हलके फुलके क्षण अन् आनंदाचा ''बॅलन्स''

Happiness
Happinessesakal

''पंख सकारात्मकतेचे हे सदर सुरू होऊन बरोबर सात आठवडे झाले आहेत. आजचा हा लेख या साप्ताहिक सदरातील सातवा आहे. या सदरातील लेखनाद्वारे आत्तापर्यंत बहुतेक गंभीर विषयांना हात घातला आहे. त्यामुळे आज अगदीच वेगळ्या अशा विनोदी गोष्टीकडे आपण वळूया.'' - डॉ. हेमंत ओस्तवाल

मित्रांनो, ही गोष्ट आहे १९८३ सालातील. मी डॉक्टरकीच्या तिसऱ्या वर्षाला होतो. गोष्ट चांदवडची आहे. माझे वडील म्हणजे पवन सर (श्री. पवनलाल चंदुलाल ओस्तवाल, हे श्री नेमिनाथ जैन हायस्कूल मध्ये शिक्षक व त्याबरोबरच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचऱ्याश्रम येथे या संस्थेत व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या सांभाळीत होते) यांच्या चाणाक्ष नजरेत एक संजय पाटील नावाचा विद्यार्थी अगदी त्याच्या लहानपणीच आला होता. हा संजय अतिशय मेहनती आणि हुशार होता. दुर्देवाने त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती मात्र तेवढी चांगली नव्हती. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम ही जैन समाजाने आपल्या दातृत्वाने चालवलेली संस्था. या संस्थेने अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे नंदनवन फुलवले. हा संजय देखील याच संस्थेत शिक्षण घेत होता. तेव्हाच तो माझ्या वडिलांच्या म्हणजेच पवन सरांच्या नजरेत आला. एक वेळ अशी आली होती, की संजयचे शिक्षण पैशाअभावी बंद पडणार होते. परंतु वडिलांनी सर्वार्थाने संजयची काळजी घेतली. संजयला फ्रीशिप मध्ये संस्थेत ठेवले. शिक्षणात हर तऱ्हेने मदत केली. निव्वळ शिक्षणात नव्हे, तर संजयच्या संपूर्ण आयुष्याला आकार देण्यात माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा होता.

Happiness
पुरंदर-वज्रगड गाती बुलंद आत्मविश्वासाचे पोवाडे

संजयचे शिक्षण संपले आणि वडिलांनी त्यास संस्थेच्या लेखा विभागात रुजु करुन घेतले. म्हणता म्हणता संजय आयुष्यात उत्तररित्या सेटल झाला. संजयच्या लग्नाच्या गोष्टी होऊ लागल्या. त्याला अनेक स्थळ सांगून येत होती. कुठे मुलगी पसंत पडत नव्हती तर कुठे मुलगा पसंत पडत नव्हता. एकेदिवशी हा योग जुळून आला. मुलगी पसंत पडली. परंतु नशिबाचे फेरे अजून संपलेले नव्हते. घरच्या सख्ख्या नातेवाईकांनी त्यात खोडा घालायचा प्रयत्न केला. परंतु संजयच्या मागे माझे वडील अतिशय खंबीरपणे उभे होते. त्यांनी सर्व काही घडवून आणले. अशा रीतीने आमच्या संजयची सोयरीक विदर्भामधील अकोला येथे झाली. लग्नाचा दिवस जवळ आला. कार्यबाहुल्यामुळे वडील लग्नाला जाऊ शकले नाहीत. पर्यायाने या लग्नाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मी देखील ती छान पद्धतीने सांभाळून लग्न अतिशय आनंदात पार पाडले. हे सर्व सांभाळत असताना नववधूशी आणि तिच्या संपूर्ण परिवाराची देखील माझी चांगलीच ओळख झाली होती. अकोल्याहून आम्ही दुपारी महाराष्ट्र एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला लागलो होतो. या प्रवासात नववधू म्हणजे सुनंदाशी गप्पा मारता मारता एक मस्त प्लॅन तयार झाला, तो प्लॅन होता पहिल्या रात्री म्हणजे सुहाग रात्रीचा.

या प्लॅननुसार मी संजयची नववधू म्हणून खोलीत थांबायचं, असं ठरलं. रात्री उशीरा आम्ही चांदवडला पोहोचलो. संजय आणि माझ्या वयात फारसा फरक नसल्याने आमच्याही आधीपासूनच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काही धार्मिक विधी पार पडले. दुपारी मी संजयचा चांगलाच ब्रेन वॉश केला. कशासाठी? तर पहिल्या रात्री म्हणजे सुहागरात्री नेमकं काय काय करायला हवं ! काय नको करायला ! कारण ''फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन'' वैगरे वैगरे...इंग्रजीतील या वाक्यप्रचारानुसार तुम्हा दोघांची आजची पहिली भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे. असं सगळं माझ्या प्लॅनला जे-जे म्हणून काही सोयीस्कर होतं, ते मी यशस्वीरित्या संजयच्या मनावर बिंबविलं. म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. शेवटचं संजयशी बोलून मी त्याची रजा घेतली आणि घरातील पुढच्या दारानं निघून मागच्या दारानं परत घरात प्रवेश केला. संजयचा शयनकक्ष हा मागेच होता. मी आणि सुनंदा ठरल्याप्रमाणे रुममध्ये गेलो. सुनंदाचे दागिने घालायचा प्रयत्न केला, मंगळसूत्र सोडलं तर तिचा कुठलाही दागिना मला येईना मोठा अवघड प्रश्न तयार झाला होता. शेवटी तिनेच आलेल्या नातेवाईक मंडळीतील एका जाडजूड स्रीच्या बांगड्या काढून मला आणून दिल्या. सुनंदाने मला छानशी साडी नेसवली, हा तर मोठा अवघड कार्यक्रम होता. पण सुनंदाने छान मॅनेज केला. अत्यंत मर्यादित दागिने आणि एक सुंदरशी साडी एवढ्या मोजक्या साहित्यनिशी मी नववधू म्हणून पहिल्या रात्रीसाठी तयार होऊन खोलीत बसलो...म्हणजे बसली..मनात बरीच धाकधुक सुरु होती. जीव घाबरत होता, आयुष्यात पहिल्यांदाच अशी काहीतरी विचित्र गंमत मी करत होतो. थोड्यावेळानं शयन कक्षात संजय आला. तेव्हा तर मला अक्षरशः दरदरून घामच फुटला. संजयला शिकवुन ठेवल्याप्रमाणे तो छान पैकी रोमँटिक गाण्याची धून गुणगुणतच आला होता. मंद सुगंध असलेला स्प्रेही त्याने मारलेला होता. त्यातल्या त्यात संजयने एक छान काम केलं होतं. मोठा दिवा बंद करून छोटा दिवा लावला होता. मग एक एक फॉर्मलीटी तो पूर्ण करायला लागला. मला छानपैकी त्याने पेढा भरविला.

Happiness
कुठून येतो आपलेपणा-परकेपणा?

त्याने मग पदर डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो मी ''हटो जी शर्म आती है'' असा बारीक आवाज काढत अयशस्वी केला. त्याने तो प्रयत्न पुन्हा पुन्हा केला. परंतु मी मात्र त्याला काही केल्या दाद दिली नाही. शेवटी कंटाळून त्याने ''घुंगट उठाने के लिये'' म्हणून त्याकाळी हजार रुपये त्याने माझ्यासमोर टाकले. असं करायचं हे देखील मीच त्याला शिकवून ठेवले होते. त्याच पद्धतीने तो तशा कृती करीत होता. आता त्याने आता छान गप्पा मारायला सुरुवात केली. मी अगदीच बारीक आवाजात (जो की स्त्रीचा आहे, की पुरुषाचा हेच कळत नव्हते, ही पूर्ण खबरदारी घेत) बोलत होतो. हे सगळं होईपर्यंत जवळपास अर्धा तास उलटला. शयन कक्षाच्या बाहेरून आता मोठ्यामोठ्याने हसण्याचे खूप सारे आवाज येऊ लागले. एव्हाना बाहेरच्या नातेवाईकांना कळून चुकले होते की, खरी नववधू अर्थात सुनंदा ही बाहेरच होती, आणि मध्ये हेमंत म्हणजे मी आहे. त्यामुळे त्यांच्या हास्याच्या कारंजांना पारावार राहिलेला नव्हता. ते हास्य ऐकून मला देखील हसू आवरणे कठीण झाले होते. मग मी संजयवर नाटकी संताप केला, की "कितने बेशरम लोग है, आपके यहा, यहा हमारी सुहागरात है और ये हस रहे है" आणि मग मात्र संजयचा संताप अनावर झाला. संजय तावातावाने शयन कक्षाबाहेर आला. त्याला पाहताच सगळ्यांच्या हास्याचा जणू स्फोट झाला. सर्व लोक अक्षरशः गडाबडा लोळून हसायला लागली. संजयचा संताप तर अजुनच अनावर झाला, तो काहींना तर अगदी मारायलाच धावला. ते पाहून बऱ्याचशा मंडळींनी तिथून काढता पाय घेतला. त्यादरम्यान मी ही मनमुराद हसून घेतले.

संजय आता आला आणि पुन्हा एकदा आमच्या गप्पा सुरु झाल्या. तो काही फारशा गप्पांच्या मूडमध्ये नव्हताच. पण माझ्याकडे मात्र दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी त्याचा ब्रेन वॉश करताना हे त्याच्या मनावर बिंबवून ठेवले होते, की पहिल्या रात्री कुठलीही घाई गडबड करायची नाही. एकमेकांशी संवाद हा व्यवस्थित झाला पाहिजे वगैरे. म्हणून संजय बिचारा माझ्याशी सुनंदा समजून बराच वेळ बोलत राहिला. यावेळी मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास जाणून घेतला आणि त्याबरोबरच त्याच्या आयुष्याचा भावी प्लॅन देखील जाणून घेतला. तिकडे बाहेर मात्र पुन्हा एकदा हास्याचे फवारे जोरजोरात उसळू लागले. यावेळी हे फवारे जरा जास्तच जोरात होते. त्यामुळे मला स्वतःलाही कंट्रोल करायला फारच अवघड जात होते.मग पुन्हा एकदा मी चिडल्याचे नाटक केले. संजयला सांगितले "हटो जी, आपके रिश्तेदार तो बहुत ही बेशरम लोग है जी, मै ही जा के देखती हु " असे म्हणून मी शयन कक्षाच्या बाहेर आलो. ते जुन्या पद्धतीचे घर होते. तेथे एक मोठा वाडा होता आणि सर्व लोकं तेथे जमुन प्रचंड हसत होते. तिथेच एक बाज होती, मी त्यावर धाडकन अंग टाकले आणि भरपूर हसून घेतले. मग सगळ्यांना हाताने इशारे करून शांत केले. अर्थातच, त्या सगळ्यांना धमाल मजा येत असल्याने त्या सर्वांनी माझे ऐकले आणि पुन्हा एकदा मी शयन कक्षात प्रवेश केला. दोन्ही वेळेपेक्षा यावेळी जरा जास्तच कठीण परीक्षा होती. माझा मित्र संजयचा संयम संपत चालला होता. मी तर गप्पाच मारायचा प्रयत्न करत होतो. यावेळी मी माझ्या स्वतःबद्दल त्याचं काय मत आहे, हे देखील जाणून घेतलं आणि अर्थातच ते मत खूपच चांगलं होतं. मी मुद्दाहून माझ्या स्वतःबद्दल वेडवाकडं बोलून बघितलं. परंतु नाही, त्याचं माझ्याबद्दलच मत अत्यंत चांगलं होतं. माझ्या वडिलांना आणि कुटुंबीयांना तर तो देवच मानत होता. आता मात्र संजयचा संयम संपत असल्याने त्याचे माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. मी आपल्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो. बाहेर तर आता हास्याचे नुसतेच फवारे नव्हे तर प्रचंड स्फोटाहून स्फोट होत होते. त्यामुळेच मलाही संयम ठेवून (हास्यावर) अत्यंत कठीण जात होते. खरं सांगायचं तर इथे सगळ्या डिटेल्स मांडणंही अवघड आहे. म्हणता म्हणता दीड तास उलटून गेला.

Happiness
ती तेव्हा तशी...

मी माझे हसणे जेमतेम कंट्रोल करत मागच्या प्रमाणेच संतापाची, रागाची ॲक्टिंग करत एकदाचा बाहेर पडलो. तेव्हा उपस्थित नातेवाईकांच्या बरोबर प्रचंड मोठ्या हास्य सागरात बुडून गेलो. मी परत शयन कक्षात का येईना, म्हणून माझ्या मागे संजय देखील आला. तिथे त्याला दोन नववधू दिसल्याने त्याचा जो गोंधळ उडाला, ते बघून सगळ्यांचीच पुन्हा एकदा हसून हसून पुरेवाट झाली. मग काहीच न बोलता खऱ्या सुनंदेने संजयला हात धरून शयन कक्षात नेले. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या संवादाची आपण कल्पनाच करु शकतो. सुनंदा सुद्धा शयनकक्षात गेल्यानंतर मनमुराद हसली. खरं सांगायचं तर अक्षरशः गडाबडा लोळत हसली (हे सर्व तिने मला दुसऱ्या दिवशी सांगितले) संजय बापडा सर्व काही अगदीच केविलवाण्या नजरेने बघत राहिला. बिचारा संजय आधीच हतप्रभ झाला होता. मोठ्या मुश्किलीने सुनंदानं आपले हसू कंट्रोल करत संजयला विचारले, ''क्यूँ जी, आपको कुछ भी समझ में नही आया? क्या बात करते हो जी?'' संजय फक्त रडायचाच बाकी राहिला होता. मग सुनंदाने त्याला उलगडा केला, अजी हेमंत था वो. संजयचा मात्र विश्‍वासच बसत नव्हता, शक्यच नाही, असं तो वारंवार सांगत होता.

सुनंदाने त्याला शांतपणे सर्व काही समजावून सांगायला सुरुवात केली. मग कुठे संजयला काय घडलं हे कळलं. त्याचा अर्थातच स्वतःवर संतापाने तिळपापड झाला. मी मात्र घराकडे काढता पाय घेतला होता. मात्र उत्सुकता मला शांत बसू देत नव्हती. मी अगदी सकाळी साडेसहालाच संजयच्या घरी जाऊन पोहोचलो. योगायोग असा मी संजयच्या घरात प्रवेश केला, तो देखील मागच्या बाजूने घरात आला. दोन्ही समोरासमोर येऊन पोहोचलो, आणि काय सांगू संजयच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा संताप स्पष्ट दिसत होता. अर्थातच हा संताप काही खरोखर भांडणं होतात, तसला अजिबात नव्हता. तर त्याच्या डोळ्यातील भाव सांगत होते की तू? तू ? तू करावीस अशी चेष्टा? अरे आपण तर एवढे जवळचे मित्र ना ! असे स्पष्ट भाव माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी मात्र तेथून धूम ठोकली. त्यानंतर तब्बल पाच ते सहा महिने आमचा अबोला होता. मी संजयच्या समोर जाऊन उभा राहायचो आणि त्याचं लक्ष वेधून घ्यायचो आणि धूम ठोकायचो.

Happiness
सोनेरी स्वप्नं : पुष्पाचा दिलजले आशिक

या सदरातून पहिल्यांदाच असं हलका फुलका विषय मांडला. हल्ली काय झालंय, तर सगळंच फार गंभीर वातावरण आपल्या आजूबाजुला आहे. निखळ विनोद तर पार हरवलाय. अनेकांच्या चेहऱ्यावरची माशी काही केल्या उडत नाही. अनेकांच्या कपाळावरच्या आढ्या तर वातावरण अधिक गंभीर करुन टाकतात. आयुष्य खरंच असं बोजड, अवघड आणि क्लीष्ट आहे...? अजिबात नाही. मोकळेपणाने वावरण्याचे, सुखद आनंदी क्षण शोधण्याची गरज आज आपल्याला जाणवते. मग अशा छोट्या-छोट्या गंमतीशीर प्रसंगांमधून आनंदाची पेरणी करता येणं शक्य असतं. हास्य चेहऱ्यावर खुलवणं ही तशी खूपच अवघड गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वभाव विनोदी असेल, असं माझं अजिबात म्हणणं नाही. मात्र अस्सल विनोदाला दाद आपण नक्कीच देऊ शकतो. आता वातावरणात थोडा तजेलापणा नक्कीच आणू शकतो. जसं आपण जेवायला बसल्यानंतर फक्त तिखट किंवा फक्त कडू असं काहीतरी खात बसतो का? येईल का मजा आपल्याला जेवण्याची? नाही ना ! आपले आयुष्य असंच आहे. अशा काही गमतीच्या क्षणांमधून आपण जीवनातील निर्मळ आनंद शोधायचा असतो. ही मिळालेली ऊर्जा नकारात्मक क्षणांना सामोरं जाण्यासाठी आपला आनंदाचा बॅलन्स वाढवण्यास मदत करत असते.

(लेखक सुयश या प्रतिथयश हॉस्पिटलचे संचालक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com