देवेंद्रभाऊचा भाऊ!

देवेंद्रभाऊचा भाऊ!

तो स्वतःला देवेंद्रचा, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाऊ मानतोय. फडणवीस संघाच्या शाखेत जायचे, तसाच हासुद्धा जायचा. त्याच्या म्हणण्यानुसार, शाखेत जाणारे ते परस्परांचे भाऊ भाऊ. मुख्यमंत्र्यांना भाऊ मानण्यासाठी शाखेचा एवढा धागा त्याच्यासाठी पुरेसा आहे. दोन अपघातांत पाय जाऊन अपंगत्व नशिबी आलेल्या या माणसाच्या तीनचाकी सायकलवर फडणवीस यांचं चित्र रंगवलेलं आहे... ‘दिवसभरात जो कुणी भेटेल त्याला धर्म समजावून सांगण्याचं काम मी करतो,’ असं त्याचं म्हणणं. या अपंग व्यक्तीच्या डोक्‍यात नेमका कोणता धर्म असेल, कोणतं राष्ट्र असेल याचा अंदाज लागूनही लागत नव्हता!

एकतीस मार्चच्या सायंकाळी निस्तेज झालेलं ऊन्ह बघत त्र्यंबक रोडवरून ‘सकाळ’च्या दिशेनं येत होतो. कुंभमेळ्यानिमित्त हा रस्ता खूपच रुंद झाल्यानं चुकीच्या दिशेनं वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढलीय. विशेष म्हणजे याच रस्त्यावर एक प्रसिद्ध शाळा आहे आणि इथं मुलांना न्यायला-घ्यायला येणारे अनेक पालक चुकीच्या दिशेनं भरधाव वाहनं चालवतात. एकूण काय आपल्याकडं रस्ता रुंद असो अथवा अरुंद; वाहतुकीचे नियम मोडून चुकीच्या बाजूनं वाहनं चालवणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. कुणालाही कोणत्याही बाजूनं सुरक्षित जाता येत नाही. चालत चालत आयटीआयच्या सिग्नलजवळ पोचलो, तर एक अपंग मला ओलांडून पुढं आला. अपंगांसाठीची सायकल त्याच्याजवळ होती. तीनचाकी. माझी चालण्याची गती मोठी असूनही तो मला मागं टाकून पुढं गेला. दोन्ही हातांनी तो सायकल चालवत होता आणि चढावरही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करता होता. मी एकटक त्याच्या सायकलकडं पाहत होतो. एवढ्या गर्दीत आणि मागून-पुढून येणारी वाहनं चुकवत तो मोठ्या आत्मविश्‍वासानं सायकल चालवत होता. मी त्याला पाठमोराच बघत होतो. रुंद पाट आणि शक्ती एकवटून वर-खाली होणारे हात मला सहज दिसत होते. सायकलच्या मागं तीन-चार ओळीत काहीतरी मजकूर लिहिलेला आहे, असं वाटत होतं. तो वाचता येईल का, यासाठी प्रयत्न करत होतो; पण ते शक्‍य होत नव्हतं. कारण त्याची गती वाढलेली असायची... वाचता काहीच येत नसलं तरी दोन ओळींमध्ये एक चित्र मात्र दिसत होतं. सिग्नल आला तेव्हा यानं आपली सायकल डावीकडं घेतली. तिची गती कमी केली. एव्हाना मीपण सायकलशेजारी पोचलो. जे चित्र अस्पष्ट दिसत होतं, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं आहे, असं वाटायला लागलं; पण खात्री होत नव्हती. मी दोन पावलं आणखी पुढं टाकून सायकलसमोर उभा राहिलो आणि थेटच त्याला प्रश्‍न विचारला ः ‘‘सायकलवर मागं चित्र कुणाचं आहे?’’

तो हसत म्हणाला ः ‘‘देवेंद्रचं.’’
पुन्हा एकदा मी ते चित्र पाहिलं. तरण्याबांड मुख्यमंत्र्यांचंच ते होतं. मी दुसरा प्रश्‍न विचारला ः ‘‘तुझ्या सायकलवर हे चित्र कसं काय? तुला सायकल भेट दिली काय?’’
तो म्हणाला ः ‘‘ते माझे भाऊ आहेत आणि सायकल काही त्यांनी भेट दिलेली नाहीय. मी जुनी विकत घेऊन तिला नवी बनवलीय.’’
‘देवेंद्र माझा भाऊ’ हे वाक्‍य आणि मुख्यमंत्र्यांना भावाप्रमाणं एकेरीत उच्चारणं थोडं गोंधळायला लावण्यासारखं होतं; पण मी दुसराच प्रश्‍न विचारला ः ‘‘हो, पण तुझ्या सायकलवर इतकं मोठं सुंदर चित्र कसं?’’
तो म्हणाला ः ‘‘त्याचं काय आहे, शहरात नुकताच कुंभमेळा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहेच की..’’
‘‘थांबा थोडं, सिग्नल पडलाय,’’ असं मध्येच सांगत त्यानं सायकल बाजूला घेतली आणि तो पुन्हा बोलू लागला ः ‘‘...तर मी म्हणत होतो, की नुकताच कुंभमेळा झाला. शहरभर पुढाऱ्यांची किती होर्डिंग होती; पण होर्डिंगवर आमच्या देवेंद्रचा फोटो छोटाच असायचा... मला वाईट वाटायचं... कुंभमेळ्यानंतर मी ठरवलं, की आपण आपल्या सायकलवर आपल्या भावाचं भारी चित्र काढून घ्यायचं... स्वतःच्या पैशातून काढून घ्यायचं...’’
आता पुन्हा त्यानं मुख्यमंत्र्यांसाठी भाऊ हा शब्द वापरला. माझा पुन्हा गोंधळ. मुख्यमंत्र्यांचा एक भाऊ आहे. ते नागपुरात असतात, एवढी कल्पना मला होती; पण हा सायकलवरचा अपंग त्यांचा भाऊ कसा, हा प्रश्‍न काही सुटत नव्हता.
मी थेट प्रश्‍नाला भिडतच म्हणालो ः ‘‘अरे, पण मुख्यमंत्री तुझे भाऊ कसे?’’
तो हसतच म्हणाला ः ‘‘भाऊच आहेत माझे.’’
मी ः ‘‘कसं काय?’’
तो ः ‘‘काय आहे, मी लहानपणापासून अंदरसूल (ता. येवला) इथं शाखेत जात होतो.’’
मी ः ‘‘शाखा म्हणजे आरएसएसची का?’’
तो ः ‘‘हो.’’
मी ः ‘‘मग संघात जाण्याचा आणि मुख्यमंत्री तुझे भाऊ होण्याचा संबंध काय?’’
तो आणखी हसला आणि म्हणाला ः ‘‘आता कसं सांगायचं? अहो, देवेंद्रही स्वयंसेवक आहे आणि दोन स्वयंसेवकांमध्ये भावाभावाचंच नातं असतं.’’
एकेक गोष्टीचा उलगडा होऊ लागला. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे हा संघवाला होता. बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी तो नाशिकहून अयोध्येत गेला होता. ‘खूप भारी काम झालं,’ असं त्याच्या बोलण्यावरून लक्षात येत होतं. त्याला संघाच्या जगातून क्षणभर बाहेर काढलं आणि विचारलं ः ‘‘ठीक आहे; पण मुख्यमंत्र्यांकडं तू काही मागितलंस का? ही सायकल दाखवली का?’’
तो ः ‘‘काय कारण? भावाकडं कुणी काही असं मागतं का? आणि सायकल का दाखवू? चित्र तरी का दाखवू?’’
मी ः ‘‘अरे, पण तू भीक मागत फिरतोस, त्याऐवजी काही तरी मागायचं की नाही?’’
तो ः ‘‘साहेब, अहो, मी भीक नाही मागत. माझी आई फुलं विकायला नाशिकमध्ये गोदाघाटावर बसते. मी तिला मदत करतो. मी १४ वर्षं गोदाकाठीच मुक्काम करतोय. कपडालत्ता, जेवणखाणं आईच बघते आणि मी तिला मदत करतोय. भीक का मागू?’’
मी ः ‘‘हो, तरीही मुख्यमंत्र्यांना अर्ज करायचा.’’
तो ः ‘‘भावाकडं अर्ज करायचा? फारच झालं!’’
मी ः ‘‘हो; पण दिवसभर तू काय करतोस?’’
तो ः ‘‘समाजसेवा... समाजपरिवर्तन करतो.’’
मी ः ‘‘म्हणजे नेमकं काय?’’
तो ः ‘‘कुणी भेटलं तर धर्म समजावून सांगतो. ‘राष्ट्रावर प्रेम करा’, असं सांगतो. कुणी कुणी ऐकतं...’’
मी ः ‘‘म्हणजे नेमकं काय सांगत असतोस?’’
तो ः ‘‘आता बघा, माझ्या सायकलवर ‘जय श्रीराम’ लिहिलंय ते तुम्ही वाचलं की नाही? तुम्हीच नव्हे तर, रोज हजारो-लाखो लोक ते वाचतात... आता ही येणारी-जाणारी गर्दीच बघा ना! त्यांनाही दिसत असतील ना अक्षरं...’’
मी ः ‘‘हो.’’
तो ः ‘‘मग झालीच की समाजसेवा आणि राष्ट्रसेवा. याशिवाय ‘जय भवानी, जय शिवाजी’ असंही लिहिलंय. बघा ना मागं जाऊन.’’
मी ः ‘‘ पण तुला हे कुणी शिकवलं?’’
तो ः ‘‘शाखेत... शाखेत जात होतो ना मी!’’
मी ः ‘‘ ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर समाजपरिवर्तन होतं किंवा राष्ट्रकार्य होतं हे तुला कुणी सांगितलंय?’’
तो ः ‘‘मला कळतं... संघात सांगितलंय.’’
मी ः ‘‘तुझं ऐकून कुणी असं वागायला लागलंय का?’’
तो ः ‘‘ नका का ऐकेनात! मी अयोध्येत जाऊन आलोय. माझ्या सायकलवर ‘जय श्रीराम’ लिहिलंय.’’
मी ः ‘‘पण तरीही भावाला भेटावं, असं वाटत नाही का? आणि हे बघ, तू त्यांना भाऊ मानलंस; पण ते तुला भाऊ मानतील का?’’
तो ः ‘‘कमालच आहे. मानण्याचा न मानण्याचा विषयच येत नाही. शाखेत जाणारे भाऊभाऊच असतात. ही सांगायची गोष्ट आहे का..? असतातच भाऊ... आणि मी कशाला त्याला सांगू आणि त्यानं तरी का सांगावं..? आम्ही आहोतच भाऊ...’’

येवला तालुक्‍यातल्या अंदरसूल या गावचा हा शशिकांत मेहेकर....तो स्वतःला देवेंद्रभाऊंचा भाऊ मानतो !

आमचं बोलणं सुरू असतानाच दोन-चार वेळा सिग्नल पडला आणि सुरू झाला. तो मध्येच मला म्हणाला ः ‘‘तुम्हीही शाखेत या... आपोआप भाऊ व्हाल.’’
मी त्याला म्हणालो ः ‘‘माझे विचार वेगळे आहेत. धर्म आणि राष्ट्राच्या कल्पना वेगळ्या आहेत. तुझा संघ तुला लाखलाभ.’’
माझ्या उत्तरावर आता तो माझी झाडाझडती घेणार, हे लक्षात यायला लागलं... माझं उत्तर ऐकून तो नाराज झाला असावा. कदाचित मीही संघवाला आहे, हे गृहीत धरून तो बोलला असावा. मी विषयांतर केलं आणि त्याला त्याच्या अंपगत्वाकडं नेलं. ‘‘तू जन्मापासूनच अपंग आहेस का?’’ यावर तो म्हणाला ः ‘‘छे, छे...अहो, मीही तुमच्यासारखा चालायचो... धावायचो; पण दोन अपघात झाले. एकदा ट्रकवाल्यानं उडवलं आणि एक पाय कायमचा गेला. दुसऱ्यांदा  मनमाडमध्ये रेल्वेत अपघात झाला आणि दुसरा पायही कायमचा गेला. दहावी नापास आहे मी आणि आता परिवर्तनाचं, प्रबोधनाचं, राष्ट्राचं काम करतोय...’’
शेवटी त्यानं मलाच विचारलं ः ‘‘तुम्ही काय करता?’’
मी म्हणालो ः ‘‘नोकरी करतोय.’’

सायकलवर ‘जय श्रीराम’ लिहून राष्ट्रकार्य करणारा हा होता शशिकांत मेहेकर...अंदरसूलचा...अपघातामुळं अपंग झालेला आणि अयोध्यावारी करून आलेला. तो जे काही करतोय त्याला तो मातृभूमीची आणि धर्माची सेवा करतोय, असं म्हणतोय...मी कितीतरी दिवस मातृभूमी, राष्ट्र, त्याची सायकल, त्यावरची वाक्‍यं यांचा काही सांधा जुळतो का, हा विचार करून पाहत होतो. त्याच्या डोक्‍यात आणि तेही एका अपंगाच्या डोक्‍यात कोणता धर्म, कोणतं राष्ट्र असेल, याचा अंदाजही  बांधत होतो.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com