सत्यशोधक समाजसेविका - शारदाबाई गोविंदराव पवार 

डॉ. अरुण शिंदे
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

विसाव्या शतकामध्ये राजकीय व सामाजिक कार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या एक अत्यंत कर्तृत्ववान महिला म्हणजे शारदाबाई गोविंदराव पवार. त्यांचे कार्य स्त्री शक्तीचा रचनात्मक उत्तुंग आविष्कार आहे.... 

शारदाबाईंचा जन्म 12 डिसेंबर 1911 रोजी लक्ष्मीबाई व कृष्णराव या माता-पित्यांच्या पोटी झाला. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता. वडील व्यवसायानिमित्त कोल्हापूरला स्थायिक झाले होते. त्यांचे बालपण कोल्हापूरच्या पुरोगामी वातावरणात गेले. थोरली बहीण कमलादेवी यांचे लग्न श्रीपतराव जाधव ऊर्फ काकासाहेब यांच्याशी झाले. काकासाहेब मुंबई सरकारच्या शेतकी खात्यात डिस्ट्रिक्‍ट ऍग्रिकल्चरल ओव्हरसियर होते. प्रमिला या मुलीच्या जन्मानंतर कमलादेवी क्षयरोगाने वारल्या. पुढे काही दिवसांनी शारदाबाईंचे वडीलही वारले. या निराधार कुटुंबाला काकासाहेबांनी आधार दिला. शारदाबाईंचे शिक्षण पुण्याच्या सेवासदन प्रशालेत झाले. शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणिवा विकसित करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात काकासाहेब शारदाबाईंना बरोबर घेऊन जात. तेथील विचारांचा प्रभाव शारदाबाईंच्यावर पडला. शिक्षणाचे महत्त्व उमगत गेले. डोळस निरीक्षण व बुद्धिवादी विचार प्रवाहातून बालमन घडत गेले. त्या 1926 साली व्हर्नाक्‍युलर फायनल उत्तीर्ण झाल्या. 

काकासाहेब नोकरीनिमित्त बारामतीस असताना त्यांची गोविंदराव पवार यांच्याशी ओळख झाली. गोविंदरावांना सर्वजण आबा म्हणत. त्यांचा जन्म सन 1900 मधील. आबा जिद्दीने शिकले. त्यांनी काही काळ पुण्याच्या शिवाजी मराठा संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. पुढे नोकरी सोडून बारामतीला गेले. तेथे खरेदी-विक्री संघात नोकरीला लागले. शेतकऱ्यांच्या समस्या व मागासलेपण पाहिले. खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी "श्री शाहू मराठा बोर्डिंग' स्थापनेत पुढाकार घेतला. काकासाहेब व आबा दोघेही सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आबांच्या बरोबर शारदाबाईंचा विवाह सत्यशोधक पद्धतीने म्हणजे कोल्हापूरच्या मराठा पुरोहितांच्याकडून लग्नविधी केले. त्यांच्या सहजीवनाला 1926 मध्ये सुरुवात झाली. आबांच्या आई-वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याने त्यांना संसाराची सुरुवात शून्यातून करावी लागली. दोन खोल्यांच्या घरात ते राहत. शारदाबाई सर्वांमध्ये मिळून मिसळून वागत. सर्वजण त्यांना "बाई' म्हणू लागले. हे नाव त्यांना इतके चिकटले की, त्यांची स्वतःची मुलेही त्यांना बाईच म्हणत. 

बाईंनी काटेवाडी येथे थोडी जमीन घेतली. त्यासाठी स्वतःचे दागिने विकले. शेतावर जाण्या-येण्याची अडचण होती; म्हणून एक जुना टांगा व घोडे विकत घेतले. टांगा चालवण्यासाठी नोकर ठेवण्याची ऐपत नसल्याने त्या स्वतःच टांगा जुंपून शेतावर जा-ये करीत. त्याकाळी मराठा समाजातील स्त्रिया "चूल व मूल' यामध्येच कोंडलेल्या असत. बाहेर जाताना शेलकट नेसून, पडदा लावलेल्या गाडीतून जात. अशा रूढीग्रस्त काळात बाईंनी टांगा चालविणे समाजाला जबरदस्त धक्का देणारे होते. त्याचप्रमाणे बदलाची वाट दाखविणारे होते. व्यवहारचातुर्य, बुद्धिमत्ता, नियोजन, श्रम यामुळे त्यांच्या कामाला यश येत गेले. शेती बहरत, पिकत गेली. त्या स्वतः पहाटे चारपासून रात्री उशीरपर्यंत काम करीत. श्रमप्रतिष्ठा, कष्टाचा पैसा, प्रामाणिकपणा यांना बाईंच्या लेखी खूप महत्त्व होते. बाईंची दूरदृष्टी, काटकसरी स्वभाव, आदर्श वागणूक, कष्ट इत्यादी गुण जाणून आबांनी त्यांना विचारस्वातंत्र्य, निर्णयस्वातंत्र्य दिले. घरची जबाबदारी सोपविली. परस्पर विश्‍वास व आदर यातून त्यांचे सहजीवन फुलत गेले. 

1940 च्या सुमारास आबांनी शेतीबरोबरच गुऱ्हाळ चालू केले. अडत दुकान काढले. गुळाचा व्यापार केला. दुसरे महायुद्ध, जागतिक मंदी यामुळे गुळाचे दर घसरले व त्यांना धंद्यात खोट आली. पुढे त्यांनी पिठाची गिरणी चालविली. पारंपरिक शेतीत त्यांनी बदल केला. आधुनिक तंत्रज्ञान, बागायती पिके, फळबागा, कुक्कुटपालन, पशुपालन यासारखे जोडव्यवसाय केले. प्रगतिशील शेतकरी म्हणून परिश्रमपूर्वक लौकिक मिळविला. बाईंनी आबांना समर्थ साथ दिली. आबांच्या प्रागतिक विचारामुळे आपल्याला सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली याची कृतार्थ जाणीव त्यांना होती. त्यांनी नेकीने संसार केला. बाजारहाटातून शिल्लक राहिलेले व साठवून ठेवलेले पैसे घर बांधण्यासाठी आबांच्या हवाली केले. कोणत्याही गोष्टीचा मोह धरला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. काळाच्या कितीतरी पुढे असणारे ते एक आदर्श जोडपे होते. 

बाईंनी मुलांना व्यवहारात तरबेज केले. शेतातील धान्य, भाजीपाला, दूध वगैरे विक्रीसाठी मुलांना पाठवले. मंडईत भाजी विक्रीस मुलांना बसवले. कोणत्याही कामाची मुलांना लाज वाटू नये, त्यांच्यामध्ये व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, याकडे त्यांचा कटाक्ष होता. घरातील पडेल ते काम प्रत्येकाने केले पाहिजे, हा दंडक होता. आळस, चुकारपणा यांचा त्यांना तिटकारा होता. कामामधून आत्मविश्‍वास येतो, व्यावहारिक शहाणपण वाढते. त्यामुळे आयुष्यात काही कमी पडत नाही, असे त्या म्हणत. खुद्द शरद पवारांनी शेतीमालाची विक्री, बाजारहाट अशांसारखी अनेक कामे केली. बाजारातील ओळखीचा पुढे त्यांना राजकारणासाठी फायदा झाला. प्रतापरावांना दूध विकण्यासाठी त्यांच्या वर्गातील एका मुलीच्या घरी जाण्याची लाज वाटायची. ही गोष्ट बाईंच्या लक्षात आल्यावर त्या रागावून म्हणाल्या, "दूध विकतोस, दारू नाही! घरातल्या कामाची लाज कसली?' बाईंच्याकडून मुलांच्या मनावर असे अनेक पैलू पाडले गेले. कामाशी तडजोड न करता पुढे जाण्याचा धडा बाईंनी सर्वांना दिला. यामुळे व्यवसायनिष्ठा, व्यावहारिक कौशल्ये, आत्मविश्‍वास यांसारख्या किती तरी गोष्टी बालवयातच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनल्या. त्याचा त्यांना पुढे खूप फायदा झाला. या संदर्भात माधवराव पवार म्हणत, ""बाईंनी आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून विक्रीची सवय लावली. त्यामुळे मोठेपणी जगाच्या बाजारपेठेत स्वतःची उत्पादने विकताना फारसे वेगळे शिकण्याची गरजच पडली नाही.'' त्यांना नकार पचवायला शिकवला. जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आली पाहिजे. रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहू नये. मोठ्यांचा मान राखणे, सदैव क्रियाशील असणे, नीटनेटकेपणा, माणसे जोडणे, ध्येय ठेवून कार्यरत राहणे अशा कितीतरी गोष्टी बाईंनी मुलांच्यावर बिंबवल्या. मुलांच्या विचार प्रक्रियेला वळण लावले. ध्येयवाद, समाजनिष्ठा, वैचारिकता, डोळसता यांचे संस्कार मात्र जाणीवपूर्वक केले. त्यामुळे आज पवार कुटुंबीय पुरोगामी विचारांबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. 

शारदाबाईंनी आपल्या सर्व मुला-मुलींना उत्तम शिक्षण दिले. प्रत्येकाला त्याची आवड, क्षमता पाहून त्या दिशेने शिक्षण दिले. आपल्या बारा मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्यातील तीस-पस्तीस वर्षे खर्ची घातली. ऐपत नसताना मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला दागिने, जमीन विकली. पण हात आखडता घेतला नाही. "प्रसंगी उपाशी राहू, पण मुलांना उत्तम शिकवू' या बाण्याने त्यांनी मुलांना शिक्षण दिले. अभ्यासाबरोबर खेळातही मुलांनी पुढे असावे, म्हणून त्या दक्ष असत. काही काळ त्यांची सहा मुले शिक्षणासाठी पुण्यात एका भाड्याच्या खोलीत राहत होती. बाई पहाटे साडेतीनला उठून मुलांना दोन वेळ पुरेल एवढा स्वयंपाक करीत. स्वतः टांग्यावरून बारामती स्टॅंडवर येऊन डबा एसटीने पुण्यास पाठवीत. मुलांचे शिक्षण हे बाईंचे जीवनध्येय होते. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले. व्यक्तिमत्त्व विकास, खेळ, वाचन, आरोग्य, व्यायाम, वैचारिकता, लोकांना मदत या गोष्टीही त्यांनी अभ्यासाइतक्‍याच महत्त्वाच्या मानल्या. शिक्षण घेऊन स्वतःला व समाजाला बदलण्याचा पीळ निर्माण केला. जगण्यासाठी आत्मविश्वास, दृष्टी व कौशल्ये दिली. मुला-मुलींमध्ये भेद केला नाही. मुलांच्या इतकीच संधी व स्वातंत्र्य मुलींना दिले. मुलींना घोड्यावर बसायला, पोहायला, चारचाकी गाडी चालवायला शिकवले. सर्व खेळात भाग घेऊ दिला. एकट्याने प्रवास करण्यास पाठवले. त्यामुळे त्यांच्या मुलींनीही स्वतःच्या संसाराबरोबर आपापल्या क्षेत्रात नाव कमावले. 

बाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. सत्यशोधक समाजाचा प्रचार करीत. बहुजन समाजाला सामाजिक, वैचारिक गुलामगिरी व आर्थिक दारिद्य्रामधून मुक्ततेसाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी शिक्षणाबाबत लोकजागृती केली. कर्मवीर भाऊराव अण्णांच्या शिक्षण कार्याविषयी त्यांना आस्था होती. त्यांनी आपल्या मुलांनाही "रयत'मध्ये शिकवले. रयत शिक्षण संस्थेला शक्‍य ती मदत केली. बारामतीस आल्यावर कर्मवीर अण्णा त्यांच्याकडे उतरत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बारामतीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा निघाला. त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र होते. क्रांतिकारकांना, देशभक्तांना त्यांनी आश्रय दिला. क्रांतिसिंह नाना पाटील त्यांना बहीण मानत होते. जबाबदारी, मुलांचे संगोपन, शिक्षण, संस्कार, शेतीची कामे, सामाजिक कार्य, लोकांच्या अडीअडचणी, लोकल बोर्डाची कामे अशा अनेक गोष्टी बाई अष्टौप्रहर करीत. लोकांच्या सदैव उपयोगी पडत. बाळंतपणापासून आजारपणातील शुश्रूषा व आर्थिक मदतीपर्यंत धावून जात. मुलांनी इतरांना मदत केली नाही तर जाब विचारीत. सामाजिक ऋण जपण्याची खूप मोठी शिकवणूक बाईंनी दिली. तो त्यांचा स्थायीभाव होता. 

बाईंच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी घटना 1938 मध्ये घडली. त्यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे पुणे जिल्हा लोकल बार्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यांची बिनविरोध निवड झाली. 1938 ते 1952 या काळात त्या सलग चैदा वर्षे लोकल बोर्डाच्या एकमेव महिला सदस्य होत्या. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्या पहिल्यांदा निवडून गेल्या. त्या सात महिन्यांच्या गर्भवती असताना बोर्डाच्या पहिल्या बैठकीस हजर होत्या. बारामतीहून पुण्याला लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी जाण्यास त्याकाळी आजच्या सारखी वाहनांची सोय नव्हती. कोळशावर चालणाऱ्या खासगी गाडीने किंवा दौंडहून रेल्वेने त्या पुण्यास ये-जा करीत. पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे आवरून त्या पुण्याला बैठकीस वेळेवर उपस्थित होत. दोन मुलांना सांभाळत सलग नऊ वर्षे पुण्यास येत. केवळ दोन महिन्याचे तान्हे बाळ बरोबर घेऊन बैठकीस जात. स्टॅंडवरून बैठकीच्या ठिकाणी बहुधा पायी ये-जा करून टांग्याचे पैसे वाचवीत. 

ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली मर्यादित अधिकार लोकल बोर्डांना होते. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. मतदारसंघातील प्रश्नांना सोडविण्यासाठी व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या दक्ष असत. बैठकीतील निर्णय चर्चा, ठराव, अर्थसंकल्पातील मागण्या वगैरे कामकाजात अभ्यासपूर्ण रीतीने भाग घेत. स्वतंत्र मते मांडत. त्यांचे अभ्यासू, बुद्धिमान, लोकहितदक्ष, महत्त्वाकांक्षी, करारी व्यक्तिमत्त्व येथे खऱ्या अर्थाने प्रकटले. बाईंची लोकल बोर्डामधील कारकीर्द गाजली. त्यांनी चौदा वर्षात विविध समित्यांवर काम केले. सार्वजनिक आरोग्य समिती, पंचायत समिती, बांधकाम समिती, स्थायी समिती अशा विविध समित्यांच्या सदस्य व काही वेळा चेअरमन म्हणून काम केले. लोकल बोर्डाच्या मर्यादित अधिकार कक्षेतही त्यांनी लोकांचे प्रश्‍न धसास लावले. तत्कालीन सामाजिक राजकीय घटना घडामोडींवर विचार मांडले. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे जमिनींचे लिलाव होत. त्यात हस्तक्षेप करून बाई ते थांबवत. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात त्यांनी नैतिकतेला सर्वोच्च स्थान दिले. लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी पूर्ण तयारी करून त्या जात. एखाद्या प्रश्‍नाचे सखोल अध्ययन करून, टिपणे काढून मुद्देसूदपणे बोलत. त्यामुळे त्यांच्या मांडणीकडे सर्वांचे लक्ष असे. त्यांनी दुष्काळी परिस्थितीत घरोघरी फिरून लोकांच्या अडचणी बोर्डामध्ये मांडल्या. शेतीची पाणीपट्टी, लोकल कर कमी करण्याची मागणी केली. दुष्काळाचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी दुष्काळ निवारण फंड स्थापन करण्याची अभिनव कल्पना मांडली. लेव्ही वसुली, धान्यास जिल्हा बंदी यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व महागाई वाढ त्यांनी सरकारपुढे मांडली. सार्वजनिक आरोग्य समितीचे सदस्य असताना पंधरा दवाखाने सुरू केले. प्लेगच्या साथीच्या कालावधीत बारामतीस हॉस्पिटल उघडले. सरकारच्या दारूबंदी धोरणास पाठिंबा दिला. सार्वजनिक बांधकाम समितीवर असताना रस्त्यांची निर्मिती प्रधान्याने केली. त्यांनी आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात जवळ जवळ 51 रस्त्यांचे काम केले. छोटी मोठी गावे रस्त्याने जोडली. खेड्यांच्या परिवर्तनास त्यांनी रस्त्यापासून सुरुवात केली. माणसांचे दवाखाने, जनावरांचे दवाखाने, शाळा दुरुस्ती ,ऑफिस, व्यायामशाळा, वृक्षारोपण, नदीघाट, हौद, पूल, पाणीपुरवठा यांसारखी खेडुतांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित अनेक कामे केली. वाहतूक, आरोग्य, शिक्षण हे विषय बाईंच्या अत्यंत आस्थेचे होते. खेड्याच्या विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून त्या राजकारणाकडे पाहत होत्या. 

बाई पुरोगामी विचारांच्या, बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. अंधश्रध्दा, कर्मकांडे, अनिष्ट रूढी-परंपरा, पूजाअर्चा, भुतेखेते यांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. कठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांचे जीवनसूत्र होते व त्यांनी ते आयुष्यभर उक्ती व कृतीतून पाळले. सत्यशोधकीय विचारांमुळे जातपात, अस्पृश्‍यता, देवधर्म यांना बाईनी कधीही थारा दिला नाही. स्वतःच्या मनातून व घरातूनच त्यांनी प्रथम जातीयततेचे उच्चाटन केले. सर्व जातिधर्मातील गुणी माणसांचा गोतावळा तयार केला. अनेक अनाथ गरीब मुलांना सांभाळले. गरिबांचे संसार उभे केले. परंतु या कामाचा कधीही गवगवा केला नाही. "जगा आणि जगवा' हा मूल्यविचार बाईंच्या जगण्यात केंद्रवर्ती होता. 

वयाच्या चाळिसाव्या वर्षी बाईंना एक विचित्र अपघात झाला. त्यांचा एक पाय मोडला. त्यांची झपाटलेली दैनंदिनी विसावली. पुढे अनेक दिवस त्या अंथरुणावर होत्या. या अपघातापासून लोकल बोर्डाच्या कामकाजाची चौदा वर्षांची सलग परंपरा कायमची थांबली. पुढील 23 वर्षांचे आयुष्य त्यांनी कुबड्या घेऊन काढले. दुर्दम्य इच्छाशक्ती व अखंड क्रियाशीलतेच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला प्रगतिपथावर नेले. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यावर बाई, आबा व त्यांचे चिरंजीव वसंतराव शे. का. प. चे कार्यकर्ते झाले. शेकापच्या बहुतांश मंडळींना सत्यशोधक चळवळीची पार्श्‍वभूमी होती. बाईंचा कल समाजवादाकडे होता. 1959 सालाच्या पोटनिवडणुकीत शेकापकडून वसंतराव उभे राहिले. कॉंग्रेसने त्यांच्या पराभवासाठी शर्थ केली. वसंतरावांचा पराभव व त्यांचा 1962 साली झालेला अकाली मृत्यू यामुळे बाई मनातून फार खचल्या गेल्या. पुढे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत त्या शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्या. 1972 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार राज्यमंत्री झाल्याचे त्यांना पाहायला मिळाले. एकदा मुंबईत गाडीचा दरवाजा बंद करताना बाईंचा अंगठा सापडला. ती जखम बरी झाली नाही. वरचेवर आजार बळावत गेला. शेवटी 12 ऑगस्ट 1974 रोजी त्यांची जीवनयात्रा संपली. 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर नीट विचार केल्यास शारदाबाईंच्या कार्याचे मोठेपण लक्षात येते. बालपणीच पित्याचा आधार हरवलेल्या शारदाबाई शिक्षण, स्वतंत्र विचार, डोळस निरीक्षण, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वास्तवाचे आकलन, काळाच्या पुढे पाहणारी दृष्टी यांच्या बळावर स्वकर्तृत्वाने मोठ्या झाल्या. सत्यशोधकीय विचारांचा अंगीकार स्वतःच्या विवाहापासून केला. बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी बुरसटलेल्या मानसिकतेला व सरंजामी स्थितिशील व्यवस्थेला सतत कृतिशील आव्हान दिले. खेड्यात राहूनही जातपात, देवधर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांसारख्या शोषक घटकांना नाकारले. बुद्धिप्रामाण्य, नैतिकता व माणुसकी सर्वश्रेष्ठ मानली. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जीवापाड जपली. समाजाच्या मोठ्या संसारात स्वतःचा संसार करण्याचा नवा पायंडा पाडला. मुलाबाळांच्या शिक्षणाचे व संस्काराचे अनुभवसिद्ध देशी तत्त्वज्ञान मांडले. व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यविचार, स्वावलंबन, सामाजिक भान व व्यावसायिक कौशल्ये विकसित करणारी दूरदृष्टी मुलांना दिली. त्यांना वेगवेगळ्या अकरा क्षेत्रात जाण्याची संधी दिली. ग्रामीण कुटुंबव्यवस्थेतील समूहभाव व गणगोत जपत आधुनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. लोकलबोर्डाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कारभाराचा प्रत्यय दिला. शेतकरी कष्टकरी स्त्रियांच्या विकसनाच्या कितीतरी वाटा त्यांनी आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातून दाखविल्या आहेत. स्त्रीमुक्तीचा व एका वेगळ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहास घडविणाऱ्या शारदाबाईंचे जीवन कार्य समग्रतेने समजून घेणे आवश्‍यक आहे. 

(लेखक कोल्हापूर येथील नाईट कॉलेजमध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत.) 
 

Web Title: Dr. Arun Shinde article