dr sadanand more's article in sapatarang
dr sadanand more's article in sapatarang

राजवाडे: अगोदरचे आणि नंतरचे (डॉ. सदानंद मोरे)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या विचारसरणीत वयानुसार बदल घडत गेला. पूर्वायुष्यातले राजवाडे आणि उत्तरायुष्यातले राजवाडे असा ठळक भेद अभ्यासकांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. राजवाडे यांनी कार्ल मार्क्‍सचं लेखन वाचलेलं होतं; परंतु त्या लेखनाचा त्यांच्यावर थेट परिणाम झाला होता, असं म्हणता येत नाही. मार्क्‍सपेक्षा भौतिकवादी फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्त कोंन याचा राजवाडे यांच्यावर प्रभाव होता. मात्र, मार्क्‍सपर्यंत पोचण्यासाठी राजवाडे यांनी आणखी एक पाऊल टाकायला हवं होतं. ते जर त्यांनी टाकलं असतं, तर ते मार्क्‍सवादीही झाले असते!

मराठी विचारविश्‍वात विशेषतः इतिहासाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त दबदबा कुणाचा असेल, तर तो इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा!
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’तल्या लेखनातून प्रेरणा घेऊन जे इतिहाससंशोधक घडले, त्यात राजवाड्यांचं नाव अग्रगण्य मानावं लागतं. ज्या लोकांचा वर्तमानकाळ क्‍लेशकारक असतो, त्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याशिवाय पर्याय नसतो. सुदैवानं मराठ्यांचा इतिहास उज्ज्वल आणि प्रेरक असल्यामुळं ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना त्याचा चांगलाच उपयोग झाला. अर्थात या इतिहासाकडं लक्ष वेधण्याचे श्रेय चिपळूणकरांकडं जातं.

राजवाड्यांनी स्वतः इतिहासावर स्वतंत्र ग्रंथ लिहिला नाही. मात्र, त्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधनं’ जमा करून ती २२ खंडांमध्ये प्रकाशित केली. त्यातल्या काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातले बरेच सिद्धान्त नंतर त्याज्य ठरले असले, तरी राजवाडे यांच्यामुळं संशोधकांना प्रेरणा मिळाली, हे विसरता कामा नये.
चिपळूणकरांच्या प्रेरणेतून सिद्ध झालेल्या विचारसरणीला राष्ट्रवाद असं संबोधण्यात येतं. साहजिकच, राजवाड्यांचं इतिहासलेखन व संशोधनही त्याच प्रकारचं झालं आहे. या प्रकारच्या विचारसरणीत राष्ट्र ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून इतर गोष्टींना दुय्यम किंवा गौण लेखलं जातं. इतकंच नव्हे तर, त्यांचं अस्तित्व अंतिमतः राष्ट्रासाठीच असतं, असंही मानलं जातं. इतिहासाची मांडणीसुद्धा राष्ट्राला अनुकूल अशीच केली जाते.
***
सुरवातीच्या काळात राजवाडे यांची मांडणीही अशीच दिसून येते. मात्र, वाढत्या वयाबरोबर त्यांच्या विचारांमध्ये बदल होत गेले.
विचारवंतांच्या आयुष्यात असे बदल होत जाणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. तीत गैर काहीच नाही. जगातल्या थोर थोर विचारवंतांच्या बाबतीत असं घडलं आहे. दोन उदाहरणं पुरेशी ठरतील.

पहिलं उदाहरण कार्ल मार्क्‍सचं. मार्क्‍स याच्यावर पूर्ववयात प्रसिद्ध व प्रभावी जर्मन चिद्वादी तत्त्ववेत्ता हेगेल याचा प्रभाव होता. या काळातले त्याचे विचार व नंतरच्या काळातले विचार वेगळ्या प्रकारचे वाटतात. ‘पूर्वकालीन मार्क्‍स’ (early) आणि ‘उत्तरकालीन किंवा नंतरचा मार्क्‍स’ (later) असा फरक अभ्यासक करतात. उत्तरकालीन मार्क्‍सनं वैज्ञानिक पद्धतीनं विचार केला.
याचा अर्थ असा होतो, की मार्क्‍सचा वैचारिक इतिहास ही एक सलग वा अखंड प्रक्रिया नसून, तिच्यात स्पष्ट दरी दिसून येते. तिच्यात तफावत पडल्याचं आढळून येते. इतकंच नव्हे तर, मार्क्‍सच्या या दोन वैचारिक टप्प्यांमध्ये त्यांना जोडणारा कोणताही दुवा नाही.

दुसरं उदाहरण विसाव्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ समजल्या गेलेल्या विटगिन्स्टाईन या जर्मन तत्त्वज्ञाचं आहे. त्याच्याही विचारात ‘पूर्व-विटगिन्स्टाईन’ आणि ‘उत्तर-विटगिन्स्टाईन’ असा भेद करण्यात येतो. अगोदरचा विटगिन्स्टाईन हा एक पूर्णतः कृत्रिम व आदर्श भाषाव्यवस्थेचा पुरस्कार करणारा होता. याच काळात त्यानं Tractatus हा ग्रंथ लिहिला. नंतर त्याचा भाषेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व तो दैनंदिन साधारण भाषेचा पुरस्कर्ता बनला. या काळातला त्याचा Philosophical Investigations हा ग्रंथ प्रातिनिधिक मानला जातो. विटगिन्स्टाईनच्या या दोन वैचारिक टप्प्यांमधला अंतःसंबंध शोधणं हे अभ्यासकांपुढचं आव्हान आहे.
या पद्धतीनं राजवाड्यांचा विचार केला तर काय दिसेल, याची थोडी चर्चा इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या लेखनात सापडते; पण ती पुरेशी नसून सूचक आहे.

***
अगोदरचे राजवाडे चिपळूणकरांच्या राष्ट्रीय विचारसरणीनं प्रभावित असल्यामुळं काही प्रमाणात सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी, काही प्रमाणात स्थितिवादी होते. वर्णजातिव्यवस्थेचे, ब्राह्मणी वर्चस्ववादाचे समर्थक होते. उत्तरकालीन राजवाडे भौतिकवादी विचारसरणीनं प्रभावित झाले. इतकंच नव्हे तर, कार्ल मार्क्‍सच्या विचारपद्धतीच्या जवळ आले.

खरं तर शेजवलकरांच्याही अगोदर ही गोष्ट कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या लक्षात आली होती, असं म्हणता येतं; पण त्यांनीही राजवाड्यांमधल्या या परिवर्तनाचं पुरेसं स्पष्टीकरण केल्याचं आढळून येत नाही.

दुसरं असं की, या परिवर्तनात राजवाड्यांनी स्वतः मार्क्‍सचं लेखन वाचलं होतं व त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला होता, असं नाही. भौतिकवादी फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्त कोंन त्यांच्या वाचनात आला होता व त्याच्याच प्रभावातून ते बदलले होते, असं म्हणता येईल. अर्थात मार्क्‍सच्या भौतिकवाद कोंनच्या भौतिकवादापेक्षा वेगळा आहे व त्यामुळं मार्क्‍स कोंनवर टीका करतो, हेही लक्षात घ्यायला हवे. मार्क्‍सपर्यंत पोचायला राजवाड्यांनी आणखी एक पाऊल टाकायचे बाकी होते. ते त्यांनी टाकलं असतं तर कदाचित ते मार्क्‍सवादीही झाले असते. मार्क्‍सच्या भाषेतच सांगायचं झाल्यास त्याचा स्वतःचा भौतिकवाद हा द्वंद्वात्मक होता, तर कोंनचा (व इतरही फ्रेंच तत्त्वज्ञांचा) भौतिकवाद यांत्रिक होता.

भौतिकवादाचे ‘द्वंद्वात्मक’ (Dialectical) आणि द्वंद्वात्मक भौतिकवादाचे ‘पूर्वीचे अद्वंद्वात्मक यांत्रिक भौतिकवाद’ असे प्रकार मानणं हा मुद्दा पद्धतिशास्त्रीय आहे. मार्क्‍स आणि इतर भौतिकवाद्यांच्या भौतिकवादात एक महत्त्वाचा फरक आशयात्मकही आहे. अन्य भौतिकवादी विचारवंत हवा-पाणी, अन्न अशा भौतिक घटकांना महत्त्व देऊन तेच इतिहासाचे निर्णायक घटक असल्याचं मानतात. हा एक प्रकारचा बाळबोध किंवा प्राथमिक स्तरावरचा भौतिकवाद होय. मार्क्‍सच्या भौतिकवादात आर्थिक घटकाला अधिक महत्त्व आहे. आर्थिक घटक म्हणजे समाजात प्रचलित असलेली उत्पादनव्यवस्था आणि त्या व्यवस्थेच्या घटकांमधले (उत्पादन) संबंध, प्राथमिक साम्यवाद, मध्ययुगीन सरंजामशाही, भांडवलशाही आणि साम्यवाद हे ऐतिहासिक कालखंड वस्तुतः आर्थिक कालखंड आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राजवाड्यांचा भौतिकवादाची चर्चा करायला हरकत नाही. त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात संपादित केलेल्या ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकाची प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे.
महिकावती म्हणजे आजचं माहीम. भगवान दत्त आणि केशवाचार्य यांनी सिद्ध केलेल्या महिकावतीच्या इतिहासाची प्रत राजवाड्यांना उपलब्ध झाली व ती त्यांनी प्रसिद्ध केली.
तिच्या प्रस्तावनेच्या अखेरीस राजवाड्यांनी केलेल्या सैद्धान्तिक मांडणीतून त्यांचं मतांतर स्पष्टपणे दिसून येतं. ते लिहितात - ‘‘येणेप्रमाणे उत्तर कोकणातील हिंदी लोक ऊर्फ कायमची वस्ती करून राहिलेले नाना वंशांचे, नाना वर्णांचे, नाना देवधर्मांचे, नाना आचारांचे व नाना भाषांचे सर्व लोक जे इतके राजकारणपराङ्‌मुख, समाजपराङ्‌मुख, राष्ट्रपराङ्‌मुख, मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व व्यक्तितंत्र दिसतात, त्याचे एकच एक आदिमूळ आर्थिक आहे.’’

राजवाड्यांच्या या आशयसंपृक्त विधानातला ‘आर्थिक’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इथं राजवाडे मार्क्‍सच्या एकदम जवळ पोचतात. अर्थात तरीही भेद उरतोच. आर्थिकतेची राजवाड्यांची कल्पना प्राथमिक व बाळबोध आहे. ती द्वंद्वात्मक नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे ती मर्यादित आहे. तिचा उत्पादनाशी संबंध नाहीच, असं नाही; परंतु उत्पादनप्रक्रियेच्या जटिलतेत ते प्रवेश करत नाहीत व उत्पादन म्हणजे अन्नाचं उत्पादन इथं थांबतात.

मार्क्‍सच्या भौतिकवादाची सुरवातही अन्नाच्या उत्पादनापासून होते (फार काय, आपल्याकडच्या उपनिषदांमध्येसुद्धा ‘अन्नब्रह्मवाद’ आढळून येतो). खरं तर माणसाला क्षणोक्षणी आपल्या जगण्याचंच उत्पादन करावं लागतं. या उत्पादनात त्याला हवा, पाणी व अन्न यांचा उपयोग होतो. पैकी हवा व पाणी यांचं त्याला उत्पादन करावं लागत नाही. ते त्याला निसर्गातून उपलब्ध होतं. अन्नसुद्धा निसर्गातून उपलब्ध होतं; परंतु निसर्गातून उपलब्ध होणारं अन्न पुरेसं नसल्यानं त्याला अन्न-धान्याचं उत्पादन करावं लागतं, म्हणजेच शेती करावी लागते. शेती हे माणसाचं पहिलं उत्पादक कर्म होय. उत्पादन ही बाब आली की तो विषय आर्थिक होतो, हे राजवाड्यांच्या लक्षात आलं व त्यांनी ‘आर्थिक’ हा शब्द उपयोजिला. इथं ते मार्क्‍सच्या जवळ आले. आता पुढं  -‘‘अन्नाचे वैपुल्य व सौलभ्य हे एक समाजाविन्मुखतेचे कारण आहे. अशा परिस्थितीत मानवाचा कोणताही वंश अशाच स्वभावाचा बनला असता. पश्‍चिम युरोपातील ख्रिस्ती लोक बद्धद्वार, एकजूट, समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ जे दिसतात, त्याचेही मूल मुख्य कारण आर्थिकच आहे. अन्नाचे दौर्भिक्ष्य व दौर्लभ्य हे या एक समाजसन्मुखतेचे कारण आहे. संघटित लोकांवर घाला घालून अन्न मिळवण्याकरिता एकसंध व एकसमाज केल्याशिवाय त्यांना तरुणोपाय नव्हता.’’
उत्तर कोकणातली परिस्थिती व इतिहास यांना राजवाडे एकूणच हिंदुस्थानाच्या परिस्थितीचं व इतिहासाचं प्रातिनिधिक प्रतीक मानतात. उत्तर कोकणाचं विवेचन संपूर्ण हिंदुस्थानला लागू होतं, असं ते सांगतात. परकीय देशांनी हिंदुस्थानावर आक्रमणं केली, याचं कारणच मुळी त्या परक्‍या देशांमधल्या अन्नाची दुर्मिळता व हिंदुस्थानातल्या अन्नाची विपुलता हे होय.

हेच विवेचन हिंदुस्थानच्या अंतर्गत इतिहासालाही लागू होतं. हिंदुस्थानातल्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत हाच अन्न नावाचा भौतिक घटक कारणीभूत आहे. राजवाडे म्हणतात ः ‘‘जातिसंस्था व वर्णसंस्था या देशात मूळ उत्पन्न होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात अन्नवैपुल्याचे व अन्नसौलभ्याचे कारण बरेच प्रमुख आहे. प्रत्येक जातीने आपापले अन्न आपापला धंदा करून तुटकपणे सुखाने खावे. प्रत्येक माणसाने आपापला पृथक्‌ देव करून खुशाल तदेवभक्त व्हावे. प्रत्येक माणसाने समाजापासून विलग होऊन संन्यस्त होण्यात परमपुरुषार्थ मानावा.’’
जी गोष्ट सामाजिक व्यवहाराच्या बाबतीत सत्य आहे, तीच राजवाडे राजकीय व्यवहाराच्या संदर्भातही सत्य मानतात. तिचं सार त्यांच्याच शब्दांत ः ‘‘एकाच वाक्‍यत सांगावयाचे म्हणजे हिंदुस्थानातइतके मुबलक अन्न असे की येथे तल्लब्ध्यर्थ राज्यमंत्र, राष्ट्र, माऱ्यामाऱ्या व मुत्सद्देगिरी पैदा करण्याची जरुरी नसे.’’
हिंदुस्थानच्या इतिहासात अशा प्रकारची राज्यं, त्यासाठीच्या मारामाऱ्या वा त्यामागची मुत्सद्देगिरी अशा गोष्टी सापडत नाहीत, असं राजवाड्यांचे म्हणणे नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, की या गोष्टींचा सामान्य माणसाशी काहीएक संबंध नसून, तो अल्पसंख्य सत्तालोलुपांचा खेळ होता. सर्वसामान्य भारतीय माणसाला कुणाचं राज्य गेलं व कुणाचं आलं याचं सोयरसुतक नसे. त्याचा त्याला पत्ताही नसे, इतका तो उदासीन व अलिप्त होता. या संदर्भातलं त्यांचं धाडसी विधान असं ः ‘‘गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली, ती सर्व एक प्रकारच्या पोटबाबू चोरांची झाली व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत असे.... या भावनेचा परिणाम असा झाला की सातवाहन, जुने मराठे, मुसलमान व पोर्तुगीज इत्यादी सरकारांचे जन्म व मृत्यू हिंदू गावकऱ्यांनी होतील असे होऊन दिले.’’

अशा प्रकारच्या अन्नमेववादी इतिहासमीमांसेपुढं उत्पन्न होणारा प्रश्‍न राजवाडे टाळत नाहीत. ते म्हणतात ः ‘‘सरकार नावाच्या कृत्रिम, उपटसुंभ, चोरट्या व जुलमी संस्थेसंबंधी गावकरी जर इतक्‍या पराकाष्ठेचा उदासीन असेल, तर असा प्रश्‍न उत्पन्न होती, की येणारे नवे सरकार व जाणारे जुने सरकार यांच्यामधील युद्धे, तंटे, माऱ्यामाऱ्या व झटापटी कोण खेळे? हिंदुस्थानातील राजकीय इतिहास ऊर्फ सरकारांचा इतिहास तर अथपासून इतिपर्यंत माऱ्यामाऱ्यांनी तुडुंब भरलेला आहे. या मारामाऱ्या कोण करी? मृत सरकारबद्दल कोण रडे? आणि नव्या सरकारची जयंती कोण करी?’’
राजवाड्यांचे उत्तर असे आहे  ः ‘‘ज्या मूठभर उपटसुंभांनी सरकार स्थापिले ते मूठभर लोक जुन्या सरकारच्या वतीने नव्या सरकारशी झुंजत, तंडत. पराभूत झाले असता रडत आणि विजयी झाले असता खिदळत. हिंदुस्थानात सरकार ही संस्था काही अल्पसंख्याकांची असे; सार्वलौकिक कधीही नसे.’’

देव आणि धर्म या कल्पनांची व्यवस्था राजवाडे अशीच लावतात. ते म्हणतात ः ‘‘देव एक आहे हे जितके खरे, तितकेच ते कोट्यवधी आहेत हेही खरे असल्यामुळे म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवाप्रमाणे असत्य असल्यामुळे कातकरी, यहुदी, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू सारेच अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठीमागे धावत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यात सौख्य मानीत होते. अशा या नाना प्रकारच्या देवकल्पनांनी पछाडलेल्या गटांचा एक भरीव समरस समाज बनवावयाला एकच तोडगा होता. तो हा की सर्वांच्या डोक्‍यातील निराधार व अशास्त्र अशी जी देवकल्पना तीच मुदलात उपटून काढली पाहिजे होती. निदान एक समाजत्वाप्रीत्यर्थ या देवकल्पनेला व देवधर्माला गबाळात गणून इतर राजकीय, वैय्यापारिक व शास्त्रीय व्यवहारात तिला नितांत गौणत्व दिले पाहिजे होते.’’

राजवाड्यांचा अंतिम निष्कर्ष असा आहे ः ‘‘हिंदू-मुसलमानांच्या राष्ट्रपराङ्‌मुखतेचे मुख्य व एकच एक कारण सुलभ व विपुल अन्नसंपत्ती आहे. ही संपत्ती अपुरी भासण्यास हिंदुस्थानात आहे तीहून लोकसंख्या तिप्पट-चौपट वाढली तरी पाहिजे किंवा आहे त्या लोकसंख्येच्या रहाणीची इयत्ता दसपटीने तरी पाहिजे किंवा बहिःस्थ राज्यकर्त्यांनी अन्नशोषण करून ते अत्यंत दुर्मिळ तरी करून टाकिले पाहिजे.’’
राजवाड्यांचा हा भौतिकवाद म्हणा किंवा भौतिक अर्थवाद म्हणा मार्क्‍सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या मागेच होता; पण मुख्य मुद्दा म्हणजे, राजवाड्यांमध्ये बदल झाला होता. त्यामुळं आपणही ‘अगोदरचे राजवाडे’ आणि ‘नंतरचे राजवाडे’ असा भेद करू शकतो व केलाही पाहिजे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com