सहज मिळतात परवाने, ट्रॅफिक होतेय दीवाने !

महेश क्षीरसागर
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सोमवारी पुण्यातील बाणेर रस्त्यावर असाच एक भीषण प्रसंग घडला. या अपघातामुळे पुण्याची वाहतूक पुन्हा चर्चेत आली आहे. वारंवार अशा घटना समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया संकलित स्वरुपात इथे देत आहोत : 

दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना देण्यासाठी असलेले निकष आहेत ते अधिकाधिक कठोर करायला हवेत. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना वाहतुकीचे साधे नियम कसे पाळायचे हे माहीत असायला हवे. सद्यस्थितीत वाहतूक परवाना देण्यासाठी ज्या चाचण्या होतात त्या चाचण्यांची काठिण्य पातळी विशेष नाही. सर्वप्रथम या चाचण्या फक्त नियम, चिन्हे माहीत आहेत का यावर भर देतात. वाहन चालविण्याच्या चाचणी केवळ 30 सेकंद पाहिले जाते, यात 8 च्या आकड्यासारख्या वळणांवरून चालवणे किंवा जास्त गर्दी असेल तर फक्त चारचाकी थांबवून काही फूट चालवणे अशाप्रकारे परवान्यासाठीची चाचणी झाल्यास जे लोक गाडी घेऊन रस्त्यावर येतात त्यांच्याकडून अपघात होण्याची शक्यता प्रचंड वाढते. 

वाहतुकीचे नियम, चिन्हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली आणि त्यानंतर चालकासोबत बसून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वाहन चालवण्यास सांगावे. त्याचबरोबर चालकाला माहीत असलेल्या नियमांची चाचपणी करायला हवी असे वाटते. अशा चाचणीत वेळ जाईल यात शंका नाही, पण रस्त्यावर लोकांना शिस्त हवी असेल तर कुठेतरी आपल्याला वेळ आणि पैसा गुंतवावा लागेलच.

ट्रॅफिकबद्दलची सहनशीलता अन् स्वयंशिस्त वाढवा

यासोबत दुसरा एक भाग जो व्हायला हवा तो म्हणजे लोकांना नियम न पाळण्यामुळे होणाऱ्या परिणामांची जरब बसवणे. चिरीमिरी देऊन जोवर लोक सुटत राहतील किंवा मोठ्या अपघातात जे लोक कोणा बड्या व्यक्तीचा किंवा पैशाचा वरदहस्त असल्याने निसटत असतील तर लोकांना कायद्याची भीती राहणार नाही. फक्त कायदे करून उपयोग नाही त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे होणे गरजेचे आहे. माझ्या मते पाश्चात्य देशांप्रमाणे पॉइंट्स पद्धत लागू करावी जेणेकरून प्रत्येक गुन्हयासाठी ठराविक पॉइंट्स परावन्यावर जमा होईल आणि ठराविक पॉइंट्सच्या मर्यादेनंतर परवाना रद्द केला जाईल.

दररोज एक अनुभव येतो तो असा की, वाहनचालकांना लेन कशी पाळायची हे समजत नाही असे दिसते. आपण चालवत असलेल्या वाहनाच्या प्रकारानुसार आणि आपल्या पुढच्या मार्गावरील वाळणानुसार लेन बदलणे, खाली आणि वरचा प्रकाशझोत (अपर, डीपर) कधी वापरायचा, सर्वात महत्वाचे म्हणजे हॉर्नचा कमीत कमी आणि योग्य वापर करणे, किंवा मोबाईलचा वापर न करणे या क्षुल्लक गोष्टीची जाणीव नाही किंबहुना जाणीव असूनही कारवाईची पर्वा नाही असे दिसते. त्यामुळे यासंबंधी 'ई सकाळ'वर मागील लेखात लिहिल्याप्रमाणे cctv सारख्या उपलब्ध सुविधांचा जास्त आणि योग्य प्रकारे वापर करून पोलिसांकडून परवाना रद्द केला जाऊ शकतो हे कळले तर लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होईल. 

शेवटी हे सर्व फक्त उपाय आहेत, जोपर्यंत लोकांना स्वयंशिस्त लागत नाही आणि आपल्या अशा वागण्यामुळे- वाहन चालविण्यामुळे दुसऱ्याची गैरसोय होते. प्रसंगी एखाद्याचा जीव जाऊ शकतो, याबद्दल त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न होत नाही तोवर आपणच वाहन चालवताना आपली सहनशक्ती वाढवावी आणि रस्त्याने चालताना जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी हा एकच उपाय आहे..!