निमित्त ‘डॉक्‍टर्स डे’चं... (डॉ. कैलास कमोद)

निमित्त ‘डॉक्‍टर्स डे’चं... (डॉ. कैलास कमोद)

भारतात एक जुलै रोजी डॉक्‍टर्स डे साजरा केला जातो. पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सेवाभावी डॉक्‍टर म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात नावाजलेले डॉ. बिधानचंद्र तथा बी. सी. राय (१८८२ ते १९६२) यांचा एक जुलै हा जन्मदिन. आणि याच तारखेला त्यांचा स्मृतिदिनही. राय यांचं स्मरण जागवण्यासाठी आयोजिल्या जाणाऱ्या या दिनानिमित्त...

मा  णसाला डॉक्‍टरची गरज कशी आणि कधी भासली असेल? मुळात डॉक्‍टर हा वर्ग जन्मालाच कसा आला असेल? अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा स्वत: शीच प्रयत्न केला तर गमतीदार शक्‍यता डोळ्यासमोर येतात. माणसाचं काही दुखायला लागलं असेल, तेव्हा निसर्गातच उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतींचा अर्थात ‘जडी-बुटीं’चा किंवा खनिजांचा प्रयोग या दु:खशमनासाठी त्यानं स्वत:वरच केला असेल. पण मग असे प्रयोग तर अनेकानेकांनी स्वत:वर केले असतील. त्यातले थोडेफारच लोक डॉक्‍टर झाले. ते का?

कल्पना करा. चावडीवर संध्याकाळच्या वेळेला आठ-दहाजण गप्पा मारत बसले आहेत. त्यांच्यापैकी एका माणसाच्या एका बाजूचा हात आणि पाय अचानक हलेनासा झाला आहे...त्याला अर्धांगवायूमुळं पक्षाघाताचा झटका आला आहे...त्यांच्यापैकी एकजण म्हणातो ः ‘या झाडावर मुंजा असतो, त्यानंच काहीतरी केलं असावं. त्याच्याखाली बसलं की हा आजार होतो.’ दुसरा म्हणतो ः ‘नाही, जमिनीत काही घडामोडी घडल्या असतील. या जागेचा काही दोष असावा. इथं बसलं की हा आजार होतो. तिसरा म्हणातो ः ‘आकाशात ग्रह-तारे अशुभ पद्धतीनं एकत्र आले असतील. ही वेळ चुकीची आहे. सांजेला असं बाहेर बसलं की आजार होतो.’ चौथा म्हणातो ः ‘दोष वाऱ्याचा आहे. हा माणूस ज्या बाजूला बसला आहे, त्या बाजूनं वारा वाहत होता. तो त्याच्या अंगावरून गेल्यामुळं हा प्रकार झाला आहे’ त्यांच्यातला एकजण मात्र शेवटी म्हणतो ः ‘असं काहीही नाही. याच्या शरीरातच काहीतरी बिघाड झाला असावा. त्यामुळं त्याला असं झालं आहे. तेव्हा याच्या शरीराचीच तपासणी केली पाहिजे.’

शेवटी जो माणूस बोलला, त्या माणसाइतका तार्किक विचार ज्यांनी ज्यांनी केला असेल ते ते लोक डॉक्‍टर झाले असावेत. मग त्या तर्कातून कुणी मृतदेहाची चिरफाड करून, शरीराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असेल...कुणी वेगवेगळ्या द्रव्यांचं औषधी म्हणून निरीक्षण करू लागला असेल...संशोधन होत गेलं असेल... शरीरात घडणाऱ्या प्रक्रिया रासायनिक पातळीवर आणून त्यांचा विचार केला गेला असेल...हा विचार अधिकाधिक विकसित होत गेला असेल आणि मग हळूहळू वैद्यकशास्त्र निर्माण झालं असेल. शरीरांतर्गत प्रक्रियेमध्ये अतिमानवी असं काही नसतं. प्रत्येक प्रक्रियेचा रासायनिक विश्‍लेषणातून खुलासा होऊ शकतो. ज्या प्रक्रियांचा विश्‍लेषणात्मक खुलासा आजपर्यंत होऊ शकलेला नाही, तो पुढं काळाच्या ओघात निश्‍चितच होत जाईल, असं मानवी शरीरशास्त्र सांगतं

***
आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी शास्त्रांमध्ये जे जे शोध लागले, त्यांचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वापर सुरू झाला. विज्ञानानं दिलेलं वरदान  वैद्यक शास्त्रानंसुद्धा आपलंसं करत स्वत:त वेळोवेळी सुधारणा घडवून आणल्या. साधी कागदाची पुंगळी करून ती रुग्णाच्या छातीवर ठेवून छातीतल्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसातल्या श्वासाचे आवाज ऐकण्याची कल्पना फ्रेंच फिजिशियन लिनिक यानं शोधली...आणि त्यानंतर लगेचच मेकॅनिकल इंजिनिअरिंगनं ते सूत्र धरून आधुनिक स्टेथॅस्कोप निर्माण केला. भौतिकशास्त्रात लागलेल्या इलेक्‍ट्रिसिटीच्या शोधाच्या आधारानं एक्‍स रेचा शोध लागला. संगणकाच्या आगमनानंतर याच एक्‍स रेची पुढची पायरी म्हणजे सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन. वैद्यकशास्त्रात अशी प्रगती वेगानं होत गेली. लेझर किरणांच्या शोधानंतर त्या तंत्रज्ञानाचा वापर डायबेटिक रेटिनोपथीसारख्या नेत्रचिकित्सेमध्ये आणि इतरही आजारांमध्ये यशस्वीपणे होऊ लागला. शस्त्रक्रियांच्या तंत्रज्ञानात प्रगती होता होता लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीपर्यंत ही प्रगती आली. अशा काही उदाहरणांवरून लक्षात येतं, की जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त अशा विज्ञानाच्या ज्या ज्या शाखा आहेत, त्या त्या प्रत्येक शाखेतल्या नवीन संशोधनाला आपलंसं करत वैद्यकीय शास्त्र प्रगत व आधुनिक होत गेलं आहे.
***

विशेष म्हणजे, या  वैद्यकशास्त्राच्या प्रगतीच्या वेगानं डॉक्‍टरवर्गही नवीन ज्ञान आत्मसात करू लागला. पूर्वी आयुर्वेदानं ज्ञानवर्धनासाठी ‘तद्विद्या संभाषा’ हा मार्ग सांगितला आहे. म्हणजे एका वैद्यानं दुसऱ्या वैद्याची भेट झाल्यानंतर आपल्या रुग्णांसंबंधी व आपल्याला आढळून आलेल्या व्याधीसंबंधी त्या दुसऱ्या वैद्याशी चर्चा करावी; जेणेकरून दोघांच्याही ज्ञानात-माहितीत वाढ व्हावी. वैद्यकीय शिक्षणाची रीतसर सुविधा नसतानाच्या प्राचीन काळातही वैद्य स्वत:चं ज्ञान वाढवण्यासाठी आसुसलेले असायचे. आज वैद्यकीय परीक्षा पास होउन कित्येक वर्षं उलटल्यानंतरसुद्धा कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई), विविध परिषदा, चर्चा, इंटरनेट अशा माध्यमांद्वारे डॉक्‍टरमंडळी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतात. त्यांना अद्ययावत राहावंच लागतं. त्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा काळाच्या मागं राहिलेला डॉक्‍टर त्याच्या प्रॅक्‍टिसमध्ये फार काळ टिकाव धरू शकणार नाही.

अशा रीतीनं निर्माण झालेल्या डॉक्‍टरवर्गाचा संबंध शारीरिक वेदनाशमनाशी आणि मानसिक दु:खनिवारणाशी असल्यानं माणसाला डॉक्‍टर हा वर्ग आदरणीय म्हणून वेगळा वाटायला लागला. समाजाकडून डॉक्‍टरवर्गाला विशेष आदर मिळू लागला. ‘नोबेल प्रोफेशन’ ही वैद्यकीय व्यवसायाची ओळख बनली. डॉक्‍टरवर्गसुद्धा ही बांधिलकी जपत आला. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यासारखा माणूस चीनमध्ये जाऊन रुग्णसेवा करतो. आयडा स्कडर ही अमेरिकी मिशनऱ्याची मुलगी भारतात १८९० च्या आसपास आपल्या वडिलांबरोबर फिरायला म्हणून आली होती. इथल्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेअभावी मरण पावणारे लोक पाहून मनाशी काहीएक निर्धार करून ती अमेरिकेत परत गेली. तिथं डॉक्‍टर झाली आणि परत भारतात येऊन तामिळनाडूत वेल्लोरमध्ये सेवाभावी वृत्तीनं प्रॅक्‍टिस करू लागली. लोकांना प्रशिक्षित करू लागली. वेल्लोरचं मिशनरी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आजही विख्यात आहे. समाजाशी बांधिलकी आणि व्यवसायाशी निष्ठा याचं हे खूप मोठं उदाहरण डॉ. आयडा स्कडर यांनी घालून दिलं. डॉ. प्रकाश आमटे गडचिरोलीच्या जंगलात वैद्यकीय व्यवसाय केवळ समाजसेवेसाठी करतात. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. भालचंद्र या नेत्रतज्ज्ञाचा पुतळा उभा आहे. त्यांच्या सेवेला समाजानं दिलेली ही मानवंदनाच होय. नाशिकला १९७४ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. वसंतराव गुप्ते या एका सेवाभावी डॉक्‍टरला नाशिककरांनी नगराध्यपदी निवडून दिलं होतं. आजही प्रत्येक डॉक्‍टर आपल्या खासगी प्रॅक्‍टिसमध्ये रोज १० ते १५ टक्के रक्कम ‘चॅरिटी’साठी राखतच असतो. ती वरवर लक्षात न येणारी असते इतकंच. वैद्यक व्यवसायातल्या गैरप्रकारांबद्दलही आपण अधूनमधून वाचत किंवा ऐकत असतो; पण तसे प्रकार अपवादात्मकच. त्या काही थोडक्‍या डॉक्‍टरांच्या चुकीच्या वागण्यामुळं सगळ्यांना दूषण लावणं अन्यायकारक होईल. समाजात जवळपास सगळ्याच क्षेत्रांमध्ये थोड्याफार अपप्रवृत्ती असतात. मात्र, सगळा समाज कधीच वाईट असू शकत नाही. वैद्यक व्यवसायाची ‘प्रोफेशनल एक्‍सलन्सी’ डॉक्‍टरवर्ग आणि समाज या दोन्ही बाजूंकडून जपली जाते. ती तशी जपली गेली पाहीजे. यातूनच ‘डॉक्‍टर्स डे’ साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

भारतात एक जुलै रोजी ‘डॉक्‍टर्स डे’ साजरा केला जातो. पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि तेव्हाच्या कलकत्ता (आता कोलकता) शहरात ‘सेवाभावी डॉक्‍टर’ म्हणून विख्यात असलेले डॉ. बिधानचंद्र तथा बी. सी. राय (एक जुलै १८८२ ते एक जुलै १९६२) यांचा हा जन्मदिन. याच तारखेला त्यांचा स्मृतिदिनसुद्धा असतो. त्यांचं स्मरण जागवण्यासाठी डॉक्‍टर्स डेचं आयोजन केलं जातं. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले. स्वातंत्र्यानंतर १९४८ ते १९६२ अशी १४ वर्षं ते पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या स्मृती जपत असतानाच सकल डॉक्‍टरवर्गाला आणि त्यांना आदर देणाऱ्या समाजाला ‘डॉक्‍टर्स डे’निमित्त सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com