आकाशवीराची रोमांचक कहाणी

उदय हर्डीकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

‘यु   द्धस्य कथा रम्या,’ असं म्हटलं जातं. म्हणजे युद्धाच्या कथा वाचायला, ऐकायला बऱ्या वाटतात; पण प्रत्यक्षात त्यात सहभागी असलेल्यांना त्या निश्‍चितच रम्य वाटत नसतात. युद्ध म्हणजे केवळ बॉम्बफेक, गोळीबार, हल्ले-प्रतिहल्ले असं नसतं. डावपेच, मुत्सद्देगिरी, आक्रमण, सहनशीलता अशा अनेक बाबींचा अंतर्भाव असलेली ती एक घटना असते. एका युद्धाचे समाजावर अनेक प्रकारे परिणाम होत असतात.

‘यु   द्धस्य कथा रम्या,’ असं म्हटलं जातं. म्हणजे युद्धाच्या कथा वाचायला, ऐकायला बऱ्या वाटतात; पण प्रत्यक्षात त्यात सहभागी असलेल्यांना त्या निश्‍चितच रम्य वाटत नसतात. युद्ध म्हणजे केवळ बॉम्बफेक, गोळीबार, हल्ले-प्रतिहल्ले असं नसतं. डावपेच, मुत्सद्देगिरी, आक्रमण, सहनशीलता अशा अनेक बाबींचा अंतर्भाव असलेली ती एक घटना असते. एका युद्धाचे समाजावर अनेक प्रकारे परिणाम होत असतात.
संरक्षण दलं म्हटलं, की संघर्ष आलाच. आपल्याकडं गेल्या काही वर्षांत संरक्षण दलांवर लेखन वाढलं आहे. निवृत्त लष्करी अधिकारी आपले अनुभव लिहू लागले आहेत. त्यांचे अनुभव आपल्या सामान्य आयुष्यापेक्षा फार वेगळे असतात. कारण, संरक्षण दलांमधलं जीवनच वेगळं असतं. फक्त शौर्य असून भागत नाही, तर प्रसंगावधानही तेवढंच गरजेचं असतं. हवाई दलातले निवृत्त विंग कमांडर धीरेंद्रसिंह जफा यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर लिहिलेलं ‘डेथ वॉज नॉट पेनफुल’ हे पुस्तक आपल्याला ४६ वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातं. या पुस्तकातली कृष्ण-धवल छायाचित्रं आपल्याला युद्धातल्या असामान्य वीरांचं स्मरण करून देतात. वर्षा गजेंद्रगडकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातलं १९७१ चं युद्ध नेहमीपेक्षा वेगळं ठरलं, ते एका नव्या देशाच्या निर्मितीमुळं. या युद्धातून बांगलादेशाची निर्मिती झाली. हा भाग तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणून परिचित होता. या संघर्षात तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कणखर नेतृत्व जगापुढं आलं. त्याचबरोबर संयमी भारत प्रसंगी कसा आक्रमक होतो हेही दिसलं. या सगळ्या घटनांचे धीरेंद्रसिंह जफा हे साक्षीदार होते.

युद्धाचे पडघम वाजत असताना जफा तेव्हाचे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांचे साहाय्यक (एडीसी) म्हणून काम करत होते. युद्ध दाराशी आल्यावर जफा यांनी हवाई दलप्रमुखांकडं विनंती करून स्वत:च्या युनिटमध्ये जाणं पसंत केलं आणि ते रणांगणावर दाखल झाले. त्यांनी युद्धात पराक्रम तर गाजवलाच; पण बॉम्बफेक करताना त्यांच्या विमानावर मारा होऊन त्यांना विमानातून बाहेर पडावं लागलं. पॅराशूटमधून उतरताना ते जमिनीवर आदळल्यानं त्यांच्या पाठीच्या मणक्‍यांना दुखापत झाली आणि पाकिस्तानचा ‘पाहुणचार’ही त्यांना युद्धकैदी या नात्यानं घ्यावा लागला. या काळात युद्धकैदी झालेले अन्य भारतीय वैमानिकही त्यांच्यासोबत होते. या सगळ्या अनुभवांचे कथन ‘डेथ वॉज नॉट...’ हे पुस्तक करतं. संरक्षण दलांमध्ये काम करणारी माणसं; मग ती कोणत्याही दलांतली असोत किंवा देशातली; एका वेगळ्याच मुशीत घडवली जातात, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. जफाही त्याला अपवाद ठरले नाहीत.

युद्धाच्या काळात लढाऊ विमानांच्या वैमानिकांचं आयुष्य अक्षरश: पणाला लागलेलं असतं. शत्रूवर हल्ला करून सुखरूप परतणं ही वाटते तेवढी सोपी बाब नाही. संरक्षण दलांत काम करणारीही माणसंच असतात. त्यांनाही भीती वाटते, कधी नैराश्‍य येतं, तर कधी विरक्ती. पाकिस्तानच्या कैदेत एक वर्ष युद्धकैदी म्हणून काढताना जफा या अनुभवांतून गेले. या सगळ्याचं प्रतिबिंब पुस्तकात उमटलं आहे. जबर जखमी होऊनही शांत असणारे सहकारी जफा यांच्या लेखनात येतात, दोन्ही बाजूंचा परस्परांवरचा अविश्‍वास डोकावतो, कधी परस्परांवर विनोद केले जातात, टीकास्त्र सोडलं जातं, त्याचबरोबर कैद्यांना ‘घरचं अन्न’ मिळावं म्हणून तुरुंगात जेवण घेऊन येणाऱ्या पाकिस्तानी महिला भेटतात आणि तुरुंगातून पलायनाची योजना आखणाऱ्या तीन सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे मित्रही जफा यांच्या या पुस्तकात येतात.
युद्ध म्हटल्यावर भीती आलीच; पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाताना पाय डगमगले तर कसं होणार? आपल्या एका तरुण सहकाऱ्याचा उल्लेख जफा यांनी केला आहे. या तरुण वैमानिकाची समजूत घालून त्यांनी त्याला युद्धाला तयार केलं. व्यक्ती तितक्‍या प्रकृती, ही उक्ती सगळीकडं लागू पडते. फ्लाईट लेफ्टनंट एम. एस. मल्होत्रा यांच्याबाबत अशी एक घटना पुस्तकात आहे. सोपवलेली कामगिरी वेगळी असताना मल्होत्रा यांनी पाकिस्तानचं ‘मिग-१९’ हे विमान पाडण्याचाही पराक्रम केला होता. त्याचा किस्सा पुस्तकात आहे. युद्धकाळात अनेकदा काही विचित्र प्रसंगही घडतात. स्क्वाड्रन लिडर अमरजितसिंग संधू ((यांच्याबाबतीत घडलेली घटना जफा यांनी नोंदवली आहे. त्यासाठी ‘काला संधू’ हे प्रकरण वाचायला हवं. संधू यांच्या वडिलांनी मुलाची घेतलेली भेट आणि नंतर पुढं त्यांचं संभाषण वाचताना आपण हरवून जातो. या युद्धात अमरजितसिंग संधू यांना वीरमरण आलं; पण त्यांच्या वृद्ध पित्याच्या चेहऱ्यावर आपण एका वीराचे वडील असल्याचं समाधान होतं...

जफा कैदेत असताना स्वातंत्र्याची आस लागलेले त्यांचे तीन सहकारी पलायनाची योजना आखत होते. त्यासाठी ‘हाक स्वातंत्र्याची’ हे प्रकरण वाचलं पाहिजे. या तीन सहकाऱ्यांची मुक्तता अगदी थोडक्‍यात हुकली. अफगाणिस्तानच्या सीमेपासून अवघ्या पाच मैलांवर हे तिघे पकडले गेले. मात्र, संतप्त जमावाच्या तावडीत सापडून मारहाण होण्याचा प्रसंग दिलीप परुळकर यांच्या प्रसंगावधानमुळं टळला. युद्धानंतर पाकिस्तानात झुल्पिकार अली भुट्टो सत्तेवर आले. त्यांनी या कैद्यांच्या तुरुंगाला भेट दिली, तेव्हा युद्धात सपाटून मार खाऊनही त्यांची बोलण्यातली दर्पोक्ती कमी झाली नसल्याचं निरीक्षण जफा नोंदवतात. युद्ध संपल्यावर झालेल्या कराराचे तपशील समजल्यावर या धाडसी वीरांची झालेली तगमग आणि अस्वस्थताही पुस्तकात दिसते. गजेंद्रगडकर यांनी या पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. प्रवाही भाषेमुळं एकापाठोपाठ एक अशी प्रकरणं वाचत राहावीशी वाटतात. सर्वसामान्यांच्या आयुष्यापेक्षा वेगळं जीवन जगणाऱ्या या धाडसी वीरांविषयी समजून घेण्यास हे पुस्तक मदत करतं. शेवटी दिलेल्या परिशिष्टात जफा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची नावं दिली आहेत आणि त्यांची माहितीही. पुस्तक वाचताना ती उपयुक्त ठरते.
‘नभ: स्पृशं दीप्तम्‌’ (आमच्या कर्तृत्वानं आम्ही आकाशाला गवसणी घालू) हे हवाई दलाचं बोधवाक्‍य. ते सार्थ करणारे वीर योद्धे आपल्या कर्तृत्वानं हे बोधवाक्‍य सिद्ध करत आहेत, याची खात्री ‘डेथ वॉज नॉट पेनफुल’ हे
पुस्तक देतं.

पुस्तकाचं नाव :
डेथ वॉज नॉट पेनफुल
लेखकाचं नाव : धीरेंद्रसिंह जफा
अनुवाद :
वर्षा गजेंद्रगडकर
प्रकाशक :
अ. वि. वाळिंबे, अभिजित प्रकाशन, पुणे (फोन : २४४९७७४८)
पृष्ठं : २८८,
मूल्य : ३०० रुपये

Web Title: book review in saptarang