पारंपरिक खेळांची रंजक माहिती

पारंपरिक खेळांची रंजक माहिती

‘पडला-पडला, आपटला, उडाला, उडवला, धडपडला’...एखाद्या लहान मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकू येतात, तेव्हा कोणता तरी खेळ खेळणं सुरू असेल असं वाटतं; पण प्रत्यक्षात एकटाच मुलगा मोबाईल, आयपॅड किंवा व्हिडिओ गेम खेळताना असं बडबडत असल्याचं दिसतं. अशा प्रकारच्या गेम्समधून मुलांचं मोठं शारीरिक, मानसिक आणि भावनिक नुकसान होतं. त्यातून मग सुट्टीपुरता छंदवर्ग किंवा इतर काही उपाय पालक करतात; पण त्या तात्पुरत्याच मलमपट्ट्या असतात. यावर सकारात्मक, उद्बोधक पर्याय हवे असतील, तर ‘भारतीय खेळ’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

बडोद्याचे तत्कालीन राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थाननं ते त्या काळात प्रसिद्ध केलं होतं. त्या संस्थानच्या शाळा खात्याचे विद्याधिकारी जे. ए. दलाल यांनी संपादित केलेलं पुस्तक गुजराती भाषेत होतं. त्याचा मराठी अनुवाद सयाजीरावांच्याच प्रेरणेनं झाला होता. निरनिराळ्या प्रातांमधल्या खेळांच्या माहितीचं संकलन त्या पुस्तकात होतं. तेच पुस्तक आता पुनर्मुद्रित करण्यात आलं आहे. हे पुस्तक वाचताना आज चाळिशी-पन्नाशीत असलेली पिढीसुद्धा चकित होईल, तर त्याआधीच्या पिढीला कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल. अनेक खेळांची नुसती नावं वाचली, तरी त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. ‘आटक माटक‘, ‘हाटुशा पाणी’, ‘आड बाई आड’, ‘उजू बाई गुजू’ अशी उदाहरणं देता येतील.

नुसता एक चेंडू घेऊन अनेकांना खेळता येतील, असे  अनेक खेळ या पुस्तकात आहेत. ‘सातपाणी’, ‘गोंदे’, ‘रंगणपाणी’, ‘हातपोळी’, ‘चलनपाणी’, ‘हटवणापाणी’, ‘चोरगल्ली’ अशी या खेळांची नावं आहेत. नुसत्या नावावरून खेळाचं स्वरूप कळणं शक्‍य नसल्यामुळं वानगीदाखल यातल्या ‘सातपाणी’ या खेळाची माहिती बघू. या खेळात सहभागी खेळाडूंचा डाव आधी नक्की केला जातो. ज्याचा पहिला डाव येईल, त्यानं चेंडू भिंतीवर मारायचा आणि झेलायचा. पाचव्यांदा चेंडू झेलताच त्यानं एखाद्या गड्याला तो चेंडू फेकून मारायचा. तो अचूक लागताच त्यानंच पुन्हा खेळायचं. हुकला तर पुढचा डाव असलेल्याला संधी मिळते.

फुगडीचेही असंख्य प्रकार या पुस्तकात आहेत. दोन हातांच्या फुगडीशिवाय ‘बस फुगडी’, ‘चौघींची फुगडी’, ‘दंड फुगडी’, ‘एका हाताची फुगडी’, ‘भुई फुगडी’, ‘माकड फुगडी’, ‘कासव फुगडी’, ‘लोळन फुगडी’ अशी गंमतीशीर नावं आहेत. यातल्या काही फुगड्या घालताना गाणी म्हणायची असतात. ‘काथवट कणा, चौघी जणी सुना, पाणी का ग द्याना, का ग प्याना, पायांची माती नणंदेच्या हाती, नणंदेने दिली खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याची वाटी जळून गेली, नकटी नणंद पळून गेली,’ असं ‘लोळन फुगडी’चं गाणं आहे. आणखी एका फुगडीच्या गाण्यात मामा-मामीचा उल्लेख आहे. या गाण्यांमागं मुलांचं पाठांतर व्हावं, त्यांचे उच्चार लयबद्ध आणि स्पष्ट व्हावेत, असे उद्देश हसत-खेळत साध्य होतात.

आट्यापाट्या आणि विटी-दांडू असे खेळ अथक खेळलेली पिढी आता चाळिशी-पन्नाशीच्याही पुढं गेली आहे. त्यांनाही चकित करेल, अशी माहिती या पुस्तकात आहे. आट्यापाट्या खेळल्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना उत्तम व्यायाम होऊन मन प्रसन्न होतं. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्येही याचा उल्लेख आहे.

विटी-दांडू खेळातल्या ‘झक्कूपाणी’ नावाच्या प्रकाराचं वर्णन वाचल्यानंतर तर हे पुस्तक बाजूला ठेवून तो खेळ खेळायचा मोह आवरता येत नाही.  अकबर बादशहाच्या काळात खेळल्या जाणाऱ्या वाटोळ्या गंजिफाची नेमकी पद्धत आता ठाऊक नाही; पण दशावतारी गंजिफा या खेळाचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. नऊ पानांमध्ये नियमांचाही उल्लेख आहे. या पुस्तकात उल्लेख केलेले खेळ खेळण्यासाठी ट्रॅक सूट, स्पोर्टस शूज, टीशर्ट असं काहीही लागत नाही. सोसायटीच्या पार्किंगमध्ये यातले अनेक खेळ खेळता येतील. यावरून ते कालबाह्य झाले नसल्याचं स्पष्ट होतं. उलट हे खेळ म्हणजे आजच्या काळाची गरज आहे, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरू नये. हे पुस्तक घेऊन त्यातल्या काही खेळांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. किमान पालकांनी तरी दोन-चार खेळ मुलांना शिकवले, तर ई-दुष्परिणामांच्या सार्वत्रिक समस्येवर उतारा मिळेल.

पुस्तकाचं नाव - भारतीय खेळ - श्रीमंत सयाजीराव गायकवाड संस्थानचे प्रकाशन
प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, पुणे (९९६९४९६६३४)
पृष्ठं - २०२ / मूल्य - २५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com