तपत्या झळा उन्हाच्या (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

तपत्या झळा उन्हाच्या (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

उन्हाळ्यात तापमान वाढणार हे अपेक्षितच असलं, तरी यंदा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात तीव्रतेनं वाढ व्हायला सुरवात झाली आहे आणि दिवसेंदिवस काहिली वाढतच चालली आहे. हवामानात अचानक होणाऱ्या अशा बदलांमागं काही तात्कालिक कारणं असली, तरी एकूणच मानवाकडून निसर्गाच्या चक्रात सुरू असलेल्या हस्तक्षेपाशी त्याचा संबंध आहे, यावर बहुतेक तज्ज्ञांचं एकमत आहे. उष्णतेची लाट तयार होण्याच्या स्थितीला आणखी कोणते घटक कारणीभूत आहेत, त्यांचे थेट आणि दीर्घकालीनदृष्ट्या परिणाम काय, जागतिक तापमानवाढीशी त्याचा काय संबंध आहे आदी बाबींचा वेध.

या   वर्षी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच हवेचं तापमान वेगानं वाढण्याची लक्षणं दिसू लागली होती. २५ मार्चनंतर देशाच्या भागात उष्णतेची लाट पसरू लागल्याची चिन्हं दिसू लागली आणि या लाटेची तीव्रता वाढून तिचं रूपांतर झपाट्यानं अतितीव्र उष्णता लहरीत (Severe Heat  Wave) झालं. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या व्याख्येनुसार मैदानी प्रदेशात जेव्हा हवेचं उच्चतम तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा ( १०४ अंश फॅरनहाइट) जास्त आणि डोंगराळ प्रदेशात ३० अंश सेल्शिअसपेक्षा (८६ अंश फॅरनहाइट) जास्त असतं, तेव्हा उष्णतेच्या लाटेचा प्रादुर्भाव असतो, असं समजलं जातं.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात सर्वत्र थोडी घट झाली; मात्र ९ एप्रिलनंतर पुन्हा तापमान वाढू लागलं. उष्णतेची लहर पुन्हा एकदा येण्याची शक्‍यता ‘स्कायमेट’नं मागच्या आठवड्यात वर्तविली होतीच; पण आता होत असलेली तापमानवाढ ही उष्णतेची लहर नव्हे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे.

‘स्कायमेट’च्या म्हणण्याप्रमाणं वाऱ्याच्या दिशेत एकाएकी झालेले बदल, हे या तापमानवाढीमागचं मुख्य कारण आहे. उत्तर अरबी समुद्रात, उच्च वातावरणात, प्रत्यावर्ती (Anticyclonic) प्रवाहचक्र निर्माण झाल्यामुळं उत्तरेकडून आणि ईशान्येकडून येणारे कोरडे आणि उष्ण वारे वाळवंटी प्रदेशाकडं आणि तिथून मध्य भारतात आल्यामुळं वाढ जाणवत आहे. काही हवामानतज्ज्ञांनी या उष्णतावाढीला सूक्ष्म उष्णता लहर (Mini heat wave ) असं म्हटलंय आणि हिचा प्रभाव अजून काही दिवस नक्कीच राहील, असा अंदाज केलाय.

भारतात अगदी अलीकडं २०१२, २०१३ आणि २०१५मध्ये उच्च उष्णतेच्या लाटा अनुभवास आल्या होत्या. १९६१ ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात अनेक वेळा उष्णतेच्या लहरींचा प्रकोप भारतानं अनुभवलाय. या लहरींचं उगमस्थान अगदी उत्तर अटलांटिक आणि प्रशांत महासागरापर्यंत असल्याचंही दिसून येतं. एका महासागरामुळं उत्तर मध्य भारत, तर दुसऱ्यामुळं पूर्व भारताचा किनारी प्रदेश या लाटेच्या प्रभावाखाली येतो. या वर्षी इंदूर इथं ४० अंश सेल्सिअस, तर जयपूर इथं ४१ अंश सेल्सिअस इतकी म्हणजे गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. हौशंगाबाद आणि खरगपूर इथं तर हे तापमान ४२.५ अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी नोंदविलं गेलं. राजस्थानातल्या बारमेर इथं ४४ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली. महाराष्ट्रात बीड, अकोला, नांदेड, औरंगाबाद, धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली, नागपूर आणि सोलापूर अशा विस्तीर्ण प्रदेशांत तापमान सतत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्तच होतं. येत्या काही दिवसांत तापमानात घट होईल; पण ही घट एक ते दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणार नाही, असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे.  

भिराचं ‘तापमान’रहस्य
महाराष्ट्रातल्या भिरा या ठिकाणी २८ मार्च या दिवशीच्या २४ तासांत ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं वृत्त आलं. या ठिकाणचं हे तापमान दरवर्षी याच वेळी इथं आढळणाऱ्या सामान्य तापमानापेक्षा जवळजवळ सात अंशांनी जास्त असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळंच भारतीय हवामान खात्याला या नोंदीविषयी शंका वाटली. ही नोंद योग्य नसल्याचं त्यांनी ३० मार्चला जाहीर केलं. हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्या एका खासगी संस्थेनं ही नोंद केली असल्याचं खात्यानं लक्षात आणून दिलं. भिराच्या आजूबाजूच्या परिसरात कुठंही तापमानाची इतकी जास्त नोंद त्या दिवशी झालेली नव्हती.

भिरा हे सह्याद्री पर्वतात समुद्रसपाटीपासून सरासरी १३० मीटर उंचीवर वसलेलं गाव आहे. आजूबाजूला दाट झाडीनं वेढलेलं आणि तलावाकाठी हे गाव असल्यामुळं इतक्‍या उच्च तापमान नोंदीची शंका यावी, हेही सयुक्तिकच होतं. त्यानंतरच्या दिवसात पश्‍चिमेकडून जसजसे बाष्पयुक्त वारे या भागात पोचले, तसं इथलं तापमानही घटलं; मात्र भिरा इथं ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा ४५.५ इतकी आणि चंद्रपूर इथं ४२.६ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. भिरा इथं २००५मध्ये तापमान ४९ अंश सेल्सिअस नोंदलं गेल्याचे उल्लेख आढळतात.

  • उष्णतेच्या लाटा कशामुळं?
  • भारतात उष्णतेच्या लाटा किंवा तत्सम परिस्थिती निर्माण होण्यामागं काही महत्त्वाचे घटक नेहमीच कारणीभूत ठरत राहिलेले आहेत. हे घटक असे आहेत ः
  •   वायव्येकडच्या वाळवंटी प्रदेशात तयार झालेल्या ‘लू’ नावाच्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा मध्य भारतातून प्रवास
  •   साधारणपणे दीड ते तीन किलोमीटर उंचीवरून खाली येणारे वारे जमिनीवरून वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांत मिसळून जाणं
  •   समुद्राकडून जमिनीच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्यांत बाष्पाची कमतरता असणं
  •   दिवसभर आकाश निरभ्र असणं

या वर्षीची उष्णतेची लाट तयार होण्यामागं आणि त्यानंतरही सतत वाढत असलेल्या तापमानामागं ही सगळी कारणं होतीच;  शिवाय, मध्य भारतात जमिनीपासून सरासरी साडेपाच किलोमीटर उंचीवर तीव्र प्रत्यावर्त (Anticyclone ) तयार झालं होतं. २८ मार्च रोजी हे प्रत्यावर्त गुजरातवर, तर २९ मार्च रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रावर सक्रिय होतं. प्रत्यावर्ताचा विस्तारही खूपच मोठा होता. असे प्रत्यावर्त खरं म्हणजे एप्रिलपासून गुजरात-राजस्थान भागांत निर्माण होऊ लागतात. या वर्षी मात्र ते मार्चमध्येच निर्माण झालं. मागच्या आठवड्यात एप्रिलमध्ये पुन्हा असं प्रत्यावर्त अरबी समुद्रात तयार झालं.

२८ मार्च रोजी दिल्लीमध्ये ‘उष्णतेच्या लाटेचं भाकीत’ या विषयावर भारतीय हवामान खात्यानं निमंत्रित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत या लाटेची विस्तारानं चर्चा केली गेली. गेल्या काही वर्षांत भारताप्रमाणेच जगभरात अनेक ठिकाणी दीर्घ मुदतीच्या तीव्र उष्णतेच्या लहरींची वारंवारिता वाढली असल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं. जागतिक तापमानवाढ हे यामागचं मुख्य कारण असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं गेलं.

‘उष्णतेच्या लाटेचा’ समावेश नैसर्गिक आपत्ती या प्रकारात केला जात नाही. त्यामुळं या लाटेनं बाधित लोकांना नैसर्गिक आपत्ती नियंत्रणाखाली मदत मिळू शकत नाही. यासाठी गेल्या पाच वर्षांत अहमदाबाद, नागपूर, भुवनेश्वर यांसारख्या काही शहरांनी ‘हीट ॲक्‍शन प्लॅन’ तयार करून बाधित लोकांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. असे प्रयत्न इतर शहरांतूनही होणं गरजेचं आहे.

सध्याच्या हवामानाच्या क्‍लिष्ट आणि किचकट आकृतिबंधात एका गोष्टीबाबत तज्ज्ञांच्या मनात अजिबात संदेह नाही, ती म्हणजे उष्णतेच्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तिची तीव्रता आणि वारंवारिता वाढण्यामागचं कारण. स्थानिक आणि काही अंशी जागतिक पातळीवर हवामानासंदर्भात माणसाचा सुरू असलेला हस्तक्षेप हे ते कारण. भारतात या लाटेचा मनुष्याच्या शरीरावर होणारा परिणाम समजण्यासाठी ‘उष्णता निर्देशांका’चा (Heat index )  वापर होणं गरजेचं आहे, असा विचारही या कार्यशाळेत मांडण्यात आला.

उष्णतेची ‘बेटं’
हवेतल्या अतितीव्र उष्णतानिर्मितीचा संबंध हा निश्‍चितपणानं वातावरणातल्या खालच्या ‘तपांबर’ (Troposphere ) या थरातल्या मानवी क्रिया-प्रक्रियांशी आहे. त्या दृष्टीनं पाहता या लाटा हा हवामानबदलाचाच एक आविष्कार आहे, असा विचार या वेळी व्यक्त केला गेला. पुण्यासारख्या शहरात एका भागात ३९.६ (शिवाजीनगर), तर दुसऱ्या भागात ४०.५ अंश सेल्सिअस (लोहगाव) अशी जास्त उष्णतेची बेटं तयार झालेली दिसतात. शिवाजीनगर आणि लोहगाव इथं झालेली ही वाढ तिथल्या सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे २ आणि २.५ अंश सेल्सिअसनी जास्त होती. शहरात तयार होणारी अशी ‘उष्णतेची बेटं’ (Heat islands ) ही अल्पकालीन असली, तरी ती भविष्यात खूपच धोकादायक ठरू शकतील, असं निरीक्षणही या वेळी मांडण्यात आलं.    

भारतात सामान्यपणे उष्ण आणि कोरड्या हवेचा कालखंड मार्चच्या मध्यापासून सुरू होतो आणि मेच्या अखेरीपर्यंत त्याचं प्राबल्य राहतं. २१ मार्चनंतर म्हणजे वसंत संपल्यानंतर उत्तर भारतातल्या तापमानात झपाट्यानं वाढ होते आणि ही वाढ २१ जूनपर्यंत म्हणजे कर्क संक्रातीपर्यंत जाणवत राहते. वायव्य भारतात (राजस्थान, पंजाब व हरियाना) आणि उत्तर भारतात (उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा) याचबरोबर मध्य भारतात (मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र) रोजचं उच्चतम तापमान ४० अंश ते ४७ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं जातं. रोजचं किमान तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येतं, म्हणजे कमीत कमी तापमानही २६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्तच असतं. गंगेच्या मैदानी प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव असतो. पाच ते तीस टक्के इतकी अत्यल्प सापेक्ष आर्द्रता, कोरडी हवा, अधूनमधून पडणारा अभिसरण स्वरूपाचा पाऊस, धुळीची वादळं आणि असह्य उन्हाळाही या भागात, या कालखंडात नेहमीच जाणवणारी हवामान स्थिती असते.
तुलनेनं दक्षिण भारतात याच काळात उच्चतम सरासरी तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं जातं. या वर्षी तापमानातल्या या सरासरी वृत्तीत खूपच बदल होत असल्याचं दिसून आलं. तापमानात होणाऱ्या वाढीचा संबंध जागतिक तापमानवाढीशी असावा, असंही अनेकांना वाटतं आहे.

हवामानात होणारे असे अचानक बदल हे सध्याच्या हवामानबदलाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हा परिणाम प्रामुख्यानं त्या प्रदेशातल्या पर्यावरणात आणि नैसर्गिक परिसरात माणसामुळे चालू असलेल्या बदलांचा परिपाकच असल्याचं निश्‍चितपणं दिसून येतं. पृथ्वीपृष्ठानजीकच्या वातावरणाच्या थरांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्यं अल्पकाळासाठी झपाट्यानं बदलतात, ऊर्जासंक्रमणाची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते आणि हवामानात बदल जाणवतो. तापमानात बदल ही त्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया असते. पृष्ठभागाजवळचं हवामान हे आत येणाऱ्या सौरऊर्जेचं प्रमाण आणि त्यांचा विनियोग यावर ठरतं. त्यामुळं उष्णतेत एकाएकी होणारी तीव्र वाढ, तितक्‍याच वेगानं अल्पकाळात कमी होणारं किंवा सामान्य स्थितीला येणारं तापमान, अल्पकालीन वृष्टी, गारपीट यांचा संबंध प्रत्येक वेळी जागतिक हवामानबदलाशी लावता येईलच असं नाही, असं अनेक हवामानशास्त्रज्ञांना वाटतं. सध्या जाणवत असलेले हवामानातले असे तीव्र बदल हे फार मोठ्या दीर्घकालीन बदलाचे सूचक असावेत, असं वाटत असलं, तरी एक-दोन निरीक्षणांतून असा निष्कर्ष काढणं योग्य नाही, असंही अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. याचं मुख्य कारण मनुष्याच्या एकाच प्रकारच्या हस्तक्षेपामुळं एकाच विशिष्ट पद्धतीनं पृथ्वीभोवतालचा नजीकचा वातावरण थर बदलतो आहे, असंही एक निरीक्षण आहेच.

परिणाम काय?
जागतिक तापमानवाढ हा सध्याच्या काळातला मुख्य हवामानबदल आहे. एका अंदाजानुसार, एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि या तापमानवाढीचे खूप दूरगामी परिणाम होतील. जास्त उंचीवर जेट प्रवाह दुर्बल होतील, वारे त्यांची दिशा बदलतील, वृष्टीचं प्रमाण कमी होईल, बरीचशी वृष्टी केवळ पाऊस या स्वरूपातच होईल, पुरांची संख्या व तीव्रता वाढेल, उन्हाळ्यात वादळांची संख्या वाढेल, सागरपातळी दर वर्षी वीस ते तीस मिलिमीटरनं वाढेल, किनारी प्रदेशातलं भूजल अधिक खारट होईल. ध्रुव प्रदेशातील बर्फ पूर्णपणे वितळेल आणि शेतीप्रधान देशातल्या शेतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटेल.  हवामानात आणि विशेषतः तापमानात होणारे हे बदल नेमके कशामुळे होत आहेत, याचं नेमकं उत्तर खरं म्हणजे आजही आपल्याला गवसलेलं नाही. आत्तापर्यंतच्या हवामानशास्त्रीय संशोधनातून एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे, की पृथ्वीवर विविध ठिकाणी अशी अल्पकालीन तापमानवाढ यापूर्वी अनेक वेळा झालेली आहे; मात्र त्या वेळची या वाढीमागची कारणं आतापेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यातली बरीचशी कारणं नैसर्गिक होती. आज जगभरात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप या बदलास मोठ्या प्रमाणावर हातभार लावतो आहे, याबद्दल कोणाच्याच मनात आता संदेह नाही.

ही सगळी मीमांसा हेच लक्षात आणून देते, की हवामान यंत्रणा कितीही क्‍लिष्ट असली, तरी त्यातही एक सुसूत्रता आहे. सामान्य हवामान यंत्रणेत जे बदल होताना दिसत आहेत, त्याचा संबंध मोठ्या अंशी पृथ्वीवरच्या मानवनिर्मित आणि मानवनिगडित असंख्य घटना आणि त्यामुळं होणारे बदल यांच्याशीच आहे. निसर्गाचं वेगानं ढासळणारं संतुलन हीच खरी तर आजच्या जगाची मुख्य समस्या आहे. हे संतुलन का, केव्हा, कसं आणि कुणामुळं बिघडलंय याचा पूर्ण अंदाज आज खरं तर सगळ्यांनाच आलाय. त्याकडं आपण किती संवेदनशीलपणे पाहतो हे महत्त्वाचं!
भिरा इथं झालेली उच्च तापमानाची नोंद किती खरी, किती खोटी याचं उत्तर मिळेलच; पण आपल्याच हस्तक्षेपामुळं निसर्गाचा तोल बिघडून नजीकच्या भविष्यकाळात अनेक ठिकाणांना अत्युच्च तापमानाचा ‘सन्मान’ मिळू शकेल असं वाटावं, अशी स्थिती आज नक्कीच आहे, असं म्हणायला हरकत नसावी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com