'जंक' प्रश्नावर 'पौष्टिक' उत्तर

dr sunil godbole and dr ashwini godbole write junk food article in saptarang
dr sunil godbole and dr ashwini godbole write junk food article in saptarang

शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं या कॅंटीनमधून बिस्किटं, बर्गर, नूडल्स, पिझ्झा वगैरे पदार्थ आता हद्दपार होतील, तर त्यांच्या जागी पराठे, खिचडी वगैरे पौष्टिक पदार्थ येतील. हा निर्णय किती गरजेचा होता? जंक फूडमुळं नक्की काय हानी होते? बंदी घातल्यामुळं मुलांचे पोषणविषयक प्रश्‍न सुटतील का? पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?....या सगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण.

राज्य सरकारनं नुकतीच शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूड खाण्यावर आणि विकण्यावर बंदी घातली आहे. अनेक कंगोरे असलेल्या या प्रश्‍नाचा विचार करण्याआधी मुळात जंक फूड म्हणजे काय, हे आधी समजून घेतलं पाहिजे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जंक फूड म्हणजे ‘टाकाऊ हानिकारक पदार्थ!’ आता आपल्याला आपली मुलं ‘टिकाऊ’ हवी असतील, तर ‘टाकाऊ पदार्थ’ कसे काय चालायचे? सर्वसाधारणपणे तळणीचे पदार्थ, बटाटा बेफर्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, कोल्ड्रिंक्‍स, केक्‍स, बिस्किटं, जेली, कॅंडीज, पेस्ट्रीज, चायनीज-नूडल्स असे आणि इतरही अनेक तत्सम पदार्थ जंक फूड या प्रकारात मोडतात. या पदार्थांची चकाचक दुकानं आणि त्यांच्या त्याहूनही आकर्षक जाहिराती आपल्या सगळ्यांना भुरळ पाडत असतात. त्यात वेगवान आधुनिक जीवनशैलीत सगळंच ‘रेडीमेड’ हवं असतं! त्यातूनही ‘मॉडर्न आई’ला हे अन्नपदार्थ म्हणजे एक ‘वेळ वाचवणारी, कष्ट टाळणारी सोय’ वाटत असते. बरं एवढंच नाही, तर आपले सगळे हिरो-हिरॉईन्स, क्रिकेटपटू या जंक फूडचं येता-जाता गुणगान करत असतात. ‘तुफानी ठंडा’पासून ‘कुछ मीठा हो जाए’पर्यंत सगळं कसं आपल्या लाडक्‍या चॅनेलवर दर ‘ब्रेक’मध्ये झळकत असतं! आपल्या भारतीय व्यक्तींना अमेरिकन व्यक्तींचं भारी कौतुक. त्यातूनच त्यांच्या पिझ्झा-बर्गरचा आपण लगेच स्वीकार करतो (त्यांची नियमित व्यायामाची/ खेळण्याची सवय मात्र सोईस्करपणे विसरतो). काही घरांमध्ये ‘फास्ट फूड’ म्हणजे ‘स्टेटस सिंबॉल’ समजला जातो, तर वयात येणाऱ्या बऱ्याच मुलांना जंक फूड हा चक्क ‘सक्तीचा विषय’ वाटतो किंवा अनिवार्य गरज भासते!

...पण एवढे सगळे जंक फूडला ‘प्रिय पदार्थ’ म्हणत असताना आम्ही डॉक्‍टर लोक मात्र त्याला ‘घातक, त्रासदायक’ वगैरे विशेषणं लावून बदनाम का करतोय? का सरकार अशा सरसकट बंदीचा टोकाचा निर्णय घेत आहे?...या प्रश्‍नांचं उत्तर मिळवण्याआधी एक लक्षात घेतलं पाहिजे, की हा निर्णय केवळ आजच्या महाराष्ट्र सरकारचा नसून, डिसेंबर २०१४पासूनच तो केंद्रीय पातळीवरच्या संशोधनात, नियमावलीत आलेला आहे. हैदराबादची राष्ट्रीय पोषण संस्था हेच अत्यंत सखोल पातळीवर संशोधन करून सांगत आहे.

भारताच्याही आधी अमेरिकेतली १६ राज्यं; तसंच ब्रिटन, आयर्लंड, मेक्‍सिको, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, हंगेरी, फिनलंड, नॉर्वे, फ्रान्स या विकसित देशांनीही या प्रकारचे कायदे केलेले आहेत. अमेरिकेतील बर्कले- कॅलिफोर्निया इथं सोड्याशी संबंधित पेयांवर जादा कर लावण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत शाळांमधली मुलं लक्षणीयपणे जाड झाली. त्यावर त्यांनी जंक फूडवर बंदी आणि एक तास मैदानी खेळाची सक्ती अशा दोनच उपायांचा प्रभावी वापर करून नियंत्रण आणलं आहे. जगभरातल्या अनेक संशोधन संस्थांमध्ये जंक फूडच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. या दुष्परिणामांचा आपण विचार करूः

  •   चौरस आहारामध्ये जो सर्व बाजूंनी समतोल साधलेला असतो, तो फास्ट फूड किंवा जंक फूडमध्ये आढळत नाही. विशेषतः उष्मांक (कॅलरीज) आणि स्निग्धता (फॅट्‌स) त्यात अतिरिक्त प्रमाणात असतात. त्यातून लठ्ठपणाची ‘भेट’ मिळणारच. विशेषतः लहान वयातला लठ्ठपणा म्हणजे मोठेपणीही लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, लवकरच्या वयातला मधुमेह आणि हृदयविकाराची भीती.
  •   जंक फूडमध्ये जीवनसत्त्वं आणि क्षार अत्यल्प आणि असंतुलित असतात. त्यातून प्रतिकारशक्तीची वाट लागते. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूसंसर्गामुळं होणारे आजार वाढतात.
  •   जंक फूड आणि बद्धकोष्ठता हेही ‘घट्ट नातं’ आहे. विशेषतः मैद्याच्या पदार्थांचा त्रास होणारच.
  •   फास्ट फूड खाण्याची (खरं तर ‘चरण्याची’) पद्धत अयोग्य (उभं राहून, जाता-येता, टीव्ही पाहत...) असते. त्यामुळं पोटात पाचक स्राव निर्माण करण्याची प्रक्रिया बिघडते आणि अपचनाचा त्रास सुरू होतो.
  •   जंक फूडच्या ‘खास’ चवीसाठी आणि काही वेळा ‘टिकाऊ’ बनण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. शीतपेयांबद्दलचा या संदर्भातला वाद सर्वश्रुत आहेच.
  •   जंक फूड आणि मुलांमधली अस्थिरता, चंचलपणा यांचा संबंधही काही संशोधनांमधून पुढे आला आहे.
  •   जंक फूड नुसतं पोटावरच नाही, तर मेंदूवरही परिणाम करतं. त्यातून चिडचिड, हट्टीपणा, निद्रानाश असल्या समस्या जाणवतात.
  •   जंक फूड आणि काही ॲलर्जींचाही संबंध लक्षात आला आहे. विशेषतः तळणीचे दाणे, काजू यांचा बालदम्याशी संबंध इथं लक्षात घेण्याजोगा आहे.
  •   बाजारीकरण आणि नफेखोरीच्या वृत्तीमुळं स्वस्त, निकृष्ट, काही वेळा शिळे, टाकाऊ अन्नपदार्थ प्रचंड किमतींत, चकाचक वेष्टनात ग्राहकांच्या माथी मारले जातात.
  •   जंक फूड म्हणजे ‘पैसे टाका आणि मजा करा’ हा दृष्टिकोन. त्यामुळं आईच्या हातचं ताजं, चविष्ट जेवण नाकारण्याची वृत्ती वाढते.
  •   या जंक फूडचं एकदा व्यसन लागलं, की ते अक्षरशः सुटता सुटत नाही. या मोहजालाचं दारू, सिगारेट इत्यादी व्यसनांबरोबरीचं नातंही अगदी जवळचं असतं.
  • या सर्वसाधारण दुष्परिणामांच्या बरोबरीनं आहारशास्त्रीय दृष्टिकोनातूनही काही जंक फूडची चिरफाड करून बघूयात ः

चिप्स आणि फ्रेंच फ्राइज

  •   एका छोट्या चिप्सच्या पॅकमध्ये तीनशेपेक्षा जास्त उष्मांक आढळतात. त्या खाल्ल्यावर भुकेची वाट लागणारच. बरोबरीनं लठ्ठपणा फुकटात!
  •   या चिप्स/ फ्रेंच फ्राइज भरपूर तळलेल्या असतात. यामुळं तेलातलं ‘ॲक्रीलिमाइड’ नावाचं रसायन मोकळं होतं. हे रसायन कर्करोगाचं एक कारण आहे. इतकंच नाही, तर संवेदना वाहून नेणाऱ्या शिरांनासुद्धा त्यानं इजा पोचते.
  •   चिप्समध्ये क्षारांचं (मिठाचं) प्रमाण भरपूर असतं. त्यानं शरीरातल्या पाण्याचं साठून राहणं वाढतं. त्यातून किडनीला ताण येऊ शकतो; तसंच रक्तदाबही वाढू शकतो.
  •   स्वादासाठी वापरण्यात येणारं ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ हे रसायन ॲलर्जी, डोकेदुखी, छाती दुखणं इत्यादी तक्रारींना निमंत्रण देतं.

बर्गर

  •   बर्गरमध्येही अतिरिक्त उष्मांक, स्निग्ध पदार्थ, मिठाचं प्रमाण प्रचंड असतं- जे हानिकारकच आहे. यामध्ये टोमॅटो, भाज्या ‘ताज्या’ दिसण्यासाठी त्यावर ‘सल्फाइट्‌स’ रसायनं वापरली जातात- जी रोगाला निमंत्रण देतात.
  •   बर्गरमधलं चीज हे पचायलाही अवघड आणि वजनवाढीलाही कारण!
  •   विशेषतः ‘मांसाहारयुक्त’ बर्गरबद्दल खूपच काळजी घेतली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मांसाच्या स्वच्छतेची, ताजेपणाची काळजी घेतली जात नाही आणि भयानक आजार होऊ शकतात.

पिझ्झा

  •   यात ‘मैदा’ हा मुख्य घटक असतो. त्यामुळं बद्धकोष्ठता होणारच.
  •   पिझ्झावर घातली जाणारी टॉपिंग्ज, सॉसेस, भाज्या या रासायनिक प्रक्रियेतून टिकवलेल्या असतात. त्यात भरपूर प्रमाणात नायट्राइट्‌स, प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज व सॅट्युरेटेड फॅट्‌स असतात. कधी ना कधी हे सगळे त्रास देणारच.
  •   पिझ्झा, बर्गरबरोबर शीतपेय पिण्याची ‘फॅशन’ पोटापासून डोक्‍यापर्यंत त्रासदायकच.

चायनीज नूडल्स

  •   यात भरपूर प्रमाणात स्टार्च (कर्बोदकं) असतात. ती पचायला अवघड आणि वेळ लावणारी असतात. परिणाम एकचः अपचन.
  •   नूडल्समध्ये जीवनसत्त्वं, उपयुक्त क्षार जवळपास नसतातच.
  •   नूडल्समधल्या प्रिझर्व्हेटिव्ह्‌जबद्दलचा वाद सगळ्यांना आठवत असेलच.

केक आणि पेस्ट्रीज

  •   खरं तर उत्कृष्ट दर्जाच्या, ताज्या पदार्थांपासून बनवलेले केक फारसे वाईट नाहीत; पण हे निकष पाळले नाहीत, तर अपचन, अन्नातून विषबाधा इत्यादी त्रास होऊ शकतात.
  •   पेस्ट्रीजवर फक्त ‘क्रीम’ म्हणजे ‘फॅट्‌स’ आणि भरपूर साखर असते. त्यातून उलट्या, पोटदुखी, जुलाब, भूक मंदावणं इत्यादी तक्रारी होऊ शकतात.
  •   दातांवरचा ‘ॲसिड ॲटॅक’ ही केक आणि पेस्ट्रीजबद्दलची अजून एक चिंता.

शीतपेयं

  •   शीतपेयांमध्ये भरपूर साखर असते. त्यामुळं वजन तर वाढतंच; पण बरोबरीनं पचनयंत्रणा कमकुवत होते. जेवणानंतर शीतपेय प्यायल्यामुळं जेवण नीट पचू शकत नाही.
  •   शीतपेयांमधली अतिरिक्त साखर पचण्यासाठी शरीराला जास्त प्रमाणात ‘इन्सुलिन’ तयार करावं लागतं. वर्षानुवर्षं हे असंच चालू राहिल्यास शेवटी ‘मधुमेहाची ओळख’ होणारच.
  •   शीतपेयं ‘ॲसिडिटी’ वाढवतात. शीतपेयांचा ‘पीएच’ २.५ म्हणजे प्रचंड ॲसिडिटी असणारा असतो. त्यामुळं हाडांची झीज, पचनाचे विकार इत्यादी जाणवणारच.
  •   शीतपेयांमधले अतिरिक्त फॉस्फेट्‌स इतर क्षार (कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी) नष्ट करतात. त्यातून हाडांची झीज, लवकर म्हातारपण, हृदयविकार इत्यादी व्याधी उद्‌भवतात.

याचबरोबर इतर चमचमीत पदार्थ उदाहरणार्थ सामोसा, वडापाव यांचा कदाचित वरील पदार्थांइतका वाईट परिणाम नसेलही; पण त्यातून अतिरिक्त कॅलरीज आणि फॅट्‌स नक्की मिळणार. याचा थेट संबंध परत एकदा लठ्ठपणाशी आहे. मिठाया, गोड गोळ्या, जेलीज हे पदार्थ कधी तरी गंमत म्हणून, पार्टी म्हणून खाणं वेगळं; पण रोजच रतीब सुरू केला, की परत फक्त कॅलरीज आणि फॅट्‌सची भर पडणार.

‘जंक फूडबंदी’नं फरक काय?
नुसती शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालून काय साध्य होणार, असा एक प्रश्‍न नक्कीच आहे. माझ्या एका मित्रानं ‘हल्ली पालक मुलांना घरात काय खायला घालतात,’ असा प्रश्‍न विचारला. पालकच मुलांना जंक फूडचं व्यसन लावणार असतील, तर नुसत्या शाळेतल्या बंदीचा काय उपयोग होणार?
या प्रश्‍नांवर कॅलिफोर्नियातल्या शाळांमधल्या संशोधनात छान उत्तर मिळालं आहे. केवळ शाळेत जंक फूडवर बंदी घालण्यामुळं रोज प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या १६० कॅलरीज (गरज नसलेल्या) कमी झाल्या. अर्थातच वजन नको तितकं वाढण्याचा वेगही मंदावला. गंमत म्हणजे या संशोधकांनी मुलांच्या घरच्याही जंक फूडचा वापर मोजला. शाळेत बंदी आली, तरी घरात जंक फूडचा वापर वाढला नाही हेच त्यात सापडलं.
कॅलिफोर्नियातल्या याच शाळांमध्ये सॅलड्‌स, फळं, सुका मेवा यांची स्वयंचलित ‘व्हेंडिग यंत्रं’ सुरू करण्यात आली. काही काळानंतर या पोषक अन्नपदार्थांचा मुलांच्या आवडीमध्ये समावेश होऊ लागला!

अजूनही ‘शाळा’ ही जीवनमूल्यं शिकण्याची जागा मानली जाते. शाळेमध्ये इतर मुलांकडून जो प्रभाव पडत असतो, तो कायमचा रुजला जातो. किमान तिसरी-चौथीपर्यंत तरी शिक्षकांच्याही शब्दांचा मुलांवर प्रभाव असतो. परंतु शिक्षकांची उक्ती आणि शाळेची कृती यात फरक असेल तर गोंधळ उडणारच.

फक्त उच्चभ्रू शाळांमधलं फॅड?
जंक फूड कॅंटीन हे फक्त काही उच्चभ्रू शाळांमधलं फॅड आहे, असंही काही जण म्हणतील. काही अर्थी हे बरोबरच आहे. कारण काही न कळणाऱ्या वयात  ‘पॉकेट मनी’ मिळणाऱ्या मुलांसाठी, आधुनिक पालकांसाठी आणि त्यामुळं त्यांच्यासमोर स्वतःला ‘मॉडर्न’ सिद्ध करण्यासाठी या उच्चभ्रू शाळांमध्ये/ कॉलेजमध्ये जंक फूड येणारच. त्यावर प्रचंड आर्थिक ताकद असणाऱ्या जंक फूडच्या बाजारपेठांचाही दबाव असतो. कारण त्यांनाही मुलं ही ‘सॉफ्ट टार्गेट’ आणि उद्याच्या कायमस्वरूपी ग्राहकांची खात्री दिसत असते. मात्र, सर्वसामान्य शाळांमध्येही जंक फूडचा प्रवेश झाला आहे. दुर्दैवानं त्यात गुणवत्तेतही परिस्थिती वाईट आहे. तिथं कदाचित ‘बर्गर’ आढळणार नाही; परंतु, वडा-पाव, खारी-बिस्किटं आहेतच की! म्हणजे प्रश्‍न अर्थकारणाचा नसून, ‘जीवनशैलीचा’ आहे.

‘पौष्टिक’ उत्तर काय?
खरं तर आपली भारतीय आहारातली विविधता आपल्याला ऋतूंनुसार, जागेनुसार आणि परवडण्यानुसारसुद्धा अनेक सोपे, स्वस्त; पण पौष्टिक न्याहारीचे पदार्थ देऊ शकते. अगदी दाक्षिणात्य इडली-सांबारापासून काश्‍मिरी पुलावापर्यंत, गुजराती ढोकळ्यापासून बंगाली खिरीपर्यंत मुलांना आवडतील असे इतके पदार्थ आहेत, की रोज एक पदार्थ बनवायचा ठरवला, तरी वर्षाचे ३६५ दिवस वेगळा पदार्थ देता येईल. आपल्या नुसत्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा विचार केला, तरी वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की, राजगिरा लाडू, पोहे, उपमा, दलिया, मसालेभात, थालीपीठ असे पदार्थ मुलांना देता येतील. नारळाचं पाणी, लस्सी, लिंबू सरबत, कोकम सरबत ही ‘कूल’ सरबतं कृत्रिम शीतपेयांच्या ऐवजी देता येतील. ऋतुमानाप्रमाणं मिळणारी फळंसुद्धा शाळेच्या कॅंटीनमध्ये देता येतील.

मुलांना हा बदल कितपत आवडेल?
हा प्रश्‍न मुलांच्या आवडीनिवडीचा नसून, तुम्हा-आम्हा मोठ्यांचा आहे. पालक, शिक्षक आणि डॉक्‍टरांनी एकत्र येऊन ठरवलं, स्वतःमध्ये विचारपूर्वक बदल केले, तर फक्त एका शैक्षणिक वर्षात हा बदल दिसेल. शाळेचं नंतर बघू... साधा आपल्या मुलांचा वाढदिवस जंक फूडशिवाय साजरा करून बघूयात! मुलांचं कौतुक करताना कॅडबरीच्या ऐवजी लोणावळा चिक्की देऊन बघूयात! शीतपेयांच्या बाटल्या न आणता मुलांनाच स्वतः सरबत बनवायला शिकवूयात! आपल्या पार्ट्या म्हणेज श्रीमंतीचं प्रतीक न मानता आपल्या कौटुंबिक चालीरितींचं सादरीकरण करण्याची संधी मानूयात! हॉटेलमध्ये मेनू निवडताना पौष्टिक पदार्थ विचारपूर्वक निवडूयात! आपल्या जीवनशैलीत बदल करूयात!

एवढाच उपाय पुरेसा आहे का?
जंक फूडला शाळेत बंदी घालणं ही तर फक्त सुरवात आहे. लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधनपत्रिकेच्या फेब्रुवारी २०१५च्या अंकात ‘निरोगी-अन्न-धोरण’ मुद्देसूद दिलं आहे. त्यातले काही मुद्दे ः

  •   मुलांसमोर जाहिरातीवर निर्बंध.
  •   जंक फूडवर भरपूर कर.
  •   मुलांचं, पालकांचं पौष्टिक अन्नाबद्दल निरंतर शिक्षण.
  •   पौष्टिक अन्नपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेला सरकारी पातळीवर प्रोत्साहन.
  •   समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पौष्टिक अन्नाच्या पर्यायांची सहज उपलब्धता.
  •   वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या मदतीनं आरोग्यशिक्षण.
  •   समाजातल्या मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून योग्य प्रसार.
  •   दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी.
  •   पुरेसा निधी उपलब्ध करून देणं.
  •   सरकारी यंत्रणेत लोकांचा, पालकांचा, शाळांचा, मुलांचाही सहभाग.
  •  अन्नप्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंतचा अन्नसाखळीच्या गुणवत्तेवर नियंत्रण आणि संरक्षण.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या आहारातून जंक फूडची हकालपट्टी करायची असेल, तर सरकारी उपाययोजनांची नव्हे, तर आपल्या जीवनशैलीत सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल करायची गरज आहे. मोबाईल-संगणक-टीव्हीच्या विळख्यात न अडकता भरपूर खेळणं, व्यायाम गरजेचा आहे. विचारांमध्येसुद्धा सकारात्मकता हवी. तेव्हा कुठं चौरस, पौष्टिक आहारही सहजसाध्य होईल. थोडक्‍यात ‘स्वास्थ्य’ची व्याख्या म्हणजेच ‘स्वस्थ आहार-स्वस्थ विहार-स्वस्थ विचार’ हीच गुरुकिल्ली!

(लेखक डॉ. सुनील गोडबोले हे बालविकासतज्ज्ञ असून, डॉ. अश्‍विनी गोडबोले यांनी या लेखासाठी संशोधनसाह्य केलं आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com