वारी देवाची आणि संतांची (डॉ. रतिकांत हेंद्रे)

dr ratikant hendre's muktapeeth article
dr ratikant hendre's muktapeeth article

कार्तिक वद्य एकादशीला संतांच्या पालख्या आळंदीला येतात. त्याच सुमारास संत नामदेवांची पालखी पंढरपूरहून आळंदीला येते. ज्ञानेश्‍वर आणि नामदेव हे समकालीन संत. त्यांचं कार्य एकमेकाशी संबंधित होतं; तसंच पूरकही होतं. ज्ञानेश्‍वरांनी संजीवन समाधी घेतल्यावर त्यांच्याविषयीच्या आत्यंतिक प्रेमामुळं नंतर ज्ञानेश्‍वरांच्या समाधी दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी नामदेव महाराज आळंदी येथे येत असावेत. पुढं नामदेव महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आळंदीला जाण्याची प्रथा त्यांच्या वंशजांनी सुरू केली. आज (रविवार) त्यांची पालखी पुण्यात येत असून, उद्या ती आळंदीला जायला निघेल. त्यानिमित्तानं या दोन संतांच्या अनोख्या ‘भक्तिभावा’विषयी...

आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरला जातात. तसंच संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या पुण्यभूमीहून निघून पंढरपूरला जातात. या सर्व वारकरी मंडळींचं आणि संतांच्या पालख्यांचं स्वागत करण्याचा मान पांडुरंगाचा लाडका भक्त नामदेव यांचा असतो. त्या वेळी ज्येष्ठत्वाचा मान म्हणून ज्ञानेश्‍वरांची पालखी सर्वांत शेवटी पंढरपुरात प्रवेश करते. कार्तिक महिन्यात अनेक संतांच्या पालख्या ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आपापल्या मूळ ठिकाणाहून आळंदीस येतात. त्यात नामदेव महाराजांचीही पालखी असते. कदाचित त्यामुळंच पंढरपूरची वारी म्हणजे ‘देवाची वारी’ आणि आळंदीची वारी म्हणजे ‘संतांची वारी’ असं म्हटलं जातं.


ज्ञानदेव आणि नामदेव हे समकालीन संत. त्यांचं कार्य एकमेकाशी संबंधित होतं; तसंच पूरकही होतं. नामदेवांच्या विठ्ठलभक्तीनं ज्ञानदेव स्तीमित झाले, तर ज्ञानदेवांच्या ज्ञानाच्या तेजानं नामदेव दीपून गेले. परस्परांबद्दल असलेला जिव्हाळा चारधाम यात्रेच्या निमित्तानं वृद्धिंगत झाला. चारधाम यात्रेनंतर ज्ञानेश्‍वरादी भावंडांसमवेत नामदेव महाराज शके १२१८ मध्ये पंढरपूरला परतले. त्यानंतर लगेचच ज्ञानेश्‍वरांनी आपलं अवतार कार्य संपवण्याचा निश्‍चय केला. शके १२१८ मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला असंख्य संत मंडळींच्या उपस्थितीत ज्ञानेश्‍वरांनी संजीवन समाधी घेतली. या प्रसंगी ज्ञानेश्‍वरांची भावंडं उपस्थित होती. याशिवाय नामदेव आणि विसोबा खेचर, चांगदेव, चोखामेळा, सावता माळी, नरहरी सोनार असे अनेक समकालीन संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधी सोहळ्याला हजर होते. कार्तिक वद्य एकादशीपासून त्रयोदशीपर्यंत अहोरात्र अखंड कीर्तन आणि भजन चालू होते. नारा आणि विठा या नामदेवांच्या मुलांनी समाधी स्थळाची व्यवस्था ठेवली होती. ज्ञानेश्‍वरांचे गुरू, ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ; तसंच नामदेव महाराज ज्ञानेश्‍वरांना समवेत घेऊन समाधी स्थळापर्यंत आले. ज्ञानेश्‍वरांनी समाधी स्थळात प्रवेश केल्यावर निवृत्तीनाथ यांनी शिळा ठेवून समाधी स्थळाचं प्रवेशद्वार बंद केलं.


सर्व उपस्थित मंडळी विरहाच्या दुःखानं व्याकूळ झाली. ज्ञानेश्‍वरांविषयी नामदेवांच्या मनात विलक्षण श्रद्धेची भावना होती. त्यामुळे आपल्या थोर संत मित्राच्या वियोगानं नामदेव व्याकूळ झाले. आपली विरहावस्था नामदेवांनी आपल्या अभंगात सांगितली आहे.

नाथा नकोरे अंतरु । तुझ्या कासेचे वासरु।।
कळा दुभती तू गाय। तुझा वियोग असह्य।।

असं म्हणून नामदेवांनी टाहो फोडला.

नामा म्हणे देवा घार गेली उडोन।
बाळे दानादान पडियेली।।

किंवा
नामा म्हणे आता लोपला दिनकर।
बाप ज्ञानेश्‍वर समाधीस्त ।।

हे अभंग नामदेवांची मनोव्यथाच दर्शवतात. ‘सूर्य अस्ताला गेल्यावर सर्वत्र अंधःकार पसरतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्‍वर समाधीस्त झाल्यामुळे माझ्यापुढे अंधार पसरला आहे. आता वाट दाखविण्याचे काम कोण करणार?’ अशी त्यांची भावना होती.
ज्ञानेश्‍वर माझा दाखवा या वेळी।
जीव तळमळी त्याच्या वीण।।

ज्ञानेश्‍वरांच्या वियोगामुळे माझा जीव तळमळत आहे, असं नामदेवांनी म्हटलं आहे. समाधी सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्वच संत मंडळींची अवस्था तशीच झाली होती.

नामा म्हणे संत कासावीस सारे।
लाविती पदर डोळियासी ।।

अशा करुण शब्दांत ज्ञानेश्‍वरांच्या वियोगानं झालेली सर्वांची कासाविशी नामदेवांनी प्रकट केली आहे. ज्ञानदेवांच्या नंतर सोपानदेव, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ या भावंडांनी पाठोपाठ समाधी घेतली. या सर्व प्रसंगी नामदेव महाराज उपस्थित होते. ज्ञानेश्‍वरादी भावंडांच्या वियोगामुळे नामदेवांची मनःस्थिती विकल झाली. या औदासिन्यातून बाहेर पडण्यासाठी नामदेव महाराज पंजाबात गेले. तिथं त्यांनी अठरा वर्षं वास्तव्य केलं आणि नंतर आपलं उर्वरित आयुष्य पांडुरंगाच्या चरणी समर्पण करण्यासाठी ते पंढरपूरला परत आले. त्यानंतर नामदेव महाराज दर वर्षी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आळंदी येथे येत असावेत, असं वाटतं. पुढे शके १२७२मध्ये आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवांनी पंढरपूर इथं समाधी घेतली.

नामदेवांच्या पश्‍चातसुद्धा भागवत धर्माचा नंदादीप त्यांच्या कुटुंबात तेवत होता. वारकऱ्यांच्या दिंडीसह नामदेवांच्या पादुका मस्तकावर घेऊन आळंदी इथं ज्ञानेश्‍वर समाधी सोहळ्याच्या स्मृतिदिन प्रीत्यर्थ जाण्याची प्रथा नामदेवांच्या पश्‍चात त्यांच्या वंशजांनी सुरू केली. पंढरपूरची कार्तिक महिन्यातली वारी झाली, की पौर्णिमेला पंढरपूरहून निघून कार्तिक वद्य अष्टमीला आळंदी येथे मुक्कामाला जात असत. ज्ञानेश्‍वरांच्या समाधीचा प्रतिवार्षिक सोहळा आटोपला, की परतीच्या प्रवासाला सुरवात करीत असत. अजूनही तीच प्रथा चालू आहे.

बिकट काळात प्रथा सुरू
आता खूप सुविधा झाल्या आहेत. परंतु, कुठल्याही सुविधा, सोयी उपलब्ध नव्हत्या, अशा बिकट काळात नामदेवांच्या वंशजांनी नामदेवांच्या पादुका कार्तिक महिन्यात आळंदी इथं माउलींच्या भेटीसाठी आणण्याची प्रथा अखंडपणे आणि निष्ठेनं चालू ठेवली. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस पंढरपूरहून नामदेव महाराजांची पालखी आळंदीस जाण्यासाठी निघते आणि कार्तिक वद्य अष्टमीस आळंदीस पोचते. पंढरपूर ते आळंदी असा दोनशे किलोमीटरचा प्रवास पायवाटेनं नऊ दिवसांत पूर्ण केला जातो. दररोज सरासरी तीस किलोमीटर अंतर चालावं लागते. पंढरपूर ते आळंदी आणि परत पंढरपूर अशा वाटचालीत ठिकठिकाणच्या भाविकांच्या सहकार्यानं पालखीबरोबर असलेल्या वारकरी मंडळींची निवास आणि भोजनाची व्यवस्था होत असते. ज्ञानेश्‍वरांनी शके १२१८ मध्ये समाधी घेतली, तेव्हापासून आता शके १९३८ पर्यंत म्हणजे ७२० वर्षे नामदेवांचा संदेश पंढरपूरपासून आळंदीपर्यंत पोचविला जात आहे.

‘जातिभेद अमंगळ’
नामदेव महाराज बहुजन समाजातून आले होते. आयुष्याची ऐंशी वर्षं बहुजन समाजात वावरले होते. पांडुरंगाइतकेच मानवावरही प्रेम होते. आपल्या भक्तीच्या उत्कटतेनं सर्वांच्या बरोबर त्यांनी आपुलकीचं नातं निर्माण केलं. चोखामेळा, जनाबाई इत्यादी उपेक्षितांना आपलंसं केलं. संत चोखोबांच्या अस्थी मंगळवेढा येथून गोळा करून पंढरपूरला आणल्या आणि महाद्वारासमोर चोखोबांना समाधी दिली. ‘जाती भेद अमंगळ’ असं नुसतं न म्हणता स्वतःसुद्धा महाद्वारात समाधी घेतली. दलितांच्याबद्दल नामदेवांच्या मनात समतेची भावना होती. ती त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवली.

संतांच्या भेटी
पालखी सोहळ्याच्या पूर्ततेचा दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधीचा स्मृतिदिन. त्या दिवशी नामदेवांचे वंशज नामदेवांच्या पादुका हातात घेऊन ज्ञानेश्‍वरांच्या मंदिरात जातात. तिथं ज्ञानेश्‍वरांच्या समाधीची आणि नामदेवांच्या पादुकांची शास्रोक्त महापूजा केली जाते. श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या वंशजांचा ज्ञानेश्‍वर देवस्थानच्या वतीनं सत्कार केला जातो. आरती झाल्यावर ज्ञानेश्‍वरांचा आणि नामदेवांचा जयजयकार केला जातो. नामदेव आणि ज्ञानेश्‍वर यांच्या भेटीची परंपरा सातशेहून अधिक वर्षांची आहे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. पालखी सोहळ्यामध्ये नामदेव आणि ज्ञानेश्‍वर या महाराष्ट्रातल्या दोन थोर संतांच्या परस्परांच्या भेटीची कल्पना आहे. ती अतिशय हृद्य आहे. पंढरपूरहून संत नामदेवांची पालखी निघाली असून, ती आज (रविवार) पुण्यात पोचते आहे. उद्या (सोमवारी) ती आळंदीला जायला निघणार आहे. संत ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याची समाप्ती २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पंढरपूरहून आळंदीला येणारा नामदेवांच्या पालखीचा सोहळा म्हणजे ज्ञानेश्‍वर आणि नामदेव या दोन महान संतामधील अतूट स्नेहभावाचं प्रतीक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com