अश्रू देवभूमीचे (ज्ञानेश सावंत)

dnyanesh savant write kerala flood article in saptarang
dnyanesh savant write kerala flood article in saptarang

केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला दृष्ट लागली. अनेकांचे संसार वाहून गेले. या राज्याला प्रत्यक्ष भेट देऊन मांडलेला वृत्तांत.

केरळमधलं जोसेफ कुटुंब काही वर्षांपासून मुंबईत राहतं; परंतु जुलै महिन्यात आलेल्या पुरात घरातल्या वस्तूंचं थोडंफार नुकसान झालं... मुंबईत पुन्हा एकदा मोठा पूर येईल, या भीतीनं जोसेफ कुटुंब केरळमधल्या आपल्या मूळ गावी गेलं. मात्र, भविष्यात वेगळंच लिहून ठेवलं होतं- कारण, केरळमध्ये पोचताच मुंबईपेक्षा शेकडोपट भयानक पूर त्यांच्या स्वागतालाच उभा ठाकला. या पुरात जोसेफ कुटुंबीय कसेबसे वाचले; पण कुट्टनाडमधल्या पुम्बा नदीकाठची त्यांची टुमदार घरं आणि गावातली तीन मेडिकलची दुकानं वाहून गेली... ही घटना त्यांना डोळ्यादेखत बघावी लागली. काय एकेक खेळ असतात नियतीचे! ... जोसेफ याचं एक उदाहारणं झालं; पण अनेक वर्षं पै-पै जमवून उभारलेला संसार क्षणार्धात वाहून जातो आणि त्याला आपण रोखू शकत नाही, अशी हतबलता केरळातल्या अनेकांच्या डोळ्यात पाहायला मिळाली. वार्तांकनाच्या निमित्तानं या राज्यात गेलो, तेव्हा प्रत्यक्ष महापुराबरोबरच अश्रूंचाही पूर दिसत होता.

केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त नेहमीच केरळवर राहिला आहे. हिरवाईनं नटलेला; डोंगर, डोंगर-दऱ्यांतून खळाळणाऱ्या नद्या आणि अत्यंत मोहक अशा निसर्गसौंदर्यानं सजलेला परिसर. देव कायमच प्रसन्न असलेल्या केरळवर यंदा मात्र आक्रित घडलं. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला दृष्ट लागली.

चालाकुडी आणि अलुवा या चिखलानं माखलेल्या शहरात गेलो, तेव्हा मॅथ्यूहेरूंब यांच्या घराच्या अंगणातून चिखलातूनच वाट काढली. अलुवातलं हे श्रीमंत कुटुंब. त्यांच्या घरात लाखो रुपयांच्या इलेक्‍ट्रानिक आणि शोभेच्या वस्तू होत्या, त्याही चिखलात पडल्या होत्या. तिथून नायरांच्या घरात गेल्यानंतर आजीबाई भेटल्या. त्यांची मुलं शिबिरात होती, घर सावरण्यासाठी धाडसी आजीबाई आल्या होत्या. टोपली घेऊन त्या घरात साचलेल्या मातीच्या गाळाचा ढिगारा उकरत होत्या. त्यांचे पाय चिखलात अडकत होते; मात्र त्याची पर्वा न करता आपलं घर पुन्हा उभं करण्याची पराकाष्ठा करत होत्या. हीच परिस्थिती वेगवेगळ्या 20 ते 25 गावांमध्ये पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी केवळ घरांच्या भिंती शिल्लक राहिलेल्या दिसल्या. या भिंतीच्या सहवासात राहायलाही लोक प्रचंड घाबरत असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवत होते. पुन्हा पूर येईल आणि आपल्यालाही घेऊन जाईल, याचा धसका ओणमच्या सणादिवशी सिजीच्या घरी गेल्यानंतर जाणवलं. मॅथ्यूहेरूंब यांच्यासारखाच, जीवनशैलीचा भाग म्हणून खरेदी केलेल्या महागड्या इलेक्‍ट्रॉनिक आणि गृहोपपयोगी वस्तूंचा गावांगावांमधल्या रस्त्यांवर खच पडला होता. जिथं माणसांच्या जिवांची खात्री नव्हती, तिथं या वस्तूंवर जीव लावण्यात काय अर्थ आहे, असाच प्रश्‍न मनात आला- तो महागड्या वस्तूंचा कचरा पाहून.
या दोन्ही शहरांमधल्या बाजारपेठा बुडाल्या होत्या, आठव्या-नवव्या दिवशी व्यापारी दुकानांमधलं पाणी काढत होते, तेव्हा पोलिस आणि सरकारी कर्मचारी तिथून कचऱ्यानं भरलेली पोती वाहून नेत होते. किती आणि काय नुकसान झालं, याचा हिशेब व्यापाऱ्यांना सांगत येत नव्हता; पण "आम्ही वाचलो' हे ते सांगत होते.

पर्यटनावर ज्याचं पोट भरलं जायचं, तेही पुरानं थांबवल्याचं अल्लेपीत दिसून आलं. इथल्या दीड ते दोन हजार बोटी बंद आहेत. अलापुझातून पुम्बा नदीकडे जाताना तर दोन-दोन महिने पाण्याखाली असलेली घरं दिसली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच माणसं गावागावांत होती. त्यांच्या काळवंडलेल्या चेहऱ्यांवर भीतीची छाया अधिकच गडदपणे जाणवत होती. त्यामुळं त्यांच्याशी कसं आणि काय बोलावं, याचं दडपण सतावत होतं. विशेष म्हणजे आपलं सर्वस्व वाहून गेल्याचं दुःख बाजूला सारत माझ्यासह अन्य राज्यातून आलेल्या मंडळीची चौकशी करत, त्याचं जेवण, राहणं आदी व्यवस्था करायला केरळवासीय विसरत नव्हते. विविध धर्मीयांमधला सौहार्दही जागोजागी दिसत होता. तिथला ओणम हा पारंपरिक सणही साधेपणानं; पण एकमेकांना साथ देत थोड्याफार प्रमाणात साजरा झाला. एर्नाकुलम आणि कोचीतले बलाढ्य नेतेही राजकीय वैर बाजूला सारून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्रिशूरमध्ये तर मंत्रयालात रुबाब वावरणाऱ्या सचिवांपासून जिल्हाधिकारीही शिबिरात येऊन लोकांसोबत चार घास खात आणि त्यांच्या दु:खात सहभागी होत होते. एर्नाकुलम आणि वायनाडच्या सीमेवरच्या मुन्बंबमधले मच्छिमार तर राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकाच्या आधीच मदतकार्यात जोमाने काम करीत होते. मासेमारी करताना पुराचा तडाख्याचा अंदाज आलेले हे लोक गटागटानं गावोगावी पोचले. तिथले ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना दोरखंडांनी सुरक्षितस्थळी नेल्याचं ते सांगत होते. हेच समाधान घेऊन मच्छिमार आता आपल्या व्यवसायात रमू लागल्याचे त्यांच्यासमवेत काही तास घालवले तेव्हा दिसले. पूरस्थिती आटोक्‍याबाहेर गेल्यानं वेगवेगळ्या राज्यांतल्या काही संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधींचे हातही मदतकरिता सरसावले आहेत. त्याबाबतची कृतज्ञता केरळवासीयांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते.
अनेक ठिकाणी माणसं आपल्या भावनांना वाट करून देत होती. ""बघा आमचा संसार. आम्ही उभे कसे राहू,'' अशा प्रश्‍नांचं गाठोडं ठेवत होती. पण, सरकारनामक यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती. चिंतेतच ही माणसं आपला दिवस ढकलत होती. भल्यामोठ्या नदीकाठी फारशी सुरक्षितता नसतानाही घरं उभारण्यास परवानगी देण्यात आली, ती पर्यटनाला चालना मिळावी म्हणून. या व्यवसायाने महसुलाचे आकडे जबरदस्त वाढत गेले; पण लोकांच्या जीवाचा खेळ झाला. त्रिशूर जिल्ह्यातल्या चेरकल्ला तलीकुलम, मुट्टीचूल, पेरिंगगोटुकरा, आल्लप्पाड, पुल्ल, आंदीकाड आदी गावांना पाण्यानं वेढलं होतं. गावाच्या वेशीबाहेर एखाद्याला सहजरित्या ओढून नेईल, इतक्‍या पाण्यानं रस्ते रोखून धरले होते. तिथून मी आणि काही जण पुढच्या गावात जाण्याच्या प्रयत्नात होतो, तेव्हा आमच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी हुसकावलं. ते आमच्या भल्यासाठीच केलं, हे आम्हाला काही मिनिटांनी कळून चुकलं- कारण पुढच्या गावांभोवती नदीनं आक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं होतं. तिचं पाणी गवांमध्ये पसरत होतं.

शेती, उद्योग व्यवसायालाही प्रचंड मोठा फटका बसला आहे. वायनाडलगतच्या कुनगरमधल्या राजूचं इस्त्रीचं दुकानही वाहून गेलं. त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. तर शहरांमधल्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठा आणि नव्या वाहनांची दालनात अजूनही चिखलाचा थर आहे. पाऊस होता, तेव्हा ही दालनं पाण्यात बुडाली होती. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेता, संपूर्ण केरळ राज्यातलं नगरनियोजनाचं पितळ उघडं पडल्याचं जाणवलं. शहरं, गावं नटली; किंबहुना ती कृत्रितरित्या सजवण्यातही आली; पण राज्याच्या सौंदर्याला धोका पोचू नये, अशी यंत्रणा उभारण्याची काळजी आतापर्यंतच्या कोण्या एका सरकारनं घेतली नाही, हे पूरस्थितीनं दाखवून दिलं. हा निसर्गाचा आघात असला, तरी तो का ओढवला, याचंही चिंतन करायला महापुरानं भाग पाडलं आहे. ते करण्याइतपत शहाणपण इथले राज्यकर्ते आणि प्रशासनकर्त्यांना येईल, अशी अपेक्षा आहे. केरळमधली ही मंडळी पुराच्या रौद्ररूपानं उद्‌ध्ववस्त झाली असली, तरी त्यांच्या मनगटातली ताकद पाहता आणि बोलण्यातला विश्‍वास बघता ती पुन्हा नव्या ताकदीनं उभी राहतील, यात काहीच शंका नाही. संबंध केरळ नक्कीच दिमाखदारपणे उभा राहील. केवळ केरळवासीयच नाही, तर भारतातला प्रत्येक नागरिक केरळच्या मदतीला धावून आल्याचं मला प्रत्यक्ष शहरं आणि गावांतून फिरताना जाणवलं. देवभूमी आक्रंदते आहे; पण ती पुन्हा नवी भरारी घेईल, हा विश्‍वासही तीच देते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com