वैचारिक लिखाणातलं प्रकाशाचं बेट (धनंजय बिजले)

dhananjay bijale write article in saptarang
dhananjay bijale write article in saptarang

आपल्या मूलगामी विचारांनी, तटस्थ निरीक्षणांनी, समतोल मांडणीनं प्रत्येक प्रश्‍नाच्या निरगाठी सोडवणारे आणि समाजाला दिशा देणारे हे विचारवंत म्हणजे प्रकाशाची बेटंच असतात. असंच एक बेट म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत रामचंद्र गुहा. राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर सातत्यानं अभ्यासपूर्ण लेखन करणारे गुहा आज वयाची साठ वर्षं पूर्ण करत आहेत. प्रत्येक शब्दाला सखोल अभ्यासाचा, ऐतिहासिक संदर्भाचा, पुराव्यांचा आधार देणाऱ्या गुहा यांच्याविषयी...

समाजमाध्यमांमुळं एकीकडं प्रत्येक जण "विचारवंत' आणि "इतिहास अभ्यासक' झालेला असताना आणि त्याच वेळी विचारवंतही "शिक्के' बनलेले असताना वैचारिक लिखाणाचं क्षेत्र अंधकारमय होतंय की काय अशी शंका येते. मात्र, अशी भावना मनात येत असतानाच काही प्रकाशाची बेटंही दिसतात. आपल्या मूलगामी विचारांनी, तटस्थ निरीक्षणांनी, समतोल मांडणीनं प्रत्येक प्रश्‍नाच्या निरगाठी सोडवणारे आणि समाजाला दिशा देणारे हे विचारवंत म्हणजे प्रकाशाची बेटंच असतात. असंच एक बेट म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत रामचंद्र गुहा.

 राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करणारे गुहा आज वयाची साठ वर्षं पूर्ण करत आहेत. गुहा यांच्या शाब्दिक फटकाऱ्यांचा मार सर्वच राजकीय पक्षांना सोसावा लागतो. तरीही सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि लाखो वाचक त्यांचं लेखन आवडीनं, गांभीर्यानं वाचतात. कारण गुहा यांच्या प्रत्येक शब्दाला सखोल अभ्यासाचा, ऐतिहासिक संदर्भाचा, पुराव्यांचा आधार असतो. त्यांचं लेखन पूर्वग्रहदूषित नसतं.

 त्यामुळंच, "कॉंग्रेस हा सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे. तो टिकवायचा असेल, तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी,' असा थेट सल्ला ते देतात. त्याच वेळी भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर सडकून टीकाही करतात. "पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना निवडणुका जिंकण्यापलीकडे लोकशाहीविषयी आस्था नाही,' असंही आवर्जून सांगतात. देशभक्तीच्या तोकड्या व्याख्येवरही ते प्रहार करतात. "देशभक्ती ही फार उदात्त भावना आहे. लोकशाही तत्त्वाचं पोषण करणं, गरिबीनिर्मूलन करण्यात यश मिळवण्यातच खरी देशभक्ती आहे,' याचीही आठवण करून देतात.

 त्यामुळं गुहा यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो; पण त्याकडे ते साफ दुर्लक्ष करतात. कारण त्यांची श्रद्धा कोणा एका राजकीय पक्ष, अथवा व्यक्तीवर नसून ती आहे भारतीय लोकशाही मूल्यांवर. लोकशाही तत्त्वांचा, परंपरांचा, संस्थांचा आदर राखला जावा, सर्वसामान्य गरीब, आदिवासींवरील अन्याय थांबावा यासाठीच ते लेखन करतात. त्यामुळंच भल्या भल्या नेत्यांच्या चुकांवर ते निर्भीडपणे बोट ठेवतात. इतिहासाचे अभ्यासक एवढीच त्यांची ओळख नाही. अर्थशास्त्र, पर्यावरण, राज्यशास्त्र, मानवविकास, क्रिकेट हे सारे त्यांच्या अभ्यासाचे, लेखनाचे विषय आहेत. सुप्रसिद्ध डून स्कूल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समधून शिकल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं. जगप्रसिद्ध अशा येल व ओस्लो विद्यापीठात शिकवल्यानंतरही त्यांची नाळ गरीब, शेतकरी आदिवासींशी घट्ट जोडलेली आहे. त्यामुळंच ते संदर्भ गोळा करण्यासाठी देश, परदेशातील विद्यापीठं, संस्थांत जातात. नामांकित संस्थांमध्ये भाषणांसाठी जातात. तितक्‍याच आत्मीयतेनं ते गडचिरोली, बस्तर, गढवाल भागातल्या गरीब, आदिवासींच्या पाड्यांमध्ये जातात. अनिल आगरवाल, शिवराम कारंथ, महाश्वेतादेवी, चंडीप्रसाद भट, समीर सेन आदींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या लेखनातून तो पदोपदी जाणवतो.

 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स; तसंच कॅलिफोर्निया विद्यापीठातही त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं. मात्र, त्यांचा खरा ओढा लेखनाकडंच राहिला. गेली काही वर्षं ते पूर्णवेळ लेखनच करतात. हिमालयाच्या कुशीत डेहराडूनमध्ये लहानाचे मोठे झाल्यानं पर्यावरण हा कायमच गुहा यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळंच जंगल, डोंगर त्यावर अवलंबून असलेले मूळ गौंड आदिवासी यांचे प्रश्न त्यांना साद घालतात. त्यांच्या पीएचडीचा प्रबंधदेखील याच विषयावर होता. त्यावर आधारित त्यांचे पहिले पुस्तक "द युनिक वूड्‌स' 1989 मध्ये प्रकाशित झालं. यात पर्यावरणाचा इतिहास ओघवत्या भाषेत वाचायला मिळतो.

 क्रिकेट हादेखील गुहा यांचा हळवा कोपरा. ते स्वतः उत्तम क्रिकेटपटू होते. क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांच्या मामांनी गुहा यांना शास्त्र शाखेऐवजी कला शाखेत घातलं होतं. "ए कॉर्नर ऑफ फॉरेन फिल्ड' (2002) हे क्रिकेटवरचं त्यांचं पुस्तक गाजलं. त्यात गुहा यांची वेगळी खुमासदार शैली वाचायला मिळतेच, शिवाय क्रिकेटकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती व्यापक आणि सर्वसमावेशक आहे हेदेखील कळतं.

 यानंतर गुहा यांनी महात्मा गांधी यांना आपल्या लेखनाचा चरित्रनायक बनवलं. "इंडिया आफ्टर गांधी' हा त्यांचा ग्रंथ 2002 मध्ये प्रकाशित झाला आणि गुहा यांचं नाव खऱ्या अर्थानं देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. या अभ्यासपूर्ण ग्रंथात गुहा यांनी जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताचा स्वांतत्र्योत्तर इतिहास समजावून घेत त्याचं ओघवत्या शैलीत विवेचन केलं आहे. विविध धर्म, जाती, अनेक भाषा, श्रीमंत, गरीब अशांचा समुच्चय असलेल्या भारतात लोकशाही कशा प्रकारे रुजली आणि देशानं कसा विकास केला हे यातून वाचकाला समजतं. "इकॉनॉमिस्ट', "वॉशिंग्टन पोस्ट' व "वॉल स्ट्रीट जर्नल'नं या पुस्तकाची "बुक ऑफ द इयर' अशी निवड केली. यावरून या पुस्तकाचं जगातलं महत्त्व अधोरेखित होतं.

 लेखनासाठी केवळ ग्रंथालयातल्या संदर्भांवर अवलंबून राहणं हा गुहा यांचा स्वभाव नाही. अनेक समकालीन लोकांना भेटणं, घटना जिथं घडल्या तिथं प्रत्यक्ष भेट देणं, इतिहासाची खातरजमा करणं या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळं गुहा यांच्या लेखनाला वेगळं मोल प्राप्त होतं. महात्मा गांधी यांच्यावर अनेक ग्रंथ आहेत; पण गुहा यांनी गांधीजींचे वेगळे अपरिचित पैलू उजेडात आणले. "गांधी बिफोर इंडिया' हा त्यांचा ग्रंथ 2014 मध्ये प्रकाशित झाला. यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गांधीजी जिथं शिकले, राहिले तिथं जाऊन लोकांशी बोलले.

 गेल्या वर्षी ते पुण्याला आले होते. त्यावेळीही याची प्रचिती आली. दोन दिवसांच्या व्यग्र दिनक्रमातूनही त्यांनी गांधीजींशी संबंधित अनेक ठिकाणांना आवर्जून वेळ काढून भेट दिली, तिथं महत्त्वाची टिपणं काढली. महाराष्ट्राच्या भूमीविषयी माझ्या मनात मोठा आदर आहे, हे त्यांनी त्यावेळी खास नमूद केलं होतं. "मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या 19 व्यक्तींविषयी त्यांनी यात विवेचन केलं आहे. विशेष म्हणजे यातल्या सर्वाधिक व्यक्ती महाराष्ट्रातल्या आहेत.

 आजमितीस त्यांची 12 स्वतंत्र आणि 11 संपादित पुस्तकं आहेत. सध्याच्या काळात ललितेतर (नॉन-फिक्‍शन) प्रकारात देशात त्यांच्या तोडीचा दुसरा लेखक नाही. लेखनाकडं किती गांभीर्यानं पाहायचं असतं, याचं उदाहरण म्हणून आजच्या पिढीनं त्यांचा आदर्श घ्यायला हवा. "न्यूयार्क टाइम्स'नं भारतातील सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून त्यांचा गौरव केला आहे तो उगाच नव्हे. गुहा यांचं सारं लेखन इंग्लिशमध्ये असलं, तरी वीसहून अधिक भारतीय भाषांतून त्याचा अनुवाद झाला आहे. केवळ ग्रंथलेखन करून ते थांबलेले नाहीत. विविध वृत्तपत्रांत समकालीन विषयावर सहा भाषांत त्यांचे स्तंभ प्रसिद्ध होतात. त्यामधलं त्यांचं सद्यःस्थितीवरचं राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांवरचं विश्‍लेषण वाचणं ही वाचकांसाठी पर्वणीच असते.

 सध्या सर्वत्र निवडणुका जिंकणं किंवा हरणं यापुरतीच लोकशाही तोलली जात आहे. त्यामुळं आपणच नकळतपणे लोकशाही खुजी करत चाललो आहोत. लोकशाही ही जगण्याची एक पद्धती आहे, मूल्यव्यवस्था आहे, ती रोजच्या जगण्यात आचरणात आणावी लागते. केवळ पाच वर्षांतून एकदा ती वापरून चालत नाही. त्यामुळंच राजकारणाच्या परिघात भाजप हा एक पक्ष म्हणून इतका यशस्वी, ताकदवान झालेला असतानाही त्यांच्या धोरणांवरही टीका होते. लोकशाहीची ही जाण अनेक भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यामागं गुहा यांच्यासारख्या विचारवंताचा मोठा वाटा आहे. सध्याच्या सोशल मीडियानं व्यापलेल्या कालखंडात गुहा यांच्यासारख्या लोकशाही मूल्यांवर; तसंच घटनात्मक संस्थावर नितांत श्रद्धा असणाऱ्या, त्याचप्रमाणं समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी सखोल विश्‍लेषण करणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या, निर्भीड विचारवंतांची खऱ्या अर्थानं गरज आहे. यापुढच्या काळातही त्यांचं लेखन हे यासाठी फार मोलाचं ठरणार आहे.

"सखोल अभ्यासाचा आदर्श'

 गुहा यांनी दोनच पुस्तकं सहलेखकासमवेत लिहिली आहेत. यात त्यांचे सहलेखक आहेत ते ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ. भारतीय पर्यावरणाच्या इतिहासावरचं 25 वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेलं पुस्तक आजही अनेक अभ्यासक्रमांत पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. दोघंही घट्ट मित्र आहेत. गुहा यांच्याबाबत गाडगीळ यांनी व्यक्त केलेल्या भावना ः

 स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास समजावून घेत विवेचन करणं आणि त्यावर पुस्तकं लिहिणं हे गुहा यांचं वैशिष्ट्यं आहेच; पण समाजात पदोपदी चाललेल्या अन्यायांवर, अत्याचारावर निर्भीडपणे लिहिणं हे त्याचं वेगळेपण आहे. आजच्या भारतीय समाजात सुशिक्षित, आर्थिक सुस्थितीत असलेल्या मध्यमवर्गातली आणि अजूनही दारिद्रयानं पीडित बहुजन समाजातली दरी आणखीच रुंदावत आहे. त्यातच अधिकाधिक बळकट होत चाललेल्या विकृत विकासवादाबद्दलचं वास्तव अनुल्लेखानं मारलं जातं. याला गुहा यांचे लेख अपवाद असतात. 2016 मध्ये गोव्यात बिस्मार्क डियासचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं ऐकल्यावर गुहा स्वखर्चानं गोव्याला गेले, मग त्यांनी खास लेख लिहून या वास्तवाला निर्भीडपणे वाचा फोडली. हे त्यांचं वेगळेपण आहे. अगदी तरुण वयापासून गुहा यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर प्रचंड मान कमावला आहे. आज लाखो वाचक त्यांचं वृत्तपत्रीय लिखाण उत्सुकतेनं नियमितपणे वाचतात. येलसारखं जगन्मान्य विद्यापीठ त्याला सन्मान्य पदव्या देतं, पद्मभूषणसारखा किताब मिळतो; मात्र तरीही त्याला कोणताही अहंकार नाही. सर्वांशी तो समानपणे वागतो. त्याचं साधेपण मनाला भावतं. नव्या पिढीनं त्याच्याकडून सखोल अभ्यासाची जरूर प्रेरणा घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com