करिअरची गुरूकिल्ली (डॉ. श्रीराम गीत)

करिअरची गुरूकिल्ली (डॉ. श्रीराम गीत)

मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली एकदाची दहावी आता’ असं जाहीर करून सुटीचा आनंद लुटायला ज्याच्यात्याच्या कुवतीप्रमाणं सारेच बाहेर पडतात. आता जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद मूठ लाखाची असते.

उरलेल्या निम्म्या म्हणजे बारावीची परीक्षा दिलेल्या घरातली परिस्थिती मात्र अस्वस्थतेची आणि उलघालीची असते. बारावी झाली; पण खरी परीक्षा म्हणजे सीईटी, नीट, जेईई व्हायचीच असते. शिवाय अजून इतरही काही परीक्षांची यादीसुद्धा काही घरांत तयार असते. ‘वेल्लोर’, ‘मणिपाल’, ‘एसआरएम’, ‘बिट्‌स’, ‘नाटा’, ‘डिझाइन’, ‘फॅशन’, ‘हॉटेल मॅनेजमेंट’, ‘बीबीए’ वगैरे वगैरेंची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणं संपतच नाही. हिमालयाच्या पर्वतरांगांतल्या ट्रेकमध्ये जसे एकामागून एक डोंगर नव्यानं समोर येत राहतात, तशी या प्रवेश परीक्षांची रांग मुलांच्या, पालकांच्या समोर उभी ठाकत राहते.

यंदाचे निकाल जूनमध्ये लागायला लागले. प्रथम बारावीचा लागला. सुखद पावसाचा शिडकावा यावा अन्‌ त्याचं स्वागत व्हावं, तसाच तो होता. आयसीएसई, सीबीएसई आणि एचएससी अशा तिन्ही बोर्डांचा निकाल अनेकांना पास करून, मार्कांची बरसात करून गेला. सर्वांत आनंदी होतात ते कला शाखेचे विद्यार्थी. इयत्ता दहावीचे मार्क नक्की वाढवून मिळण्याची हमी असलेली ही शाखा. कारण एकच- शास्त्र आणि गणिताचं नकोसं पोतं पाठीवरून कधीच टाकून दिलेलं. कॉमर्समध्ये अकौंट्‌स आणि अर्थशास्त्र यामुळं काहींचे पाय खेचले जातात. मार्कांचा इयत्ता दहावीतला डोंगर थोडासा पोखरला जातो. अभ्यासाची जाणीव तरी होते किंवा कॉमर्स नकोसं वाटायला लागतं. कॉमर्स शाखेतल्या अभ्यासू, हुशार मुलामुलींना बारावीच्या निकालाचं अप्रूप नसतं. कारण त्यांचे डोळे लागलेले असतात ते सीपीटी/ फाऊंडेशनच्या म्हणजेच सीए/ सीएसच्या परीक्षांकडं. मात्र, शास्त्र शाखेतली धामधूम यंदाही दरवर्षीप्रमाणं अनेक कुटुंबांना हादरवून सोडणारी ठरत आहे. त्याचं कारण तसं नेहमीचंच आहे. नीटमधले अपुरे मार्क, ‘नाटा’नं लावलेला मार्कांचा नाट, सीईटीमधून जेमतेम पन्नास टक्के म्हणजे दोनशेपैकी शंभर कसेबसे हाती लागलेले... अशी अवस्था शास्त्र शाखेतल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांची आहे. पुन्हा उन्हाळा आणि पावसाची उपमा द्यायची, तर बारावीचा निकाल हा जोरदार पावसाचा थंडावा देणारा होता; पण दुसऱ्या दिवशी पडलेल्या कडकडीत उन्हामुळं हवेत आलेला नकोसा दमट उकाडा या विविध प्रवेश परीक्षांनी सर्वदूर पसरवलेला होता. या साऱ्यांमध्ये ‘जेईई’, ‘जेईई ॲडव्हान्स’, ‘बिट्‌स पिलानी’, ‘एनआयडी’, ‘एनआयएफटीसाठीचे क्‍लासेस लावलेले; पण यशस्वी मात्र खूप शोधले तर सापडत होते. आकड्यातच मोजायचं झालं, तर सारं मिळून जेमतेम पाचशे ते सहाशे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर दहावीचा निकाल लागला. गंमतीची गोष्ट म्हणजे बारावीच्या मुलामुलींकडं अजिबात न लक्ष देता, त्यांच्या वाटचालीचा अर्थ न लावता, त्यातून काही थोडाफार बोध न घेताच इयत्ता दहावीचे विद्यार्थी मनात स्वप्नं पाहू लागले. मनसुबे रचू लागले. पालकांनी त्या साऱ्यांमध्ये एक छानशी बघ्याची भूमिका ही स्वीकारली ः ‘‘त्याला/ तिला काय करायचं, त्याला आमची संमती आहे, पाठिंबा आहे. कसलीच आडकाठी नाही.’’ 

आज आपण दोन्ही निकालांमधून पालकांनी आणि त्यांच्या मुलामुलींनी काहीतरी आत्मपरीक्षण करावं, बोध घ्यावा, अनेक वर्षांच्या या ऊन-पावसाच्या निकालाच्या खेळातून काही शिकावं याकरताचे मार्ग पाहू या. करिअरची रास्त, उपयुक्त निवडच म्हणा ना याला!

स्वप्नांना बळ हवं वास्तवाचं
पारंपरिकदृष्ट्या डॉक्‍टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं किंवा एनडीएमध्ये जायचं हे लाखोंचं स्वप्न. त्यात सध्या भर पडली आहे आयएएस होण्याची. हा सारा अभ्यासू विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा भाग. इयत्ता दहावीला पंचाऐंशी टक्के मिळाले, की त्या साऱ्यांचा ध्यास घेतला जातो. मग अर्थातच क्‍लासेसची चौकशी. कॉलेजच्या प्रवेशाआधीच त्यांची निश्‍चिती केली जाते. मात्र, यंदाचा नीटचा निकाल, जेईईचा निकाल किंवा सीईटीचा निकाल यांची आकडेवारी फारच क्वचित वाचली जाते. ती समजून घेणं तर फार दूर.

यंदा दोन्ही इयत्तांतल्या पालकांना भेटताना तेही एकाच दिवशी भेटताना हे सतत जाणवत होतं. दहावीचे सारेच विद्यार्थी आणि पालक स्वप्नात दंग होते, तर बारावीचे जवळपास ऐंशी टक्के वास्तवानं हताश झालेले होते. खरं तर दोघांनीही पर्यायी चांगल्या रस्त्याचा म्हणजेच‘ प्लॅन बी’चा विचार केला तर? तो कसा करावा हेच आपण पाहू या ना.

मेडिकल नाही मिळालं, तर पॅरामेडिकलचा विचार करा. एमबीबीएस हाती लागलं नाही, तर डेंटिस्ट्री किंवा    व्हेटरनरीचाही विचार करा. आयुर्वेद किंवा होमिओपॅथीमध्ये सध्या पर्यायी उपचारपद्धती म्हणून संधी वाढत आहेत. ‘आयुष’ या नावानं सरकार त्याच्या प्रसारात सहभागी आहे.

पर्यायी पॅरामेडिकल नको असेल, तर फार्मसीचा उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे डॉक्‍टरांना परदेशी जाणं कठीण आहे; पण बीफार्म करून इंजिनिअरप्रमाणंच आपण एमएस करायला परदेशी जाऊ शकतो. एवढंच नव्हे तर परत येऊन भारतीय वा परकी औषध कंपन्यांत उत्तम नोकरी मिळवू शकतो.

इंजिनिअरिंग म्हणजे आयआयटीचा क्‍लास हे समीकरण पालकांच्या मनातून जाईल, तेव्हा खरं वास्तव सुरू होईल. दहावीचे नव्वद टक्के मार्क म्हणजे आंतरशालेय खेळातलं पदक आहे, तर आयआयटी प्रवेश म्हणजे ऑलिंपिक स्पर्धेचा भारतीय चमू आहे. ऑलिंपिकचं पदक तर नक्कीच नाही. याउलट ‘प्लॅन बी’प्रमाणं जेईईचा क्‍लास लावून सीईटीमध्ये उत्तम मार्क मिळवणं हे ध्येय ठेवलेला सायन्सचा विद्यार्थी चांगला यशस्वी इंजिनिअर बनतो, असा गेल्या तीस वर्षांचा इतिहास सांगतो.

एनडीएसाठी गणित उत्कृष्ट लागतं. कारण त्याचाच पेपर महत्त्वाचा असतो. याउलट एनडीएसाठी सायन्स घेतलेल्या बहुतेकांच्या हातून सीईटी, सायन्स व एनडीए सारंच निसटतं. मात्र, चिकाटी ठेवलेले कोणत्याही - होय कोणत्याही पदवीनंतर - इंडियन मिलिटरी ॲकेडमीमधून अधिकारी बनतात.

न्युरोसर्जन, कार्डिॲक फिजिशियन, मेंदूचा अभ्यास करणारा डॉक्‍टर बनण्यासाठी एकदा-दोनदा नव्हे, तर तीनदा नीटची परीक्षा देऊन दर वेळी त्यातल्या पहिल्या दहा टक्‍क्‍यांत यावं लागतं हे वास्तव. पहिल्या नीटचा यंदाचा निकाल यंदा दहावी पास झालेल्यांनी थोडासा अभ्यासला तर?
 छान छान वाटा, चिकाटी सातत्य असणाऱ्या अनेकांसाठी वाट पाहत आहेत. मात्र त्यातली वर्षं ऐकली, की तो रस्ता नको म्हणणारे दहावी-बारावीचे जवळपास ९९.९९ टक्के विद्यार्थी आहेत. मायक्रोबायोलॉजी, मरिन बायोलॉजी, ओशनोग्राफी, बायोटेक्‍नॉलॉजी, जेनेटिक्‍स, ॲस्ट्रोनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्‍स, एरोस्पेस इंजिनिअरींग, भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र या साऱ्यांमध्ये काम करणारी मंडळी चिकाटी आणि सातत्य या दोन शब्दांच्या आधारावरच उभी असतात. दहावीपासून सातत्यानं ७०-७५ टक्के टिकवत वाटचाल केली, तर यातल्या प्रत्येक क्षेत्रात वाव आहे. जोड हवी ती प्रचंड चौकसपणाची. हुशारी असली, तर वेगानं पुढं जाल. मात्र, चिकित्सकपणा वापराल तर अनुभवातून शिकत राहाल. 

‘इतिहास मला आवडत नाही, अन्‌ भूगोल कठीण वाटतो,’ असं वाक्‍य अनेकदा मी ऐकत असतो. वाचलेल्या माहितीचा अर्थ लावणं असं या दोन्हीमध्ये गरजेचं असतं. अर्थ लागत जातो, तसा त्यातला रस वाढत जातो. मग इतिहासातून चिकाटी आणि सातत्य ठेवलं, तर मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, अनुवंशशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध असे विषय उलगडत जातात. भूगोलातून तर सारीच दुनिया सामोरी येते. कॉम्प्युटरची जोड दिल्यास जिओइन्फर्मेटिक्‍सचा खजिना समोर येतो. दोन्हीची जोड घेतली म्हणजे इतिहास आणि भूगोल यांना एकत्रित आणलं, तर ट्रॅव्हल अँड टूर्समधला गाइड बनतो.

भूगर्भशास्त्र मानवी गरजांचा शोध घेतं. भूगर्भातलं पाणी, तेल, वायू, खनिजं या साऱ्यांचा शोध, उत्खनन याच्याशी संबंधित हे शास्त्र. मात्र, पुण्यासारख्या भल्यामोठ्या शहरात त्याला उणेपुरे पन्नास-साठ विद्यार्थी मिळतात, अन्‌ कॉम्प्युटरच्या मागं सारेच धावून फरपट करून घेतात. कारण त्यात शिक्षण घेता येतं. पदवी मिळते; पण नोकरी मात्र सध्या फार तर दहा टक्‍क्‍यांना कशीबशी मिळते.

ज्यांच्या अंगी नाना ‘कला’...
कोणत्याही बारावीनंतर चित्रकलेतून डिझाइन, ॲनिमेशन, व्हीएफएक्‍स, ग्राफिक्‍स डिझाइन, फॅशन, इंटिरियर, कमर्शियल, आर्टिस्ट असे अनेक रस्ते उपलब्ध आहेत; पण ‘चित्रं काढून पोट कसं भरणार’ या प्रश्‍नावर ऐंशी टक्के पालक अडकतात. वृत्तपत्र उघडलं, तर साठ टक्के जाहिरातींनी ते व्यापलेलं असते. टीव्ही लावला, तर दर दहा मिनिटांनी जाहिरातींचा मारा असतो. चॅनेल कोणताही असो, पडद्यामागं किमान दोन ग्राफिक आर्टिस्ट गरजेचे असतात. जाहिरात कंपन्या, टीव्ही चॅनेल्स, प्रकाशन संस्था, आयटी कंपन्या या साऱ्यांमध्ये सध्या ही मंडळी अत्यंत गरजेची असतात; पण पालक मान्यच करायला तयार होत नाहीत, मुलांच्या हाती चित्रकलेचे कसब असलं तरी ते तसंच राहतं.

कोणत्याही बारावीनंतर लॉजिस्टिक्‍स, इव्हेंट मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्टस मॅनेजमेंट, फिल्म अँड एडिटिंग, मास कम्युनिकेशन, ललित कलांमध्ये बीए, व्हिडिओग्राफी ॲड फिल्म मेकिंग अशा प्रकारचे पदवी अभ्यासक्रम नामवंत संस्थांमधून उपलब्ध आहेत.
दुर्दैवानं बेरोजगार इंजिनिअरांची आणि नुसत्याच कॉम्प्युटर पदवीधरांची निरुपयोगी फौज निर्माण करण्यात पालक व विद्यार्थी हातभार लावत आहेत. इंजिनिअरिंगसाठी पात्रता कमी पडली (म्हणजे पीसीएमची मार्कांची बेरीज पुरेशी नाही झाली), तर बीसीए किंवा बीसीएसचा म्हणजे सध्याच्या कॉम्प्युटर सायन्सचा रस्ता धरायचा मोह आवरला तर?

हॉटेल मॅनेजमेंट आणि हेल्थकेअर टेक्‍निशियनसाठी अक्षरशः प्रत्येकाला नोकरी आहे. मात्र, दोन्हींच्या रस्त्याला हिणवणारे पालकच जास्त भेटतात. दोन्हींमध्ये नामवंत संस्थांमध्ये पदवी कोर्स आहेत. महाराष्ट्रातलं कोणतंही मोठं रुग्णालय घ्या. त्यात मराठीभाषक नर्सेस शोधाव्या लागतात. नर्सिंगमध्ये अनेक पातळीवरचे अभ्यासक्रम आहेत. अनुभवातून प्रगती प्रत्येक कोर्सनंतर होते. मुलांनासुद्धा यात प्रवेश घेता येतो. दहावीनंतर ऑक्‍झिलरी हा दीड वर्षांचा, बारावीनंतर जीएनएमचा, बारावी सायन्सनंतर बीएस्सीचा आणि नंतर एमएस्सीचा कोर्स आहे. प्रत्येकाला नोकरी आहे. बीएस्सीनंतर सर्व जगभर भारतीय नर्सेस काम करतात. उत्कृष्ट कमावतात. मात्र, या साऱ्यांमध्ये मराठी टक्का शोधावा लागतो.

शालेय स्तरावर आपण जिल्हा पातळीवर खेळातून पोचलो असलो आणि आर्टस वा कॉमर्स शाखेतून पदवी घेताना राज्य आणि राष्ट्र पातळी गाठता आली, तर खेळातून करिअर सुरू होतं. कोच, मॅनेजर, ट्रेनर, मार्केटिंग आणि इव्हेंट्‌स, क्रीडा पत्रकार, क्रीडा समीक्षक अशा अनेक भूमिकांमधून प्रगती होते. संभाषण, सभाधीटपणा, आवाजावर हुकूमत असेल, तर अँकर, निवेदक, मुलाखतकार, कॉमेडियन, आरजे यामध्ये शिरकाव करून घेता येतो. त्याला पूरक वाचन व अभ्यास हवाच.

बना ‘तंत्रकुशल’
कॉल सेंटर, बीपीओ, डिजिटल मार्केटिंग, डाटा एंट्री, सर्व सुविधा पुरवणारं ‘ऑनलाइन सुविधा केंद्र,’ ट्रॅव्हलसाठीचं ट्रेन, विमान, एसटी बुकिंग केंद्र यातून सुरवात करता येते. एमकेसीएलचे ‘कमवा व शिका’ यासाठीचे बारावीनंतरचे सुंदर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी योग्य उमेदवार येत नाहीत, अशी त्यांची तक्रार असते.

आरोग्य, कौशल्यविकास क्षेत्रातल्या संधी
जिम इन्स्ट्रक्‍टर, योगशिक्षक, पर्सनल फिटनेस ट्रेनर, डाएटिशियन (न्युट्रिशिनिस्ट नव्हे), मसाजिस्ट या क्षेत्रातले छोटे-मोठे अभ्यासक्रम पदवीसोबत करणारे आज स्वतःचं सुरेख बस्तान बसवत आहेत. ब्युटी अँड कॉस्मेटिक्‍स, कलिनरी आर्टस, ज्वेलरी डिझायनिंग, ट्रॅव्हल अँड टूर्स, रिटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात कोणत्याही बारावीनंतर कौशल्यविकासातल्या पदव्या घेता येतात. त्यात काम करता येतं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, कामाची व शिकण्याची वृत्ती असेल, तर स्टोअर्स, पर्चेस, सेल्स, इन्शुरन्स, सप्लाय-चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग, ट्रेडिंग या साऱ्यांमध्ये सामान्य पदवी घेतानाच उमेदवारी करायला सुरवात करता येते. पदवीनंतर सहसा जिथं उमेदवारी करत असता, तिथंच कायम नोकरीत घेतात.

करिअरची आखणी; निर्णयातले घटक
ही सारी सर्वसमावेशक अशी करिअरची यादी अर्थातच नव्हे. मात्र, बारावीनंतर रस्ता खुंटला असा विचार करणाऱ्या प्रत्येकाला विचार करण्याजोगी अशी ही यादी नक्कीच आहे. तसंच यंदा दहावी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आपली क्षमता ओळखून, स्पर्धेची तीव्रता ओळखून ‘प्लॅन बी’ची आखणी करावी.

सरधोपटपणे ‘बारावीपर्यंत सायन्स घेऊन पाहू, नंतर वाटल्यास बदल करून टाकू,’ असा विचार नको.
केवळ छान मार्क आहेत म्हणून आयआयटी नाही.
 मेडिकलच्या आणि पॅरामेडिकलच्या एकूण जागाच मुळी सर्व मिळून फक्त बारा हजार आहेत, हा आकडा नीट ध्यानात घ्यावा. महाराष्ट्रात ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांतून आपल्याला बारा हजारमध्ये पोचायचं आहे, हा विचार करायला हवा. ते जमणार नसेल तर काय करायचं, याचाही विचार आधीच हवा.
 प्रत्येक शाखा छान आहे. प्रत्येक शाखेतून सारख्याच संधी आहेत. कोणत्याही बारावीनंतर आपण पाहिल्या तशा किमान बारा-चौदा संधी आहेत. अगदी सीए, सीएसची प्रवेशपरीक्षा कोणत्याही बारावीनंतर देता येते किंवा पदवीला फर्स्ट क्‍लास असेल, तर ती माफही असते.
 अनेक दिग्गज नेते, प्रतिभावंत आर्टस शाखेचे पदवीधर असताना ती शाखा निरर्थक असा निष्कर्ष काढणं कितपत योग्य?
 भारतीय शास्त्रज्ञांची नावं साऱ्या भारतीयांना माहिती आहेत आणि जगभर त्यांना मान्यता आहे. मात्र, डॉक्‍टर आणि इंजिनिअर आपापल्या गावापुरतेच प्रसिद्ध राहतात, याकडे क्षणभर तरी लक्ष द्याल काय?
 कोणाची चिकित्सक बुद्धी काम करते, कोणाची गणिती चमक नजरेत भरते, कोणाची भाषा, कोणाचा संवाद, कोणाची चित्रकला लक्षवेधी ठरते. एखादा कामातल्या सातत्यानं पुढं जातो. कोणाचे नेतृत्वगुण त्याला नेतेपद देतं, तर एखाद्याचं लवचिक, तंदुरुस्त शरीर त्याला एक नंबरचा ॲथलिट, खेळाडू बनवतं. यातल्या कशाचा नेमका वापर करायचा, याचा विचार दहावी ते बारावीदरम्यान करायचा असतो.
दहावीचे मार्क फक्त एक जुलैपर्यंतच लक्षात ठेवायचे असतात. नंतर सुरू केलेला कोणताही रस्ता - कोणत्याही शाखेचा असो - खडतर वाटचालीचा असतो. इयत्ता तेरावीचे क्‍लासेस नसतात. म्हणजेच ‘स्व-अभ्यास’ अकरावीपासूनच शिकायचा असतो ना?
दहावी, बारावीचे मार्क महत्त्वाचे असतात- नाही असं नाही. पण केवळ त्याला अनुसरून निर्णय घेतला, किंवा तोच टप्पा महत्त्वाचा टप्पा मानला तर पुढच्या आयुष्याचं गणित बिघडू शकतं. म्हणून मार्कांचा विचार किंचित बाजूला सारून, जाहिरातबाजीचा मारा दूर करून, कुटुंबीयांच्या अपेक्षा-इच्छा यांच्याकडेही थोडा काणाडोळा करून प्रत्येक विद्यार्थ्यानं थोडा स्वतःच्या कुवतीचा, आवडीचा आणि पुढच्या संपूर्ण आयुष्याचा विचार केला पाहिजे. केवळ त्या त्या करिअरच्या चकचकाटाचा विचार करता त्या करिअरनंतरचं स्वतःच्या आयुष्याचंही गणित मांडलं पाहिजे. रुळलेल्या वाटेपेक्षा परिघाबाहेरचा विचार अनेकदा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळं थोडा विचारपूर्वक आणि द्रष्टेपणानं स्वतःच्या करिअरची निवड करायला हवी. सर्वांसाठी त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे छान रस्ते वाट पाहात आहेत. त्यांचा आनंदानं स्वीकार करा, म्हणजे यशाकडे, प्रगतीकडे वाटचाल सुरू होणारच. आयुष्याच्या या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा!

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?
मानवी बुद्धीच्या संदर्भात काही प्रकार कोणीही समजून घेऊ शकतो. 

  •  अनुभव घेत, काम करत शिकणं काहींना खूप आवडतं, आनंददायी वाटतं. त्यातून त्यांची प्रगती वेगानं होत जाते. तुम्ही त्यात मोडता काय?
  •  दुसऱ्या प्रकारातल्या व्यक्तींना वाचताना, समोर असलेल्या पुस्तकात असलेले कूट प्रश्‍न सोडवायला, नवीन विचार करायला, कल्पना सुचवायला सहज जमतं. अर्थातच समग्र वस्तुस्थितीचं आकलन पटकन्‌ होतं.
  •  तिसऱ्या प्रकारातल्या व्यक्तींना कामाचं नियोजन, आखणी, त्याचं वेळेचं बंधन सांभाळून व्यवस्थित काम करणं जमतं.
  •  बरोबरच्या सर्वांना सांभाळून, संवाद करत, त्यांच्या अडचणी समजून घेत जाणारी व्यक्ती आंतरव्यक्ती संबंधात आपली बुद्धी वापरत असतेच. हा झाला आणखी एक प्रकार.
  •  छोट्या-मोठ्या अडचणींचा डोंगर पार करताना, त्यातून तणाव न घेता मार्ग काढणारी व्यक्ती तर नेहमीच लागते. यासाठीची बुद्धिमत्ता वरच्या प्रकारांपेक्षा वेगळीच असते.
  • पहिला प्रकार सेवा क्षेत्रासाठी उपयुक्त, दुसरा नवनिर्मिती व यंत्रणेमध्ये सुधारणा सुचवणाऱ्यांसाठी आहे. तिसऱ्यामधली मंडळी टेस्टिंग, क्वालिटी, प्रोटोकॉल यात सक्षम होतात, तर चौथी व्यक्ती एखाद्या गटाचे नेतृत्व करते. पाचवी व्यक्ती खरं तर चारही कामात मदत करू शकते किंवा अडचणींवर मात करण्यात आपली बुद्धी पणाला लावते. आपण यातल्या नेमक्‍या कोणत्या प्रकारात मोडतो याचा विचार प्रत्येकानं स्वतःच करायचा असतो. पालक मुलांना पुरेसे ओळखून असतात. त्यामुळं त्यांचा सल्ला घ्यायला अर्थातच हरकत नाही. कलचाचणी, क्षमताचाचणी असे शास्त्रीय मार्गही आहेत. एकूणच आधी स्वतःला ओळखणं आणि त्यानुसार मग करिअरची निवड करून ती वाटचाल दमदारपणे करणं हे महत्त्वाचं. 

शब्दांच्या चकचकाटापलीकडं...
‘मला गेमिंगमध्येच जायचं आहे,’ असा हट्ट धरलेले सध्या भेटतात. ‘हॅकिंग’ या शब्दाचं आकर्षण अनेकांच्या मनात असतं. सीआयडी नियमितपणे पाहून ‘फॉरेन्सिक सायन्स’चं वेडही मनात डोकवत असते. आकाशात उडण्याचं स्वप्न म्हणून ‘पायलट’ किंवा ‘एरोनॉटिकल इंजिनिअर’ हे शब्द डोक्‍यात पक्के असतात. असे शब्द डोक्‍यात घेऊन मग त्यातच करिअर करण्याचं वेड घेतलेल्या मुलांशी कसा संवाद साधावा, याचा अंदाजच पालकांना येत नाही. मात्र, ‘गेम खेळणं, मोबाइल किंवा व्हिडिओ गेम्सचे पॉइंट्‌स मिळवणं म्हणजे गेम तयार करणं नसतं. त्यासाठीची कौशल्यं खूप वेगळी असतात,’ हे तर सांगता येतं ना? तीच गोष्ट उत्कृष्ट सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर हॅकिंग करतो. त्यासाठी प्रथम काँप्युटर क्षेत्रातली उत्तम पदवी, उत्तम मार्गानं मिळवणं महत्त्वाचं असतं. फॉरेन्सिक सायन्स ही अत्यंत रुक्ष, कंटाळवाणी शाखा आहे. विलक्षण चिकाटीनं आणि संशोधक वृत्तीनं त्यात काम करावं लागतं, हे तर अनेकदा सांगण्याची वेळ माझ्यावर येत असते. खरं तर पालकांनी एकच गोष्ट करणं सहज शक्‍य असतं. ‘गेमिंग’, ‘हॅकिंग’, ‘पायलट’, ‘फॉरेन्सिक’, ‘एरोनॉटिकल किंवा ‘आयबी’, ‘रॉ’ अशा नावांमध्ये, त्यांच्या चकचकाटामध्ये मुलं अडकून बसतात, तेव्हा अशी एखादी व्यक्ती प्रत्यक्ष शोधण्याचं काम सुरू करावं.

अर्थातच अशा व्यक्ती सहजी सापडत नसतील, तर अर्थ साधा असतो ः ‘हा रस्ता अवघड, खडतर आहे!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com