वय कोवळे उन्हाचे... (डॉ. वैशाली देशमुख)

palak katta
palak katta

मुली वयात येण्याची स्थिती हल्ली लवकर येताना दिसत आहे. आधुनिक जगातले ताणतणाव, लठ्ठपणा आणि मुख्य म्हणजे वातावरणातलं प्रचंड वाढलेलं प्रदूषण या गोष्टी त्याला जबाबदार आहेत! प्लॅस्टिक, किटकनाशकं, कॉस्मेटिक्‍स, कृत्रिम खतं, रंग, जंतुनाशकं, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे अशा अनेक गोष्टींमध्ये एन्डोक्राइन डिस्रप्टिंग केमिकल्स (ईडीसी) असतात. ही रसायनं आपल्या शरीरात घुसून निरनिराळ्या संस्थांना, मुख्यत: संप्रेरकसंस्थेला चक्क फसवतात. त्यामुळं वयात येण्याची स्थिती लवकर होते. पालक म्हणून आपण काय करायचं? कोणत्या काळजी घ्यायच्या?...

वयात येणं म्हणजे काय? मुलं मोठी का होतात? वयात येण्याची पूर्वतयारी आत्ता, वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासूनच करायला हवी का? विशेषत: मुलींच्या बाबतीत? "पालककट्टा' या सदरात या वेळी हे प्रश्न उपस्थित करावेसे वाटले, त्याला एक कारण घडलं. ते म्हणजे गेल्या आठवड्यातली प्लॅस्टिकवर बंदीची बातमी! काही तरी फार असंबद्ध वाटतंय का? पण तसं ते नाहीये. खरंच या दोन गोष्टी एकमेकांवर परिणाम करतात. शास्त्रीय संशोधनांतून प्लॅस्टिकमधली किंवा तत्सम रसायनं आणि मुली लवकर वयात येणं यांचा परस्परसंबंध असल्याचं सिद्ध झालंय. कसा तो पाहू.
सजीवांविषयी आपण शाळेत शिकलोय. अगदी अमिबासारख्या साध्या, एकपेशीय प्राण्यापासून गुंतागुंतीच्या सस्तन प्राण्यांपर्यंत ही एक मालिका असते. माणूस हा त्यातला सर्वांत विकसित झालेला प्राणी. त्याचं शरीर असंख्य पेशींनी बनलेलं असतं. त्या इवल्याशा पेशीतल्या त्याहूनही इवल्याशा केंद्रकात असतात जनुकं आणि त्यांच्यामध्ये भरलेले असतात असंख्य प्रोग्रॅम्स! अनेक वेगवेगळ्या संस्था असतात. एकमेकांशी मेळ साधून एका लयीत त्या काम करत असतात. फक्त एका पेशीपासून तयार झालेलं हे शरीराचं यंत्र इतक्‍या बिनचूकपणे काम करतं हे एक नवलच आहे.
आपल्या शरीराच्या या शिस्तबद्ध कार्यक्रमातला एक भाग म्हणजे वयात येणं. ही घटना जनुकं, संप्रेरकं आणि आजूबाजूचं वातावरण या सर्वांच्या परस्पर-प्रक्रियेतून होते. प्रत्यक्ष पाळी सुरू होण्याआधी किती तरी घडामोडी आपल्या संप्रेरक-संस्थेत आणि मेंदूत होत असतात. लहानपणी मुलं आणि मुली यांच्यात स्रवणाऱ्या संप्रेरकांमध्ये तसा फारसा फरक नसतो. आता मात्र मुलींमध्ये इस्ट्रोजेन हे स्त्रीजनन संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्रवायला लागतं. त्यामुळं दिसणारी पहिली शारीरिक खूण म्हणजे स्तनांची वाढ. त्यानंतर साधारण एक ते तीन वर्षांत पाळी सुरू होऊ शकते. काही दशकांपूर्वी पाळी आली, की बाजूला बसायची पद्धत होती (काही ठिकाणी अजूनही आहे). त्यावेळी या वयाच्या मुलींना अगदी थातूर-मातूर स्पष्टीकरण दिलं जायचं, "कावळा शिवलाय' वगैरे. आता मात्र तसं चालत नाही, स्पष्ट शास्त्रीय माहिती द्यावी लागतेय. त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आता या प्रक्रियेविषयी स्पष्टता आलीय, त्यामागचं शास्त्रीय कारण कळलंय, त्याचा नैसर्गिकपणा कळलाय. आणि दुसरं असं, की ही माहिती थोडी लवकर देणं आवश्‍यक झालंय कारण पौगंडावस्थेचं वय अलीकडं येत चाललंय.

मुळात वयात येणं (puberty) कसं आणि केव्हा सुरू होतं याविषयी वैद्यकीय क्षेत्रात अजूनही पुरेशी स्पष्टता नाही; पण शरीरातलं मेदाचं प्रमाण, आनुवंशिकता असे घटक यात महत्त्वाची भूमिका बजावतात असं दिसतं. मग आजकाल का बरं हे सगळं लवकर घडतंय? त्याला जबाबदार आहेत आधुनिक जगातले ताणतणाव, लठ्ठपणा आणि मुख्य म्हणजे वातावरणातलं प्रचंड वाढलेलं प्रदूषण! आणि यात प्लॅस्टिकचा वाटा सिंहाचा आहे. अन्न आणि पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोच आहे; पण त्यातले विषारी पदार्थ माती, पाणी आणि हवा यात मिसळून आपल्या पोटात जातायत. त्यांना एन्डोक्राईन डिस्रप्टिंग केमिकल्स किंवा "ईडीसी' असं म्हणतात. ही रसायनं प्लॅस्टिकव्यतिरिक्त किटकनाशकं, कॉस्मेटिक्‍स, कृत्रिम खतं, रंग, जंतुनाशकं, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे अशा अनेक गोष्टींमध्ये असतात. ती आपल्या शरीरात घुसून निरनिराळ्या संस्थांना, मुख्यत: संप्रेरकसंस्थेला चक्क फसवतात. इस्ट्रोजेन या संप्रेरकाची ती नक्कल करतात. भीतीदायक गोष्ट अशी, की आपण जे अन्न खातो, जे पाणी पितो, इतकंच नव्हे तर जो श्वास घेतो त्यातूनही ही विषारी रसायनं आपल्या शरीरात जाऊ शकतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांचा आपल्या शरीरातला प्रवेश सोपा झालाय.

एरवी बऱ्यापैकी निवांतपणे, सुरळीत होणारं बालपणापासून ते प्रौढपणापर्यंतचं संक्रमण यामुळं काहीसं अस्थिर झालंय. त्या त्या वयाची शारीरिक-मानसिक विकासाची कामं पूर्ण होण्याआधीच नवीन कामांचा भार पडायला लागलाय, पाया बांधून होण्याआधी भिंत बांधायला लागावी तसा. याचे परिणाम फक्त शरीरावरच नव्हे, तर मनावर आणि सामाजिकीकरणावरही व्हायला लागलेत.

उंची सर्वाधिक गतीनं वाढण्याचा काळ हा पाळी येण्याआधी असतो. कारण तेव्हा यासाठी आवश्‍यक असलेली ग्रोथ होर्मोन, इस्ट्रोजेन यासारखी संप्रेरकं जोमानं स्रवत असतात. लवकर वयात आलं, की सुरवातीला उंची सटासट वाढायला लागते; पण लवकरच ती वाढायची थांबते आणि शेवटी कमी उंचीवर समाधान मानायला लागतं. शरीराचा आकार बदलतो, स्तनांची वाढ होऊ लागते, काखेत केस येऊ लागतात. अर्थातच त्यामुळे मुलींच्या हालचालींवर बंधनं येतात. खेळणं कमी होतं. कुठले कपडे घालावेत, पाळीमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी कशी घ्यावी, यावरही विचार करायला लागतो. शरीर मोठं दिसायला लागतं खरं; पण आतून मन अजून बालिशच असतं. या सगळ्याचं आकलन होणं त्यांच्यासाठी तसं कठीण असतं. त्यातून अनेक मनोसामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. नैराश्‍य, लैंगिक प्रयोग, धोकादायक वागणुकी यांचं प्रमाण लवकर वयात येणाऱ्या मुलींमध्ये अधिक प्रमाणात दिसून आलंय. बघणाऱ्यांची नजरही बदलते, अपेक्षा वाढतात. पालक, समाज आणि मुली यांच्यात भावनिक खेचाखेच चालू होते. आधी म्हटल्याप्रमाणं बरीचशी रसायनं आपल्या शरीराला गुगली टाकत असल्यामुळे संप्रेरकसंस्थेबरोबरच इतर अनेक संस्था गोंधळून जातात. त्यामुळे प्रौढपणात डायबेटिस, कॅन्सर, ब्लड प्रेशरसारख्या आजाराचं प्रमाणही वाढलेलं दिसून आलंय.

स्तनांच्या वाढीची सुरवात ही इशारा देत असते, लवकरच पाळी सुरू होणार असल्याचा! पुढे येऊ घातलेल्या बदलांची माहिती देण्याची, मनाची तयारी करण्याची हीच वेळ असते. ही सुरवात आठ वर्षांच्या आधी झाली असेल, तर सजग व्हायला हवं. डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा. शारीरिक तपासणी, रक्ताच्या काही तपासण्या आणि हाडांचं वय समजण्यासाठी एक्‍स रे यावरून एकूण परिस्थितीचा डॉक्‍टर अंदाज घेतात. आवश्‍यकता वाटली, तर काही हार्मोनसदृश औषधांचा वापर करून ही प्रक्रिया थोपवून धरता येते; पण औषधांचे दुष्परिणाम आणि पाळी पुढं ढकलण्याचे फायदे यांचा सारासार विचार करूनच हा निर्णय घेतला जातो. बहुतेकवेळा एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली, की ती स्वीकारणं जास्त सोयीचं पडतं.

आपण काय करू शकतो?
- डॉक्‍टरांच्या सल्ल्यानं तपासण्या आणि औषधोपचार
- मुलींची मानसिक तयारी, त्यांना मानसिक आधार
- आवश्‍यकतेनुसार पुढे येऊ घातलेल्या बदलांची माहिती
- भरपूर व्यायाम
- परिस्थितीचा सकारात्मकतेनं स्वीकार

टाळण्यासाठी काय करता येईल?
- आपली मुलं लठ्ठ होत नाहीयेत ना, इकडे लक्ष द्यायला हवं. त्यासाठी नियमित मैदानी खेळ, भरपूर चोथा असलेलं ताजं, घरचं अन्न, कमीत कमी जंक फूड
- कॉप्युटर, टीव्ही यांच्यासमोर घालवला जाणारा वेळ कमीत कमी ठेवणं
- प्रक्रिया केलेलं, हवाबंद डब्यातलं अन्न टाळणं
- प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर
- भाज्या, फळं वापरण्याआधी स्वच्छ धुवून घेणं
- जास्तीत जास्त नैसर्गिक आहार-विहार

तसं बघायला गेलं, तर यातल्या कित्येक घटकांवर, बदलांवर आपलं काहीसुद्धा नियंत्रण नाही. पर्यावरणाचं बिघडतं चक्र उलटं फिरवणं अवघड आहे. त्यामुळं या बदलांना समोर जाण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही; पण निदान पूर्वीच्या मानानं पाळीच्या वेळी घ्यायची काळजी सुकर जावी, अशी परिस्थिती आहे. पालकांमधली सजगता, दर्जेदार, शोषक सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता, बऱ्याचशा शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय आणि समाजाचा पाळीकडे बघण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन अशा काही चांगल्या गोष्टी घडताहेत. आपल्या आणि मुलींच्या मनाची तयारी करणं मात्र आपल्या हातात आहे. योग्य आधार मिळाला तर वाटतं त्या मानानं मुली याचा स्वीकार बऱ्यापैकी करतात. याविषयी तिरस्कार, वैतागाची भावना न येऊ देता त्या हे संक्रमण सकारात्मकरीत्या स्वीकारतील हे आपण पाहूया. त्यांच्याशी याबद्दल योग्य वेळी खुलेपणानं बोलूया. त्याबाबत चिडवाचिडवी न करता मुलींना योग्य तो आदर द्यायला मुलांनाही शिकवूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com