जो ना सुने उसे भगवान बचाए! (धनश्री घाटे)

dhanshree ghate
dhanshree ghate

बऱ्याच वेळा असं घडलं आहे की एखाद्या जागेचा रियाज आई करायची व मला ती जागा आपोआपच येऊन जायची. लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाल्यामुळे असं होत असावं. बुजुर्गांनी सांगितलेली म्हण आई नेहमी सांगायची ः "सौ सुने तो पचास याद रहे और दस गले से निकले, जो ना सुने उसे भगवान बचाए'. "खूप लोकांचं गाणं ऐकावं' हेच या उक्तीचं सार!

माझा जन्म रायगड जिल्ह्यातल्या रसायनीचा (ता. पनवेल). माझी आई, जयपूर घराण्याची नामवंत गायिका कुमुदिनी काटदरे हीच माझी प्रथम गुरू. लहानपणापासून घरात सतत गाणं सुरूच असायचं. सकाळी जाग आईच्या रियाजानंच यायची. संगीतविद्या मिळवण्यासाठी आईला खूप कष्ट घ्यावे लागले, हे मी लहानपणापासून पाहत आले आहे.

आम्ही गोव्याला असताना आईची एक मैत्रीण कवयित्री लता काळे यांनी आपल्या काही रचनांना चाली लावून, छोट्या मुलांकडून गाऊन घेऊन रेडिओवर रेकॉर्डिंग करून घ्यायचं ठरवलं. मी तेव्हा आठ वर्षांची होते. पणजी आकाशवाणी केंद्रावर "किलबिल' या कार्यक्रमात मी तेव्हा पहिल्यांदा गायले. त्यानंतर "बालदरबार', "युववाणी' (मुंबई) याही कार्यक्रमांत माझं गाणं झालं. आवाज चांगलाच होता व सतत कानावर गाणं पडत होतं; त्यामुळे बऱ्याच गोष्टी न शिकताही मला येऊ लागल्या. मी आठ वर्षांची असताना किशोरीताई आमोणकरांचं गाणं व व्याख्यान पहिल्यांदा ऐकलं व त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर आई जेव्हा पुण्याला त्यांच्याकडं शिकायला जायची तेव्हा मी तिच्याबरोबर जात असे. सन 2002 च्या गुरुपौर्णिमेला त्यांच्या भेटीचा योग आला व आशीर्वाद मिळाला. त्या आईला नेहमी सांगत, "जेव्हा तू तुझी सर्व विद्या लेकीला (अथवा शिष्यांना) देशील, त्या वेळी तू गुरूंच्या ऋणातून मुक्त होशील.' आई जेव्हा मारुलकरबुवा, कमलताई तांबे, कौसल्याबाई मंजेश्वर यांच्याकडं शिकायला जायची तेव्हा मीही अनेक वेळा गेले आहे. मधुसूदन कानेटकर ऊर्फ अप्पा जेव्हा आईला शिकवायला घरी येत त्याही वेळी मी तिथं असे. एवढ्या मोठ्या बुजुर्ग कलाकारांकडून मला विद्या सहज मिळाली.

शाळेत असताना विविध गायन स्पर्धांमध्ये मला अनेक बक्षिसं मिळाली. गुजरातमध्ये राहत असताना राज्यस्तरीय युवकमहोत्सवात मला पहिलं बक्षीस मिळालं. वयाच्या 15 व्या वर्षापासून मी आईला मैफलीत स्वरसाथ करत असे. अगदी "नायकी कानडा', "सुहा', "भूपनट' यांसारख्या रागांच्या बंदिशींचे मुखडे व काही आलाप घोटून मी साथ करत असे. बऱ्याच वेळा असं घडलं आहे की एखाद्या जागेचा रियाज आई करायची व मला ती जागा आपोआपच येऊन जायची. लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाल्यामुळे असं होत असावं. बुजुर्गांनी सांगितलेली म्हण आई नेहमी सांगायची ः "सौ सुने तो पचास याद रहे और दस गले से निकले, जो ना सुने उसे भगवान बचाए'. "खूप लोकांचं गाणं ऐकावं' हेच या उक्तीचं सार!

पुण्यात आल्यानंतर मी पौर्णिमा तळवलकर (आग्रा घराणा) यांच्याकडं दोन वर्षं शिकले. त्यांचं गाणं अतिशय शिस्तबद्ध व बंदिशी खूप सुंदर असत. त्यानंतर माझ्या आईच्या गुरुभगिनी हेमा गुर्जर यांच्याकडं मी काही वर्षं शिकले. तिथंच मी "विशारद पूर्ण' पर्यंतचा अभ्यास केला. "गाण्याला शास्त्राच्या अभ्यासाची जोड हवीच,' हा हेमाताईंचा आग्रह असे. शास्त्रशुद्ध व रसीलं गाणं यांचा संगम हेमाताईंच्या गाण्यात व शिकवण्यात होता. त्याच सुमारास कमलताई मुंबईहून पुण्यात राहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडंही माझं काही वर्षं शिक्षण झालं. त्यांनी मला भूप (ए री आज), यमन (सोहेला नंद), तिलक कामोद (सकल दुख हरन), बागेश्री (कौन गत भई), भीमपलास (रे बिरहा) व नंद (ढूँढू बारे सैयां) हे राग शिकवले. हे सर्व जरी मूळ राग असले तरी बंदिशी व त्यांची मांडणी खास जयपूरची. प्रत्येक रागाचे काही आलाप व ताना त्या लिहून देत व घोटून घेत. त्यानंतर बंदिश शिकवत असत. कमलताई अतिशय मृदू स्वभावाच्या होत्या. लहानपणापासून मी त्यांच्याकडं जात असल्यामुळे त्या माझ्याशी खूपच प्रेमानं वागत. जयश्री सबनीस या उत्तम नाट्यसंगीतगायिका व संगीतनाटकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री. त्यांनी मला काही नाट्यपदं शिकवली, तसेच "संगीत-अलंकार'साठी डॉ. माधुरीताई डोंगरे यांचंदेखील बहुमोल मार्गदर्शन मला लाभलं. हे सर्व शिक्षण घेत असताना अधूनमधून आईकडं शिकणं सुरूच होतं.

सन 1996 मध्ये गुरू दाजी करंदीकर यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ठुमरी-दादरा मैफल आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी काही नवोदित कलाकारांना त्यांनी स्वतः ठुमरी व दादरे शिकवले, त्यात मीही होते. कार्यक्रमानंतर ज्योत्स्नाताई भोळे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार झाला. राजाभाऊ देव यांच्याकडंही मी काही दिवस शिकायला जात असे. रागाचे सर्व आलाप, बोलताना ते पाठ करून घेत असत. अत्यंत बोजदार, गमकयुक्त व भरीव असे ते आलाप व ताना असत. सन 1999 पासून मी रेडिओवर नियमित गाऊ लागले. भारतात अनेक ठिकाणी मैफली झाल्या. गेल्या वर्षी "भारत विकास परिषदे'तर्फे "तेजस्विनी पुरस्कार' मला मिळाला. प्रसिद्ध कथक नृत्यांगना अमला शेखर (नृत्यगुरू रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या) यांच्या नृत्याच्या अनेक कार्यक्रमांत मी गायनसाथ केली आहे. आईच्या तराण्यांवर त्यांनी "अष्टनायिका' ही नृत्यनाटिका केली होती. तीत तराण्यांचं गायन मी केलं. त्याचबरोबर भरतनाट्यम्‌गुरू अनुराधाताई शिंदे यांच्याही कार्यक्रमांत मी अनेक वेळा गायनसाथ केली. "पंचकन्या' व "अपराजिता' या त्यांच्या नृत्यनाट्याचं संगीत आईचं आहे व पार्श्वगायन माझ्या आवाजात आहे. भारतात अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग झाले. आईला साथ करण्याच्या निमित्तानं मला "दादर-माटुंगा कल्चरल सेंटर,' "देवल क्‍लब, कोल्हापूर', "घराणा संमेलन, कोल्हापूर' अशा अनेक मान्यवर संस्थांमध्ये गायची संधी मिळाली. घराणा संमेलनात गाणं झाल्यावर अज़ीज़ुद्दीन खॉंसाहेब (जयपूर घराण्याचे अध्वर्यू अल्लादिया खॉंसाहेबांचे नातू) आम्हाला भेटायला आले व त्यांनी गाण्याचं कौतुक केलं. आईबरोबर मी जुगलबंदीचेही काही कार्यक्रम केले आहेत. राजे रणजितसिंह गायकवाड यांनी बडोद्याच्या "लक्ष्मीविलास पॅलेस'मध्ये आयोजिलेलं आमचं गाणंही खूप रंगलं. "भावपंढरी' व "आईची गाणी' या माझ्या दोन सीडीज्‌ प्रकाशित आहेत. "पुणे प्रार्थना समाज' ही संस्था आपल्या कार्याचा प्रसार "आध्यात्मिक संगीत' या कार्यक्रमाद्वारे करत असते. सन 1995 पासून मी या कार्यक्रमात गात आहे.

आईच्या बंदिशींवर "गुरुपदवंदन' हा कार्यक्रम मी व माझ्या गुरुभगिनी करतो, तसंच आईची रचना "राग-समय-चक्रमालिका' हिच्यावर "रागमाला' हाही स्वतंत्र कार्यक्रम आम्ही करतो. शास्त्रीय संगीत कसं ऐकावं, मैफलीत रागाची मांडणी गायक कसे करतात, काय आधी गावं, काय नंतर गावं हे कसं ठरवलं जातं यावर मी "व्याख्यान-प्रात्यक्षिक' या स्वरूपात कार्यक्रम केले आहेत. आईला साथ करण्याच्या उद्देशानं माझे वडील चंद्रकांत काटदरे तबला शिकले. माझे बंधू निखिल काटदरे हेदेखील उत्तम तबलावादक आहेत. बडोद्याचे मधुकर गुरव (अजराडा घराणा) यांच्याकडं त्यांनी तबलावादनाची प्रदीर्घ तालीम घेतली आहे. आईला व मला त्यांनी अनेक कार्यक्रमांत व रेकॉर्डिंग्जना तबलासाथ केली आहे.

गेल्या वर्षी मी राजेंद्र मणेरीकर (सातारा) यांच्याकडून "आवाजसाधना शास्त्रा'चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पाश्‍चात्यांनी या विषयावर सखोल अभ्यास करून आवाजनिर्मितीचं शास्त्र सिद्ध केलं आहे. मणेरीकर सर इंग्लंडला जाऊन त्याचा अभ्यास करून आले आहेत. इथल्या गायकांनाही त्याचा लाभ घेता यावा, या तळमळीतून त्यांनी अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. सर म्हणतातः ""आवाज ही स्वतंत्रपणे शिकण्याची गोष्ट आहे. आवाजसाधनेचं शास्त्र हे शुद्ध नादाचा वेध कसा घ्यावा व त्याची उपासना-जोपासना कशी करावी याचा मार्ग सांगतं. गाणं हे सहज हवं. कितीही गायलं तरी गळा थकता कामा नये. प्रत्येक सुराला तोंडाचं उघडणं वेगळं असायला हवं. आकार लावताना जीभ पूर्ण सपाट ठेवायची.'' आ-काराबरोबर सरांनी ई-कार, ए-कार, ओ-कार व ऊ-काराचा सराव सर्व पट्ट्यांमध्ये करून घेतला. मी अजूनही नियमितपणे याचा अभ्यास करते. आई तर माझी गुरूच; पण वडिलांनीही मला खूप प्रोत्साहन दिलं व सर्व प्रकारे पाठिंबा दिला. सासू-सासऱ्यांनाही गाण्याची खूप आवड व सासरी सर्वांनाच माझ्या गाण्याचं कौतुक आहे. माझ्या घरच्यांची मला कायम साथ असते. माझे यजमान गौतम घाटे हे स्वतः काही वर्षं उस्ताद हनीफभाई मिरजकर यांच्याकडं तबला शिकले आहेत.

आईचं गाणं अत्यंत शांत व धीम्या गतीचं. स्वराचा आनंद श्रोत्यांना देत देत बढत करणारं. कुठल्याही आवाजाच्या कसरती तिनं कधीही केल्या नाहीत. तेच संस्कार ती आम्हा शिष्यांवर करत असते. उच्चार कसे करावेत, स्वरांवर शब्द ठेवताना स्वरांना धक्का लागू देऊ नये, अ-कार लांबवू नये अशा अनेक उपयुक्त गोष्टी ती शिकवताना सहज सांगून जाते. या गोष्टींचा उपयोग मलाही माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना होतो.

जयपूर घराण्याचं गाणं लहानपणापासूनच ऐकल्यामुळे ते गळ्यावर सहज चढलं; पण ते किती घरंदाज आहे, उत्तुंग आहे याची जाणीव मात्र नंतरच झाली आणि इतकं जरी झालं असलं तरी मला गाणं अजून खूप केलं पाहिजे याची पूर्ण जाणीव आहे. आत्तापर्यंत जे मिळालं ते घरात गाणं असल्यामुळे सहजच कानावर पडून आलेलं आहे. त्याबाबतीत मी खूपच भाग्यवान आहे व देवाची खूप खूप आभारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com