वाममार्गापासून रोखताना... (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

कोणत्याही चांगल्या घटनेबद्दल आपण मुलांशी बोलतोच, यशाच्या चर्चा करतो; पण त्यापेक्षाही अपयश, कुसंगती, चुकीचे निर्णय या विषयांच्या साधकबाधक चर्चा करायला हव्यात. उपदेश नकोत. चुकीच्या मार्गाला गेलेल्यांविषयी आवर्जून बोलायला हवं. चुकीच्या मार्गाला जाऊन परत आलेल्यांची उदाहरणं द्यायलाच हवीत. जी उदाहरणं द्यायची ती फार जुनीपुराणी नकोत, आत्ताच्या काळातली पाहिजेत.

कोणत्याही आईबाबांना "मुलांना वाईट सवयी लागाव्यात' असं कधीही वाटत नसतं. जगातले कोणतेही आईबाबा हे मुलांच्या चांगल्यासाठी, हितासाठीच झटत असतात; पण कधीकधी समीकरणं नको एवढी चुकतात.

आपापल्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीप्रमाणं जे झेपेल त्यातून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कोणतेही आईबाबा करतात. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून त्यांनी लहानपणापासूनच खूप प्रयत्न केलेले असतात. लहानपणापासून अनेक चांगल्या सवयी लावलेल्या असतात. मुलं चुकली, तर त्याबद्दल रागावलेलं असतं, लहान- मोठ्या शिक्षा केलेल्या असतात. मुलांनी आयुष्यात काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून शिक्षा करताना मनावर दगड ठेवलेला असतो. आपल्याच मुलाला/ मुलीला शिक्षा केली पश्‍चात्ताप झालेले पालक काही कमी नसतात. वास्तविक चांगल्या सवयी, विचारांना लागलेलं चांगलं वळण हे आयुष्यभर टिकणारं असतं- असायला हवं. आपण जे प्रयत्न केले त्याला नक्की फळं लागतील, असा एक विश्वास आई-बाबांना स्वत:वर आणि मुलांवर असायला हवा. पण... या "पण'मध्ये काही अदृश्‍य गोष्टी आहेत. कारण सवयी, संस्कार सर्व काही असलं, तरीही तेरा ते एकोणीस या वयात येणारं "टीनएज'चं वळण काहींसाठी सुरळीत, तर काही काही जणांसाठी अतिधोकादायक असू शकतं.

गेल्या काही वर्षात घडणाऱ्या घटना हेच सांगताहेत. अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे हा वाढत्या चिंतेचा विषय आहे. परीक्षा रद्द व्हावी म्हणून आपल्याच शाळेतल्या लहान मुलाचा खून एका अकरावीतल्या मुलानं केला. मुलाची शंभर टक्के चूक झाली, यात काहीच दुमत नाही. सराईत गुन्हेगार असल्याप्रमाणं त्यानं दुसरीतल्या मुलाच्या गळ्यावर सुरी फिरवली, असा त्याच्यावर आरोप आहे. छोट्या मुलाची काही चूक नव्हती, त्याचा कसलाही संबंधही नव्हता. तरीही हे घडलं. इथं सारासार विचारशक्ती कमी पडली का? यातून काय धोका निर्माण होऊ शकतो, हे आधी लक्षात आलं नव्हतं का? हा क्रूरपणा त्याच्या स्वभावात होता का?... या गोष्टी एक केस म्हणून तपासल्या जातीलच.

तरीही हा सोळा वर्षांचा मुलगा असं काही करायला धजावला, याचा अर्थ त्याच्यावर असलेला अवाजवी ताण त्याला सहन झाला नाही आणि त्यातून हे भयंकर कृत्य त्याच्याकडून घडलं. अशा प्रकरणात पालकांकडं बोट जाणं स्वाभाविक आहे; पण या मुलाचे आईबाबा सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. रोज उठून कोणाचा तरी खून करणारे नाहीत. मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी गावाकडच्या घरातून शहरी भागात येऊन राहिलेलं हे सर्वसामान्य कुटुंब. बाबा नोकरदार. आई घराकडे- मुलांकडे लक्ष देणारी. मुलांना शाळा-क्‍लासला सोडणारी. स्वत: हा मुलगाही अभ्यासात खूपच चांगला. संगीताची आवड असलेला. भरपूर बक्षिसं- सर्टिफिकेट्‌स यांची मिळकत असलेला असा होता. त्याच्या इंग्लिशच्या अफाट आणि अचूक शब्दसंपत्तीची नोंद तर प्रत्यक्ष तपास अधिकाऱ्यांनीही घेतलेली आहे. नव्या उमद्या भविष्याची स्वप्नं आईबाबांनी तर त्याच्या लहानपणापासूनच पाहिली होती. त्यानंही पाहिली असतील. या वळणावर त्याच्या हातून असं घडलं.

मजा करण्यासाठी पेट्रोल चोरणं, घरातले पैसे चोरणं, वस्तू चोरून विकणं या गोष्टी या वयातल्या मुलांकडून घडायच्या. आता सामूहिक अत्याचारापर्यंतच्या घटना होताना दिसत आहेत. मित्रा-मित्रांनी मिळून मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणं असा गुन्हा कधीच घडू नये; पण आता तो वारंवार घडताना दिसतो आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत कुठंही घडतो आहे. ओळखीच्या किंवा अनोळखी मुलीवर मित्रा-मित्रांनी अत्याचार करणं. चॉकलेट खाऊन झाल्यावर रॅपर फेकून द्यावं तसं त्या मुलीला निर्जीव वस्तूसारखं कुठंही फेकून देणं किंवा वाईट पद्धतीनं जीवे मारणं हे प्रकार अल्पवयीन मुलांकडून घडतात.

दारू पिऊन मुलींनी रस्त्यात दंगा केला, इतर गाड्यांना ठोकलं हे आपण वाचत- बघत आहोत. अवघी एकोणीस वयाची मुलगी लग्न झालेल्या माणसाबरोबर अफेअर करते आणि त्याला ब्लॅकमेलही करते, तर बाविशीची मुलगी प्रेमप्रकरणातून अवघ्या चार वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ करताना सापडते. ही सर्व शिकलीसवरलेली माणसं आहेत. "हे बघा! या इथं गुन्हे घडतात, आपल्या घरात नाही,' असं म्हणून समाजाच्या एका वर्गाकडं बोट दाखवता येणार नाही. असे गुन्हे क्षणिक संताप, क्षणिक; पण अवाजवी ताण, व्यसनं, समवयस्क मित्रमैत्रिणींच्या आज्ञा किंवा फक्त एक गंमत यांमुळं घडू शकतात.

पालकांच्या कट्ट्यावर अस्वस्थ करणारा हा विषय मांडावासा वाटला- कारण आपल्या घरांमध्ये विविध वयांची लहान-मोठी मुलं आहेत. बारा-चौदापर्यंत गोड- आज्ञाधारक असणारं मूलही वादळी वयातून जाणार आहे. टीन एजच्या दरम्यान धाडस आणि धोका यातली सीमारेषा जरा फिकट व्हायला लागते. आपण धाडस करत आहोत हे कळत असतं. त्यात धोका असू शकतो, हे ही नीट समजत असतं. यात आपली स्वत:ची सुरक्षितता पणाला लागू शकते, याचाही व्यवस्थित अंदाज असतो; पण तरीही पुढं जाऊन बघायचं असतं. जे चालू आहे, त्याच्या विपरीत जायचं असतं. काही मुलं स्वभावत:च शांत, सरळमार्गी असतात; पण त्यांच्यातही थोडे बदल होऊ शकतात.

दर वेळी मुलांच्या अशा विचित्र, धाडसी, धोकेबाज, मागचा-पुढचा विचार न करता अंधारात उडी घेण्याच्या विचारप्रक्रियेच्या मागं पालकांची चूक असेलच असं नाही. प्रत्येक वेळी "मूल असं वागलं याला त्यांच्या घरातल्या वातावरणातच दोष आहे,' असं नसतं. कारण या वयात पालक जे सांगतात, त्याच्या विरुद्ध जे असेल तेच करावंसं वाटतं. या वयात सर्वाधिक प्रभाव असतो तो आसपासच्या मित्रमैत्रिणींचा. "पीअर प्रेशर' या नावाखाली मुलं-मुली काहीही करू शकतात. जन्मल्यापासून आयुष्याच्या अंतापर्यंत माणूस त्याच्या टीन एजएवढा साहसी कधीच नसतो. म्हणून केवळ स्वत:च्या मुलांची नाही, तर या समवयस्कांचीही काळजी घ्यावी असे दिवस आहेत. मुलींचं माणूस म्हणून अस्तित्व तर पुनःपुन्हा सांगावं लागणार आहे.

उगवत्या पिढीच्या दृष्टीनं बोलायचं तर दिवस आणि रात्री प्रलोभनाच्या आहेत. सर्व काही पालकांच्या हाती नाही. एका मर्यादेपलीकडं आई-बाबांनी मुलांचं स्वातंत्र्य मान्य करून त्यांना धाडस करू द्यावं, अशी मांडणी होत असताना दुसरीकडे मुलांना धाडस आणि गुन्हा यातला फरक सांगत, भावनिकदृष्ट्या अतिशय कणखर बनवणं अतिशय आवश्‍यक आहे. आता यापुढं प्रत्येक ठिकाणी आई-बाबा मुलांबरोबर नसणार, त्या वेळी त्यांच्यात सारासार विचारशक्ती जागती करणं आणि ती जागती राहण्यासाठी प्रयत्न करणं आवश्‍यक आहे.

कोणत्याही चांगल्या घटनेबद्दल आपण मुलांशी बोलतोच. यशाच्या चर्चा करतो; पण त्यापेक्षाही अपयश, कुसंगती, चुकीचे निर्णय या विषयांच्या साधकबाधक चर्चा करायला हव्यात. उपदेश नकोत. चुकीच्या मार्गाला गेलेल्यांविषयी आवर्जून बोलायला हवं. चुकीच्या मार्गाला जाऊन परत आलेल्यांची उदाहरणं द्यायलाच हवीत. जी उदाहरणं द्यायची ती फार जुनीपुराणी नकोत, आत्ताच्या काळातली पाहिजेत. क्षणिक ताण, क्षणिक संताप, क्षणिक मोहाच्या वेळी ही उदाहरणं मुलांना नक्की आठवतील! हे सर्व करण्यासाठी घरात मोकळा संवाद असावा लागतो. तो असेल तर ठीकच; पण नसेल तर तशी पुस्तकं, फिल्म्स दाखवून का होईना आपलं म्हणणं पोचवायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com