बदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

जमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात. जी मुलं सभोवतालाशी आणि बदलांशी जुळवून घेऊ शकतात ती वर्गात जास्त उत्साहानं सहभागी होतात, शाळेचा आनंद घेतात; आत्मविश्वासानं आणि काही एका ध्येयानं आयुष्याला सामोरी जातात, असं एका अभ्यासात दिसून आलं. असं होण्याचं कारण म्हणजे आलेल्या परिस्थितीला आनंदानं, कुरकुर न करता हाताळण्यासाठी लागणाऱ्या अनेक खुब्या त्यांच्याकडं असतात. मनाविरुद्ध काही घडलं, तर हतबल होण्याऐवजी ती त्यातून सकारात्मक मार्ग शोधतात, अपयशामध्येही संधी शोधतात, नवनवे प्रयोग करत राहतात. या सगळ्याला एखादी व्यक्ती कशा प्रकारे तोंड देईल यावरून तिचं आयुष्य कसं असेल ते ठरतं.

It is not the strongest of the species that survive, nor the most intelligent, but the ones most adaptable to change!
...दुनियेत टिकून राहण्यासाठी फक्त शक्ती आणि बुद्धी असून चालत नाही, तर त्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेण्याची युक्ती लागते! नेहमी कायम, स्थिर राहणारी एकच गोष्ट म्हणजे बदल! मग ते बालपणातून उमलून येणारं तरुणपण असो, की तारुण्याच्या ताठ कण्यातून, झुकलेल्या वृद्धत्वात केलेला सहजप्रवेश असो! घरच्या आश्वस्त कोशातून बालवाडीत टाकलेलं पाहिलं पाऊल असो, की शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मोहमयी दुनियेत केलेली सफर असो! बदलणारे मित्रमैत्रिणी असोत की कपडे; गाव असो की घर! मात्र, इतक्‍या सार्वत्रिक असणाऱ्या बदलांना आपण घाबरतो. आपल्या नेहमीच्या जागा, माणसं, काम, अन्न या सगळ्या गोष्टी इतक्‍या उबदार, सोयीच्या आणि सवयीच्या असतात, की अनोळखी प्रदेशात प्रवेश करणं नकोसं वाटतं. इतकंच नव्हे, तर आपल्या मुलांनाही शक्‍यतो एक अगदी स्थिर, सुरळीत आयुष्य मिळावं, त्यांना फारसे टक्केटोणपे खायला लागू नयेत याच्या तजविजीत असतो आपण.

जुळवून घेण्याची प्रक्रिया तीन विभागात होते ः वर्तणूक, विचार आणि भावना. वागणुकीत बदल करणं म्हणजे अधिक जोमानं प्रयत्न करणं, आवश्‍यकता भासेल तिथं मदत मागणं, आणि इतरांना मदत करणं. विचारांचं काम असतं नवनवीन कल्पना सुचणं, चौकटीबाहेरचे विचार, आणि स्वत:शी सकारात्मक संवाद! तर बदल होत असताना जाणवणाऱ्या तणाव, चिंता अशा नकारात्मक भावनांचं नीट समायोजन करता येणं, इतरांच्या भावना ओळखून त्याप्रमाणं पावलं उचलणं हा जुळवून घेण्यातला भावनिक भाग झाला.

बदलांचा स्वीकार किंवा अस्वीकार हा एकेकाचा स्वभाव असतो. प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. काही जण पटकन सरावतात, काही जण वेळ घेतात, तर काहींना ते जमतच नाही. त्यातून आजच्या जगात बदल भोवंडून जाणाऱ्या वेगानं होतायत. कुठलंही क्षेत्र घ्या, वैद्यकीय, तंत्रज्ञान, दळणवळण, फॅशन... आजची गोष्ट उद्या जुनी झालेली असते. त्यामुळं तर हे जास्तच आव्हानात्मक झालंय. जी मुलं बदलांचा सहज स्वीकार करू शकतात, त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट करून घेणं सोपं असतं. नाही तर मात्र कपडे बदलण्यासारखी किंवा शाळेत जाण्यासारखी एखादी साधी सोपी गोष्ट का असेना, प्रत्येक प्रसंग समरप्रसंग होतो.

जमवून घेण्याचे शाळेत आणि एकूणच आयुष्यात बरेच फायदे दिसून आलेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं यामुळे मुलांसमोर उघडतात. जी मुलं सभोवतालाशी आणि बदलांशी जुळवून घेऊ शकतात ती वर्गात जास्त उत्साहानं सहभागी होतात, शाळेचा आनंद घेतात. ती आत्मविश्वासानं आणि काही एका ध्येयानं आयुष्याला सामोरी जातात, असं एका अभ्यासात दिसून आलं. असं होण्याचं कारण म्हणजे आलेल्या परिस्थितीला आनंदानं, कुरकुर न करता हाताळण्यासाठी लागणाऱ्या अनेक खुब्या त्यांच्याकडे असतात. नव्याची आस, कल्पक आणि चिकित्सक वृत्ती, परिस्थितीला किंवा इतरांना दोष न देणं, पुढं येऊ घातलेल्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ठेवणं या त्यातल्या काही. मनाविरुद्ध काही घडलं, तर हतबल होण्याऐवजी ते त्यातून सकारात्मक मार्ग शोधतात, अपयशामध्येही संधी शोधतात, नवनवे प्रयोग करत राहतात. या सगळ्याला एखादी व्यक्ती कशा प्रकारे तोंड देईल यावरून तिचं आयुष्य कसं असेल ते ठरतं. कुठल्याही थोर, यशस्वी व्यक्तींचं उदाहरण घेतलं, तर लक्षात येईल, की अडथळा आला म्हणून ते अडून बसले नाहीत. कधी लव्हाळ्यासारखं झुकून, तर कधी नदीच्या पाण्यासारखं वाट मिळेल तसं वाहून, कधी ओल्या मातीच्या गोळ्यासारखं स्वत:ला मोल्ड करून, तर कधी छोटी छोटी पावलं टाकून ते पुढं पुढं जात राहिले.

दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली, की पालकांकडून शाळेकडे अनेक तक्रारी येतात. "या वर्षी मुलांच्या तुकड्या का बदलल्या?', "त्याच्या मित्राला त्याच्या शेजारी बसू दे', "अमुक मुलगी माझ्या मुलीला त्रास देते, तिला प्लीज सांगा' अशा अनेक सूचना पालक करतात. एका शाळेत एकदा शिक्षकांनी पालकांना सांगितलं ः "या वर्षी आपण अशा कोणत्याही सूचना न देऊन पाहू. यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे एक चॅलेंज आहे असं समजू आणि या वर्षी होणाऱ्या प्रत्येक बदलाला सामोरं जाण्याची मुलांना संधी देऊ. एखाद्याला नाहीच जमलं तर मदत करायला शिक्षक आहेतच.' हा प्रयोग करण्याचं कारण म्हणजे शाळा हा एक प्रकारे आयुष्याचा आरसा असतो. नंतर येणाऱ्या आव्हानांचं प्रतिबिंबच यात पडतं. आपल्या बऱ्या-वाईट निर्णयांचा परिणाम काय होतो, अनोळखी व्यक्तींशी मैत्री कशी करायची, गटामध्ये काम कसं करायचं, मनाविरुद्ध असलेल्या सूचनांचं पालन कसं करायचं, सार्वजनिक अपमान कसा हाताळायचा याचा अनुभव घेतल्यामुळं प्रत्यक्ष वेळ आली, की त्याचा त्यांना उपयोग होतो. सिम्युलेटरमध्ये सुरक्षितपणे बसून गाडी शिकण्यासारखं आहे हे. त्या प्रसंगांना सामोरं तर जायचं; पण त्यातल्या धोक्‍यांना बळी न पडता त्यातून धडे घ्यायचे! मुलं जेव्हा कुणाच्याही लुडबुडीशिवाय दोस्तांबरोबर खेळतात, मैदानावर गटांमध्ये खेळतात, तेव्हाही असंच काहीसं शिक्षण होतं.

आपण आधी म्हटलं, की बदलांशी जुळवून घेण्याची प्रत्येकाची क्षमता जन्मजात आणि निरनिराळी असते. काय होईल ती कमी असेल तर? खरं तर याचा एक फायदाही असतो. ही मुलं सहसा कुठलं, तरी वेडं साहस करायच्या भानगडीत पडत नाहीत, उगीचच अनुभव घ्यायचे म्हणून काहीतरी प्रयोग करायला जात नाहीत. त्यामुळं आई-बाबांना ती काळजी नको; पण धोका असा की परिस्थितीला हाताळायला नाईलाजानं दारू, ड्रग्ज, जुगार, गुन्हेगारी, समाजविरोधी वर्तन, राग, वैफल्य, नैराश्‍य, आत्महत्या, हिंसाचार असे नको ते मार्ग चोखाळले जाऊ शकतात. मग ही क्षमता वाढवता येईल का? काही प्रमाणात ते शक्‍य आहे. मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचेच; पण त्यांची प्रत्येक मागणी पुरी करण्याचा अट्टाहास नको, एखादं मूल बदलांविषयी नाखूष आहे म्हणून परिस्थिती जैसे थे ठेवायची, असं नको. एक दैनंदिन वेळापत्रक असलं, काय काय करायचंय याची पूर्वसूचना मिळाली, तर काम काहीसं सोपं जातं. (विशेषत: जी मुलं शाळेत जाताना आवरायला त्रास देतात, त्यांच्याबाबतीत हे उपयोगी पडतं.) शिवाय बदल हळूहळू झाले, तर त्यांना जुळवून घेण्याला अवसर मिळतो. फार अवघड जात असेल, तर थोडी फार मदत करायला लागते. पालकांचा स्वभाव आणि मुलांचा स्वभाव यात या बाबतीत काही वेळा फरक असतो. मग चकमकी होतात, ठिणग्या उडतात. यासाठी आई-बाबांची जुळवून घेण्याची, नवनवीन अनुभवांना सामोरं जाण्याची कितपत मानसिकता आहे, आणि मुलांच्या बाबतीत ती कशी आहे याचा नीट अभ्यास केला तर त्यानुसार मुलांशी वागता येतं. रोजच्या अनुभवातून, निरीक्षणातून हा अंदाज घेता येतो.

शिवाय बदलांविषयी मुलांचे नक्की काय विचार आहेत ते शब्दात मांडायला त्यांना मदत केली, तर आपल्याला कशाची भीती वाटतेय, का नको वाटतंय हे त्यांच्या लक्षात येईल. आणि ही भीती घालवण्याचा प्रयत्न करता येईल. उदाहरणार्थ, एखादा मुलगा नवीन शाळेत जाण्याआधी "तिथं गेल्यावर माझे जुने मित्र नसतील, मला एकटं राहायला लागेल, फार बोअर होईल...' असा विचार करत असेल, तर ऍडजस्ट होण्यासाठी त्याला असे काही मुद्दे घेऊन मदत करता येईल ः "कुठलीही गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट नसते. तिला इतरही बाजू असतात, अनेक पर्याय असतात. बदल झाला आणि तो मनाविरुद्ध असेल, तर नुसती वाट बघत बसण्यापेक्षा आपणहून प्रयत्न केले, तर तीच गोष्ट आनंददायी होऊ शकते. मग काय काय बरं करता येईल? नवीन मित्र कसे मिळवता येतील? नव्या शाळेत आधीच्या शाळेपेक्षा काय काय जास्त चांगलं आहे?...'

हा विषय तसा न संपणारा आहे; पण एकूण, बदलांबरोबर चपखलपणे लय साधता आली, तर मुलाचं आणि पालकांचं आयुष्य सुरेल बनू शकतं हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com