महाराष्ट्रः धर्ममंथनाची भूमी (सदानंद मोरे)

महाराष्ट्रः धर्ममंथनाची भूमी (सदानंद मोरे)

‘सत्ताधारी वर्गाला सर्वच प्रजेचे प्रशासन करायचे असते; त्यामुळे एका धर्मातील लोकांबरोबर चांगले वागून इतरांशी वाईट वागणे हे त्याला परवडणारे नसतेच,’ असं प्रतिपादन श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या लेखनातून केलं आहे. ते म्हणतात ः ‘राजाचा स्वतःचा धर्म कोणताही असला, तरी त्यानं सगळ्या धर्मांच्या प्रजेशी सारखी वागणूक ठेवावी, ही भारतातील परंपरा आहे.’

महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाच्या उत्क्रांतीचा शोध घेताना ‘ज्ञानकोश’कार  श्रीधर व्यंकटेश केतकर आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्यातला अनुबंध महत्त्वाचा ठरतो. मार्क्‍सवादी इतिहासलेखकांच्या प्राथमिक किंवा आदिसाम्यवाद या समाजाच्या व्यवस्थेऐवजी पाटलांनी स्त्रीसत्तेची कल्पना मांडून मार्क्‍सवादी वर्तुळाचा रोष ओढवून घेतला हे आपण जाणतोच. या कल्पनेच्या अनुषंगानं गण, गणमाता, गणिका या शब्दांचा मागोवा त्यांना व्युत्पत्ती व व्याकरण यांच्या अंगानं घ्यावा लागला. अर्थात व्युत्पत्ती किंवा व्याकरण हा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळं नवीन अभ्युपगम स्फुरू शकतो; पण पुरावा म्हणून स्वतंत्र घटनांचीच अपेक्षा असते.
या संदर्भातल्या मांडणीनं केतकर हे पाटलांच्या मांडणीच्या जवळ तर जातातच; शिवाय ते त्यासाठी अनुकूल असे पुरावे बृहत्कथेतून दाखवून जातात. ते म्हणतात ः ‘राजकीय स्थितीचा विचार करताना दुसऱ्या एका मोठ्या सामाजिक प्रश्‍नाचा विचार करणं प्राप्त होते. तो प्रश्‍न म्हटला म्हणजे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक कुटुंबपद्धतींचे सामीप्य आणि त्याचा राजकारणावर परिणाम हा होय. बृहत्कथेत अनेक श्रीमान्‌ वेश्‍यांचा उल्लेख आहे. या वेश्‍यांपाशी हत्ती, घोडे वगैरे सैन्य असते. त्यांच्यापाशी श्रीमंती इतकी असते, की राजेलोकांनीदेखील यांच्याकडे उतरावे. यांनी राजे लोकांकडून पैसे घेण्याऐवजी त्यांना दिल्याचेच उल्लेख आहेत. ...या वेश्‍यांची श्रीमंती शरीरविक्रयावर अवलंबून होती, असे मुळीच दिसत नाही. अशी कल्पना होते, की श्रीमंत वेश्‍या या मातृ-कन्यापरंपरेचा अवशेष असाव्यात. ज्या काळात जमिनीची मालकी स्त्रियांकडेसच असेल तो काळ नाहीसा होऊन जेव्हा पितृपरंपरायुक्त समाज सुरू झाला असेल, तेव्हा या जमिनीच्या मालक असलेल्या स्त्रिया वेश्‍या आहेत असेच लोकांना वाटत असेल... मोठमोठ्या जमीनदार असलेल्या, स्वेच्छेने पुरुषसेवनाचे स्वातंत्र्य राखीत व नगरात राहत; अशा स्त्रिया व गरीब शरीरविक्रयावरच उपजीविका करणाऱ्या स्त्रिया या दोहोंचे शहरात अस्तित्व असावे. दोन्ही प्रकारच्या स्त्रियांस पौरुषनीतिशास्त्राने मापन करणारे लोक एकाच वर्गात घालतील यात आश्‍चर्य नाही.’
‘बृहत्कथा मुख्यत्वे कुरुयुद्ध ते बुद्धकाल यादरम्यानचा इतिहास सांगते,’ असं केतकरांचं म्हणणं आहे. सातवाहन राजघराणं ज्या अश्‍मक घराण्यानंतर राज्य करू लागलं, त्या अश्‍मक घराण्याची मुलं केतकर कुरुयुद्धापर्यंत म्हणजेच महाभारतकाळापर्यंत भिडवतात.

पण तिथं थांबतील ते केतकर कसले? ते थेट वेदकाळात शिरतात आणि असंही दाखवण्याचा प्रयत्न करतात, की वेदांचा काही भाग दक्षिणेत सिद्ध झाला आहे! इतकंच नव्हे तर, वैदिक परंपरेतले काही महत्त्वाचे वादसंघर्ष दक्षिणेत-महाराष्ट्रातही झाले असल्याचंही केतकर सांगतात. अगदी विशिष्ट नामनिर्देश करून सांगायचं झाल्यास ‘ऐतरेय ब्राह्मणा’तल्या विदर्भाच्या भीमनामक राजाचा करता येईल. याच्या काळात येथील क्षत्रिय यज्ञात सोमपान न करता सोमाऐवजी अन्य पर्याय वापरत, या वस्तुस्थितीकडं केतकर लक्ष वेधतात; पण मुद्दा केवळ वस्तुस्थितीचा नाही. सोम वनस्पतीपासून तयार केलेल्या पेयाचं प्राशन न करता दुसरी वनस्पती वापरणारे हे श्रेष्ठ होत, असाही दावा करण्यात आला आहे.

मात्र, मुळात सोमाऐवजी अन्य पर्याय उपयोगात आणणारे सोमरस पिणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ का, याची चर्चा केतकर करत नाहीत. त्याचं कारण सोम ही वनस्पती मारक आहे, यापेक्षा वेगळं असू शकत नाही.
मादक द्रव्याचं सेवन न करणं हा मुद्दा नैतिक आहे. त्यावर गौतम बुद्धांनी भर दिला असल्याचं सर्वज्ञातच आहे; पण महाराष्ट्रातल्या
मादकद्रव्य-निषेधाची परंपरा बुद्धपूर्व असल्याचं म्हणता येतं. विशेष म्हणजे, हा संघर्ष वैदिक परंपरेच्याच अंतर्गत होता व त्याचा संबंध धर्माशी होता. यज्ञात सोमपानाला किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या वैदिकांचं हे कृत्य वैदिक यज्ञधर्मातल्या ख्य प्रवाहाविरुद्ध केलेलं बंड होतं, असं म्हणण्यास प्रत्यवाय नाही!

अशा प्रकारच्या धार्मिक संघर्षाची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे.
कृष्ण आणि नल या प्रसिद्ध राजांच्याही अगोदरचा विदर्भाचा जावई म्हणजे अर्थातच अगस्त्य ऋषी. केतकरांच्या मते ‘अगस्त्यकालीन धार्मिक परिस्थिती शोधणे म्हणजे महाराष्ट्राची अत्यंत प्राचीन धार्मिक स्थिती शोधणे होय.’
या काळातला धर्म यज्ञप्रधान होता व त्यातही राजसूय आणि अश्‍वमेध यज्ञांना विशेष महत्त्व असल्याचं केतकर सांगतात.

धर्मेतिहासाच्या संदर्भात आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केतकर करतात. पहिली गोष्ट म्हणजे ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या हिंदू धर्मातल्या श्रुती, स्मृती आणि पुराणे या प्रमाणांमध्ये कालानुक्रम असल्याचं विद्वान मानतात, ते केतकरांना मान्य नाही. पौराणिक धर्मातल्या काही गोष्टी श्रौत धर्माच्या समकालीन, प्रसंगी आधीच्याही असल्याची शक्‍यता केतकर सूचित करतात.
हीच गोष्ट श्रमणांच्या जैन व बौद्ध धर्मांच्या बाबतीतही सांगता येते. जैनांच्या बाबतीत तर प्रश्‍नच उद्भवत नाही. वर्धमान महावीर यांच्या पूर्वी जैनांचे तेवीस तीर्थंकर होऊन गेले (ऋषभदेव या आदितीर्थंकरांचा उल्लेख ऋग्वेदात असून, भागवत पुराणातल्या चोवीस अवतारांमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे.) गौतम बुद्धांच्या संदर्भातसुद्धा चार बुद्धांची कल्पना कमीत कमी अशोककालीन असून, सिद्धार्थ गौतम हे चौथे बुद्ध होत. पहिले बुद्ध कुकुच्छंद, दुसरे बुद्ध कनकमुनी आणि तिसरे कश्‍यप. सम्राट अशोकानं कनकमुनींच्या जन्मस्थानी जाऊन तिथं त्यांच्या प्रीत्यर्थ स्तंभ उभारला होता. केतकर म्हणतात, ‘यावरून असं दिसतं, की यज्ञधर्मापासून भिन्न अशी जी एक निराळी परंपरा होती, ती गौतमापूर्वीची होती.’

भारताच्या (आणि अर्थातच महाराष्ट्राच्याही) धर्मेतिहासाबद्दल केतकरांचं असं निरीक्षण आहे, की ज्याला आपण धार्मिक संघर्ष म्हणतो, त्या संघर्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांची नसायची व सत्ताधीश राजांचीही नसायची. सामान्य लोकांना त्यांचे नवस पुरले म्हणजे इच्छापूर्ती झाली म्हणजे पुरे; मग ती कोणत्याही धर्माच्या देवतेकडून होवो!’ त्याचप्रमाणे ‘सत्ताधारी वर्गाला सर्वच प्रजेचे प्रशासन करायचे असते; त्यामुळे एका धर्मातील लोकांबरोबर चांगले वागून इतरांशी वाईट वागणे हे त्याला परवडणारे नसतेच,’ असंही केतकरांचं म्हणणं आहे.

‘राजानं एखाद्या धर्माची बाजू घेऊन इतर धर्मांच्या प्रजेशी अयोग्य व्यवहार करणं ही पद्धत इस्लाम व ख्रिस्तीधर्मीय सत्ताधीशांची’ असं सांगून केतकर असंही म्हणतात, की ‘भारतामधील सत्ताधीश या प्रकारचे नव्हते; त्यामुळे त्यांनी ख्रिस्तीधर्मीयांना चर्चेस बांधण्यात व मुस्लिमांना मशिदी बांधण्यात मदत केली.’
धर्मेतिहासाची मांडणी कुणी गंभीरपणाने घेतल्याचं दिसत नाही; पण ती सहजासहजी उडवून लावावी इतकी उपेक्षणीय नाही, असं मात्र निश्‍चितपणे म्हणता येतं.
महाराष्ट्रातला एके काळचा धार्मिक प्रवाह यज्ञप्रधान होता; पण तरीही या यज्ञप्रधान धर्माच्या वाङ्‌मयाला इतर लहान-मोठ्या देशी वा स्थानिक परंपरा आपल्याला सामावून घेण्यात काही अडचण नव्हती. विशेषतः पुराणग्रंथांनी हे काम केल्याचंही केतकर सांगतात.

स्वतः केतकरांच्याच आवडीचा विषय असलेल्या सातवाहनकाळाचा विचार केला तर काय दिसतं?
या प्रश्‍नाचे अगदी विश्‍वासार्ह उत्तर मिळण्याची शक्‍यता आहे ती स्वतः सातवाहन कुलातील राजपुरुषांनी व राजस्त्रियांनी कोरून ठेवलेल्या शिलालेखांमुळं. हा पुरावा इतका निःसंशय व बिनतोड आहे, की त्याच्या संदर्भात शंका उपस्थितच होऊ नये.
सातवाहनाच्या एका शिलालेखात सुरवातीला ज्या दैवतांना नमन करण्यात आलं आहे, त्यांच्यात प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण, वासुदेव, चंद्र, सूर्य, त्याचप्रमाणे यम, वरुण, कुबेर आणि वासव या चार लोकपालांचा समावेश आहे.

यांच्यापैकी काही देवता वैदिक आणि काही पौराणिक असल्याचं सहज लक्षात येतं.
या लेखाबरोबर संबंधित देवतांच्या मूर्ती होत्या, त्या आज भग्नावस्थेत आहेत; पण याचा अर्थ असा होतो, की या काळात वैदिक धर्मात एक प्रकारच्या मूर्तिपूजेचा शिरकाव झालेला होता. राजानं केलेल्या विविध यज्ञांचा व यज्ञांतील दक्षिणांचा उल्लेख या लेखात येतो. या यज्ञात राजसूय आणि अश्‍वमेध यांच्यासह तब्बल १८ प्रकारचे यज्ञ समाविष्ट आहेत! त्यातल्या काहींचे पूर्ण तपशील यज्ञीय साहित्यातसुद्धा उपलब्ध नाहीत! या प्रकारावर केतकरांचा शेरा चिंतनीय आहे. ते लिहितात ः ‘या लेखामध्ये सातवाहनांनी किती यज्ञ केले याचा हिशेब आहे आणि तो पाहता, दोनदा अश्‍वमेध करणारा पुष्यमित्र किंवा खारवेल हे दोघेही अगदी फिके पडतात.’’

सातवाहनांच्या लेखांची चर्चा करताना याच काळात होऊन गेलेल्या कलिंगाधिपती राजा खारवेलाचा विचार टाळता येणार नाही. त्याच्या हाथीगुंफा इथल्या प्रसिद्ध शिलालेखाची सुरवात अर्हतांना व सिद्धांना नमन करून झाली आहे. याचा अर्थ तो स्वतः धर्मानं जैन होता हे स्पष्ट आहे. याच शिलालेखात खारवेलानं आपण नंदराजाने हिरावून पळवलेल्या जिनमूर्ती त्याचा पराभव करून परत कलिंगात आणल्याच्या घटनेचा अभिमानपूर्वक उल्लेख केला आहे.

पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, खारवेलाचा अभिषेक राजसूय विधीनंच झाला होता. याचा अर्थ असा होतो, की राजा धर्मानं अवैदिक श्रमण परंपरेतला असला, तरी काही आवश्‍यक विधी वैदिक पद्धतीनं करण्यात त्याला काही वावगं वाटत नसे.
सातवाहन राजे तर सरळ सरळ वैदिक धर्माचे अभिमानी दिसतात. मात्र, वैदिक यज्ञायाग करणारे व पौराणिक देवतांना नमन करणारी ही सातवाहन मंडळी शिलालेख कोरताना मात्र संस्कृतऐवजी प्राकृतभाषेचा उपयोग करतात. (शिवाय महाराष्ट्री भाषेतल्या साहित्यनिर्मितीला उत्तेजन देतात हा भाग वेगळा). यावरून असंही म्हणता येतं, की या काळात यज्ञ किंवा इतरही विधींमधलं प्रत्यक्ष मंत्रोच्चारण वगळलं, तर बहुतेक सर्व व्यवहार प्राकृतातून होत असणार.

आणि जिथं वैदिकधर्मीय सातवाहनांचे यज्ञाविषयीचे लेख प्राकृतात कोरले जातात, तिथं कार्ले, भाजे अशा ठिकाणांच्या बौद्धधर्मीय लेखनाची भाषा प्राकृतच असणार, हे वेगळं सांगायची गरज नाही.

सातवाहन काळातल्या चैत्यविहारादी बौद्ध अवशेषांवररून त्या काळात वैदिक धर्माप्रमाणेच बौद्ध धर्माचीही चलती होती, हे सहज समजून यावं. आता प्रश्‍न असा उपस्थित होतो, की वैदिकधर्मीय सत्ताधाऱ्यांचा बौद्ध धर्माशी कोणत्या प्रकारचा संबंध होता?
इथं हिंदुस्थानातल्या धार्मिक संबंधांबद्दल केतकरांनी नोंदवलेलं निरीक्षण कामाला येतं. राजाचा स्वतःचा धर्म कोणताही असला, तरी त्यानं सगळ्या धर्मांच्या प्रजेशी सारखी वागणूक ठेवावी, ही भारतातील परंपरा असल्याचे केतकर सांगतात. (सम्राट अशोक हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण होय). सातवाहन राजे त्याला अपवाद असायचं कारण नाही.
या संदर्भात गौतमी बलश्रीचा पुत्र यज्ञश्री या सातवाहन राजाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागतो. प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन आणि यज्ञश्री हे समकालीन होते.
आचार्य नागार्जुन यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे, महायान पंथाची तात्त्विक मांडणी. याच नागार्जुनांच्या शून्यवादी तत्त्वज्ञानाचा शंकराचार्यांच्या मायावादावर प्रभाव होता, असं मानलं जातं. आचार्य नागार्जुन आणि यज्ञश्री सातवाहन यांचे निकटचे संबंध होते. राजाला आचार्यांबद्दल नितांत आदर असून, आचार्यांनाही राजाबद्दल आस्था होती. यज्ञश्रीनं बौद्ध धर्म स्वीकारला असल्याची माहिती तिबेटी बौद्ध ग्रंथांवरून मिळते.
तिबेटी ग्रंथांमधली ही माहिती खरी की खोटी, हा प्रश्‍न बाजूला ठेवू. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की नागार्जुनांनी आपला स्नेही यज्ञश्री याला बौद्ध धर्माची शिकवण समजावून सांगण्यासाठी एक छोटेखानी ग्रंथच रचला. त्याचं नाव ‘सुहृल्लेख.’
भारतीय बौद्ध शिक्षणपद्धतीचा ‘सुहृल्लेख’ हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. बौद्ध साधक त्याचं सतत चिंतन-मनन करत असल्याचं सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी इत्सिंग सांगतो. तिबेटी परंपरेत हा ग्रंथ अजूनही महत्त्वाचा मानला जातो.

१२५ संस्कृत श्‍लोकांचा हा ग्रंथ आज मूळ स्वरूपात उपलब्ध नसला, तरी त्याचा तिबेटी अनुवाद उपलब्ध आहे. ‘सुहृल्लेखा’त बुद्धांच्या प्रतीत्यसमुत्पाद या कार्यकारण तत्त्वज्ञानाबरोबर रोजच्या जीवनात नीतीनं कसं वागावं, याचंही मार्गदर्शन केलेलं आहे. प्रज्ञा आणि शील या तत्त्वांवर या ग्रंथाचा भर असून, आई-वडिलांना कसा मान द्यावा इथपासून ते पत्नी कशी असावी, यांसारख्या दैनंदिन जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राच्या भाषिक व राजकीय इतिहासाच्या दृष्टीनं पाहिलं तर या ग्रंथाचं महत्त्वही वेगळ्याच बाजूनं उलगडतं. एकीकडं पालीसारख्या प्राकृत भाषेतून लिहिणारे बौद्ध तत्त्वज्ञ संस्कृतमध्येही लिहू लागले, तर दुसरीकडं प्राकृतला महत्त्व देणाऱ्या सातवाहन राजांसाठीचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला गेला!
महाराष्ट्रातली ही परिवर्तनं प्रायः दुर्लक्षितच राहिली, असं म्हणणं भाग पडतं! पण ते काहीही असो, महाराष्ट्र ही धार्मिक मंथनाची भूमी आहे, हे कुणाला नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com