महाराष्ट्री प्राकृतचं स्थान आणि महत्त्व (सदानंद मोरे)

महाराष्ट्री प्राकृतचं स्थान आणि महत्त्व (सदानंद मोरे)

‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या म्हणण्यानुसार ‘महाराष्ट्रीय भाषा वैदिक भाषेइतकीच जुनी आहे आणि मुख्य म्हणजे या दोन भाषांमध्ये फार पूर्वीपासून देवाणघेवाण होत होती.’ याशिवाय, त्यांचा सगळ्यात साहसी दावा म्हणजे  ः ‘ललित वाङ्‌मयाच्या क्षेत्रात महाराष्ट्री काव्यानं संस्कृत काव्यावर केवळ मोठा परिणाम केला, एवढं ‘महत्त्ववर्णन’ पुरे होणार नाही, तर संस्कृत साहित्याचं आणि त्याच्या शास्त्राचं अस्तित्वच महाराष्ट्री प्राकृत काव्यानं शक्‍य केलं, असं म्हणण्यास प्रत्यवाय नाही.’

कोणत्याही समाजात एकाच वेळी अनेक व्यवहार चालत असतात. या व्यवहारांपैकी काही व्यवहार एका भाषेतून व इतर काही व्यवहार दुसऱ्या एखाद्या भाषेतून असा मामला असेल, तर तो समाज एक ‘भाषिक समाज’ म्हणून परिपूर्ण नाही, त्याचं जीवन दुभंगलेलं आहे, इतकंच नव्हे, तर तो खऱ्या अर्थानं स्वतंत्रसुद्धा नाही, असं बेलाशक समजावं.

या दृष्टीनं पाहिलं तर सातवाहन काळातला महाराष्ट्रातला समाज परिपूर्ण समाज म्हणावा लागेल. कारण, या काळात इथल्या समाजाच्या सगळ्या व्यवहारांची भाषा महाराष्ट्री प्राकृत हीच होती. सातवाहनांनंतर आलेल्या वाकाटक, चालुक्‍य, राष्ट्रकूट इत्यादी राजवटींमध्ये सगळ्या व्यवहारांसाठी एकाच भाषेचं सूत्र सुटून प्राकृतच्या बरोबरीनं संस्कृत व कन्नड भाषा वापरात आल्या. ही परिस्थिती बदलायला यादवकाळाची वाट पाहावी लागली. यादवकाळात मराठी समाजाचे सगळे व्यवहार मराठीतून होऊ लागले.

तेराव्या शतकाच्या सुरवातीलाच यादवांचं राज्य लयाला जाऊन उत्तरेकडून आलेल्या खिलजींची राजवट प्रस्थापित झाली. तेव्हापासून १६७४ पर्यंत, म्हणजे शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत, महाराष्ट्रातल्या जनतेला प्रशासकीय व्यवहारांसाठी राज्यकर्त्यांच्या पर्शियन भाषेचा उपयोग करावा लागला. याचाच अर्थ असा होतो, की या काळात मराठी समाज खंडित व अपरिपूर्ण जीवन जगत होता आणि मुख्य म्हणजे राजकीय व प्रशासकीय व्यवहारांसाठी परभाषेचा उपयोग ही गोष्ट स्वातंत्र्याच्या अभावाची खूण होय.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची सगळीच मतं त्यातल्या तपशिलांसह मान्य करायचं काही कराण नाही; परंतु त्यांनी प्रकट केलेली मर्मदृष्टी मात्र महत्त्वाची आहे. ते लिहितात ः ‘या पाच हजार वर्षांमध्ये निरनिराळ्या काळांत अनेक वाङ्‌मयी भाषा उत्पन्न झाल्या व त्यांचा विलय झाला. त्या सर्वांची स्थूल कल्पना तरी आल्याशिवाय निरनिराळ्या काळांतील संस्कृतिविकास, संस्कृतिविनाश आणि संस्कृतीची पुनर्घटना यांचा इतिहास समजणार नाही. राजकीय इतिहास हा भाषात्मक इतिहासातील एक उपप्रकरण आहे.’

केतकरांनी हे जे सूचित केलं आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या भाषिक इतिहासाचा आढावा त्यांनाच वाट पुसत घ्यायला हरकत नाही. निष्कर्षरूपात ते नोंदवतात.
‘‘महाराष्ट्री ही मुख्य प्राकृत धरून इतर प्राकृतांची तीपासून भिन्नता थोडक्‍या सूत्रांत सांगता येईल, इतक्‍या त्या जवळ जवळ आहेत, असं वररुचीचा ‘प्राकृतप्रकाश’ दाखवत आहे आणि ‘प्राकृतप्रकाश’ बुद्धपूर्व स्थिती दाखवत आहे. बुद्धाच्या अवतारानंतर जर ‘प्राकृतप्रकाश’ तयार झाला असता, तर पाली हे भाषानाम तरी त्यास लक्षात घेऊन विवरण करावे लागले असते किंवा ‘पाली’ हे नाव जर बरेच उत्तरकालीन असले तरी मागधीस अधिक महत्त्व द्यावे लागले असते. बुद्धपूर्व काळी चांगला भाषाविकास महाराष्ट्राचाच झाला असला पाहिजे.’’

केतकरांच्या म्हणण्यानुसार ‘महाराष्ट्रीय भाषा वैदिक भाषेइतकीच जुनी आहे’ आणि मुख्य म्हणजे या दोन भाषांमध्ये फार पूर्वीपासून देवाणघेवाण होत होती. या भाषेतला (महाराष्ट्रीय) कोणता काव्यसंग्रह संस्कृतीकरण होऊन महाभारतात दाखल झाला असेल, असं विचारता नल-दमयंती आख्यानाकडं बोट दाखवावंसं वाटतं.
महाराष्ट्राच्या इतिहासातलं नल-दमयंती आख्यानाचं स्वरूप व त्यातून निघणारे निष्कर्ष केतकरांनी अचूक ओळखले. दमयंती ही महाभारतकालीन रुक्‍मिणीप्रमाणेच विदर्भाशी निगडित आहे. तिच्याशी विवाह करण्यास संपूर्ण भारतवर्षातले राजपुत्र उत्सुक होते, ही बाबच मुळी विदर्भाच्या राज्याकडं निर्देश करते. केतकर सांगतात- ‘‘कुरुयुद्धकाली महाराष्ट्रात कुंडिनपूर, भोजकट या राजधान्या प्रसिद्ध होत्याच. शूर्पारक क्षेत्रदेखील प्रसिद्ध असावे आणि कुरुयुद्धाच्या पूर्वीच्या कालातही कुंडिनपूर हे तर असावेच; पण निषध या सुप्रसिद्ध राज्याची राजधानी कोठेतरी असावी. अश्‍मक आणि कुंतल यांच्या राजधान्या कुरुयुद्धकाली महत्त्वाच्या होत्याच.’’

केतकर हे महाराष्ट्रातल्या सातवाहनपूर्वकालीन अश्‍मकादी राजघराण्यांचं मूळ बुद्धाच्याही पूर्वी कुरुयुद्ध म्हणजे महाभारतकाळापर्यंत सहजपणे भिडवतात आणि त्याच्याही मागं थेट वैदिक काळापर्यंत जाता येतं, हेही त्यांना समजलं आहे. कारण, अश्‍मकांचा संबंध खुद्द रामाच्या ईक्ष्वाकू कुळाशी पोचतो. म्हणजेच बुद्ध, महाभारत, रामायण या सगळ्यांच्या काळाच्या पलीकडं वैदिक ऋषींपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पोचतो. त्यानुसार ‘ज्या वेळेस वैदिक मंत्रवाले लोक देशात प्रविष्ट झाले, त्या काळी सर्व देशभर वेदभाषेपासून भिन्न अशा ज्या प्राकृत भाषा होत्या, त्यांमध्ये शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री असे भेद असले पाहिजेत.’

थोडक्‍यात सांगायचं झाल्यास असं म्हणता येतं, की ‘संस्कृत भाषा ही प्राकृत भाषांच्या आधीची आहे व प्राकृत भाषा संस्कृतपासून निघाल्या,’ हे भाबडं गृहीतक केतकरांना मान्य नाही. भाषेची समस्या अत्यंत गुंतागुंतीची असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. त्यामुळं एकीकडं ते उत्तरेकडची संस्कृत आणि दाक्षिणात्यांची संस्कृत असा भेद करतात आणि दुसरीकडं संस्कृत व प्राकृत अशी तुलना करतात. ‘‘बुद्धपूर्वकाळात दक्षिणेत संस्कृत पांडित्याची जी परंपरा उत्पन्न झाली, ती देशी वाङ्‌मयाची संग्राहक व संरक्षक होती,’ हा एक मुद्दा आणि त्यापेक्षा महत्त्वाचा व खळबळजनक मुद्दा म्हणजे ‘संस्कृत काव्याचं आणि इतर साहित्याचं भवितव्य ठरण्यास प्राकृत काव्य आणि विशेषतः महाराष्ट्री काव्य कारण झालं. संस्कृत वाङ्‌मयाने आणि पांडित्याने भारतीय संस्कृतीच्या गंभीर संस्कृतीची जोपासना केली आणि प्राकृत वाङ्‌मयाने भारतीय संस्कृतीचं लालित्य संवर्धित केले. गंभीर क्षेत्रात दाक्षिणात्यांची कामगिरी आहेच. ती कात्यायन वैयाकरण आणि आपस्तंब आणि बौधायन यांच्या शुल्ब सूत्रावरून व्यक्त होत आहे. व्याकरणाच्या क्षेत्रात दाक्षिणात्य संस्कृत भाषेचे योग्य महत्त्व आणण्याचा प्रयत्न कात्यायनाने केला, तर बौधायन आणि आपस्तंब यांनी गणित आणि भूमिती यांची जोड वैदिक विद्येस दिली.’

‘आर्य हे बाहेरून भारतात आले, त्यांचं वाङ्‌मय म्हणजे वेद, त्याचा बराचसा भाग ते भारतात येण्यापूर्वीच सिद्ध झाला होता आणि काही भाग भारतातल्या वायव्य भागात सिद्ध झाला,’ असंही एक गृहीतक प्रचलित होतं. त्याला छेद देत केतकर वेदांचा काही भाग दक्षिणेत निर्माण झाला असल्याचं सूचित करतात.

केतकरांचा सगळ्यात साहसी दावा म्हणजे ‘ललित वाङ्‌मयाच्या क्षेत्रात महाराष्ट्री काव्यानं संस्कृत काव्यावर केवळ मोठा परिणाम केला, एवढं महत्त्ववर्णन पुरे होणार नाही, तर संस्कृत साहित्याचे आणि त्याच्या शास्त्राचे अस्तित्वच महाराष्ट्री प्राकृत काव्याने शक्‍य केले, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.’

केतकरांच्या या मुद्द्याची सविस्तर चर्चा वेगळ्या प्रकारे ‘गर्जा महाराष्ट्र’ या माझ्या ग्रंथात करण्यात आलेली आहे. तिची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. केतकरांच्या मांडणीमुळं ‘जन्यजनकभावा’चीच उलटापालट झालेली आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. एका अर्थानं ही भाषा आणि साहित्य यांच्या इतिहासाविषयीच्या पारंपरिक गृहीतांच्या आणि समजुतींची अधोर्ध्व समीक्षा (Transformative critique) आहे, असं म्हटलं तरी चालेल.

संस्कृत-प्राकृत संबंधांची केतकरांनी केलेली मीमांसा चुकीची की बरोबर, याविषयी चर्चा होऊ शकते; पण या मीमांसेतून निष्पन्न होणारी एक बाब फार महत्त्वाची आहे. भाषेचा संबंध अस्मितेशी लावला जात असल्यामुळं संस्कृचच्या अभिमान्यांनी प्राकृतला तुच्छ लेखायचं व प्राकृतच्या पक्षपात्यांनी संस्कृतचा तिरस्कार करायचा, हा प्रकार आपल्याला अपरिचित नाही. वास्तविक संस्कृत भाषा काय किंवा प्राकृत भाषा काय, भारतात या दोन्ही भाषांचा विकास समांतरपणे व एकमेकींवर प्रभाव पाडतच झालेला आहे. असं म्हणता येतं, की भारतात भाषांची एक महाव्यवस्था आहे. संस्कृत आणि प्राकृत भाषा या महाव्यवस्थेमधली उपव्यवस्था आहेत. या उपव्यवस्थांमधला नातेसंबंध एकपदरी नसून विलक्षण गुंतागुंतीचा आहे. कोणत्याही प्रकारच्या ‘डायलेक्‍टिक्‍स’मध्ये पकडता येणार नाही इतका तो जटील आहे. भारतामधली भाषाच काय; परंतु वेगवेगळे धर्मसुद्धा एका व्यापक महासंस्कृतीचे भाग आहेत. त्यांच्या पसस्परसंबंधांमध्ये ताणतणाव, विरोध, वर्चस्वासाठी प्रयत्न नाहीत, अशातला भाग नाही; तथापि असं असूनही त्यांच्यात साम्यस्थळं पुरेशी आहेत व त्यांमुळं त्यांच्यात देवाणघेवाण होऊ शकते. स्पर्धा होऊ शकते.

भाषेच्या संदर्भात हा मुद्दा एक उदाहरणाच्या साह्यानं स्पष्ट करता येईल. बंगाल प्रांतातल्या लोकांची भाषा बंगाली होती व हे लोक एकेकाळी हिंदू व बौद्धधर्मीय होते. पुढं इस्लामी सत्तेमुळं त्यांच्यापैकी अनेक लोक मुसलमान झाले. इतकंच नव्हे, तर मुस्लिम लीगच्या नादी लागून महंमद अली जीना यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची मागणी करण्यात ते सहभागी झाले. त्यानुसार भारताची फाळणी होऊन त्यांना (पूर्व) पाकिस्तान मिळालासुद्धा; पण त्यानंतर त्यांची भाषिक अस्मिता जागृत होऊन त्यांचा प्रवास पाकिस्तानातून फुटून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याच्या रोखानं झाला. ही घटना ‘राजसत्तांचा इतिहास हा भाषिक इतिहासाचा भाग असतो,’ या केतकरांच्या मतावर शिक्कामोर्तब करते; पण त्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे, बांगलादेशातली मुसलमानांची भाषा ही भारतीय संस्कृत-प्राकृत भाषांच्या महाव्यवस्थेतली एक व्यवस्था आहे. या भाषा एकाच सांस्कृतिक परिवेशात विकसित झालेल्या आहेत.
पर्शियन काय किंवा इंग्लिश काय, या परकीय भाषा मुळात महाव्यवस्थेचा भाग नव्हत्या. त्या राजकीय अपरिहार्यतेतून, व्यावहारिक कारणामुळं स्वीकाराव्या लागल्या. त्यांचा काही परिणाम झाला नाही किंवा उपयोगही झाला नाही, अशातला भाग नाही; मात्र तरीही त्यांचं स्वरूप इंग्लिशमध्ये ज्याला Foreign body म्हणतात असंच राहिलं. बंगाली लोकांना संधी मिळताच त्यांनी पर्शियनप्रभावित उर्दू भाषेला आपल्या भाषिक संस्कृतीमधली Introduction of foreign body म्हणून बाहेर टाकलं. महाराष्ट्रात ही प्रक्रिया छत्रपती शिवाजीमहाराजांनी ‘राज्यव्यवहार कोशा’च्या निर्मितीद्वारे केली होती.

या प्रश्‍नाला दुसरी बाजूही आहे. (पश्‍चिम) पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी बंगाली मुसलमानांवर आपलं वर्चस्व लादण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून उर्दू लादण्याचा प्रयत्न केला नसता, तर कदाचित ही भाषा बंगालच्या गुंतागुंतीच्या अशा व्यापक भाषिक महाव्यवस्थेचा भाग होऊ शकली असती. या महाव्यवस्थेत एका बाजूला नव्य-न्याय दर्शनानं घडवलेल्या पारिभाषिक संज्ञांचा, तर दुसऱ्या बाजूला नव्य-न्यायाचे प्रतिस्पर्धी असलेल्या बौद्धांच्या लोकाभिमुख अभिव्यक्तीचा समावेश होतो. आणखी एकीकडं तंत्रमार्गातून प्रविष्ट झालेला गूढतेचा अंश होता, तसंच चैतन्यप्रभूंच्या वैष्णव धर्मातली भावनात्मकताही होती. बाऊल संन्याशांचा बेभानपणाही होता!

आपल्या चर्चा विषयाकडं म्हणजेच महाराष्ट्राकडं येताना तुलनेचं एक स्थळ म्हणून बंगालचं उदाहरण लक्षात ठेवायला हरकत नसावी. महाराष्ट्राच्या चर्चेचा केंद्रबिंदू केतकरांनी जे सूचन केलं आहे, त्यानुसार भाषा हेच ठेवायचं झालं, तर अर्थातच ती भाषा महाराष्ट्री प्राकृत असणार हे उघड आहे. प्राचीन महाराष्ट्रातच काय; परंतु संपूर्ण भारतात संस्कृत-प्राकृत भाषांची एक महाव्यवस्था नांदत होती. या महाव्यवस्थेमध्ये जे आंतर्विरोध व ताणतणाव होते, त्यांपैकी एक हा दाक्षिणात्य व उत्तरेकडील यांच्यातला होता. कॉम्रेड शरद पाटील यांची मदत घ्यायची झाली, तर दुसरा आंतर्विरोध ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असा होता आणि याशिवाय वैदिक-अवैदिक असाही एक पैलू या प्रकरणात होताच.
केतकर सांगतात, ‘संस्कृत साहित्याचे व त्याच्या शास्त्राचे अस्तित्वच महाराष्ट्री प्राकृतमुळं शक्‍य केले.’

केतकरांना अभिप्रेत असलेलं संस्कृत साहित्य हे यज्ञाच्या प्रक्रियेशी संबंध असलेलं मंत्रब्राह्मणात्मक साहित्य नव्हे, हे उघड आहे. केतकर ललित साहित्याबद्दल आणि साहित्यशास्त्राबद्दल बोलत आहेत, काव्य-नाटकांबद्दल बोलत आहेत. ही चर्चा ते मुख्यत्वे सातवाहन काळात निर्माण झालेल्या महाराष्ट्री भाषेतल्या हाल सातवाहन राजाने संग्रहित केलेल्या ‘गाथा सप्तशती’च्या आधारे करतात. हालानं संपादित केलेल्या या काव्यात्म गाथांच्या संस्कृत छाया अर्थात अनुवाद तर करण्यात आले होतेच; पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, संस्कृत काव्यशास्त्रात जेव्हा सर्वोत्कृष्ट काव्याची, म्हणजेच ध्वनिकाव्याची उदाहरणं देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा याच गाथा उद्‌धृत केल्या जातात.

दुसरी गोष्ट संस्कृत नाटकांची. संस्कृत नाटकांमध्ये काही पात्रं महाराष्ट्री भाषा बोलणारी असतात, म्हणजेच महाराष्ट्री प्राकृतशिवाय निर्भेळ संस्कृत नाटक संभवत नाही; मात्र निर्भेळ प्राकृतमधलं नाटक सापडू शकतं.
यासंदर्भात आणखी एका मुद्द्याचा उल्लेख करायला हवा. सुट्या प्राकृत कवितांचा अर्थ लावणं सोपं नसतं. त्यामुळंच साहजिकपणे ओढून-ताणून शृंगारिक ध्वन्यर्थ लावण्याचा प्रयत्न पंडित करत असतात. मुळात या कविता म्हणजे प्राकृत नाटकांमधल्या संवादाचा भाग असून, त्यांचा अर्थ त्या त्या संवादांच्या संदर्भांच्या चौकटीच्या कोंदणातच लावायला हवा; परंतु काळाच्या ओघात ती नाटकं लुप्त झाली व कविता तेवढ्या उरल्या.

या सर्व विवेचनाचा इत्यर्थ हाच, की  ‘प्राकृतप्रकाश’ या ग्रंथाचा लेखक कात्यायन वररुचीनं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात बोलली जाणारी महाराष्ट्री ही सर्व प्राकृत भाषांमधली श्रेष्ठ व मानदंडात्मक भाषा तर होतीच; परंतु इथल्या भाषिक महाव्यवस्थेत तिचं स्थान संस्कृतच्या बरोबरीचं होतं. संस्कृत साहित्यकारांनी तिचं अनुकरण केलं व साहित्य मीमांसकांनी व काव्यशास्त्रज्ञांनी तिच्यापासून साहित्याच्या श्रेष्ठत्वाच्या निकषांची व साहित्यसमीक्षेतल्या मूल्यांची निर्मिती केली.
केतकरांचा सिद्धांत व्यतिरेकी पद्धतीनं मांडायचा झाल्यास म्हणावं लागतं, की महाराष्ट्री भाषेतलं साहित्य नसतं, तर संस्कृत साहित्याचा आणि साहित्यशास्त्राचा जो विकास झाला, तो झाला नसता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com