दुधाबाबत गैरसमजांचा महापूर (डॉ. नारायण जी. हेगडे)

dr narayan g hegde write milk article in saptarang
dr narayan g hegde write milk article in saptarang

सध्या समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, त्यामुळे ए वन आणि ए टू दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ए वन दूध हे आरोग्याला घातक असल्याचा समज वेगाने बळावत आहे. खरं तर भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि आहारामध्ये दुधाचे विशेष महत्त्व आहे. दुधामध्ये सात्विक गुणधर्म असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये दुधाचा वापर केला जातो. देशात सुमारे आठ हजार वर्षांपासून गायी पाळल्या जात आहेत. दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. लहान मुलांच्या पोषणासाठी तर दूध हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. परंतु, आता ए वन आणि ए टू दुधाचा वाद पेटल्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

कोणताही सबळ पुरावा नसतानासुद्धा दुधामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग, स्त्रीबीजांडाचा कर्करोग, टाईप १ मधुमेह, मल्टिपल स्केलेरोसिस, चरबी वृध्दी, ॲलर्जी, वजनवाढ, हाडे कमकुवत होणे वगैरे विकार होतात, असे गैरसमज पसरविले जात आहेत. निसर्गोपचारांमध्ये दमा आणि सोरायसिसने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दूध घेण्यास प्रतिबंध केला आहे; कारण दुधामुळे उपचारांमध्ये अडथळा येतो. परंतु अशा थोडक्या लोकांचा अपवाद वगळला तर आज दररोज अनेक लोक कोणत्याही त्रासाशिवाय दुधाचे वेगवेगळ्या स्वरूपात निर्वेधपणे सेवन करत आहेत.

सर्वप्रथम न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी १९९२ मध्ये टाइप १ मधुमेह आणि विविध देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुधाचा प्रकार यांच्यात संबंध स्थापित केला. त्यामुळे दुधाचे, ए वन आणि ए टू असे दोन प्रकार असल्याचे लक्षात आले. ए वन दुधामध्ये `बीटा कॅसोमोर्फिन -७` गटातील सात अमिनो आम्लांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन टाइप १ मधुमेह, हृदयरोग, अर्भक मृत्यू, मंदबुद्धीची बालके जन्मास येणे ह्या बाबी घडू शकतात. परंतु ए वन प्रकारचे दूध मुख्यतः युरोपियन वंशाच्या गाई जसे की फ्रिझियन, आयरशायर, ब्रिटिश शॉर्टहॉर्न आणि होल्स्टिन यांच्यामध्येच आढळते. ए टू दुधामध्ये वर उल्लेखलेली हानिकारक घटक नसतात. हे दूध ग्युरेन्साय, चानेल बेट, चारोलैस, दक्षिण फ्रान्स मधील लीमौसीन, आफ्रिका आणि आशिया खंडातील झेबू गायांमध्ये आढळते. युरोप आणि उत्तर अमेरिकेमधील अंदाजे ५० ते ६५ टक्के होलस्टीन फ्रिझीयन(एचएफ) गायी ए वन दूध उत्पादन करतात तर जर्मनी मधील ९० टक्के एचएफ गायी ए टू दूध उत्पादित करतात. तसेच ७५ ते ८५ टक्के जर्सी आणि ग्युरेन्साय गायी ए टू दूध देतात. बऱ्याच सर्वेक्षणांवरून असे आढळून आले आहे की ए वन आणि ए टू प्रकारच्या दुधाचे प्रमाण हे गायींच्या जातींपेक्षाही विशिष्ट विभागांवर आधारित आहे. सुदैवाने, भारतातील ९८ टक्के गायींच्या जाती तसेच १०० टक्के म्हशी आणि शेळ्या ए टू प्रकारचे दूध देतात. याचा अर्थ भारतात ए वन दुधाचे प्रमाण अगदी नगण्य आहे.

न्यूझिलंडमध्ये २००० मध्ये ए टू प्रकारचे दूध ओळखण्यासाठी व्यावसायिक तत्त्वावर गायींच्या जनुकीय चाचण्या करण्यासाठी ए टू दुग्ध महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाने २००३ मध्ये ए वन दुधाच्या आरोग्यविषयक धोक्यांना व्यापक प्रसिद्धी दिली. तसेच न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खाद्य मानक नियंत्रक प्राधिकरणाकडे उत्पादकांनी दूध पॅकेजवर `आरोग्य सूचना` छापण्यासाठी याचिका सादर केली. प्राधिकरणाने ही याचिका स्वीकारली नाही, उलट ए टू दुग्ध महामंडळाला ए टू दुधाविषयीचे दावे काढून टाकण्यास सांगितले. त्याच वर्षी, डेअरी मार्केटर्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने ए टू दुग्ध महामंडळाकडून पेटंटचे अधिकार आणि बोध चिन्ह घेऊन ए टू दुधाच्या खरेदी-विक्री व्यवसाय सुरू केला. ऑस्ट्रेलियन सरकारने २००४ मध्ये या कंपनीला `ए टू दुधाबाबत खोडसाळ दावे केल्याबद्दल` दंड केला. तथापि, ए टू दुग्ध महामंडळाने वेगवेगळ्या भागीदारांसमवेत व्यवसाय चालू ठेवला.

कीथ वुडफोर्ड यांनी २००६ मध्ये `डेव्हिड इन द मिल्क` हे पुस्तक लिहून ए वन दुधाचे धोक्यांविषयी सविस्तर मांडणी केली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ए टू दूध विक्रीस प्रोत्साहन देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी टाईप १ मधुमेह होण्याकरिता ए 1 बीटा-केसीनचे सेवन कारणीभूत असल्याचे सात पुरावे सादर केले. युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरणाने त्यांचे शास्त्रीयदृष्ट्या परीक्षण करून २००९ मध्ये अहवाल सादर केला. `ए १ दुधामधील बीसीएम – ७ चा विविध रोगांचे कारण अथवा परिणाम याच्याशी संबंध नाही,` असे त्यात नमूद केले आहे. तथापि, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ए टू दुधाची विक्री २० टक्क्या पेक्षा जास्त दराने चालू आहे.

भारतात राष्ट्रीय दुग्धशाळा संशोधन संस्था, इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसर्च यासारख्या प्रमुख संस्थांनी २००९ मध्ये प्रथमच ए वन प्रकारच्या दुधाचा अभ्यास सुरू केला. `नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसर्च`ने २००९ मध्ये कोणत्याही शास्त्रीय संशोधनाचा अभ्यास न करता ए वन प्रकाराच्या दुधाबाबत धोक्याचा इशारा दिला. तसेच या संस्थेने २०१२ मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध करून ए वन दुधाचे दुष्परिणाम नमूद केले; पण जाता जाता याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचा उल्लेख केला. प्रजननासाठी ए टू अनुवांशिक गुणधर्म (जीन्स) असलेल्या वळूंचा वापर करावा असे सुचवित असताना, सुरक्षा उपाययोजना म्हणून, एनबीएजीआरने वेगवेगळ्या विभागांमधून १८० वळूंचे नमुने तपासले. त्यातून हानिकारक वाटणाऱ्या ए वन प्रकारचे दूध उत्पादन करणाऱ्या संकरित गायींची संख्या फक्त १ टक्का असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे डेअरीमध्ये दूध संकलन करताना निरनिराळ्या जातींच्या जनावरांचे दूध एकत्र केले जात असल्याने ए वन दुधाचा प्रभाव जवळपास नगण्य ठरतो.

युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरणाने २००९ मध्ये अहवाल प्रकाशित केल्यानंतर बहुतांश देशांमध्ये ए वन दुधाचा वाद संपला आहे. परंतु, भारतात मात्र काही लॉबींना हा वाद जिवंत ठेवण्यात स्वारस्य आहे. युरोप आणि अमेरिकेत अनेक शतके ए वन दुध आहारात आहे. भारतातही गेल्या ५० वर्षांत काहीच अपाय झालेला आढळला नाही. (तरीसुद्धा, हा वाद संपविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने २०१५ मध्ये संकरित गायींचे दूध तपासण्यासाठी चाचण्यांना सुरवात केली. त्यांचे निष्कर्ष अजून प्राप्त व्हायचे आहेत.) दुधातील ए वन आणि ए टू प्रकारांबाबत नेमके शास्त्रीय तथ्य काय आहे, याविषयी शासनाने निःपक्षपाती भूमिका घेऊन वास्तव समोर ठेवावे. संकरित गायींच्या दुधामध्ये ए टू घटक असल्यामुळे सर्वसाधारण दूध आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची भावना बळकट केली पाहिजे. (खबरदाराची उपाय म्हणून जनावरांच्या देशी किंवा विदेशी जातींचा विचार न करता पैदाशीसाठी फक्त ए टू प्रकारचे वळू वापरून त्यांची ए वन/ए टू दुधासाठी चाचणी घेण्यात यावी. लहान बालकांना ए टू दूध आणि ए टू दूध पावडर वापरण्याचे निर्देश द्यावेत.)

---------------------------------------------------------------------------------
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम शक्य
गायीच्या दुधामध्ये ८७ ते ८८ टक्के पाणी आणि १२ ते १३ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थांमध्ये दुग्धशर्करा (४.८ टक्के), स्निग्धता (३.९ टक्के), प्रथिने (३.२ टक्के) आणि खनिजे (०.७ टक्के) समाविष्ट आहेत. अंदाजे ८० टक्के प्रथिने ही केसिन आहेत. त्यातील ३०-३५ टक्के बीटा-केसिन (प्रति लिटर २ चमचे) लहान आतड्यात पचन झाल्याच्या वेळी ए वन प्रकाराचे दूध एक बायोएक्टिव पेप्टाइड निर्माण करते. त्यात ७ अमायनो आम्ल असतात, ज्याला बीटा कॅसोमोर्फिन - ७ (बीसीएम - ७ ) असे म्हणतात. ते ओपीओईड असते व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन काही आजार होऊ शकतात.
---------------------------------------------------------------------------------
(लेखक बायफ विकास संशोधन प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com