एकाच घनाच्या दोन आम्ही सरी... (डॉ. सतीश पत्की)

डॉ. सतीश पत्की
रविवार, 9 एप्रिल 2017

सध्याच्या ‘डिजिटल’ आणि ‘बायोमेट्रिक’ युगात हातांचे ठसे खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत; पण तंतोतंत साम्य असणाऱ्या ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या ठशांचं काय?...अशा जुळ्या भावंडांच्या हातांच्या ठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का, हे पडताळण्यासाठी कोल्हापूरमधलं पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाविषयी...

 

सध्याच्या ‘डिजिटल’ आणि ‘बायोमेट्रिक’ युगात हातांचे ठसे खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत; पण तंतोतंत साम्य असणाऱ्या ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या ठशांचं काय?...अशा जुळ्या भावंडांच्या हातांच्या ठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का, हे पडताळण्यासाठी कोल्हापूरमधलं पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाविषयी...

 

स्त्री  रोग आणि प्रसूतिशास्त्र क्षेत्रामध्ये गेली तीन दशकं कार्यरत असलेल्या कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्यांच्या हातांच्या ठशांबाबतचं तुलनात्मक संशोधन करण्यात आलं. यासाठी मी आणि शरीरशास्त्रातले माझे सहकारी तज्ज्ञ डॉ. अनिता गुणे आणि डॉ. आनंद पोटे यांनी गेली दोन वर्षं अथक परिश्रम घेतले. आता या संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल जर्नल ऑफ क्‍लिनिकल ॲनॉटॉमी’ या विख्यात नियतकालिकानंही घेतली आहे.  

‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेकडं सध्या देशाची वेगानं वाटचाल चालू असून ‘फिंगरप्रिंट्‌स’ प्रणालीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘बायोमेट्रिक’ प्रणाली, सध्याच्या कॅशलेश व्यवहारांसाठी वरदान असलेलं ‘भीम ॲप’ यांसाठीचा मूळ आधार हातांचे ठसे हाच असल्यामुळं कोल्हापूरमध्ये झालेल्या या मूलभूत संशोधनाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. या हुबेहूब जुळ्यांच्या हातांच्या ठशांमध्येही साम्य असल्यास मर्यादा येतात का; तसंच त्यामुळं धोके तर संभवणार नाहीत ना, याचा पडताळा करण्यासाठी हे संशोधन लाभदायक ठरण्याची शक्‍यता आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सरकारी योजनांना पूरक असेच आढळले आहेत.

अलीकडंच पत्की रुग्णालयानं कोल्हापुरात एक समारंभ आयोजित करून हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या-तिळ्या बालकांना आणि युवक-युवतींना आमंत्रित केलं होतं. या प्रसंगी एखाद्या चित्रपटातल्या दृश्‍यालाही मागं टाकणारी वस्तुस्थिती उपस्थितांनी अनुभवली. एकाच वेळी एकसारखी दिसणारी ३० जुळी व तिळी अशा विविध वयोगटांतील एकूण ६३ व्यक्ती एकत्रित पाहून उपस्थितही अचंबित झाले होते.
पत्की रुग्णालयात पहिल्या २५ वर्षांच्या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या आणि तिळ्या मुलांची नोंद ‘ट्विन रजिस्ट्री’ या उपक्रमाद्वारे २०१३मध्ये घेण्यात आली. २५ वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये पत्की रुग्णालयामध्ये एकूण सुमारे २५ हजार प्रसूती झाल्या असून, त्यामध्ये ४१८ जुळ्या आणि ६ तिळ्या बालकांचा म्हणजेच एकूण ८५४ मुलांचा समावेश आहे. २०१४पासून आजपर्यंत त्यामध्ये पुन्हा १५५ जुळी आणि २ तिळी अशा ३१६ मुलांची भर पडली आहे. याआधीही सन २०१३मध्ये पत्की रुग्णालयातर्फे जुळ्या आणि तिळ्यांच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातल्या जुळ्यांच्या आणि तिळ्यांच्या उच्चांकी उपस्थितीची नोंद २०१४च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये घेण्यात आली होती.

या स्नेहमेळाव्यादरम्यान उपस्थित सगळ्या जुळ्या आणि तिळ्या बालकांची सविस्तर वैद्यकीय माहिती आणि छायाचित्रं घेण्यात आली होती. या सर्व बाबींचं संकलन करत असताना २८ जुळ्यांच्या आणि एका संचातल्या तिळ्या मुलांच्या दिसण्यात तंतोतंत साम्य आढळून आलं. प्रत्येक जोडीमधल्या मुलांच्या रक्तगटाचा अभ्यास केला असता तो समान असल्याचं निदर्शनास आलं. या सर्व जोड्यांतल्या मुलांना पुढच्या संशोधनासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि मे २०१४पासून या संशोधनास प्रारंभ झाला.

 

‘आयडेंटिकल’ जुळी म्हणजे काय?
अमेरिकेमध्ये साधारणतः शंभर गर्भवती स्त्रियांमध्ये पंचवीस ते तीस स्त्रियांना जुळ्यांचा लाभ होतो, तर भारतामध्ये हेच प्रमाण आठ ते दहा असं आहे. तिळ्यांच्या जन्माचं प्रमाण तर खूपच दुर्मिळ म्हणजे साधारणतः सात हजार गर्भवती स्त्रियांमध्ये एक असं आहे. सध्या जगामध्ये साडेबारा कोटी जुळ्यांची (म्हणजेच सर्व लोकसंख्येच्या १.९ टक्के)
नोंद आहे. जुळ्यांमध्ये प्रामुख्यानं दोन प्रकार असतात. दोन वेगवेगळ्या स्त्री-बीजांपासून निर्माण झालेल्या जुळ्यांना ‘डायझायगॉटिक’ अथवा भिन्न दिसणारी जुळी असं म्हणतात. एकूण जुळ्यांपैकी ६५ टक्के जुळी या प्रकारचीच असतात. अशी जुळी मुलं बहुतांशी भाऊ-बहीण स्वरूपात असतात आणि त्यांच्यामध्ये विशेष साम्य दिसून येत नाही. याउलट क्वचित प्रसंगी एकाच गर्भाचं दोन गर्भामध्ये विभाजन होऊन जुळी निर्माण होतात. अशा जुळ्यांना शास्त्रीय भाषेमध्ये ‘आयडेंटिकल’ जुळी असं म्हणतात. एकाच गर्भापासून निर्माण झालेली असल्यामुळं दोघं भाऊ किंवा दोघी बहिणी अशा स्वरूपात ही जुळी पाहायला मिळतात. अशी जुळी दिसण्यामध्ये बहुतांश वेळा हुबेहूब असतात. त्यांचे रक्तगटसुद्धा नेहमी समान असतात. एकूण जुळ्यांपैकी तीस ते पस्तीस टक्के जुळी ही ‘आयडेंटिकल’ असतात.

‘आयडेंटिकल’ जुळ्यांचं गरोदरपण हे मातेच्या आणि बाळांच्या दृष्टीनं खूप जोखमीचं समजलं जातं. काही प्रसंगी दोन गर्भांपैकी एका गर्भाकडे बराचसा रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळं एका मुलाची वाढ खूप जास्त, तर दुसऱ्याची वाढ खूपच कमी दिसून येते. अगदी क्वचित प्रसंगी ही जुळी विभाजनावेळी अपुऱ्या प्रक्रियेमुळं चिकटून राहतात. त्यालाच ‘सयामी जुळी’ असं म्हणतात.

‘आयडेंटिकल’ जुळी जसजशी मोठी होतात, तसं त्यांच्या दिसण्यामध्ये खूपच साम्य दिसून येतं. त्यांची उंची, वजन, दिसणं आणि सवयी इतक्‍या हुबेहूब होतात, की त्यांना स्वतंत्रपणे ओळखणं कुटुंबाबाहेरच्या लोकांना सहजशक्‍य होत नाही. लहानपणी शाळेमध्ये, तर मोठेपणी सार्वजनिक आयुष्यामध्ये अशी जुळी एकत्र पाहणं हे चित्रपटातल्या दृश्‍याप्रमाणं वाटतं. ‘आयडेंटिकल’ जुळ्यांना अवयवदानामध्ये वेगळं महत्त्व आहे. त्यांची जनुकीय घडण एकच असल्यामुळे एकमेकांना अवयवदानाची वेळ आल्यास ही प्रकिया सुलभ आणि हमखास यशस्वी ठरते.

हाताच्या ठशांचा अभ्यास
हाताच्या ठशांचा उपयोग व्यक्तीची अचूक ओळख करण्यासाठी केला जातो. ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये तंतोतंत जनुकीय साम्य असल्यामुळं अशा जुळ्या भावंडांच्या हस्तठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का हे पडताळण्यासाठी पत्की रुग्णालयात संशोधन करण्यात आलं. ‘फिंगरप्रिंट्‌स’च्या आधारावरच ‘बायोमेट्रिक’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याचा उपयोग कार्यालयातील हजेरी, बॅंकेमधील व्यवहार; तसंच जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या सरकारी नोंदी आणि आधार कार्ड तयार करण्यासाठी केला जातो. न्यायवैद्यक शास्त्रामध्येदेखील गुन्हेगार शोधून काढण्यासाठी हस्तठशांचा उपयोग केला जातो. ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेनं सध्या देशाची घोडदौड चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर हातांचे ठसे एकसारखे असतील, तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं यावर लक्ष केंद्रित करून हे संशोधन करण्यात आलं आणि भविष्यातदेखील सुरू राहणार आहे.

या संशोधन प्रकल्पाअंतर्गत पत्की रुग्णालयामध्ये जन्म झालेल्या आणि विविध वयोगटांतल्या २८ ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या बोटांचे; तसंच दोन्ही हातांचे ठसे घेण्यात आले. या ठशांचा अभ्यास लेन्सद्वारे शरीरशास्त्रज्ञांतर्फे करण्यात आला. या संशोधनामध्ये मुख्यतः चार प्रकारच्या ठेवणींचा अभ्यास करण्यात आला. बोटांच्या पेरावर हस्तरेषा वर्तुळाकार निर्माण करतात, त्याला ‘चक्र’ म्हणतात, तळव्यांवर विशिष्ट  ठिकाणी त्या शंखाचा आकार निर्माण करतात. काही ठिकाणी हे दोन्ही प्रकार एकत्रित आढळून येतात. हाताच्या तळव्यावर या रेषांमध्ये विशिष्ट कोन निर्माण होतो. त्याचं मोजमापही वैशिष्ट्यपूर्ण असतं. गर्भावस्थेत असताना अवघ्या तीन ते पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये तळहात आणि बोटांवरच्या रेषा निर्माण होतात. एकदा निर्माण झालेल्या या रेषा नंतरच्या आयुष्यामध्ये कधीही बदलत नाहीत.
या संशोधनाचे निष्कर्ष ठशांमधल्या या सर्व बारकाव्यांवर आधारित आहेत.

‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये दिसण्यामध्ये साम्य असलं, त्यांचा रक्तगट आणि त्यांच्यामधल्या जनुकीय रचनादेखील तंतोतंत असल्या, तरी त्यांच्या हातांच्या ठशांमध्ये फरक असतो. गर्भाशयातल्या वास्तव्यादरम्यान गर्भजलाच्या सूक्ष्म वातावरणातल्या तफावतींमुळे अशा जुळ्यांमधल्या प्रत्येक व्यक्तीचे ठसे हे वेगळे आणि स्वतंत्र निर्माण होतात. त्यामुळं ‘बायोमेट्री’मध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये फसगत होऊ शकत नाही. अर्थात हे असलं, तरी केवळ एका बोटावरचे ठसे विचारात घेतले, तर ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये अचूक फरक करणं थोडंसं कठीण आहे, असं आढळून आलं. परंतु, सर्व बोटं आणि हाताच्या तळव्यांचे ठसे एकत्रित घेतले, तर ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये निश्‍चितपणे अचूकपणे फरक करता येतो. गर्भावस्थेतल्या विषम रक्तपुरवठ्यामुळं काही जुळ्यांच्या जन्मावेळाच्या वजनांमध्ये तफावत आढळली. अशा वेळी कमी वजनाच्या जुळ्याच्या हातावरच्या रेषांची संख्या ही जास्त वजनाच्या दुसऱ्या जुळ्यापेक्षा जास्त असते, असाही निष्कर्ष या संशोधनामध्ये निघाला.
या संशोधनाचे निष्कर्ष हे ‘बायोमेट्री’; तसंच सरकारी धोरणं आणि कॅशलेस युगातलं ‘भीम ॲप’ या सर्वांशी पूरक आहेत. ‘जुळ्यांचं दुखणं’ असा एक शब्दप्रयोग वापरण्यात येतो. पण त्यांच्यासाठी हातांच्या ठशांचं ‘दुखणं’ होऊ नये, यासाठी या संशोधनाचा उपयोग निश्‍चितपणे होईल.

Web Title: dr satish patki write article in saptarang