मंगलमूर्ती श्रीगणराय

d k soman
d k soman

गणेश हा बुद्धीचा देव, मांगल्याचं प्रतीक. सुखकता-दुःखहर्ता. त्याला वंदन करूनच सगळ्या कार्यांचा आरंभ केला जातो. या गणेशाचा दहा दिवस चालणारा सार्वजनिक उत्सव म्हणजे तर चैतन्याचा सोहळाच. मंगलमूर्तींच्या आगमनानं निराशेचं मळभ दूर होतं, आनंदाचा घंटानाद मनात सुरू होतो. या गणेशोत्सवानिमित्तानं गणरायाचं महत्त्व, त्याची रूपं, श्रद्धेचं महत्त्व, नव्या गोष्टींचा विचार आदींचा ऊहापोह.

गणेशउपासनेची परंपरा वेदकालाइतकी प्राचीन आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीच्या दिवशी गणेशपूजन करण्याची धार्मिक परंपराही फार प्राचीन कालापासून आहे. संपूर्ण भारतात गणेशपूजनाची प्रथा असली, तरी महाराष्ट्रात या गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातूनच या गणेशपूजनाला सार्वजनिक रूप मिळालं आणि गणेशउपासनेला अनेक आयाम मिळाले. गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक उत्सव बनला आहे. हा गणेशोत्सव साजरा करताना काही नवीन गोष्टीही आपण लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही आपण लक्षात घ्यायला हवी.

ईश्वराचं पूजन केल्यानं पूजा करणाऱ्यांत चांगला बदल होणं गरजेचं असतं. पूजेमागचा मूळ उद्देश तोच असतो. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा होय. ज्याला शक्‍य होईल, तेवढ्या साधनांनी पूजा केली तरी चालेल. पूजा श्रद्धेनं, भक्तीनं आणि एकाग्र चित्तानं करावी, पुरोहित मिळत नसल्यास गणेशपूजेच्या पुस्तकावरून पूजा केली तरी चालेल. पूर्वी गावी गणपती आणत होता. आता तो नवीन जागी आणायचा आहे. तरीही हरकत नाही. गणेशमूर्ती पूजन हे किती दिवस करतो, यापेक्षा ते कसं करतो ते महत्त्वाचं असतं. एखाद्या वर्षी काही अडचणींमुळं गणपती आणता येत नसेल तरीही चालतो.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीतीनं गणेशपूजा करू नये, तर भक्तीनं-श्रद्धेनं करावी. मोठ्या गणेशमूर्तीची पूजा केली, तर फल मोठं मिळतं असंही नसतं. काही लोक घरात गरोदर महिला असेल, तर गणेशमूर्तींचं विसर्जन करत नाहीत. तसं करणं योग्य नाही. घरात गरोदर महिला असेल, तरीही ठरल्या दिवशी गणेशमूर्तीचं विसर्जन करावं. त्याचा बाळावर काहीही परिणाम होत नसतो.

उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, हाही एक मोठा गैरसमज आहे. देव कधीही कडक नसतो, तो नेहमी कृपाळूच असतो. तो कुणाचं कधीही वाईट करत नसतो. तो भक्ताच्या अपराधांना नेहमी क्षमा करत असतो. गणपतीच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो म्हणून गणपतीची सोंड डावीकडं असते. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या मंत्रानं देवत्व येते आणि मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजेच्या मंत्राने मूर्तीतील देवत्व काढून घेतले जाते अशी गणेशउपासकांची श्रद्धा असते.

पर्यावरणाचीही काळजी घ्या
आपले सर्व सण-उत्सव हे पर्यावरणरक्षणासाठीच असतात. त्यामुळं कोणताही सण साजरा करताना प्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. गणेशमूर्ती ही मातीचीच हवी. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतं. त्यामुळं पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मातीच्या गणेशमूर्तीचं पूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती. त्यावेळी गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, सध्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गणेशउपासकांची संख्याही वाढली आहे. गणेशमूर्तींची संख्या वाढल्यानं पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळं कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचं विसर्जन करून जलप्रदूषण टाळणं गरजेचं आहे. निर्माल्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. निर्माल्यावर पाणी शिंपडलं, की त्याचं विसर्जन होतं. मग ते निर्माल्य खत करण्यासाठी निर्माल्य कलशात ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य पाण्यात टाकू नये. जलप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे.

गणेशोत्सवात ध्वनिवर्धकाचा वापर हा संयमाने करावा. गणेशपूजनानंतर म्हणायची आरती मधुर आवाजात म्हणावी. गणेशोत्सवामुळं ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. सध्या बाजारात मिळणारा कापूर व अगरबत्या या केमिकलपासून बनविलेल्या असतात. त्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनविकार उद्भवतात. वायूप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. आपण आनंद घेत असताना इतराना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी.
सध्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळं अनेक भारतीय लोक परदेशांत स्थायिक झाले आहेत. जगाच्या प्रत्येक देशात भारतीय लोक गेले आहेत. तिथंही ते गणेशोत्सवासारखे सण साजरे करत आहेत. त्यामुळं भारताचा पारंपरिक गणेशोत्सव आता ‘ग्लोबल’ झाला आहे. परदेशांतले नागरिकही भारताचा गणेशोत्सव सोहळा पाहायला आणि त्यात सामील होण्यासाठी भारतात येत असतात. अनेक धर्माचे लोकही या उत्सवात सामील होत असतात. म्हणून या पारंपरिक गणेशोत्सवाला देखणं, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक स्वरूप येणं आवश्‍यक आहे आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.

स्वातंत्र्य चळवळीत स्वराज्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी उपयोग झालेल्या या गणेशोत्सवाला आता मात्र आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, स्वच्छता प्रबोधन, निसर्गरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घ्यायला हवा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com