एका ‘अबोली’ची प्रेरक कहाणी

एका ‘अबोली’ची प्रेरक कहाणी

‘प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स’ हे पुस्तक म्हणजे उज्ज्वला आणि केशव सहाणे या शिक्षक दांपत्याच्या आयुष्यात ‘प्रेरणा’ बनून आलेल्या मुलीची जडणघडणीची कथा. सहा महिन्यांची असताना पॅरॅलिसिसच्या ॲटॅकमुळं लहान वयातच प्रेरणाला कर्णबधिरत्व आणि लुळेपणा आला. योग्य उपचारांनी ती स्वत-च्या पायावर उभी राहायला शिकली; मात्र तिचं कर्णबधिरत्व तसंच राहिलं. प्रेरणाचं हे अपंगत्व स्वीकारून तिला चांगलं आयुष्य देण्याचा चंगच या दोघांनी बांधला आणि अठ्ठावीस वर्षांनंतर ‘प्रेरणाचे आई-बाबा’ म्हणून मिळालेली ओळख ही त्यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याची पावतीच म्हणावी लागेल.

मूळच्या संगमनेरच्या असलेल्या उज्ज्वला कासट आणि केशव सहाणे यांनी आंतरजातीय लग्न करून पुण्याजवळ चाकणला संसार थाटला. सुरवातीचा नोकरीतला संघर्षाचा काळ, पुढचं शिक्षण, बेताचीच कमाई, त्यातच घरखर्च भागवणं अशा ओढाताणीच्या दिवसांतूनही या दोघांनी कष्टानं मार्ग काढला. पुढं मुलगी प्रियांकाच्या रूपानं त्यांच्या संसारवेलीवर फूल उमललं. नोकरी सांभाळून तिच्या बाललीला अनुभवण्यात मजेत दिवस जात होते. सासरच्या मंडळींचाही विरोध मावळला होता. अचानक घडलेल्या एका प्रसंगानं मात्र सहाणे दांपत्यांच्या जीवनाचं ध्येयच बदलून टाकलं. सहा महिन्यांच्या प्रियांकाला पॅरॅलिसिसचा ॲटक आला होता. त्याही परिस्थितीत स्वत-ला सावरून एकमेकांच्या मदतीनं हे आव्हान स्वीकारण्याचा दोघांनी निश्‍चय केला. औषधोपचारांनी आता छोटी प्रियांका स्वत-च्या पायावर उभी राहू शकत होती; पण आवाजाला प्रतिसाद देत नव्हती. त्यातूनच तिला कर्णबधिरत्व आल्याचं निदान झालं. एकामागून एक येणाऱ्या संकटांच्या मालिकेमुळे खचून गेल्यामुळं हे दांपत्य अगदी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपलं होतं. मात्र, एका प्रसंगामुळं आयुष्याकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि प्रियंका हीच त्यांच्या जगण्याची ‘प्रेरणा’ बनून राहिली. त्याच दिवसापासून प्रियांकाची ‘प्रेरणा’ झाली.
दरम्यानच्या काळात दोघांची नोकरी, पुढचं शिक्षण, नोकरीतली बढती, बदल्या, बदल्यांमुळं होणारी ओढाताण सुरूच राहिली. त्यातच प्रेरणाला आता तिच्या भाषेत शिकवण्याची, समजून घेण्याची जबाबदारी येऊन पडली होती. त्यासाठी स्वत- प्रशिक्षण घेऊन त्यांनी तिच्याशी संवाद साधायला सुरवात केली. शालेय शिक्षणाबरोबरच तिच्यातल्या नृत्याची आवड ओळखून तिला भरतनाट्यम शिकवण्यासही सुरवात झाली. तिच्या गुरू शुमिता महाजन यांनीही मोठ्या प्रयत्नांनी या शिष्येला तयार केलं. तिचं अरंग्रेत्रम किंवा इतर कार्यक्रमांतलं सादरीकरण; तसंच रसिकांची दाद या गोष्टी गुरू-शिष्येच्या कष्टाचं चीज झाल्याचंच सांगून जातात.  
प्रेरणाला वाढवत असतानाच  एम.ए. केल्यानंतर उज्ज्वला यांनी पीएच.डी. पूर्ण केली. या सगळ्या प्रवासात केशव यांनी उज्ज्वला यांना तितकीच खंबीर साथ दिली. आई म्हणून प्रेरणाला वाढवताना, तिला जगाची ओळख करून देताना आलेले अनेक विविधांगी अनुभव उज्ज्वला यांनी या पुस्तकात मांडले आहेत. अनेक सहृदयी व्यक्तींनी त्यांचं आयुष्य सुकर केलं. काहींनी अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला; पण त्याकडं दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडं वाटचाल करण्यातच या दोघांनी आनंद मानला. हे निरागस, संवेदनशील अनुभव वाचताना नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात आणि जगण्यातला खरा आनंद उमगतो.

आयुष्यात अनेकदा आलेल्या संकटांनाच संधी समजून एकमेकांच्या सोबतीनं मोठ्या धीरानं त्यांना सामोरं जात सहाणे कुटुंबानं जगण्याचा खरा अर्थ उलगडून दाखवला आहे. म्हणूनच डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी लिहिलेलं ‘प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स’ हे पुस्तक फक्त एका मुलीला वाढवतानाची गोष्ट राहत नाही, तर भौतिक सुखाच्या मागं न लागता जगण्यातला छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवतं. अनेक पातळ्यांवर लढाई सुरू असतानाही तितक्‍याच संयमानं, चिकाटीनं त्यावर मात करण्याच्या जिद्दीची ही रोमहर्षक कहाणी सर्वांनाच प्रेरक ठरणारी आहे.

पुस्तकाचे नाव - प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स
लेखिका - डॉ. उज्ज्वला सहाणे (९९२२२१३६९५)
प्रकाशक - प्रेरणा कम्युनिकेशन, पुणे (९४२२५१८८७२)
पृष्ठं - २३६/
मूल्य - ३५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com