विजयनगर साम्राज्याचा ‘अनुभव’

उदय हर्डीकर
रविवार, 14 मे 2017

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातल्या घडामोडी आणि सनावळी नसतात, तर कोणत्याही देशाची ती कहाणीच असते. इतिहासातून काही धडा घेतला, तर भविष्यकाळ आशादायक ठरतो. भारतासारख्या प्राचीन देशात तर इतिहासाला अमाप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे गोडवे आपण त्यातून गात असतो आणि नंतर पराभवाच्या आणि त्यातून आलेल्या पारतंत्र्याच्या वेदनाही अनुभवत असतो. काळाच्या पटलावर माणूस अगदीच नगण्य; पण काही सम्राट आणि त्यांच्या राजवटींनी मात्र काळावरही आपला अमिट ठसा उमटवला. विजयनगरचं साम्राज्य त्यातलं एक. आजचं हम्पी गतकाळाची साक्ष देत उभं आहे.

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातल्या घडामोडी आणि सनावळी नसतात, तर कोणत्याही देशाची ती कहाणीच असते. इतिहासातून काही धडा घेतला, तर भविष्यकाळ आशादायक ठरतो. भारतासारख्या प्राचीन देशात तर इतिहासाला अमाप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे गोडवे आपण त्यातून गात असतो आणि नंतर पराभवाच्या आणि त्यातून आलेल्या पारतंत्र्याच्या वेदनाही अनुभवत असतो. काळाच्या पटलावर माणूस अगदीच नगण्य; पण काही सम्राट आणि त्यांच्या राजवटींनी मात्र काळावरही आपला अमिट ठसा उमटवला. विजयनगरचं साम्राज्य त्यातलं एक. आजचं हम्पी गतकाळाची साक्ष देत उभं आहे.

काही माणसं इतिहासानं झपाटलेली असतात. एन. शहाजी त्यातलेच एक. एक तप त्यांनी विजयनगराचा अभ्यास केला आणि त्यातून तयार झालं ते ‘वैभवशाली विजयनगर साम्राज्य, जागतिक वारसा स्थळ’ हे पुस्तक. विजयनगर म्हणजे आजचं हम्पी. किष्किंधानगरी, विरूपाक्ष, होसपट्टण, विद्यानगर हीसुद्धा याच विजयनगरची नावं. हरिहर आणि बुक्कराय यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. संगम, साळुव, तुळुव आणि अरविदू या घराण्यांनी इथं राज्य केलं. त्यात हरिहर, बुक्कराय, देवराय, नरसिंह, श्रीकृष्णदेवराय, अच्युतराय, रामराय आणि तिरुमल हे सम्राट विशेष प्रसिद्ध आहेत. १३३६ ते १५६५ हा सव्वादोनशे वर्षांचा काळ म्हणजे विजयनगरच्या वैभवाचा कळस म्हणता येईल. त्यातही तुळुव घराण्यातील सम्राट कृष्णदेवरायाच्या काळात हे नगर वैभवाच्या शिखरावर होतं. हा सम्राट बहुश्रुत विद्वान, उच्च श्रेणीचा कवी, उत्तम शासनकर्ता, कर्तबगार सेनानी, उत्कृष्ट प्रशासक आणि महान योद्धा होता. ‘आमुक्तमाल्यदा’ हा तेलगू ग्रंथ आणि ‘जाम्बवती कल्याणम्‌’ हे नाटक अशी साहित्यरचानाही त्यानं केली.  

हम्पी म्हणजे विजयनगर साम्राज्याची राजधानी. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला हम्पी, उत्तरेला आनेगुंदी आहेत. हम्पीचा परिसर २६ चौरस किलोमीटर परिसरात असून, त्या काळात एवढं वैभवशाली साम्राज्य दुसरं नव्हतं, असा निर्वाळा परदेशी प्रवाशांनी दिला आहे. १९८६मध्ये ‘युनेस्को’नं या स्थळाला जागतिक वारशाचा दर्जा बहाल केला. हम्पीचे अवशेष केंद्रीय पुरातत्व खात्यानं पुन-स्थापित केल्यानं हे सम्राज्य कसं होतं, याचा अनुभव मिळतो.

‘वैभवशाली विजयनगर साम्राज्य, जागतिक वारसा स्थळ’ या पुस्तकात इतिहासाच्या संदर्भात सगळी माहिती देण्यात आली आहे. लेखक एन. शहाजी यांनी या पुस्तकासाठी घेतलेल्या मेहनतीची कल्पना पानोपानी येते. अप्रतिम छायाचित्रं आणि त्याला लेखनाची जोड, यामुळं पुस्तक ‘अनुभवण्याजोगं’ झालं आहे. इब्न बतुता, निकोलो दी कोंती, वार्थोमा (दोघेही इटली), अब्दुर रझ्झाक (इराण), अथेनेशियस निकिटन (रशिया), बार्बोस (पोर्तुगाल) आणि डोमिंगो पेस (इटली) या परदेशी प्रवाशांनी केलेली विजयनगरच्या वैभवाची वर्णनं या पुस्तकात वाचायला मिळतात.

या पुस्तकात हम्पीतलं विरूपाक्ष मंदिर, रथविधी (हम्पी बाजार), बिष्टय्या गोपूर, हेमकूट पहाड, सासिवेकालू गणेश, काडलेकालू गणेश मंदिर, कृष्ण मंदिर, लक्ष्मी-नृसिंह मंदिर आदी स्थळांची माहिती आहे. सम्राट कृष्णदेवरायाचे आसन असलेल्या सिंहानस चौथरा किंवा महानवमी दिब्बा या स्थळाचं वर्णन थक्क करणारे आहे. या चौथऱ्याचा पायथा ४० मीटर लांब, २५ मीटर उंच आणि ८ मीटर उंचीचा आहे. हम्पीचं दुसरं वैशिष्ट्य असलेल्या संगीत स्तंभाविषयीही यात उल्लेख येतो. एकूण ५६ स्तंभ असून, त्याकील ४० स्तंभांना १६ उपस्तंभ आहेत. उपस्तंभावर सूक्ष्म आघात केल्यास संगीत तरंग ऐकू येतात! डमरू, टाळ, पखवाज, मृदंग असे वादक स्तंभांवर असून, तसाच आवाज स्तंभांतून येतो.

या पुस्तकाच्या निर्मितीत कोणताही तडजोड नाही. छायाचित्रं, रेखाटनं आणि मजकूर उत्तम दर्जाचा आहे. मुखपृष्ठावरचं विजय-विठ्ठल मंदिराचे चित्र अप्रतिम असून, त्यामुळं पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढत जाते. सचिन शिरसे आणि सूरज सुरम यांनी काढलेली छायाचित्रं सुरेखच. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मंदिर व मूर्तीतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि पुरातत्वज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाला लाभल्या आहेत. संगम, साळुव साल्व, तुळुव आणि अरविदु वंशांची माहितीही शेवटी देण्यात आली आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आणि ‘अनुभवण्या’साठी हे पुस्तक संग्रही हवंच!

पुस्तकाचं नाव - वैभवशाली विजयनगर साम्राज्य, जागतिक वारसा स्थळ
लेखक - एन. शहाजी
प्रकाशक - विरूपाक्ष प्रकाशन विजयनगर, पुणे, ९४०५००९७२०
पृष्ठं - १८०/ मूल्य - ५५० रुपये

Web Title: book review in saptarang