साद देती पर्वत शिखरे (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar's saptarang article
dr shrikant karlekar's saptarang article

गेल्या काही वर्षांपासून जगातल्या सर्वच पर्यावरणप्रेमींना, शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना पर्वतांचं सर्वव्यापी, सर्वंकष महत्त्व लक्षात येऊ लागलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर वर्षी आजच्याच दिवशी (ता. ११ डिसेंबर) ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो. जगातल्या या अतिशय देखण्या आणि माणसाला अनेक क्षेत्रांत वरदान ठरलेल्या नैसर्गिक संपदेकडं आपण आजपर्यंत आपुलकीनं कधी पाहिलेलंच नाही. ‘पर्वत दिना’च्या निमित्तानं पर्वतांचं स्वरूप, त्यांचं महत्त्व, त्यांची स्थिती यांवर दृष्टिक्षेप.

गेल्या काही वर्षांपासून जगातल्या सर्वच पर्यावरणप्रेमींना, शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना पर्वतांचं सर्वव्यापी, सर्वंकष महत्त्व लक्षात येऊ लागलं आहे. त्याचाच एक परिपाक म्हणजे वर्ष २००३पासून दर वर्षी ११ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा ‘पर्वत दिन.’ वास्तविक पाहता, जगातल्या या अतिशय देखण्या आणि माणसाला अनेक क्षेत्रांत वरदान ठरलेल्या नैसर्गिक संपदेकडं आपण आजपर्यंत आपुलकीनं कधी पाहिलेलंच नाही. त्याचं भूरूपिक, भूवैज्ञानिक, भूराजनैतिक आणि जैविक महत्त्व कळूनही पर्वतांकडं तसं पाहिलं तर आपण दुर्लक्षच केलंय. पर्वतांच्या संधारण, संरक्षण आणि विकासासाठी मनापासून प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळं या देवदुर्लभ नैसर्गिक भूरूपाविषयी प्रेम आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे हे निर्विवाद. जगातल्या सर्वच पर्वतप्रदेशांत आढळणारी विविधता ही केवळ अनाकलनीय आणि अचंबित करणारीच आहे.

पृथ्वीवरचा २७ टक्के प्रदेश पर्वतांनी व्यापलेला आहे आणि त्यात आज जागतिक लोकसंख्येच्या १३ टक्के लोकसंख्या वास्तव्य करून राहत आहे. पृथ्वीवरील एकूण जैवआवरण आरक्षित (बायोस्फिअर रिझर्व्ह) प्रदेशांपैकी ५६ टक्के संरक्षित प्रदेश पर्वत प्रदेशांतच आहेत. जागतिक पातळीवर आज पंधरा ते वीस टक्के पर्यटक पर्वतांकडं आकर्षित होत असतात. जगातल्या साठ ते सत्तर टक्के शुद्ध पाण्याचा पुरवठा पर्वतांतून होतोय आणि जगातली न्यूयॉर्क, रिओ दी जानिरो, नैरोबी, टोकियो, मेलबर्न अशी काही मुख्य शहरं पर्वतांतील पाण्यावरच प्रामुख्यानं अवलंबून आहेत. भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या देशांना सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी पर्वतीय प्रदेश खूपच लाभदायक ठरत आहेत.  
प्रत्येक पर्वत प्रदेशाची स्वतःची अशी एक स्वतंत्र संस्कृती असते. तिथल्या स्थानिकांना त्यांच्या डोंगराळ, खडकाळ आणि दुर्गम प्रदेशाचं नेमकं ज्ञान असतं. त्यांचं सगळं जीवनच त्या कठीण आणि खडतर प्रदेशाशी जोडलेलं असतं. त्यामुळंच ‘पर्वत : उपजीविकेचं उत्तम साधन’ असं या वर्षीच्या पर्वत दिनाचं घोषवाक्‍य ठरवण्यात आलं आहे.    

पर्वतांची आज माणसाला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठीच मोठी गरज आहे. एका अर्थी हे पर्वत माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनले आहेत. पर्वत प्रदेशांतली डोंगर-उतारावर केली जाणारी शेती, जलविद्युतनिर्मिती, विखुरलेल्या वस्त्या जोडणारे-दुर्गम भागांतून जाणारे रस्ते, उपलब्ध खनिजं, औषधी वनस्पती अशा अनेकविध बाबतींत पर्बत आज माणसाचे आधारस्तंभ बनले आहेत. असं असलं, तरीही पर्वतांकडं झालेलं दुर्लक्ष आणि माणसानं निष्काळजीपणानं केवळ स्वार्थापोटी चालू केलेला पर्वतांतील समृद्ध पर्यावरणाचा अनिर्बंध वापर यामुळं जगातल्या पर्वतांचा झपाट्यानं-हास होऊ लागला आहे. आता मात्र जेव्हा या -हासाचे परिणाम पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या समृद्ध आणि विकसित प्रदेशांवर आणि मानवी वस्त्यांवर दिसू लागले, तेव्हाच पर्वतांचं महत्त्व लक्षात यायला खऱ्या अर्थानं सुरवात झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पर्वतांचं संधारण, संरक्षण आणि टिकाऊ विकास केल्याशिवाय डोंगराळ आणि पर्वतमय भागांतल्या मानवी वस्त्यांचं अस्तित्व आणि पर्यायानं मैदानी प्रदेशाची समृद्धता टिकवणं अशक्‍य आहे, हे सत्य कळायलाच आपल्याला इतकी वर्षं लागली.

पर्वतीय पर्यावरणाचा आजवर झालेला संहार लक्षात घेता, पर्वतांचा टिकाऊ विकास (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) करणं ही अर्थातच इतकी सहजसोपी गोष्ट नाही, हेही आता लक्षात येऊ लागलं आहे. जगातल्या सगळ्याच पर्वतराजीचं संवेदनक्षम, नाजूक आणि विविधतेनं ओतप्रोत भरलेलं पर्यावरण पाहता तर पर्वतांचं रक्षण आणि जतन करण्याचं काम हे एक मोठं आव्हानच बनलं आहे, यात तिळमात्र शंका नाही.

एखाद्या प्रदेशाचा विकास आणि नियोजन याचा सगळा आधारच मुळी पावलोपावली बदलणारी भूरचना आणि भूमिस्वरूप यावर अवलंबून असल्यामुळं सपाट, मैदानी प्रदेशांच्या विकासाचे कोणतेही मापदंड पर्वत प्रदेशात उपयोगाचे ठरत नाहीत. अतिशय मर्यादित अशा सपाट जागा, तीव्र डोंगरउतार, घळ्या, जंगलं किंवा बर्फाच्छादन आणि दरडी कोसळणं, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा साकल्यानं विचार करूनच इथं विकास योजना राबवणं गरजेचं असतं.
जगात असलेले सगळे पर्वत आज जसे आहेत, तसेच अनादी-अनंत काळापासून आहेत, असं लोकांना वाटतं. वास्तविक प्रत्येक पर्वत हा जन्म आणि मृत्यू या चक्रातून जात असतो. पर्वताचा जन्म हा भूकवचाच्या उंचावण्यानं (अपलिफ्टिंग) किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या घटनांतून होतो. आपल्या लाखो आणि कोट्यवधी वर्षांच्या जीवनकाळात पर्वतांची नैसर्गिकपणे आणि माणसाच्या अनियंत्रित आणि बेजबाबदार हस्तक्षेपांमुळं अपरंपार झीज होते. अखेरीस या पर्वतरांगा झिजूनझिजून लहान होतात, नष्ट होतात. काही वेळा भूकवच खचल्यामुळंही पवर्तांची उंची कमी होते.

आकारमानानुसार पर्वतांचे पर्वतरांगा, पर्वतराजी, पर्वतीय साखळ्या, पर्वत प्रणाली असे प्रकार केले जातात. सगळ्यात कमी उंचीचे पर्वत सातशे ते एक हजार मीटर उंचीचे, तर अत्युच्च पर्वत दोन हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीचे असतात. सह्याद्रीसारखे पर्वत किनारासमीप, तर हिमालय आणि सातपुडा यांच्यासारखे पर्वत अंतर्गत पर्वत असतात. हवाई बेटाजवळ ‘मोना की’सारखे एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंचीचे पर्वत समुद्रतळावर असतात. भूप्रक्षोभक हालचालींमुळे वली पर्वत, ठोकळ्यांचे पर्वत, घुमटाकृती पर्वत आणि ज्वालामुखीय पर्वत बनतात. पृथ्वीवर आज आढळणारे पर्वत विभिन्न कालावधींत आणि भूशास्त्रीय काळात तयार झाले. युरोपमध्ये प्रीकेम्ब्रिअन काळातले पर्वत ५७ कोटी वर्षांपेक्षाही जुने आहेत. भारतातल्या अरवली, महादेव आणि सातपुडा या पर्वतरांगा, कॅलेडोनियन कालखंडातल्या म्हणजे पन्नास ते चाळीस कोटी वर्षं जुन्या आहेत. टिएनशान, नानशान पर्वत हर्सिंनियन काळातले (३८ ते २८ कोटी वर्षांपूर्वीचे), तर रॉकीज, अँडीज हे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या अल्पाइन काळातले पर्वत आहेत.

जगातला सर्वोच्च आणि जास्तीत जास्त पूर्व-पश्‍चिम लांबी असलेला (अडीच हजार किलोमीटर ) आणि पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला हिमालय हा अर्वाचीन पर्वत आहे. पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी टीथिस नावाच्या प्राचीन समुद्रतळातून हिमालयाची निर्मिती झाली, असं मानलं जातं. अरबली हा आठशे किलोमीटर लांबीचा पर्वत शंभर कोटी वर्षांपूर्वीचा आणि सह्याद्री हा सोळाशे किलोमीटर लांबीचा आणि बाराशे मीटर सरासरी उंचीचा पर्वत सात ते आठ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला.   

पर्वतीय प्रदेशांबद्दलचं अपूर्ण आणि काही वेळा चुकीचं ज्ञान आणि त्यांच्या क्षमतेबद्दलचे चुकीचे आडाखे यामुळंही पर्वत विकास योजनांत अडथळे निर्माण होत असतात. जगातल्या सगळ्याच पर्वतांबद्दलचं आपलं ज्ञान तसं नवीनच आहे आणि गेल्या काही वर्षांत ते अधिक योग्य आणि नेमकं बनत आहे. त्यांची निर्मिती आणि उत्क्रांती यासंबंधीचे ठोस पुरावे आज आपल्याला मिळाले आहेत. यातूनच जगातल्या विविध प्रदेशांत आढळून येणाऱ्या निरनिराळ्या पर्वतांतील विविधता समजणं सुलभ झालं आहे. जगभरात हवामानात जे वैविध्य आढळतं, त्याचं मुख्य कारण पर्वतच आहेत, असंही आता स्पष्ट होतंय. पर्वतांचा परिणाम त्यांच्यापासून खूप दूर असलेल्या प्रदेशांच्या हवामानावरही होत असतो. हिमालय आणि सह्याद्री पर्वतांचा आपल्या मॉन्सूनच्या निर्मितीत होणारा परिणाम तर आपल्याला परिचित आहेच.

कोणत्याही पर्वताच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत हवामानात जे सूक्ष्म बदल होतात, त्यामुळे पर्वत प्रदेशांत भरपूर जैवविविधता निर्माण होते. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर पर्वत नसते, तर आज आढळणाऱ्या विविध शारीरिक बांध्याच्या, वर्णाच्या, उंचीच्या आणि काटक व कणखर मनुष्य जमाती दिसल्याच नसत्या. पर्वतांचं माणसाला वाटणारं आकर्षण हाही एक सार्वत्रिक आवडीचा विषय आहे. माणसाच्या धाडसाला सदैव आव्हान देणाऱ्या या भूरूपानं अनेकांना पर्वतारोहण, प्रस्तरारोहण, मुक्त भ्रमण, शोधन आणि संशोधन करण्यास उद्युक्त केलं आहे.

आज जगातल्या इतर पर्वतांप्रमाणंच भारतातल्या हिमालय आणि सह्याद्री या पर्वतीय प्रदेशांत काही विशिष्ट पर्यावरणीय समस्या वेगानं वाढत आहेत. पर्यटकांमुळं होणारं प्रदूषण आणि बांधकाम व्यवसायामुळं होणारा डोंगर उतारांचा ऱ्हास यामुळं पर्वताचं नष्टचर्य अनेक ठिकाणी याआधीच सुरू झालं आहे. पर्वतांतल्या लोकांच्या राहणीमानात येणारा निकृष्ट दर्जा, जंगलतोड, जमिनीची धूप, उपलब्ध; पण तुटपुंज्या पाण्याचं प्रदूषण, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात वेगानं चालू असलेली नागरी वस्त्यांची वाढ, अशा समस्यांनी भारतातल्या पर्वतांत ठाणच मांडलं आहे!

पर्वतांना त्यांचं पूर्वीचं वैभव आणि सौंदर्य मिळवून देण्यासाठी संवर्धनाच्या इतर उपायांबरोबर आज खरी गरज आहे ती पर्वतरक्षणाचं महत्त्व समजून घेण्याच्या मानसिकतेची. अशी मानसिकता तयार करण्यात यश येणं हेच आजच्या जागतिक पर्वत दिवसाचं फलित असेल, हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com