राजवाडे-केतकर-पाटील (सदानंद मोरे)

राजवाडे-केतकर-पाटील (सदानंद मोरे)

इतिहास लिहिताना पूर्वसुरींचा मागोवा घेत जावं लागतं. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर या दोन पूर्वसुरींना एका गटात समाविष्ट करता येऊ शकतं. ‘भाषा’ या मानवी इतिहासातल्या घटकाचं महत्त्व ओळखून, राजवाडे-केतकर यांच्यासारख्या पूर्वजांचा योग्य आदर करत; पण त्यांच्यापेक्षा वेगळी किंवा विरुद्ध मतं मांडणारा इतिहासमीमांसक म्हणून कॉम्रेड शरद पाटील यांचंही नाव घ्यावं लागतं. अर्थात राजवाडे-केतकर यांचं सूत्र आणि पाटील यांचं सूत्र यांच्यामध्ये मात्र ‘एकमेकांचा व्यत्यास’ म्हणता येईल, इतका फरक आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासाची मांडणी आणि मीमांसा करताना एकीकडं ती भारताच्या इतिहासाच्या व दुसरीकडं त्याही पुढं जाऊन जगाच्या इतिहासाच्या पार्श्‍वभूमीवर करायला हवी, इतकंच नव्हे, तर आपल्या या एरवी स्थानिक मानल्या जाणाऱ्या इतिहासाचं देशाच्या आणि जगाच्या इतिहासात काय योगदान आहे, याचाही विचार करायला हवा, ही गरज सर्वप्रथम लक्षात आली ती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या. अशा प्रकारची मांडणी व मीमांसा न्या. महादेव गोविंद रानडे यांनी केलेली असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

व्यापक इतिहासातलं महाराष्ट्राचं स्थान व भूमिका समजून घ्यायची गरज राजवाडे यांच्यानंतर ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी अधोरेखित केली. केतकरांचं ‘ज्ञानकोश’निर्मितीचं कार्य सर्वज्ञातच आहे. त्यांची अधिकृत ज्ञानशाखा ‘समाजशास्त्र’ ही होती, हेही आपल्याला ठाऊक असतं. तथापि, इतिहासातल्या त्यांच्या योगदानाकडं आपलं लक्ष क्वचितच जातं. केतकरांनी महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाला मौलिक योगदान दिलेलं आहे. ‘प्राचीन महाराष्ट्र’ हा त्यांचा ग्रंथ या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा होय. या ग्रंथात केतकर लिहितात ः ‘जगातील एकंदर क्रियाग्राम लक्षात घेऊन त्यांचा भारतीय वृत्तांशी संबंध पाहणे आणि भारतीय क्रियाग्रामांमध्ये महाराष्ट्राचा एकंदर क्रियाग्रामांशी संबंध शोधणे या गोष्टी केल्या नाहीत तर जगातील एक घटक या नात्याने आपल्या देशाने जे कार्य केले, त्याच्या इतिहासाचे अवगमन करण्याचे चुकवले असे होईल.’

आपली इतिहासलेखनाची ही भूमिका केतकर महाराष्ट्राच्याच प्राचीन; विशेषतः शालिवाहनकालीन इतिहासाचं लेखन करताना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतात. ‘जगातील एकंदर भिन्न स्थितींचे मिश्रण होत असता, शालिवाहनकालीन महाराष्ट्राने जगाच्या संस्कृतीस काही निश्‍चित तऱ्हेने चालना दिली आहे,’ हे निदर्शनास आणून देऊन केतकर ठामपणाने असंही सांगतात ः ‘त्या चालनेचा अत्यंत मनोरम इतिहास जगातील अत्यंत अभिमानी राष्ट्रासदेखील मत्सर उत्पन्न करील असाच आहे.’
केतकर आणि राजवाडे यांच्यातलं आणखी एक महत्त्वाचं साम्यस्थळ म्हणजे, दोघांच्याही इतिहासमीमांसेतलं भाषेचं महत्त्व. राजवाडे यांच्या विवेचनातलं भाषेचं महत्त्व पाहून केतकर यांना ‘राजवाडे हे आधी वैयाकरणी, मग व्युत्पत्तितज्ज्ञ, मग भाषाशास्त्रज्ञ व नंतर इतिहासकार आहेत’, असं म्हणावंसं वाटलं. स्वतः केतकर यांच्या बाबतीतसुद्धा असंच काही म्हणता येणं शक्‍य आहे; पण तो मुद्दा वेगळा.
जागतिक इतिहासाच्या संदर्भात केतकर यांनी काही विशेष महत्त्वाचं विधान केलेलं नसलं, तरी भारताच्या संदर्भात त्यांनी एक सूत्र सांगितलं आहे. ‘प्राचीन महाराष्ट्र’ या ग्रंथात त्यांनी या सूत्रानुसार काही चर्चा केल्याचं दिसून येतं. हे सूत्र म्हणजे ः ‘द्राविडांची संस्कृती आणि उत्तरेकडील आर्यन लोकांची संस्कृती यांच्या एकीकरणाचे स्थान महाराष्ट्र होय. ही एकीकरणाची क्रिया जोपर्यंत सांगोपांग स्पष्ट झाली नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास समजला नाही, असे म्हणावे लागेल. या दोन संस्कृतीचे ऐक्‍य ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची क्रिया होय आणि तिचे स्थान महाराष्ट्र हेच प्राधान्याने असल्यामुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा भाग होय.’ प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी मराठी संस्कृतीचं समाजशास्त्रीय विश्‍लेषण करताना हेच सूत्र वापरलं असल्याचं दिसून येतं. राजवाडे-केतकर-कर्वे यांच्या संस्कृतीविषयक विचारांकडं पाहिलं, तर असं दिसून येतं, की संस्कृती आणि तिच्या अनुषंगानं सांस्कृतिक इतिहास या संकल्पना व्यापक आहेत, जीवनाच्या सगळ्या अंगोपांगांना व्यापणाऱ्या या संकल्पना आहेत. भाषा-साहित्य-कला-धर्म, इतकंच काय परंतु, राजकीय विचार यांचाही समावेश या संकल्पनांमध्ये होतो. एखाद्या समाजाचा किंवा राष्ट्राचा इतिहास समग्रपणे लिहायचा झाला, तर अशा सगळ्या अंगोपांगांचा समावेश त्यात करायला पाहिजेच; पण त्या अंगोपांगांच्या परस्परसंबंधांचं विवेचनही करता आलं पाहिजे.

‘मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समाज किंवा समूह आणि महाराष्ट्र ही त्यांच्या वास्तव्याची व क्रियाकलापाची भूमी अर्थात राष्ट्र’ असं समजून या लोकांचा इतिहास लिहायचा झाला, तर संस्कृतीच्या या बहुविध अंगोपांगांचा परामर्श घ्यायला हवा, हे वेगळं सांगायची गरज नाही.

असा इतिहास लिहिताना पूर्वसुरींचा मागोवा घेत जावं लागतं. राजवाडे आणि केतकर या पूर्वसुरींना एका गटात समाविष्ट करता येईल, हे वरील विवेचनावरून सहज दिसून येईल. ‘भाषा’ या मानवी इतिहासातल्या घटकाचं महत्त्व ओळखून, राजवाडे-केतकर यांच्यासारख्या पूर्वजांचा योग्य आदर करत; पण त्यांच्यापेक्षा वेगळी किंवा विरुद्ध मतं मांडणारा इतिहासमीमांसक म्हणून कॉम्रेड शरद पाटील यांचं नाव घ्यावं लागतं. अर्थात राजवाडे-केतकर यांचं सूत्र आणि पाटील यांचं सूत्र यांच्यामध्ये मात्र ‘एकमेकांचा व्यत्यास’ म्हणता येईल, इतका फरक आहे. राजवाडे-केतकर यांच्या (त्यातल्या त्यात राजवाडे यांच्या अधिक) इतिहासमीमांसेत आर्यवंश, वैदिक संस्कृती, त्या संस्कृतीचे वैचारिक व भाषिक वाहक म्हणून ब्राह्मण व रक्षक म्हणून क्षत्रिय हे वर्ग यांना विशेष महत्त्व आहे. समकालीन विचारविश्‍वात प्रचलित असलेल्या कल्पनांना अनुसरत राजवाडे हे ‘आर्यवंश व आर्यलोकांची संस्कृती या जगात सर्वत्र पसरलेल्या गोष्टी आहेत,’ असं गृहीत धरून या वंशाचं व संस्कृतीचं संरक्षण-संवर्धन भारतात व त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात झालं आहे, असं समजून इतिहास लिहितात. आर्यांची समाजरचना व सामाजिक संस्था सर्वश्रेष्ठ असल्याचा त्यांचा ठाम विश्‍वास होता. साहजिकच त्यांची मांडणी आर्यकेंद्रित, वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारी झाली. तिच्यात वैदिक धर्माचा अतिरिक्त अभिमान व अवैदिकांविषयीची; विशेषतः बौद्ध-जैनादींबद्दलची तुच्छता ठायी ठायी प्रकट होते. आर्यवंश व आर्यसंस्कृतीसंबंधीची केतकर यांची मतं राजवाडे यांच्या मतांशी बरीच मिळती-जुळती असल्यामुळं त्यांचं व राजवाडे यांचं सूत्र समान असल्याचं म्हणता येतं. मात्र, भेदांचीही नोंद घ्यायला हवीच. राजवाडे लिहितात ते बऱ्याच अंशी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर. पद्धतीशास्त्राच्या व्यवस्थित शिक्षणाची संधी त्यांना मिळाली नाही. याउलट केतकर यांनी परदेशी जाऊन समाजशास्त्र आणि समाजशास्त्रीय पद्धतीशास्त्र यांचा नीट अभ्यास केला होता. साहजिकच राजवाडे यांच्याइतक्‍या टोकाच्या विचारांपर्यंत ते जात नाहीत. अनेक ठिकाणी व अनेक बाबतींत ते तडजोडी करायला तयार आहेत; परंतु मूळ गाभ्याशी ते आणि राजवाडे एकच आहेत. ‘केतकर म्हणजे संस्कारित (Sophisticated) राजवाडे’ असं म्हणायलाही हरकत नसावी.

कॉम्रेड शरद पाटील यांचं संशोधनशास्त्रीय, तसंच पद्धतीशास्त्रीय प्रशिक्षण विद्यापीठीय वातावरणात वगैरे झालं नव्हतं. ‘कम्युनिस्ट पक्षाचा जीवनदायी (पूर्ण वेळ) कार्यकर्ता’ या नात्यानं त्यांना मार्क्‍स-एंगल्सप्रणीत, रशियन विद्वानपुरस्कृत ‘डायलेक्‍टिकल मटेरिॲलिझम’ किंवा ‘द्वंद्वात्मक भौतिकवाद’ या अभ्यासपद्धतीची ओळख झाली. या पद्धतीचा अवलंब करून लिहिल्या गेलेल्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड ई. एम. एस. नंबुद्रीपाद, डी. डी. कोसंबी आदी मार्क्‍सवादी विचारवंतांच्या ग्रंथांचं त्यांनी परिशीलन केलं; पण त्यांचं समाधान होईना. ‘मार्क्‍सवादी आकलन आणि अन्वेषणपद्धतीमध्ये समाजाची आर्थिक रचना (म्हणजे उत्पादनपद्धती व उत्पादनसंबंध) पायाभूत मानली जाऊन समाजातले अन्य व्यवहार, मुख्यत्वे वैचारिक व्यवहार, दुय्यम समजले जातात. भौतिकतेला प्राधान्य दिलं जाऊन कला-साहित्य-धर्म आदी वैचारिक क्षेत्रांतल्या घडामोडी भौतिक घटनांनी नियंत्रित केल्या जातात,’ असं मार्क्‍सवादी पद्धतीला अभिप्रेत आहे. या गृहीतकांचा पाटील यांनी कधी त्याग केला नाही. मार्क्‍सवादी पद्धतीशास्त्राचा गाभा त्यांना मान्यच होता. त्याला पाटील यांनी आव्हान दिलं आहे, असं आढळत नाही.

पाटील यांचा समकालीन मार्क्‍सवादी वैचारिक नेतृत्वावर कटाक्ष आहे तो वेगळ्या कारणामुळं. ‘ही मंडळी उच्चवर्णीय असल्यामुळं आणि भारतातली समाजव्यवस्था उच्च वर्णांना अनुकूल व लाभदायक असल्यामुळं त्यांच्याकडून तिच्या, म्हणजेच वर्ण-जातिव्यवस्थेच्या, विरोधातल्या चळवळींकडं- म्हणजे गौतम बुद्ध यांच्यापासून ते महात्मा जोतीराव फुले यांच्यापर्यंत झालेल्या चळवळींकडं - दुर्लक्ष झालं’, असं पाटील यांचं निरीक्षण आहे. त्यातूनच त्यांचं ‘ब्राह्मणी आणि अब्राह्मणी’ असं वर्गीकरण पुढं आलं. वस्तुतः हे वर्गीकरण जातीय नसून, वैचारिक आहे. केवळ शब्दयोजनेमुळं ते जातीय भासू शकतं.

इतर कम्युनिस्टांचं जाऊ द्या; आपण पाटील यांची चर्चा राजवाडे-केतकर यांच्या संदर्भात करत आहोत. राजवाडे-केतकर यांच्या ‘आर्यवंश व वैदिक संस्कृती यांचं श्रेष्ठत्व’, ‘ब्राह्मणवर्णाचं उच्च स्थान’ आदी गृहीतकांची संभावना ‘ब्राह्मणी’ अशी करत पाटील यांनी ही गृहीतकं पूर्णपणे नाकारली. मात्र, या गोष्टी नाकारणारे पाटील हे काही पहिलेच विचारवंत नव्हते. आधुनिक काळात फुले यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अशा अनेक विचारवंतांची प्रभावी मालिका महाराष्ट्राला लाभलेली आहे. अशा विचारवंतांव्यतिरिक्त अशा प्रकारे बोलणारे अभ्यासक व कार्यकर्ते यांची संख्या हजारच्या अंकातच मोजावी लागेल!

पाटील यांचा नकार हा सखोल संशोधनावर व अभ्यासावर आधारित आहे. इतकंच नव्हे, तर त्यासाठी त्यांनी स्वतंत्र असं पद्धतीशास्त्र विकसित केलं होतं. सुरवातीला ‘मार्क्‍स-फुले-आंबेडकरवाद’ असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर विषयाची व्यामिश्रता लक्षात येत गेली, तसतसे व त्यानुसार या पद्धतीशास्त्राच्या नावातही बदल करण्यात आले.

या पद्धतीशास्त्राच्या वा तीमधल्या बदलांच्या खोलात शिरायचं इथं प्रयोजन नाही. इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की पाटील यांनी सिद्ध केलेल्या पद्धतीशास्त्रात भाषा आणि तद्‌नुषंगानं व्याकरण व व्युत्पत्ती यांना स्थान आहे आणि  नेमक्‍या याच कारणामुळं पाटील यांचं नातं राजवाडे-केतकर यांच्याशी जुळतं. पाटील यांच्याविषयी अधिक काही सांगण्यापूर्वी राजवाडे आणि केतकर यांच्यामधल्या आणखी एका प्रस्तुत भेदाचा उल्लेख करायला हवा. वैदिक संस्कृतीचा व त्याअनुषंगानं संस्कृत भाषेचा अभिमान बाळगणारे राजवाडे यांचा प्राकृत भाषांकडं पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा उदासीन असल्याचं दिसून येतं (यामुळं विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्यावर कठोर टीकाही केली आहे). केतकर यांचं तसं नाही.

केतकर हे प्राकृत भाषेतल्या ग्रंथांना प्रमाण मानून त्यांच्याच आधारे इतिहासाची मांडणी करण्यात काही गैर समजत नाहीत. खरं तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची मांडणी करताना ते बुद्धपूर्व काळात प्रवेश करण्याचं धाडस करू शकतात ते अशा प्राकृत साधनांच्या बळावरच. सातवाहन राजांनी प्रचलित केलेल्या ‘महाराष्ट्री प्राकृत’ला तर तिचं वाजवी स्थान देण्यात केतकर काहीच हातचं राखून ठेवत नाहीत; पण त्याही पुढं जाऊन गुणाढ्य या कथाकाराच्या मूळ ‘पैशाची प्राकृता’त लिहिलेल्या (आणि नंतर क्षेमेंद्र व सोमदेव यांनी संस्कृतात रूपांतरित केलेल्या) ‘बृहत्कथा’ या महाग्रंथाचा उपयोग करूनच ते महाराष्ट्राच्या इतिहासाचा धागा भारताच्या व जगाच्या इतिहासाशी जोडतात. आपल्या इतिहासलेखनाची साधनं ज्या भाषांमध्ये आहेत, त्या प्राकृत भाषांचं महत्त्व व प्रामाण्य प्रतिष्ठित करण्यासाठी केतकर हे वररुची आणि कात्यायन या प्राकृत व्याकरणकारांचा आधार घेतात. आता या व्याकरणकार वररुची याची माहिती मिळवण्यासाठी गुणाढ्याच्या कथांचाच उपयोग होतो.

‘लोक, भाषा आणि भूमी’ या त्रिपुटीत महाराष्ट्राचा इतिहास मांडायचा झाल्यास, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत तरी ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ अशी परिस्थिती झाली होती. महाराष्ट्री भाषेचं, क्वचित महाराष्ट्र समाजाचं (गणाचं?) अस्तित्व मान्य करणारे अभ्यासक महाराष्ट्र नावाच्या भूमीचं अस्तित्व मानायला तयार नव्हते! त्यांना गप्प करण्यासाठी वररुची याच्या ‘प्राकृतप्रकाशः’ या व्याकरणविषयक ग्रंथाचा उपयोग केतकर यांनी खुबीनं आणि कौशल्यानं करून घेतला. ‘शौरसेनी प्राकृत बोलणाऱ्यांचा शूरसेन हा प्रदेश आहे, मागधी प्राकृत भाषा बोलणाऱ्यांचं मगध हे राष्ट्र आहे, तर मग महाराष्ट्री भाषा बोलणाऱ्यांचं ‘महाराष्ट्र’ असणं तितकंच स्वाभाविक आहे,’ असं तर्कसंगत अनुमान केतकर करतात.

अशा प्राकृत साधनांची मातब्बरी तेव्हा कळते, जेव्हा केतकर महाराष्ट्राचा संबंध थेट मगध राज्याच्या राजधानीशी जोडतात. महाभारतकालीन जरासंधाच्या मगध राज्याची राजधानी राजगृह ही नगरी होती. राजगृहात प्रवेश करूनच कृष्ण, भीम आणि अर्जुन यांनी जरासंधाचा काटा काढला. जरासंधाला मारल्यानंतर सहदेव या त्याच्या मुलाला गादीवर बसवून पांडवांनी त्याचं राज्य राखलं. भारतीयुद्धात हा सहदेव पांडवांच्या बाजूनं लढला व मारला गेला.

नंतरच्या काळात प्रसिद्ध पावलेल्या नंद घराण्याच्या मगध राज्याची राजधानी ही राजगृह नसून पाटलीपुत्र असल्याचं आपण जाणतोच. याच घराण्यातल्या शेवटच्या धनानंद या राजाचा नायनाट करून कौटिल्य व चंद्रगुप्त यांनी तिथं मौर्य घराण्याची स्थापना केली, हेही आपल्याला ठाऊक असतं; पण भारतातल्या या पहिल्या साम्राज्याच्या राजधानीची- पाटलीपुत्र या शहराची- स्थापना कुणी केली? ते शहर वसवलं कुणी? केतकर दाखवून देतात, की ते श्रेय महाराष्ट्रातल्या तारापूरजवळच्या चिंचणीनामक गावच्या एका ब्राह्मणाचं आहे! अशा प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासाचा भारताच्या इतिहासाशी संबंध प्रस्थापित झाला.

पण याचा पुरावा केतकर यांना कुठं सापडला? अर्थातच गुणाढ्याच्या ‘बृहत्कथे’त!
‘कुरुयुद्ध ते बुद्ध’ या कालखंडातला महाराष्ट्राचा इतिहास केतकर जेव्हा सांगतात, तेव्हा ते राजवाडे यांच्या जवळ असूनही दूर असतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com