देवेंद्र -उद्धवांची ही नुरा कुस्तीच ! 

Devendra Fadnavis Uddhav Thackray
Devendra Fadnavis Uddhav Thackray

राजकारणाच्या आखाड्यात दोन वजनदार मल्ल उतरले असले तरी ते कडवी झुंज देणार नाहीत. त्यांची ही नुरा कुस्तीच असल्याचे दिसून येते. नाही तरी राज्यात भाजप, शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यांचेही काही हक्काचे मतदारसंघ आहेत. ते उखडून टाकण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. त्यामुळे युती तोडण्याची कितीही मोठ्याने गर्जना केली तरी ते कदापी शक्‍य नाही. 

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकींच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे फाटले. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सामना रंगला आहे. मुख्यमंत्र्यांपेक्षा उद्धवच अधिक आक्रमक झाले आहे. बाळासाहेबानंतर उद्धव हे इतके आक्रमक झाल्याचे यापूर्वी महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळीही भाजपवरील टीकेची धार इतकी तीव्र नव्हती. ती आता दिसू लागली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आता जे काही चालले आहे त्यावरून युती तुटेल का ? हा अंत्यत महत्त्वाचा प्रश्‍न दररोज विचारला जातोय.

युती तुटावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधीपक्ष देव पाण्यात बुडवून बसले असले तरी युती तुटेल असे वाटत नाही. युतीचे नेते राज्यात कुस्तीचा फड गाजवत आहेत. मनोरंजन सुरू आहे. मात्र युती तुटणार नाही. तर अभेदच राहणार. मैदानात उतरलेले हे दोन बलाढ्य मल्ल नुरा कुस्ती खेळताहेत असेच चित्र दिसून येत आहे. झाले गेले गंगेला मिळाले असे समजून हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या गळ्यात गळा घालणार ही काळ्या दगडावरची रेघ. मी माझ्या मागील एका ब्लॉगमध्ये तसा उल्लेखही केला होता. यापूर्वीही युती तुटण्याचे अनेकदा प्रसंग आले. पण ती तुटली नाही. भाजपतील शेलार-सोमय्यांसारख्या बेस नसलेल्या नेत्यांच्या हट्टाहासासाठी युती तुटेल असे वाटत नाही. शिवसेनेचे प्रवक्ते, संपादक कम नेते संजय राऊत हे कितीही युती तोडण्याची भाषा करीत असले तरी रबर तुटे पर्यंत संबंध ताणले जाणार नाहीत. मुंबई महापालिकेची सत्ता एकदा का ताब्यात आली की शिवसेनेच्या वाघाची शेळी झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्यातील मासा जसे बाहेर काढले की तडफडत असतो तसेच मुंबई विषयी शिवसेनेचे आहे. राज्यातील इतर कोणत्याही महापालिकेसाठी शिवसेना इतका प्रतिष्ठेचा मुद्दा का करीत नाही हे कळत नाही. मुंबईसाठीच का इतकी शक्ती खर्च केली जात आहे ? हे ही न उलगडणारे कोडे. जे शिवसेनेचे तेच भाजपचे. त्यांनाही मुंबईची सत्ता का हवी आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच या दोघांना हवी आहे. बिचारी काँग्रेसही धडपडते पण काही चालेना.असो. 

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. शिवसेना जरी सत्तेत असली तरी तिची घुसमट होत आहे हे खरे असले तरी सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. युती तुटेल का हो ? असा ज्याचा त्याचा प्रश्‍न. 

शिवसेना खरंच हिम्मत दाखवील का? या प्रश्‍नाचा जर विचार केला तर असे वाटते की महापालिका निवडणुकीनंतर जरी मुंबईत शिवसेनेने बाजी मारली तरी सत्तेतून बाहेर पडल्याने काय फायदा होणार आहे. फडणवीस सरकारच्या हातात आणखी अडीच वर्षे आहेत. समजा जरी पाठिंबा काढून घेतला तरी सरकार लगेच कोसळेल असेही नाही. विश्वासदर्शक ठराव जर शिवसेनेशिवाय भाजपने जिंकला तर शिवसेना तोंडघशी पडेल. पुढील अडीच वर्षे जितके चेपता येईल तितके चेपण्याचा प्रयत्न भाजप करू शकते. शेवटी सत्तेचा फायदा उठविल्याशिवाय भाजपही स्वस्थ बसणार नाही.

शिवसेनेला जितके खिळखिळे करता येईल तितके केले जाईल. भाजप सोडल्यास शिवसेनेला दुसरा जवळचा कोणी मित्रही नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाणेही शक्‍य नाही. कारण हिंदुत्वाच्या मुद्यावर काँग्रेस शिवसेनेला बरोबर घेणे कदापी शक्‍य नाही. राष्ट्रीयस्तरावर काँग्रेसची अडचण होऊ शकते. शिवाय शिवसेना ज्या मुद्यासाठी आग्रही आहे त्याचे काय हा ही प्रश्‍न उरतोच. पुन्हा प्रादेशिक अस्मीतेकडे वळावे म्हटले तरीही अडचणी आहेतच. कारण पक्षाचा बेस शहरे हाच आहे. अपवाद मराठवाड्याचा असू शकतो. त्यामुळे प्रादेशिकचा मुद्दा घेतल्यास सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. तरीही शिवसेनेकडे काही पत्ते असू शकतात. ते अद्याप उघड करणार नाहीत. पण, महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत शिवसेनेचा जर पराभव झाला तरच ती वेगळा विचार करू शकते. अन्यथा नाही. मुंबईत पुन्हा ती विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे झाले तर शिवसेना फडणवीसांना पुन्हा टाळी देतील. शेवटी उद्धव ठाकरे यांनीच म्हटले आहे ना की युतीचे काय करायचे ते मी आणि फडणवीस पाहून घेऊ. तुम्हाला कसली चिंता वाटते? यातच सर्वकाही आले. 

कुस्तीच्या मैदानात दोन वजनदार मल्ल उतरले असले तरी एकमेकांना कडवी झुंज देणार नाहीत. त्यांची ही नुरा कुस्तीच असल्याचे दिसून येते. नाही तरी राज्यात भाजप, शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यांचेही काही हक्काचे मतदारसंघ आहेत. ते उखडून टाकण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. त्यामुळे युती तोडण्याची कितीही गर्जना केली तरी ते कदापी शक्‍य नाही. मुंबईत सत्ता आली किंवा नाही आली तरी भाजपचे काहीच नुकसान होणार नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यामुळे भाजपवाले बिनधास्त आहेत असे दिसते. प्रत्येकाच्या औकातीचा ज्याला त्याला अंदाज आहे. शेवटी असे म्हणावेसे वाटते की राज्यात स्वबळावर निवडून येण्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूत जयललिता यांना जसा पाठिंबा मिळतो तो आपल्याकडे मिळणे कदापी शक्‍य नाही. नशिबाने आपल्याकडे व्यक्तिपुजेला खूप महत्त्व दिले जात नाही. अन्यथा शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी इतकी वर्षे खर्ची करावी लागली नसती. देशात मोदींची त्सुनामी येऊनही महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही यातच सर्व काही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com