संतविचारांची दिल्ली-वारी (शंकर टेमघरे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि दिल्लीकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीज्ञानेश्‍वरी पारायणसोहळा दिल्लीतल्या रामलीला मैदानावर नुकताच पार पडला. राजधानीत प्रथमच झालेल्या या सोहळ्यातून वारकरी संप्रदायाची भजन-कीर्तनाची परंपरा, संस्कृती दिल्लीकरांनी अनुभवली. त्यानिमित्त... 

संत ज्ञानेश्‍वरमहाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. संत नामदेवमहाराज, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत एकनाथमहाराज यांच्यासह अनेक संतांनी हा वारकरी संप्रदाय वाढवला. भागवतधर्माची पताका फडकवत ठेवली. संत तुकाराममहाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस ठरले. नामदेवमहाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली. आपल्या विचारांची बीजं परराज्यात सर्वप्रथम पेरणारे संत म्हणजे नामदेवमहाराज. त्यांच्यानंतर अनेक प्रांतांत वारकरी सांप्रदायिक संतांचे विचार वाङ्‌मयाच्या रूपानं बहरत गेले. अन्य राज्यांमधल्या तीर्थक्षेत्रांमध्ये श्री ज्ञानेश्‍वरीपारायण, श्रीमद्‌भागवत कथापारायण, तुकाराममहाराज गाथापारायण असे अनेक सोहळे यापूर्वीही झाले आहेत. त्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा जागर त्या त्या प्रांतात होत गेला. अजूनही होत आहे आणि पुढंही होत राहणार आहे. काही सप्ताहांमधून तेथील संत-महात्म्यांची हिंदीतून प्रवचनंही झाली आहेत. त्यानिमित्तानं वारकरी सांप्रदायिक विचारसरणी आणि त्या त्या प्रांतांमधली विचारसरणी यांची तुलना अधिक प्रकर्षानं जाणवते. अन्य प्रांतांसह परदेशांतही भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होऊ लागले. वारकरी संप्रदायाची पताका सातासमुद्रापार दिमाखात फडकू लागली. इंटरनेटच्या माध्यमातून परदेशांतले विचारवंत, वारकरी सांप्रदायाशी जोडले गेले. आषाढी वारीविषयी त्यांची उत्सुकता वाढू लागली. त्यामुळं परदेशी भाविकसुद्धा संतविचारांनी प्रेरित झाले. गेल्या काही वर्षांपासून आषाढीवारीत परदेशी वारकऱ्यांची संख्या वाढताना दिसते. एकंदर, संतविचारांचा प्रचार आणि प्रसार आता प्रांतांच्या व देशांच्या भिंती तोडून परदेशात गेला आहे. 

कौतुकास्पद प्रयत्न 
या सगळ्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय वारकरी मंडळानं राजधानी दिल्लीत प्रथमच ज्ञानेश्‍वरी पारायणसोहळा नुकताच आयोजिला होता. तिथल्या सप्ताहाचं नियोजन भव्य होतं. तुलनेनं भाविकांची संख्या कमी असली, तरी होती ती निष्ठावान होती. त्यामुळं त्यांनी काकड आरती, ज्ञानेश्‍वरी पारायण, तुकाराममहाराजांच्या चरित्रावर प्रवचन, हिंदी प्रवचन, भजन, हरिपाठ आणि कीर्तन आदी कार्यक्रमांनी रामलीला मैदानाचा परिसर दणाणून सोडला.

सप्ताहात उत्तर भारतातल्या साधू-महंतांची हिंदीतून प्रवचनं झाली. त्याद्वारे विचारांचा वेगळा प्रवाह अनुभवायला मिळाला. या सप्ताहात अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, महापौर आदींनी या सोहळ्याला भेट दिली. मोठ्या आवडीनं त्यांनी कीर्तनात टाळांची साथही केली. ते काही काळ हरिनामात दंग झाले. अनेक भाविक, तसंच कीर्तनकार या सप्ताहासाठी दिल्लीला विमानानं दाखल झाले होते. त्यातल्या बहुतेक वारकऱ्यांनी विमानप्रवास पहिल्यांदाच केला होता. या काळात या वारकऱ्यांना याच फेरीत मथुरा, वृदांवन, हरिद्वार, हृषीकेश या तीर्थक्षेत्रांची यात्राही घडली. दिल्लीसारख्या महानगरात केलेला ज्ञानेश्‍वरी पारायणसोहळा निश्‍चितच कौतुकास्पद होता. आगामी काळात याच रामलीला मैदानावर विक्रमी गर्दीचा ज्ञानेश्‍वरी पारायणसोहळा करण्याचा संकल्प अखिल भारतीय वारकरी मंडळानं केला आहे. त्याला दिल्लीकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आगामी सोहळ्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. 

भाषेचा विचार व्हायला हवा 
आगामी काळात महाराष्ट्रातल्या संतविचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काही गोष्टी आवश्‍यक आहेत. त्यात प्रामुख्यानं भाषा हा महत्त्वाचा भाग होय. संतविचारांचा निरनिराळ्या प्रांतात प्रचार व प्रसार करण्यासाठी किमान हिंदी भाषा अधिक चांगल्या पद्धतीनं आली पाहिजे. आपल्या संतांचे विचार हिंदीत सांगितले, तर त्या त्या प्रांतांतल्या भाविकांना त्याचा अर्थ उलगडण्यास मदत होईल. त्यातूनच सप्ताह अन्य प्रांतांत करण्याचा विचारही साध्य होऊ शकेल. अन्यथा 'मराठीतून पारायण सोहळा' हा भाग केवळ महाराष्ट्रातल्या मंडळींसाठीच राहील. मुंबईतल्या हिंदीभाषकांनी वसईमध्ये हिंदीतून ज्ञानेश्‍वरी पारायण केलं, याचं इथं स्मरण होतं.त्याच धर्तीवर अन्य प्रांतांत पारायण करताना हिंदी भाषेतून पारायणाचा विचार करणं ही काळाची गरज ठरणार आहे; जेणेकरून तिथल्या भाषकांपर्यंत तो विचार पोचेल. 

अधिक व्यापक नियोजन हवं 
अन्य प्रांतांत धार्मिक सोहळे करताना नियोजन अधिक व्यापक व्हायला हवं. यात दोन भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. राज्यातलं नियोजन आणि ज्या ठिकाणी सोहळे करायचं तिथलं नियोजनही अधिक चांगलं असायला हवं. इतक्‍या मोठ्या संख्येनं भाविक जेव्हा अन्य प्रांतांत जातात, तेव्हा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. याविषयीचा 'गृहपाठ' महाराष्ट्रातल्या वारकरी सांप्रदायिक मंडळींनी आगामी काळात करावा लागेल. मुख्य म्हणजे, इतक्‍या दूरवर कार्यक्रम करताना प्रवासाची सुविधा ही बाबही महत्त्वाची ठरते. ती सुलभ झाली तर मग भाविक अशा कार्यक्रमांत सहभागी व्हायला तयार होतो. 

विश्‍वबंधुत्वासाठी प्रबोधन हवं 
जे खळांची व्यंकटी सांडों। 
तया सत्कर्मी रतीं वाढों।। 

 

अशा शब्दांत ज्ञानेश्‍वरमहाराजांनी 'पसायदाना'तून विश्‍वबंधुत्वाचं दान मागितलं आहे. संत ज्ञानेश्‍वरमहाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणं ही आजच्या काळाजी खरी गरज आहे. महाराष्ट्रात गावोगावी वर्षानुवर्षं कीर्तन-प्रवचनांद्वारे संतविचार सांगितले जात आहेत. मात्र, विचारांचं अनुकरण अपेक्षित प्रमाणात होताना दिसत का, याचा विचार आपापल्या पातळीवर केला जायला हवा. 'आधी केले मग सांगितले,' हा संतांचा विचार स्वतःलाही बंधनकारक असला पाहिजे. आपल्या राज्यात संतविचारांचं अनुकरण अत्यंत काटेकोरपणे व्हायला हवं. संतविचारांत आदर्श समाज घडवण्याची ताकद आहे. हे विचार सर्वदूर पोचवण्याच्या कामी ही ताकद कमी पडता कामा नये. केवळ गावची यात्रा आहे, म्हणून ज्ञानेश्‍वरी पारायण करण्यातून काहीच साध्य होणार नाही. संतविचारांची बीजं समाजात रुजवणं हा मुख्य हेतू असायला हवा. त्या विचारांचं अनुकरण महत्त्वाचं होय. असं झालं तरच संतविचारांचं उचित मोल आपण जाणलं, असं म्हणता येईल. संतांचं तत्त्वज्ञान अन्य प्रांतांत जरूर न्यायला हवं. त्याची संपूर्ण देशाला गरज आहे. कारण आदर्श समाजरचना कशी असावी, याचं सूत्र 

ज्ञानेश्‍वरमहाराज, तुकाराममहाराज यांच्यासह सर्व संतांनी आपल्या ओव्या-अभंगांतून सांगितलेलं आहे. त्याचा उपयोग देशाला व्हायला हवा. ज्ञानेश्‍वरमहाराज यांनी पसायदानातून विश्‍वकल्याणाचा व्यापक विचार केला. त्यांचं पसायदान देशातच नव्हे तर, जगभर पोचायला हवे, हा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हवा. त्या विचारांचं काटेकोर अनुकरण हवं. त्यातच विश्वकल्याण सामावलेलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com