उद्धव ठाकरेंनी करून दाखविले.....

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई व ठाण्याचा गड राखत शिवसेनेने पर्यायाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्विवाद बाजी मारली आहे. या यशाने त्यांच्या नेतृत्वावर प्रथमच खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळची निवडणूक ठाकरे व शिवसेनेच्या दृष्टीने कमालीची महत्वाची होती. एका अर्थाने त्यांची ही लिटमस टेस्टच होती. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई यांचे अतूट असे नाते होते. त्यांच्यानंतरची ही पहिलीच निवडूणक असल्याने शिवसेनेला भाजपने कोंडीत पकडण्याची खेळी खेळली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपचा हा डाव उधळून लावला आहे. मुंबई, ठाणे शिवसेनेचेच हा स्पष्ट संदेश भाजपला देण्यात ठाकरे यशस्वी झाले आहेत. करून दाखविले....ही घोषणा शिवसेनेने खरी केली आहे.

ठाकरे यांचे संघटनकौशल्य चांगले आहेच. गेल्या दोन्ही महापालिका निवडणुकीत त्यांनी हे दाखवून दिले होते. मात्र यावेळी त्यांच्यातील आक्रमक व धोरणी राजकीय नेता मुंबईकरांना प्रथ्मच पहायला मिळाला. भाजपशी असलेली युती महिनाभर आधीच तोडून त्यांनी यावेळी ज्या आक्रमकपणे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची राळ उठविली त्यामुळे शिवसैनिकांत जान आली. शिवसेनेला अंगावर घेणे म्हणजे काय असते याची चुणूक भाजपलादेखील अनुभवता आली.

उद्धव ठाकरे उपरोधीक शैलित संयतपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. मात्र यंदा त्यांनी शिवसैनिकाला आवडते तशा परखड व बोचऱ्या शब्दांत टीका करीत भाजपला पुरते घायाळ केले. राज्यात यावेळी ठाकरे यांच्या सभांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. आले अंगावर घेतले शिंगावर या न्यायाने त्यांनी शिवसेनाला पुन्हा एकदा महत्वाच्या स्थानी नेवून ठेवले आहे.

मुंबई ही शिवसेनेच्या वाघाचे ह्दद्य़ आहे. आजही मुंबईवर शिवसेनेचेच राज्य असल्याचे ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. मुळात गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मोदी यांची तुफान लाट असताना साठपेक्षा जास्त आमदार निवडून आणत ठाकरे यांनी आपली चुणूक दाखविली होती. मात्र नंतर राज्याच्या सत्तेत मिळालेल्या अपमनास्पद वागणुकीमुळे शिवसैनिक मनाने खचला होता आणि चिडलाही होता. त्याच्या या रागाला मोकळी वाट या विजयाने मिळालेली आहे, शिवसेनेचा जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळी शिवसैनिक पेटून उठतो. हे यापूर्वीही दिसले आहे आणि यावेळीही दिसले.
मुंबईसाठी भाजपने गेल्या वर्षभरापासून कंबर कसली होती. कॅग्रेस – राष्ट्रवादी कॅग्रेसला लाजवेल अशा पद्धतीने भाजपने टीका सुरु केली होती. आशिष शेलार, किरीट सोमय्या पद्धतशीरपणे शिवसेनेवर शरसंधान करीत होते. ऐन निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येवून शिवस्मारक, मेट्रो, कोस्टल रोडचे भूमीपूजन करून खऱ्या अर्थाने प्रचाराचा बिगुल फुंकला होता. त्यामुळे शिवसेनेपुढे खरेच यावेळी प्रथमच मोठे आव्हान निर्माण झाले होते. मुंबई जर शिवसेनेच्या हातून निसटली असती तर त्याचे परिणाम साऱ्या राज्यात शिवसेनेच्या अस्तित्वावर झाले असते. मात्र हा राजकीय हल्ला परतावण्यात ठाकरे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात याचे परिणाम साऱ्या राज्याच्या राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

शिवसेनेच्या आजच्या यशामुळे भाजपलादेखील योग्य संदेश मिळाला आहे. राज्यातील अन्य महापालिकांत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला शिवसेनेचीच साथ घ्यावी लागणार आहे. त्याचा योग्य मोबदला शिवसेना वसूल करेल यात शंका नाही. मुंबई, ठाण्याच्या यशामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढली आहे. त्यामुळे कदाचित राज्य मंत्रिमंडळातही याचे अपेक्षित परीणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com