तुला पप्पा पण आहेत का?

तुला पप्पा पण आहेत का?
तुला पप्पा पण आहेत का?

बारावीची परीक्षा तोंडावर आलेली... परीक्षेचं टेन्शन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. नव्या कॉलेजमध्ये जावून परीक्षा कशी द्यायची, याच विचारात सगळे होते. कोणाकडं गाडी आहे, कोणाला कोण कॉलेजवर सोडंल, या मुद्दावर बोलत असतानाच ती म्हणाली, "बरं झालं, शुक्रवारी माझे पप्पा आहेत, सोडतील मला ते कॉलेजवर'. त्या तिच्या विधानानं थोडसं चकीत झालेल्या त्या मुलानं तिला प्रश्‍न केला, "तुला पप्पा पण आहेत का'? ती थोडी गोंधळली, त्याच्या प्रश्‍नाचा रोख तिच्या लक्षात येईना. त्यावर तो उत्तरला, "अगं तसं नव्हे, तुझ्या पप्पांना कधी पाहिलंच नाही आम्ही. विचार कोणालाही'! मग तिनं खुलासा केला, "अरे माझे पप्पा कोल्हापुरात असतात.' तिनं जेव्हा हा प्रसंग हसत हसत तिच्या आई-वडिलांना सांगितला तेव्हाही ती विनोदबुद्धी जागी ठेवूनच सांगत होती. पण तिनं सांगितलेला संवाद ऐकून आईनं भुवया उंचावत वडिलांकडं कटाक्ष टाकला. हसता हसता वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी चेहेरा लपवला... पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत ते लेकीला म्हणाले, 'अगं होतं असं कधी कधी. एवढं काय मनावर घ्यायचंय त्यात.' लेक उत्तरली, "तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऍडजेस्ट करतो. तुम्ही सोबत असला नसला तरी आम्ही सर्व निभावून नेतो. पण घराजवळ, हाकेच्या अंतरावर मी असते. दोन वर्षांत कधी तुम्ही आला नाहीत. काय माहिती, शिकायला बाहेरगावी गेल्यावर तरी येताय की नाही माझ्या चौकशीला...'

मित्र थोडासा हाताशपणाचा सुस्कारा सोडत त्याच्या मुलीबाबत घडलेला प्रसंग सांगत होता. नव्हे तो आपली व्यथाच मांडत होता. त्याच्या अंतःकरणातील अपराधीभाव चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटला होता. मध्येच ग्लासातल्या पाण्याचा घोट घेत, अवंढा गिळत तो आपल्या धावपळीची व्यथा मांडत होता...

दुसरा एक प्रसंग असाच. जत्रेचे दिवस असल्यानं दहावीच्या उंबरठ्यावरील मुलाला घेवून साहेब गावाला निघाले होते. नातेवाईकांनाही त्यांची मुलगी जत्रेला पाठवायची होती. साहेबांना त्यांच्या मेव्हुणीनं फोन करून सांगितलं, 'मी माझ्या मुलीलाही पाठवत आहे, तुमच्या मुलाला राहू दे तिथं. दोघं बहिण-भाव जत्रा फिरून येतील. करू दे एक दिवस मुक्काम'. साहेब म्हणाले, "नाही! आजचाच दिवस मी घरी आहे. गेल्यानंतर सायंकाळी त्याचा अभ्यास घ्यायचाय. शाळेत त्याचा परफॉर्मन्स घसरत आहे. आज नाही घेतला अभ्यास तर पुन्हा पंधरा दिवस भेटणार नाही आम्ही...'

दोन्हीही घटना आजच्या जमान्यातील, तुमच्या आमच्या भोवतीच्या आहेत. यातील व्यक्ती बदलल्या तरी अनेक घरांत हा प्रश्‍न आहे, हे खरं. नोकरी, करियर, घरखर्चाची हातमिळवणी असं सगळं करत असताना प्रत्येक आई-वडिलांना कधी ना कधी अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे खरं आहे. आज जीवन गतिमान झालं आहे. शिक्षणानंतर करियर सुरू केल्यानंतर संसाराच्या सप्तपदीपाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या माणसाला एका चक्रात अडकवून ठेवतात. संसार बहरतो तसं तो पेलण्याचं भान त्याला आणि तिला दोघांनाही यायला लागतं. करियरमधल्या बढतीच्या आशा आणि घरखर्चाचे आकडे त्यांना अधिक प्रौढ बनवतात. स्वतःचं करियर करताना मुलांचं करियर कधी सुरू होतं, हेच खरं तर आई-वडिलांच्या लक्षात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याची कधी पुसटशी जाणीवही होत नाही. आपण हौसेनं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत त्यांना ढकलतो. वाघिणीचं ते दूध अधिक घोटून घ्यावं, त्यांना संभाषण कौशल्यापासून सगळं अवगत व्हावं म्हणून जोडीला क्‍लासचा जादा डोस देणं सुरू करतात. वारेमाप पैसे खर्च होतात. मुलं मोठी होवू लागतात तसं छंद वर्गांचं विस्तारीत अवकाश फेर धरू लागतं. तथापि, या सर्वांमध्ये आई, बाबा आणि मुलं यांच्यातील प्रेमळ संवाद, एकमेकांना सहवास हे सर्व असतं तरी कुठं?

पायाला चाकं लावल्यासारखी आई-बाबा दोघंही करियर, घरखर्चाची तोंडमिळवणी यासाठी धावत असतात. कोणे एके काळी घरात आजी, आजोबा, चुलत अशा नात्यांचा गोतावळा असायचा. सगळी भावंडं एका छत्राखाली सख्ख्या, चुलत अशा सर्वांचं प्रेम मिळवत, एकमेकांना आधार देत, मैत्रीपूर्ण वातावरणात मोठी व्हायची. आजी, आजोबा सर्वांवर लक्ष ठेवून असायचे. थोडक्‍यात, सर्वांचीच भावनिक जपणूक, आधाराचा शब्द आणि अनुभवाचे बोल लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला यायचे. त्यातून प्रत्येकाचं आयुष्य फुलायचं आणि ममत्वाचा ओलावा सगळ्यांना मिळायचा. आता कुटूंब त्रिकोणी, फारतर चौकोनी आणि अपवादानंच त्यापेक्षा मोठी आहेत. आजी, आजोबांचं प्रेम मिळालं तरी खूप अशी स्थिती आहे. तिथं मायेचा ओलावा मिळवण्यापासून मुलांसह आई-बाबाही दुरावलेत. सहाजिकच सर्वांची मानसिक ओढाताण आणि कुचंबना होत असते. करियरमागं धावताना एकत्र बसून जेवण, गप्पाटप्पांना वेळ मिळत नाही तिथं आधाराला तरी कोण कोणाच्या येणार हा प्रश्‍नच आहे. मग मुलं एक्कलकोंडी होतात, अबोल होतात. आपल्याच विश्‍वात गुरफटतात. यंत्रांमध्ये गुंततांना त्यांचंही एक यंत्र कसं होतं, हेच लक्षात येत नाही. आई-बाबाही त्यांच्यासारखं आधीच झालेली असतात. मुलांच्या करियरसाठी ते लक्ष देतात, पैसा खर्च करतात, एकापेक्षा एक सरस क्‍लास लावतात. तथापि, त्याची उजळणी कशी घेणार, कोण घेणार असा प्रश्‍न अनेक घरांत असतो. मुलांच्या करियरचा पाया हा शाळेतच घातला जात असतो. तो पक्का होण्यासाठी शाळेतील शिक्षणाबरोबर त्यांना मानसिक बळ, आत्मविश्‍वास, अनुभवाचे बोल, मायेची पखरण यांची गरज असते. त्याकडं नाही लक्ष दिलं तर ती दुरावतात. आई-बाबा आणि मुलांमध्ये मानसिक दरी निर्माण होते. एकमेकांना समजून घेणं अवघड होवू लागतं. आई, बाबांना बघता बघता मुलं मोठी झाली, पण त्यांचं मोठं होणं काळजाच्या कोंदणात जपून ठेवण्याचं राहून गेलं, अशी हुरहूर निर्माण व्हायला लागते. मग मुलांना या वाटचालीत आई-बाबांपेक्षा मित्र, मैत्रिणी जवळचे वाटू लागतात. पण काळाच्या ओघात गेलेले अनेक क्षण परत मिळत नसतात. मुलं जेव्हा चालायला लागतात,

पहिले बोबडे बोल ऐकवतात तेव्हाचे क्षण कोणतेही आई-बाबा कधीच विसरत नाहीत, तसंच मुलांची दहावी-बारावीची वर्षं, त्यांची पुढची स्वप्नं, मैत्रीतील ओलाव्याचे किंवा दुराव्याचे क्षण अगदी पहिल्यांदाच प्रेमात पडण्याचे त्यांचे क्षण, ब्रेकअपनंतरची निराशा हे सगळं सगळं आई-बाबांनीही कधी जवळून तर कधी दुरून निरखायला हवं आणि मनात जपायलाही हवं. त्यासाठी चला घरासाठी, मुलांसाठी वेळ देवू या! मग घरात व्हॅलेंटाईन डे रोजचाच साजरा होईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com