विरुद्ध पक्ष? (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

एका विशिष्ट वयानंतर मुलांमधली "स्व'ची जाणीव, इगो वाढायला लागतो आणि त्यांचा आई-बाबांशी होणारा संवादही वेगळ्या वळणावर जातो. पालकांचं मुलांवर खूप प्रेम असतं; पण ते आपल्याला समजून घेत नाहीत असं मुलांना वाटायला लागतं. छोट्या छोट्या प्रश्‍नांचा योग्यपणे निपटारा झाला नाही, तर घरातच दोन पक्ष तयार होतात आणि हे विरुद्ध पक्ष एकमेकांशी भिडायला लागतात. हे टाळायला हवं.

बाळाचे पहिले शब्द ऐकायला आई-बाबांचे कान किती आतुरलेले असतात. तो पहिला शब्द किती तरी वेळा म्हणायला लावतो आपण. मूलही तितक्‍याच निरागसतेनं पुनःपुन्हा म्हणून दाखवतं. एकमेकांवर फार प्रेम असतं ना! काही वर्षांत हे चित्र बदलतं. ""काय कटकट लावलीय मगापासून? काय हवंय तुला?'' इथपर्यंत गाडी येते... आणि पुढं, ""जरा कमी बोलशील का? माझं काम चालू आहे...'', ""फार बडबड लावलीय, आवाज बंद'' इथपर्यंत प्रवास होतो. आपलं बोलणं असं बदललंय हे मुद्दाम आणि जाणीवपूर्वक लक्ष दिल्याशिवाय आपल्या लक्षातही येत नाही. यानंतर काही वर्षांनंतर एकमेकांशी बोलण्याच्या भूमिकाच बदलतात. टीनएजमध्ये ""तुला काय बोलायचंय ते माझ्याशी बोलशील का?'', ""माझ्याशी काही बोलायचंच नाहीये का तुला?'', ""तुझ्या मित्रांना किंवा मैत्रिणीला विचारलं की कळेल, तुझं काय चाललंय ते..'', ""सारखं डोकं मोबाईलमध्ये नकोय. त्यापेक्षा माझ्याशी बोल''... आपलं आणि मुलांचं बोलणं हा असा एक वळणवळणांचा प्रवास असतो.

कधीच कुठलं जवळचं नातं सरळ रेषेत नसतं. काहीवेळा ही सरळ वाट मजेची, विनाधक्‍क्‍याची आणि गर्द सावलीतली असते. आपल्याला कायम ही गर्द सावलीतली वाट हवी असते; पण अशी मिळू शकत नाही. वरवर सरळ रेष वाटणाऱ्या या वाटेवर हलके किंवा तीव्र चढ-उतार, जवळचे-लांबचे रस्ते, खड्डे, दऱ्या, दगड-काटे असतात. रस्ता चुकतोही कधीकधी, तर कधी चकवाही लागतो; पण रस्त्यावरचे हे खाचखळगे लक्षात घेऊन "हम है राही प्यारके, चलना अपना काम' म्हणत प्रेमानं चालत राहायचं.
मुलं बोलायला लागली, की त्यांचं सर्व काही ऐकून घेणं हे आपलं मुख्य काम व्हायला हवं. नीट आणि सगळं ऐकलं तर लक्षात येईल, की या बोलण्यात काय नसतं? त्यांचा इगो असतो, त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी असतात. त्यांच्या अत्यंत सुरेख कल्पना असतात. लहान मुलांचं सगळं जग स्वत:पासून सुरू होऊन स्वत:पाशीच संपतं. यात एक वेगळीच मजा असते. शब्दांच्या गमतीजमती तर असतातच; पण स्वत:च्या बुद्धीनं ती बेधडक अर्थ लावत असतात. आतलं आणि बाहेरचं असं काहीही नसल्यामुळे काहीही बोलतात. कोणालाही काहीही विचारतात. सगळंच बेधडक! मुलं-मुली लहान असली, कोणत्याही वयात असली, तरी ती मनाशी बोलत असतात. स्व-संवाद चालू असतो, हे लक्षात घेऊन त्यांच्या मनात शिरायला हवं. साध्याशा आणि अगदी बिनमहत्त्वाच्या वाटू शकणाऱ्या गोष्टींतूनसुद्धा ती काहीतरी सांगू बघत असतात.

मुलांच्या मनातला हा सगळा व्यवहार फार वेगळा आहे. हा व्यवहार कळण्यासाठी आपल्याला त्यांच्या वयाचं व्हावं लागतं. छोट्यांकडे असलेली मन नावाची गोष्ट एकदम जिवंत असते. सगळं काही टिपत असते. बाहेरचं प्रत्यक्षातलं बोलणं आणि मनातलं बोलणं याची सतत सरमिसळ चालू असते.

मुलं गोड असतात, निरागस असतात; पण ती जसजशी मोठी होतात, तसतसे काही ना काही प्रश्न, समस्या सुरू होतात. वयाचे एकेक टप्पे मुलं पार करतात, तसा "इगो' आपलं अस्तित्व दाखवायला लागतो. स्वभाव हळूहळू बाहेर येतो. जसजशा स्वत:विषयीच्या जाणिवा वाढायला लागतात, तसतसं मी, माझं, मला असं "स्व'त्व जागृत व्हायला सुरवात होते. यालाच आपण मूल हट्टी झालं आहे असं म्हणतो. आता मात्र अमुक एक खेळणं हवंच. "आत्ताच हवं', "इथंच खेळायचं', "घरात नको', "बाहेर जायचंय', "जायचंच आहे,' अशी मतं- मागण्या- हट्ट सुरू होतात. हवी ती गोष्ट पूर्ण केली नाही, की रडण्याचं- ते पण जोरात रडण्याचं किंवा खरं तर किंचाळण्याचं, घरात- रस्त्यात कुठंही बसकण मारून हट्टीपणा दाखवण्याचं अस्त्र बाहेर काढलं जातं. घरच्या माणसांना पूर्ण नाकी नऊ आणण्याची क्षमता मूल कमावतं. रडलं की सगळे ऐकतात, हा फॉर्म्युला हळूहळू लक्षात येतो आणि मग वारंवार तोच वापरला जातो. या वयात मूल असं वागतं- कारण त्याच्या दृष्टीनं "मी'ला अतिशय महत्त्व आहे. "मला' हवंय आणि दिलं जात नाही म्हणजे काय, हा विचार प्रबळ असतो.

मुलं शाळेत जायला लागली, की एक वेगळं वळण सुरू होतं. शाळेशी काही मुलं नीट जुळवून घेतात. काहींना लवकर जुळवून घेता येत नाही. शाळेत जायला नको म्हणणारी किंवा मारून मुटकून जाणारी कितीतरी मुलं असतात. शिकत असताना मुलांना कोणत्या प्रकारचे अनुभव मिळतात यावर त्यांचा तिथला प्रतिसाद अवलंबून असतो. घरात किंवा शाळेत अभ्यास करताना सुरवातीच्या काळात बोलणी खाणं, अपमान, मार असे अनुभव मिळाले, तर मूल अभ्यास टाळायला लागतं. अभ्यासाशी जोडल्या गेलेल्या दु:खद भावनाच स्मरणात राहतात. आईच्या हातात वही, पुस्तक बघितलं की मुलं पळ काढतात. रागावणारे - मारणारे शिक्षक बघितले, की पळ काढता येत नाही; पण टाळाटाळ, लक्ष न देणं हे सुरू होतं. त्यातून शिक्षा व्हायला लागली, तर प्रश्न सुटण्याऐवजी वाढतो. अशा वेळी मुलं कदाचित बोलणार नाहीत. मात्र, त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा, रागावण्यापेक्षा मुलांना समजून घेण्याची खूप गरज असते.
प्रश्न अभ्यासाचा असो किंवा इतर कोणताही असो; अत्यंत शांतपणानं योग्य मार्ग काढण्याची खूप गरज असते. नाही तर इथंच घरात दोन पक्ष, दोन टीम तयार होतात. विरुद्ध टीम्स. वास्तविक असं नसतं. आई-बाबा आणि मुलांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असतं; पण यात काहीकाही अडथळे येतात. आई-बाबा आपल्याला समजून घेत नाहीत, रागावतात असं मुलांना वाटतं, तर सगळं दिलं तरी मुलं अभ्यास करत नाहीत, नीट वागत नाहीत, असं आई-बाबांना वाटतं. या टीम्स समोरासमोर असतात. एकमेकांवर रागावतात. भांडणांच्या ठिणग्या उडतात. वेळीच एक टाका घातला, तर पुढचे नऊ टाके घालावे लागणार नाहीत, हा नियम अनेकदा विसरला जातो. आई किंवा बाबा- ज्यांच्याशी पटत नाही, ते कायमच वाईट वागतात, असं मुलांना वाटत राहतं. अशातच टीनएजचं वेगळं वळण आयुष्यात उगवतं. या वयात मुला-मुलींच्या मेंदूतला फ्रंटल लोब हा भाग विकसित होत असतो. ""तू आता मोठा/ मोठी आहेस. तू तुझे निर्णय घे,'' असं मेंदू सांगत असतो. याच वेळी मोठी माणसं ""तू अजून लहान आहेस,'' असं पदोपदी सांगत, दाखवून देत असतात. वास्तविक फ्रंटल लोबचं विकसित होणं, हे मुलांचं प्रौढ जगात टाकलेलं पाऊल असतं. हळूहळू मुलं ऍडल्ट झाल्यावर लागणारी कौशल्यं शिकत असतात.

मात्र, घरात सुसंवाद घडून येत नाही. कारण एकमेकांना विरुद्ध पक्षात टाकलेलं असतं. गोष्टी सुरळीत होण्यापेक्षा बिनसत जातात. आई-बाबांचं मुलांवर प्रेम असतं. मुलांचं चांगलं व्हावं असं वाटतं; पण प्रेम व्यक्त होत नाही. प्रेम व्यक्त केलं, तर मुलं हाताबाहेर जातील, बेशिस्त होतील असा एक समज आपल्याकडे असतो. त्यामुळे घराघरात असे मतभेद दिसून येतात. हे मिटवता येईल, त्यासाठी सर्वांनी एकाच पक्षात, एकाच टीममध्ये असण्याची आणि आपण सर्व एकाच टीममध्ये आहोत हे स्वत:ला आणि एकमेकांना पुनःपुन्हा सांगण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com