माणसाला अंतर्मुख करणारी ‘संवादक्रांती’

माणसाला अंतर्मुख करणारी ‘संवादक्रांती’

कोल्हापूर ‘सकाळ’च्या वर्धापनदिनी समकालीन महत्त्वाचा एक विषय निश्‍चित करून त्याच्या विविध पैलूंवर त्या त्या विषयक्षेत्रांतल्या मान्यवरांच्या लेखांसह संग्राह्य विशेषांकाची निर्मिती ‘सकाळ’तर्फे कोल्हापुरात होत असते. एक ऑगस्ट २०१० च्या तिसाव्या वर्धापन दिन विशेषांकाचा विषय होता ‘संवादक्रांती.’ तो अंक संपादित करून पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचं कार्य ‘सकाळ वृत्तपत्र समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी केलं आहे.

‘संवादक्रांती’ वाचत असताना जाणवलेली गोष्ट अशी, की सात वर्षांचा काळ उलटला तरी त्या पुस्तकाचं विषयमाहात्म्य गतकाळाइतकंच समकाळातही आहे आणि ते भविष्यकाळातही तितकंच राहील. हे पुस्तक संपादकांनी ‘नवतंत्रज्ञानावर स्वार होऊन नव्या जगात मुलूखगिरी करायला निघालेल्या पिढीस’ अर्थातच युवा पिढीला अर्पण करून मोठं औचित्य दाखवलं आहे खरं; पण माझ्यासारख्या ज्येष्ठांनाही ते ‘अरेबियन नाइट्‌स’च्या सुरस कथांपेक्षा कमी सरस वाटत नाही. याचं श्रेय संवादक्रांतीच्या विविध पैलूंवर लिहिणाऱ्या या ग्रंथातल्या लेखकांना द्यावं लागेल. या लेखांचे विषय संपादकांनी योजनापूर्वक ठरवले होते. त्यातून त्यांची दूरदृष्टी व विषय कवेत घेण्याचा आवाका स्पष्ट होतो. संपर्कसाधनांचे भले-बुरे परिणाम दिसण्याच्या वर्तमानकाळात या ग्रंथाचं प्रकाशन होणं यालाही एक प्रकारची प्रसंगोचितता प्राप्त झाली आहे.

   या ग्रंथातल्या लेखांचं तीन भागांत वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. १) संवादक्रांतीची जादू २) संवादक्रांती आणि बदल ३) संवाद-विसंवाद. पैकी पहिल्या भागातले अधिकांश लेख हे संवादपरंपरेची पूर्वपीठिका सांगणारे आहेत. पूर्वी संदेश कसे पाठवत, ते देणारे हाकारे कसे होते, मग हरकारा कसा आला, तो टपाल कसा पोचवायचा इथपासून ते भारतात संगणक व संप्रेषणक्रांती १९८६ च्या आशियाई क्रीडास्पर्धांच्या निमित्तान कशी उदयाला आली, हे वाचणं मनोरंजक ठरतं.
संवादक्रांतीनं मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत घडवून आणलेले बदल दुसऱ्या भागात अधोरेखित करण्यात आलेले आहेत. पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संवादसाधनं, शेती, प्रशासन, न्यायव्यवस्था, चित्रपट आदी क्षेत्रांत झालेली संवादक्रांती वाचताना वाचक आश्‍चर्यचकित होऊन जातो. संवादक्रांतीनं सगळे अनुकूल बदल घडून आले, असंही नाही. या क्रांतीनं माणसाला आत्मसंवादी बनवलं. तो आभासी नात्यांच्या भ्रामक जगात जगू लागला. त्यामुळं प्रत्यक्ष संपर्क, संवादाच्या संवेदी, सहअस्तित्वाच्या जाणिवांना पारखा होत तो पोरका झाला. याचं शल्य तिसऱ्या भागात वाचायला मिळतं.

या ग्रंथात डॉ. विजय भटकर, ज्ञानेश्‍वर मुळे, डॉ. दीपक शिकारपूर, अतुल कहाते, डॉ. आर. एस. तिवारी, डॉ. अनिल मडके, ॲड. पृथ्वीराज कदम, राजा शिरगुप्पे आदी मान्यवरांचे लेख आहेत. नवा जमाना त्यांनी वाचकांच्या हृदयाशी थेट भिडवला आहे. त्यातून येणारी प्रचीती मात्र भेदक खरी! ग्रंथाच्या आकर्षक मुखपृष्ठावर संवादाचं सगळं विश्‍व सांकेतिक चिन्हांनी प्रतिबिंबित झालेलं दिसतं.

संवादक्षेत्रातल्या मन्वंतराच्या पाऊलखुणा रेखाटणारा नि भविष्याचं भान देणारा असा हा ग्रंथ म्हणावा लागेल. दृश्‍यपरिणामांच्या मागं असलेल्या जगचंही दर्शन या ग्रंथातून आपल्याला घडतं. त्यामुळंच हा ग्रंथ केवळ जग दाखवणारा ‘मॅजिक लॅंटर्न’ न होता, नव्या निद्रेतून जागा करणारा ‘आय ओपनर’ बनला आहे. परिकथासदृश अशा नव्या आभासी जगाची यातली अनुभूती एकाच वेळी वाचकाला आश्‍चर्यचकितही करते नि अंतर्मुखही! आत्मकेंद्री होत असलेल्या माणसाला आंतरसंवेदी बनवण्याचं सामर्थ्य असलेला हा ग्रंथ या काळात तरंगणाऱ्या व तगू इच्छिणाऱ्या सगळ्यांनी वाचायलाच हवा.

पुस्तकाचं नाव -  संवादक्रांती
संपादक - श्रीराम पवार

प्रकाशन - सकाळ प्रकाशन (०२०-२४४०५६७७)
सकाळ पेपर्स प्रा. लि., ५९५, बुधवार पेठ, पुणे- ४११००२
पृष्ठे : १६०,
मूल्य : १६५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com