मकर-संक्रमणाची प्राचीन पाषाणशिल्पं (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

मकर-संक्रमणाची प्राचीन पाषाणशिल्पं (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

सूर्याच्या उत्तरायणाचा किंवा मकरसंक्रमणाचा दिवस हा उत्तर गोलार्धातल्या देशांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा दिवस. सूर्याच्या संक्रमणाचं किंवा उत्तरायणाचं नेमकं ज्ञान माणसाला केव्हा आणि कसं झालं, हे कुणालाही निश्‍चितपणे माहीत नाही; पण प्राचीन मानवाला अशा तऱ्हेच्या खगोलीय घटनेचं ज्ञान होतं. त्यानं ते जगभरात सगळीकडं वेगवेगळ्या पाषाणशिल्प रचना आणि मंदिरातून अतिशय प्रभावीपणे दाखवून ठेवलं आहे.

सूर्याचं उत्तर आणि दक्षिण दिशेनं होणारं संक्रमण (solstice)  ही पृथ्वीवरच्या ऋतुचक्राच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी घटना आहे. पृथ्वीवर हे संक्रमण वर्षातून दोन वेळा होतं. या संक्रमणांना अनुक्रमे उत्तरायण आणि दक्षिणायन किंवा मकर आणि कर्कसंक्रमण असंही म्हटलं जातं. ही संक्रमणं अनुक्रमे डिसेंबर आणि जून महिन्यात होतात. सूर्याच्या या बदलत्या मार्गक्रमणाचं पूर्वीपासूनच माणसाला कुतूहल वाटत आलं आहे. या दोन दिवसांनंतर वातावरणात आणि हवामानात जे बदल होऊ लागतात, ते इतके विलक्षण असतात, की त्यामुळं अनेक संस्कृतींत या दिवसांचं स्वागत अगदी समारंभपूर्वक केलं जातं.  

उत्तरायणाचा किंवा मकरसंक्रमणाचा दिवस हा उत्तर गोलार्धातल्या देशांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा दिवस. सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस फार पूर्वीपासून ‘नवीन सूर्याचा दिवस’ मानला जातो. सूर्याच्या संक्रमणाचं किंवा उत्तरायणाचं नेमकं ज्ञान माणसाला केव्हा आणि कसं झालं, हे कुणालाही निश्‍चितपणे माहीत नाही. पण प्राचीन मानवाला अशा तऱ्हेच्या खगोलीय घटनेचं ज्ञान होतं, हे मात्र निश्‍चित! त्यानं ते जगभरात सगळीकडं वेगवेगळ्या पाषाणशिल्प रचना आणि मंदिरातून अतिशय प्रभावीपणे दाखवून ठेवलं आहे.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश ही खगोलीय घटना ३१ डिसेंबरला होते; पण भारतातले अनेक सण आणि धार्मिक कृत्यं चांद्रस्थितीवर होत असल्यामुळं जानेवारी महिन्याच्या तिथीनुसार हे संक्रमण साजरं करण्यात येतं. भारतात पूर्वापार मकरसंक्रमण हा दिवस सूर्य जेव्हा मकर राशीतून संक्रमण करतो, तेव्हा म्हणजे पौष महिन्यात पाळला जातो. या दिवशी हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरवात होते. या वर्षी मकरसंक्रमण १४ जानेवारीला साजरं झालं. मकरसंक्रमणाच्या दिवशी (winter  solstice) मकरवृत्तावर माध्यान्हीचा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो. सावपावलो (ब्राझील), दक्षिण मादागास्कर आणि ब्रिस्बेनच्या थोडंसं उत्तरेला हा अनुभव नेहमीच येतो.

सूर्य त्याच्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना साडेतेवीस अंश उत्तर अक्षवृत्ताच्या वर आणि साडेतेवीस अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या खाली कधीही जात नाही. आपल्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना २१ डिसेंबरच्या दिवशी सूर्य मकरवृत्तावर येतो आणि काही काळ तिथंच थांबल्यासारखा दिसतो. या दिवशी मकरवृत्तावर त्याचे किरण लंबरूप पडतात. यानंतर तो हळूहळू उत्तरेकडं सरकू लागतो. सूर्याच्या या बदलत्या आणि आनंददायी मार्गक्रमणाचं पूर्वीपासूनच माणसाला विलक्षण कुतूहल वाटत आलं आहे. पृथ्वीवरचं ऋतुचक्र आणि सूर्याचं राशीसंक्रमण या गुंतागुंतीच्या; पण अतिशय नियमित घटनांमागं पृथ्वीचा कललेला आस हेच एकमेव महत्त्वाचं कारण आहे आणि तेच या निसर्गचक्रामागचं एक आश्‍चर्यकारक सत्यही आहे!

चिनी लोकांनी वर्षभरातल्या सूर्यस्थितीचा अभ्यास करून ‘यांग- यिन’ चक्र मांडलं. त्यानुसार मकरसंक्रमणाच्या वेळी चीनच्या प्रदेशात रोवलेल्या काठीची सावली खूप मोठी दिसते. या चक्रात सहा समकेंद्रीय वर्तुळं दाखवलेली असतात. त्याचे एकूण २४ भाग दाखवून त्यावर सूर्यप्रकाशाचं प्रमाण दाखवलेलं असतं. प्रत्येक भाग पंधरा दिवसांच्या काळातील सूर्यप्रकाशाचं प्रमाण किती असेल ते दाखवतो.  

उत्तर गोलार्धात ख्रिसमसचा कालखंड हाही या संक्रमणाशी जोडण्याचा प्रयत्न सोळाशे वर्षांपूर्वी झाल्याचे उल्लेख आढळतात. नवाष्म (Neolithic) आणि कांस्य (Bronze) युगातही हा दिवस फार महत्त्वाचा मानला जात असे. याचे काही पुरावे ब्रिटनमधलं स्टोनहिंज आणि आयर्लंडमधलं न्यूग्रांज इथं आढळतात. ‘स्टोनहिंज’ हे कर्क आणि मकरसंक्रमणाचं निर्देशन करणारं प्राचीन मानवानं बनवलेलं पाषाणशिल्प आहे, असं आज बऱ्याच संशोधकांना वाटतं. या पाषाणशिल्पांचा प्रमुख आस मकरसंक्रमण दिवसाचा सूर्योदय (न्यूग्रांज) आणि मकरसंक्रमण दिवसाचा सूर्यास्त (स्टोनहिंज) यांच्याशी संलग्न असल्याचं दिसून येतं. इथल्या त्रिशिला (Trilithon ) संरचना केंद्र भागाकडून बाहेर या पद्धतीनं बांधण्यात आल्या असून, त्यांचा सपाट पृष्ठभाग हिवाळ्यातल्या मध्यवर्ती सूर्यस्थानाकडं वळलेला दिसतो.

इजिप्तच्या न्युबिअन डेझर्ट भागातल्या नाबटा किंवा ब्रिटनमधल्या स्टोनहिंज इथं सापडणाऱ्या प्राचीन अश्‍मरचना पहिल्या, की पूर्वीच्या माणसाला अशा संक्रमणांची निश्‍चित माहिती असावी याची खात्री पटते. नाबटा इथल्या रचना स्टोनहिंजमधल्या रचनेपेक्षाही जुन्या असून त्या पासष्टशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असा अंदाज आहे. यांतल्या दगडांच्या रचनेतून उत्तर दक्षिण दिशा आणि संक्रमणाच्या वेळी होणारा सूर्योदय व सूर्यास्त यांच्या जागा नेमकेपणानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

जगातली काही प्राचीन मंदिरं ही मकर आणि कर्क या दोन मुख्य ऊर्जारेषांवर असल्याचं दिसून येतं. सुमेरिया या प्राचीन संस्कृतीपाशी या दोन रेषा एकमेकांना छेदतात. गेली बारा हजार वर्षं या रेषा अस्तित्वात आहेत. या रेषा जगभरातली बारा मंदिरं एकमेकांशी जोडतात. गिझाचे पिरॅमिड, नाझका, माचुपिचू, स्टोनहिंज, बोस्निया पिरॅमिड, भारतातल्या द्वारकेचं कृष्ण मंदिर, खंबायतचं आखात, हंपी इथल्या विजयनगर साम्राज्यातील मंदिरं आणि इंडोनेशियातला लालाकोन पर्वत ही पाषाणशिल्पं याच रेषांवर आहेत. इजिप्तमध्ये जे दोन मुख्य पिरॅमिड आहेत, त्या दोघांच्या मध्ये संक्रमणाच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं नेमकं दर्शन इथल्या स्फिंक्‍ससमोर उभं राहिल्यावर होतं. इजिप्तमध्येच असलेलं ऑसिरिओन मंदिर असं बांधलेलं आहे, की कर्कसंक्रमणाच्या दिवशी अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा प्रकाश लिब्यन टेकड्यांतल्या फटींमधून बाहेर पडून या मंदिराला छेदून जाईल. इथल्या इसेन मॉनेस्ट्रीतल्या गर्भगृहाची रचना अशी केलेली आहे, की संक्रमणाच्या वेळी त्याच्या पूर्व भिंतीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण पडतील. याच मठाजवळ चुनखडीत तयार केलेलं एक सूर्यतबक (Sundial) आहे. त्यावरून दोन्ही संक्रमण दिवस सहजपणानं ओळखू येतात.
ब्रिटनमधल्या स्टोनहिंजच्या ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर दुरिंग्टन वॉल्स ही पाषाणरचना असून, त्यात सूर्याची संक्रमण दाखविणारी सहा समकेंद्रीय पाषाणवर्तुळं आहेत. जवळच असलेल्या ब्लुहिंज इथल्या शीलाचक्र, स्कॉटलंडमधल्या लॉकनेलजवळच्या आणि आयर्लंडच्या सेस्किन पर्वतातल्या सर्पाकृती या रचनांच्या निर्मितीमागंही उत्तरायण आणि दक्षिणायन सूचित करण्याचाच प्रयत्न दिसतो.

महाराष्ट्रातल्या अजिंठा लेण्यातल्या सव्विसाव्या लेण्याची रचना कर्कसंक्रमणाच्या वेळेचा सूर्योदय आणि एकोणिसाव्या लेण्याची रचना मकरसंक्रमणाच्या वेळेचा सूर्योदय दिसावा आणि त्यावेळच्या सूर्यकिरणांनी लेण्यात प्रवेश करावा अशीच केलेली आहे. कर्नाटकात हंपी इथं असलेली विजयनगर साम्राज्यातली अनेक मंदिरे आणि त्यांचे अवशेष हेसुद्धा सूर्य संक्रमणे सूचित करीत असावीत असं तज्ज्ञांचं मत आहे. जगातल्या अशी अनेक प्राचीन पाषाणशिल्पांची ठिकाणं (Megalithic sites) ही उत्तरायण आणि दक्षिणायन या संक्रमण दिवसांचं अचूक ज्ञान व्हावं अशा पद्धतीनंच बांधण्यात आली असावीत. आज ज्ञात असलेल्या अशा रचनांव्यतिरिक्त अशा प्रकारची अजून अनेक अज्ञात ठिकाण असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com