काळ काळजीचा (डॉ. श्रुती पानसे)

palak katta
palak katta

बाळाचा जन्म होतो त्याच क्षणी आईच्या काळजीचाही "जन्म' होतो. बाळ होईपर्यंतच्या काळात बऱ्यापैकी स्वच्छंदी आणि काहीशी बेफिकीर असलेली आई अचानकच विविध प्रकारच्या काळज्या करायला लागते. त्याचीच मग तिला सवय होते. पुढं मुलं मोठी झाली, तरी ती काळजी करतच राहते. मात्र, नुसत्या वाटणाऱ्या काळजीचा खरंच प्रत्यक्षात काही उपयोग नाही. आपण काळजी करण्यात नेमका किती वेळ घालवत आहोत, केवळ काळजी करण्यानं मुलांचे परीक्षांमधले मार्क्‍स किंवा वर्तन सुधारणार आहे का याची उत्तरं प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत.

बाळाचा जन्म होतो त्याच क्षणी आईच्या काळजीचाही "जन्म' होतो. खरं तर आपल्या पोटात एक बाळ वाढतं आहे हे कळल्यापासून ती आई बाळाची- बाय डिफॉल्ट- काळजी करायला लागते. जणू काही त्याशिवाय बाळाला चांगल्या प्रकारे वाढवताच येणार नाही की काय!

बाळ होईपर्यंतच्या काळात बऱ्यापैकी स्वच्छंदी आणि काहीशी बेफिकीर असलेली ही कन्यका अचानकच विविध प्रकारच्या काळज्या करायला लागते. त्याचीच मग तिला सवय होते. तिचं नवजात बाळ एक दोन दिवसाचं असो किंवा तेरा-चौदा वर्षांचं; ती आई काळजी करतच राहते. "आई ही आई असते,' असं म्हणतात ते कदाचित यामुळंच. मुलांशी संदर्भात सर्व प्रकारच्या काळज्या ती करते.

या काळज्या तरी कित्ती कित्ती प्रकारच्या?
- बाळाला रात्री झोप का लागत नसेल?
- बाळाला भूक लागली असेल का, थंडी वाजत असेल का?
- माझ्या बाळाला ती शेजारची बाई असं का म्हणाली असेल?
- बाळ आजारी तर नाही ना पडणार?


बाळाचं आयुष्य चांगलं जावं, या काळजीपोटी ती उपास-तापासही करायला लागते.
ही झाली लवकरच्या वयातली काळजी...पुढं हे बाळ हळूहळू मोठं होतं. शाळेत जायला लागतं. विकासाचा एक टप्पा गाठतं. मुख्य म्हणजे आईपासून सुटं व्हायला लागतं. आईदेखील आपला व्यवसाय, आपापल्या कामाला लागते. तिची व्यवधानं वाढतात. कदाचित ती मुलामुलींना जास्त वेळ देऊ शकत नसेल; पण तरीही तिचं बारकाईने लक्ष असतं. एकदा शाळेत गेलेलं मूल वयाचा एक टप्पा गाठतं. आता आईची काळजी कमी व्हायला पाहिजे; पण ही काळजीदेखील एका नव्या टप्प्यावर पोचलेली असते.
- त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल ना? (चांगली शाळा म्हणजे काय याबद्दल आई आणि बाबा यांच्या कल्पना वेगळ्या असू शकतात.)

बालवाडीतल्या छोट्या मुला-मुलीला (एकट्यानंच!) बस किंवा व्हॅननं शाळेत पाठवणं, हे सुरवातीच्या काळात एक दिव्यच असतं. आपल्या मुला-मुलीला काका नीट पोचवतील ना, व्यवस्थित आणतील ना, गाडी जास्तच जोरात चालवणार नाहीत ना, आपल्या छोट्याला शिक्षिका आणि तिथल्या मावशी नीट सांभाळतील ना... याच काळज्या आईला जास्त असतात. याला कोणी हसो किंवा चेष्टा करो, किंवा काहीही म्हणो या गोष्टी आईच्या मनात येतातच आणि या चेष्टेकडं ती दुर्लक्षच करते.
पुढंपुढं मूल मोठं होईल तशी अभ्यास, परीक्षा, मित्रमंडळी, संगत, मुलांचं चांगलं किंवा चुकीचं वागणं या सगळ्या संदर्भात तिच्या मनात काळजीचा बराच मोठा कोपरा व्यापून राहिलेला असतो. शाळेत मुलाचं/ मुलीचं नीट निभावलं तर ठीक; पण तसं झालं नाही, अभ्यासाच्या, वागण्याच्या तक्रारी येत राहिल्या, तर या काळजीला पारावार उरत नाही. शाळकरी मुलांच्या आया मुलांना शाळेत, क्‍लासमध्ये, ग्राऊंडला सोडून एकमेकींशी गप्पा मारत असतात, तेव्हा पहिली दोन-तीन वाक्‍यं एकमेकींची चौकशी करण्यात जातात. त्यानंतर गाडी आपापल्या मुलांकडं वळते, ते थेट एकमेकींना "बाय' करेपर्यंत. मधल्या वेळेत त्या फक्त मुलांविषयी- आणि बहुतांशी प्रश्नांविषयी बोलत असतात. अशा गप्पांचा खरं म्हणजे फारसा उपयोग होत नाही. मात्र, यातूनच अनेक जागरूक आयांच्या हे लक्षात येतं, की "अरे! आपण भेटलो, की फक्त मुलांविषयी बोलत आहोत. मग त्या एकमेकींना बजावतात, की सारखं मुलांविषयी नाही बोलायचं. आपण एकमेकांविषयी, आपण करत असलेल्या कामाविषयी, आपल्या अनुभवांविषयी बोलायला हवं.' या दृष्टीनं त्या प्रयत्न करतात. काही वेळा यशस्वी ठरतात, तर काही वेळा नाही.

मुलांमध्ये गुंतणं इतकं असतं, की ऑफिसमधली महत्त्वाची मीटिंग पार पडली, की तिचं घड्याळात लक्ष जातं. "आलं असेल आत्ता शाळेतून.' मनातल्या मनात एक नोंद घेतली जाते. स्वत:च्या व्यवसायानिमित्त आठ दिवस दुसऱ्या गावाला असलेल्या आईला "उद्या तिची इंटरस्कूल मॅच आहे' हे पक्कं लक्षात असतं आणि जगाच्या पाठीवर कुठंही असली, तरी फोनवरून सगळ्या सूचना दिल्या जातात. खरं म्हणजे आई आपली किती काळजी करते, हे एव्हाना मुलांना माहीत झालेलं असतं. एवढंच नाही, तर या सगळ्या सूचना तिच्या हावभावांसह आणि हातवाऱ्यांसह, अगदी उदाहरणांसहही तोंडपाठ झालेल्या असतात.

आई आणि काळजी हे समीकरण ग्रामीण भागात नव्या रूपात पाहायला मिळतं. मुलांनी शिकायला हवं. मुलं शिकली तरच त्यांचा या जगात निभाव लागेल. अभ्यास आणि त्यांचा विकास याविषयी आता सर्वदूर जाणीव-जागृती झालेली आहे. फक्त खाण्यापिण्याची आणि आजारपणाची नाही, तर व्यक्तिमत्त्वविकासाच्या काळज्याही आपणच घ्यायच्या आहेत, यासाठी या राण्या पुढं सरसावल्या आहेत. पती "बापपणा' निभावत नसेल, तर त्याला बाजूला सारून, स्वत: निर्णय घेऊन, प्रसंगी काटकसरीची शर्थ करून आई मुलांच्या पाठीशी उभी राहते. आपल्या मुलांचं भविष्य ती कधीही रामभरोसे किंवा कोणाच्याही भरवशावर सोडत नाही. ती स्वत: शिक्षकांशी लढते. सुटीतल्या शिबिरांसाठी कसंही करून मुलांना शहरात पाठवते. व्हेकेशन बॅचला पाठवते. ग्रामीण स्त्रीला विविध प्रकारची कामं आणि कष्ट करावे लागतातच. आता त्यात या नव्या कामांची आणि त्यातूनच नव्या काळज्यांचीही भर पडली आहे.
त्यामुळंच ग्रामीण भागातल्या पालक शिबिरांना व्यवस्थित गर्दी होते. आपल्या मुलांची चांगली वाढ आणि विकास यासाठी ज्या व्यक्ती आपल्याला मदत करू शकतात, त्यांची सर्व मदत आई घेते. या विषयात प्रोफेशनल सल्ला मागण्यात ती मागं पडत नाही आणि यामागं एकमेव कारण असतं- ते म्हणजे आपल्या मुलांचं भलं झालं पाहिजे. आता तिचा फोकस पूर्णपणे ठरलेला आहे आणि त्यात भाबड्या आशेला मुळीच जागा नसते.

आपल्याला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरच्या मुलांची खूप काळजी वाटत असेल, काळजीपोटी झोप लागत नसेल, तर याचा तब्येतीवरही वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. एक शारीरिक सत्य लक्षात घ्या, की आपण निराशेच्या भावनेत सतत राहिलो, तर आपल्या शरीराचा रक्तप्रवाह लिंबिक सिस्टीमकडे म्हणजे भावनांच्या प्रदेशातच घोटाळत राहतो. तो विचारांच्या प्रदेशाकडं म्हणजेच निओ कॉर्टेक्‍सकडे वळवायचा असेल, तर सक्तीनं लॉजिकल विचार करावे लागतात आणि रक्तप्रवाहाला वळवावं लागतं. नुसत्या वाटणाऱ्या काळजीचा खरंच प्रत्यक्षात काही उपयोग नाही. आपण काळजी करण्यात नेमका किती वेळ घालवत आहोत, आपल्या केवळ काळजी करण्यानं मुलांचे परीक्षांमधले मार्क्‍स किंवा वर्तन सुधारणार आहे का याची उत्तरं प्रामाणिकपणे शोधा. नुसता विचार करायचा म्हटला तर एका मिनिटात पन्नासेक प्रकारचे विचार येऊन जातात; पण त्यातले खरेखुरे जे प्रश्न भेडसावताहेत, ते लिहायचे ठरवले तर हाताच्या एका बोटावर मोजता येतील एवढे तरी प्रश्न असतील का? त्यामुळं हे प्रश्न आधी लिहून काढा. या प्रश्नांवर खरंच काय उपाय असू शकतात हे ठरवा. घरातल्या लोकांशी बोला, वाटलं तर त्या प्रश्नाशी निगडित योग्य त्या व्यक्तीशी बोला. आता कुठं प्रश्न सोडवण्याची योग्य दिशा सापडेल. ती सापडली, की पुष्कळसं ओझं हलकं होईल. ओझं हलकं झालं, की त्यावर अंमलबजावणी करायची. त्यातही एक प्रकारचा ताण आहेच; पण विचारांच्या खोल आवर्तात गुंतण्यापेक्षा आपण एक पाऊल पुढं सरकतो आणि प्रश्न सुटण्याची शक्‍यता निर्माण होते.

मुलं मोठी झाली आणि प्रश्न संपले असं कधीही होत नाही. नव्या टप्प्यावर नवे प्रश्न पडत असतात; पण निव्वळ काळजी करून काहीही हाती लागत नसतं. नकारात्मकता तेवढी वाढत जाते. त्यापेक्षा लिहा आणि प्रश्नांच्या मुळापर्यंत जा. मनात थोडी रिकामी जागा असेल, तर तिचा उपयोग चांगले विचार रेंगाळण्यासाठी होईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आई होण्याआधी आपण एक माणूस आहोत, हे अधूनमधून लक्षात ठेवलं तर बरं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com