळच्या वातावरणावर प्रकाश टाकतातच. शिवाय, त्याबाबत नेहरूंच्या मनात काय चाललं होतं, ते सर्व बाबींकडं कोणत्या नजरेतून पाहत होते, याचं दर्शन पुस्तक वाचताना घडतं.

अगदी अनपेक्षितपणे नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी आलेल्या रुस्तमजी यांना त्यांच्याशी जुळवून घेताना सुरवातीला अतिशय कसरत करावी लागे. नेहरूंच्या विचारांची दिशा, त्यांच्या विधानांमागं दडलेले मथितार्थ समजून घेणं, नेहरू कोणत्या वेळी काय भूमिका घेतात, याचा अंदाज बांधणं आणि विशेषत- दौऱ्यांत असताना जनसागराला सामोरं जाताना ते कसे वागत, सामान्यांचे प्रश्‍न ऐकण्यासाठी जनतेत गेल्यावर त्यांच्याशी कसे समरसून जात, पक्षीय व्यासपीठावर आपली मतं कशी हिरिरीने मांडत, अशा घटनांच्या बारकाव्यानं केलेल्या वर्णनांतून रुस्तमजी यांनी नेहरू या व्यक्तिमत्त्वातले पंतप्रधान टिपले आहेत, तसंच त्यांच्यातलं माणूसपणही टिपलं आहे. नेहरूंची लोकांप्रती असलेली निष्ठा नोंदवायचे, तसे गर्दीला आवरताना होणारी दमछाक आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या प्रसंगांतून बाहेर पडताना होणारी त्रेधातिरपीट आणि त्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांसह स्वत- हातात काठी घेऊन गर्दी आवरण्याची येत असलेली वेळ, या वर्णनांतून त्या वेळच्या जनतेत नेहरूंप्रती असलेली आदरभावना नकळत मांडली गेली आहे. नेहरूंवर हल्ल्यांचे प्रसंग आले, अपघातांचे प्रसंग आले. विमानात झालेला बिघाड आणि राजस्थानात भटकताना जीपनंच कोलांट्या खाल्ल्यानं नेहरूंवर बेतलेला गंभीर प्रसंग, अशा घटना वाचताना अंगावर शहारे येतात. त्याच वेळी नेहरूंसारखा नेता त्याला धीरोदात्तपणे कसं तोंड देता झाला, हेही निदर्शनाला येतं. नेहरूंच्या जीवनशैलीवरही पुस्तकात वेळोवेळी प्रकाश टाकला गेला आहे. साधं अन्न आवडणारे नेहरू भूक लागल्यावर अस्वस्थ कसे व्हायचे आणि खवय्येगिरीवर रसाळ कसे बोलायचे, हे वाचताना रंजक वाटतं. त्याचबरोबर ऐश्‍वर्यदायी राहणीमानाचा आरोप झालेल्या नेहरूंचं वागणं काटकसर करणारं होतं. ते मोजेही शिवून वापरायचे, हे वाचताना वेगळंच वाटतं. लोकसंख्येनं मोठ्या देशाला प्रगतिपथावर नेताना ते किती त्यागशील होते, हेही लक्षात येतं. लोकांच्या मनातलं जाणण्याची गूढ शक्ती नेहरूंकडं होती. त्यामुळंच ते कधीकधी पोलिसांनाही न आवरता येणारी गर्दी आपल्या वाक्‌चातुर्यानं आवरत, त्याचे दाखलेही लेखकानं दिले आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये नेहरू करत असलेली भाषणे, त्यांची कार्यकर्त्यांना समृद्ध करण्यासाठीची तळमळ, अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकतानाच कुठं तरी काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळासारखा जोश राहिलेला नाही, हेही लेखकानं नमूद केलं आहे. अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जावे, त्यांच्या हितासाठी ‘ब्रिटिश राज’च्या मानसिकतेतून बाहेर येऊन काम करावं, देशाच्या विकासाची चक्रं गतिमान होण्यासाठी प्रयत्न करावेत, हे नेहरू तळमळीनं सांगायचे, याची उदाहरणं पुस्तकात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या बांडुंग परिषदेत विविध देशांच्या नेत्यांमधल्या घडलेल्या घडामोडींचे तपशील नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश टाकतात. नेहरूंचं मूल्यमापन आतापर्यंत राजनैतिक अधिकारी किंवा एखाद्या नेत्याच्या चष्मातून वाचकांसमोर आलं आहे; मात्र, एका पोलिसी रांगड्या अधिकाऱ्याच्या नजरेतून नेहरूंच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वर्तणुकीचं अवलोकन प्रथमच समोर येतं आहे. त्यामुळं या पुस्तकाचे वेगळेपण आहे, हे निश्‍चित.

पुस्तकाचं नाव -
नेहरूंची सावली

नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून
संपादन -
पी. व्ही. राजगोपाल
अनुवाद - सविता दामले
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठं - २३६ /
मूल्य - २२५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com