बुद्धम्‌ शरणं गच्छामि!

भारतदेशाला ज्ञानाची, संस्कारांची, युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रांपैकी एक शास्त्र बौद्धदर्शन होय.
Buddha Birthday Buddhist philosophy Guide to India through knowledge culture
Buddha Birthday Buddhist philosophy Guide to India through knowledge culture sakal
Summary

भारतदेशाला ज्ञानाची, संस्कारांची, युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रांपैकी एक शास्त्र बौद्धदर्शन होय.

भारतदेशाला ज्ञानाची, संस्कारांची, युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रांपैकी एक शास्त्र बौद्धदर्शन होय. राजपुत्र म्हणून जन्माला आलेले आणि गयेला बोधीवृक्षाखाली परमशांतीचा अनुभव घेतलेले गौतमबुद्ध हे या दर्शनशास्त्राचे प्रणेते आहेत. वैशाख पौर्णिमेचा (बुद्धपौर्णिमा) आजचा दिवस भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशांत उत्साहाने साजरा केला जातो.

गौतमबुद्धांचा (Gautama Buddha)जन्म झाला तेव्हा राजकीय, सामाजिक परिस्थिती अशी होती की केवळ सत्ता व पैसा हीच सुखाची साधने वाटू लागली होती. भौतिकतेचा हव्यास इतका पराकोटीला पोचला होता की त्यापुढे दुसऱ्याचे सर्वस्व, दुसऱ्याचा जीव मातीमोल ठरत होता. सम्राट अशोक हा त्यावेळचा जगज्जेता राजा, बळ आणि संपत्तीच्या जोरावर हवे ते सुख क्षणार्धात मिळवू शकेल असा. परंतु त्याच्याही जीवनात एक क्षण असा आला की भौतिकता खरे सुख देऊ शकत नाही, समाधानाशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आले आणि तो गौतमबुद्धांना शरण गेला.

राजा अशोकच कशाला? आजही समाजामध्ये कमीअधिक प्रमाणात हेच चित्र पाहायला मिळते. शिक्षण-धंदा, घर-दार, लग्न-मूलबाळ, जबाबदाऱ्या, संकटे यातून पार पडताना फक्त संख्येला, भौतिकाला, स्वतःच्या फायद्याला महत्त्व देण्याची सवय लागल्यास एक क्षण असा येतो की कोणतीही गोष्ट आनंद देऊ शकत नाही. समाधान हा भाव हरवून जातो. यातूनच हळूहळू नैराश्य, त्रागा, अगदी आत्महत्येपर्यंतचे मानसिक विकार मागे लागतात. या समस्येतून बाहेर पडायचे असल्यास गौतमबुद्धांची विचारसरणी आजही मार्गदर्शक ठरणारी आहे.

धनदौलत, ऐषोआरामात जगणं ही सुखी जीवनाची व्याख्या होऊ शकत नाही. इंद्रियांनी धावाधाव करून बाह्य जगातून मिळविलेल्या सुखाला सुख म्हणता येत नाही. जोपर्यंत जीवन समरसतेने कसे जगावे हे समजत नाही, बाहेर भटकण्याऐवजी मन जोपर्यंत आतमध्ये शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत खरा आनंद अनुभवता येत नाही. आयुर्वेदात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘सर्वसंन्यासः सुखानाम्’! सुखप्राप्तीचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे सर्व विषयोपभोगांपासून निवृत्त होणे. कधीही न संपणारा आनंद हवा आहे? कशानेही न ढळणारी शांती हवी आहे? तर त्यासाठी इंद्रियांनी विषयांना सोडून अंतर्मुख व्हायला हवे. आतल्या जिवाशी अनुसंधान साधता आलं तरच परमात्मतत्त्वासह अनुबंध प्रस्थापित होतो आणि त्यातून अनुभव घेता येतो अक्षय आनंदाचा, परमशांतीचा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. इंद्रिय व अंतरात्मा यांच्यामधील दुवा आहे मन.

इंद्रियांकडून आलेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करण्याची, काय बरोबर काय चूक, काय स्वीकारायचे, काय टाकायचे अशा अनेक निर्णयांची जबाबदारी मनावर असते, परंतु या प्रक्रियेमध्ये मन इंद्रियांना, इंद्रियांच्या विषयलोलुपतेला बळी पडते. उदा. आपण रस्त्यावरून जात असतो. एकाएकी सामोसे तळण्याचा वास येतो, नाकातील घ्राणेंद्रियामार्फत तो मनापर्यंत पोचला की मन सामोसा खाण्याच्या इंद्रियाच्या निर्णयाला बळी पडते आणि आपण भूक नसताना, ज्या कामासाठी घरातून निघालो ते तसेच ताटकळत ठेवतो आणि सामोसे खायला बसतो. आयुर्वेदात यालाच ‘प्रज्ञापराध’ असे म्हटलेले आहे. वास घेतला घ्राणेंद्रियाने, इंद्रियाच्या हट्टाला बळी पडले ते मन आणि सामोसा चाखला तो रसनेंद्रियाने, पण तरी अपराध घडला तो प्रज्ञेकडून. असे कसे? याचे कारण मनाने विषयांकडे ओढ घेतली तरी मनाला योग्य-अयोग्य, चांगले-वाईट या दोलायमानतेतून योग्य निर्णय घ्यायला मदत करते ती प्रज्ञा.

धीधृतिस्मृतिविभ्रष्टः कर्म यत्‌ कुरुतेऽशुभम्‌ ।

प्रज्ञापराधं तं विद्यात्‌ सर्वदोषप्रकोपणम्‌ ॥

....चरकसंहिता

बुद्धी, संयमनशक्ती आणि स्मरणशक्ती (म्हणजेच प्रज्ञा) जेव्हा भ्रष्ट होतात, स्वतःचे काम व्यवस्थित करत नाहीत, तेव्हा जे चुकीचे कर्म घडते त्याला प्रज्ञापराध म्हणतात आणि हेच सर्व रोगांचे मूळ असते.

वर दिलेल्या दृष्टांतात मनाला सामोसा सेवन करण्याची इच्छा झाली तरी भूक नसताना आणि काम ताटकळत ठेवून मध्येच समोसा खाणे अयोग्य आहे, हे बुद्धी मनाला समजावू शकते. संयमनशक्ती (धृती) मनाला सामोसा खाण्यापासून परावृत्त करू शकते, मनावर नियंत्रण ठेवू शकते तर स्मरणशक्ती पूर्वी कधीतरी भरल्या पोटी सामोसा खाल्ल्यामुळे झालेला त्रास लक्षात आणून देऊ शकते. अशा प्रकारे बुद्धी, धृती आणि स्मृतीरूपी प्रज्ञेच्या मदतीने मन इंद्रियांच्या इच्छेला बळी न पडता योग्य निर्णय घेऊ शकते.

अर्थात यासाठी बुद्धी असो, प्रज्ञा असो, ती शुद्ध असायला हवी; भ्रष्ट असता कामा नये. भारतीय तत्त्वज्ञानात यासाठी दोन मुख्य उपाय सुचवले, एक भक्तियोग व दुसरा ज्ञानयोग. या दोन्ही मार्गांमध्ये मनाला विषयांपासून परावृत्त करून आतल्या परमात्मतत्त्वावर दृढ करण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. यांच्या योगे मनुष्य प्रेयसाऐवजी श्रेयसाची निवड करू शकतो.

निर्वाणाचा मार्ग

मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो आहोत, तेव्हा यामागे काहीतरी उद्देश नक्कीच असणार. विषयभोगातून क्षणिक सुखाची प्राप्ती हा तर तो उद्देश असू शकत नाही. मग? अक्षय आनंद, परमानंद, आत्मसमाधान आणि परमशांती हाच आपल्या जीवनाचा उद्देश असतो. बौद्ध तत्त्वज्ञानात यालाच निर्वाण असे म्हटले आहे.

जन्माला आलेल्या जिवाची सर्वांत उन्नत अवस्था म्हणजे निर्वाण. आत्मबोधाच्या या अवस्थेत मनुष्याच्या वैयक्तिक इच्छा, वासना व वेदना यांना जागा उरत नाही. मनुष्यजन्माचे हे परमध्येय होय आणि तेथपर्यंत पोचण्यासाठी शरीर, मन, इंद्रिये ही सर्व केवळ साधनमात्र असतात. गौतमबुद्धांनी आतली परमशांती कशी अनुभवावी, त्यात रममाण कसे व्हावे हे अतिशय सोप्या पद्धतीने समजावले. समाजातील वंचित व शोषित घटकांचे ते तारणहार बनले. श्रीमंती व गरिबी यांच्यातील दरी त्यांनी करुणा, व सह-अनुभूती या भावांच्या मदतीने कमी करण्याचा मार्ग दाखवला. स्वतःजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याने जो आनंद मिळतो, जे सुख मिळते, ते इतर कशानेही मिळत नाही. आर्थिक सुबत्ता असणारा समाज जोपर्यंत गरज असणाऱ्याला यथायोग्य मदत करत नाही, तोपर्यंत समाजात समतोल साधला जात नाही. शक्तीच्या, पैशाच्या वा अधिकाराच्या बळावर दुसऱ्याचे शोषण करण्याचा हक्क किंवा प्रसंगी जीव घेण्याचा हक्क कोणालाच नसतो. या प्रेम व शांती संदेशाचा गौतमबुद्धांनी सर्वत्र प्रसार केला आणि मनुष्यजातीच्या कल्याणार्थ तीन नीतीसूत्रे समजावली.

धम्मम्‌ शरणं गच्छामि ।

धर्म या शब्दाचाच हा अपभ्रंश. पण सांप्रत काळी आपण ज्याला धर्म समजतो उदा. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध असा याचा अर्थ होत नाही. धर्म म्हणजे स्वभाव, मूळ गुणधर्म. अग्नीचा धर्म आहे ऊब देणे, शिजवणे. नदीचा धर्म आहे वाहणे, जीवन देणे. वृक्षाचा धर्म आहे छाया देणे, फुले-फळे देणे. अशा प्रकारे सर्व प्राणिमात्रांचा स्वतःचा असा धर्म असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार वागणे म्हणजे धर्माला शरण जाणे. मनुष्याचा धर्म काय? तर ‘मानवता’ हा मनुष्याचा धर्म. गरजवंताला मदत, करणे, सर्वांच्या कल्याणाचे पाहणे, सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणे, आपण निसर्गाचाच एक अंश असल्याचे भान ठेवणे, वृक्षवल्ली, भूमी, पाणी वगैरे नैसर्गिक संसाधनांचा वापर काळजीपूर्वक व आप्तभावाने करणे हे या नीतीसूत्रातून समजते.

बुद्धम्‌ शरणं गच्छामि ।

बुद्धीची उपासना करणारा तो बुद्ध. या सूत्रातून गौतमबुद्ध ज्ञानाचे सार्वभौमत्व स्पष्ट करतात. गोष्टी लक्षात ठेवणे, माहिती गोळा करणे याला ज्ञान म्हणता येत नाही, तर जे अनुभवाने सिद्ध होते व मानवजातीचे कल्याण करू शकते ते ज्ञान होय. सत्याला प्रकाशित करणारे ज्ञानच शांतीचा अनुभव देते, शक्तीचा उत्कर्ष करते. एखाद्याची फसवणूक करण्यासाठी किंवा त्याला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी बुद्धीचा वापर केल्यास त्यातून शेवटी अशांती व दुःखच मिळणार आहे.

संघम्‌ शरणं गच्छामि ।

संघ म्हणजे अमर्याद, अथांग, असीमित. कोणत्याही मर्यादेत अडकून न राहता, छोट्या छोट्या गोष्टीत न रमता आपण या महान विश्र्वाचा एक भाग आहोत आणि विश्र्वाप्रमाणे आपलीही कक्षा अथांग आहे हे समजावणारे हे नीतीसूत्र. विश्र्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो हे एकदा लक्षात आले की स्वतःचे कुटुंब, शेजारची कुटुंबे, गाव वा शहर, देश आणि सरतेशेवटी संपूर्ण पृथ्वी व संपूर्ण विश्र्व या सर्वांप्रती आपुलकीचा, समत्वाचा भाव उत्पन्न होतो. एकत्व, संघत्व हेच शेवटी तारून नेणारे असते आणि म्हणूनच समाजाला एकत्र ठेवणाऱ्या प्रथा, परंपरा, संस्कृती यांना जपणे, सर्वांचे हित डोळ्यांसमोर ठेवून योग्य निर्णय घेणे म्हणजेच संघाला शरण जाणे.

रोजचे जीवन जगताना ही नीतीसूत्रे अंगीकारली म्हणजे स्वार्थापेक्षा मानवतेला महत्त्व दिले, ज्ञानाला आदर दिला, मनात परोपकाराची भावना कायम तेवत ठेवली आणि महत्त्वाचे म्हणजे स्वहितापेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य दिले तर गौतमबुद्धांचा उपदेश खऱ्या अर्थाने अनुभवता येईल आणि आतल्या बुद्धतत्त्वाला प्रसन्न करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com