धोक्‍याची (नकार)घंटा (डॉ. वैशाली देशमुख)

धोक्‍याची (नकार)घंटा (डॉ. वैशाली देशमुख)

नकार परिणामकारक ठरण्यासाठी त्याला काहीतरी ठोस कारण हवं, आपली स्वत:ची त्याबद्दल खात्री हवी. आपल्या विचारांच्या चिलखतात थोडी जरी फट असेल, तर मुलं ती लगेच टिपतात. त्यामुळं ‘नाही’ म्हणण्याआधी नीट विचार करायला लागतो. नंतर निर्णय बदलला, की मुलं गोंधळतात. त्या नकाराला काही अर्थच राहत नाही. आणखी एक, पुनःपुन्हा ‘नाही’ म्हटलं तर त्याची धार जाते. म्हणजे ठाम राहणं आणि सातत्य राखणं या दोन्ही गोष्टी हव्यात. यात आईबाबांची आणि घरातल्या इतरांची संयुक्त आघाडी हवीच.

नी  ना लहानपणी अगदी शहाणी मुलगी होती. घरी आई, बाबा, आजी, आजोबा आणि ती. एकुलती एक राजकन्या. सगळे जण तिचं कौतुक करायचे. कधी कुठला हट्ट नाही की रडारड नाही; पण हे चित्र कधी हळूहळू पालटत गेलं कळलंच नाही. एकदा काय झालं, नीनानं आईला विचारलं ः ‘‘आई, मी लाडू घेऊ?’’  
ः ‘‘नको’’
ः ‘‘का? घेते ना एक’’
ः ‘‘नाही म्हटलं ना!’’
ः ‘‘का पण? एक घेतला तर काय होतंय?’’  
ः ‘‘बरं, घे. पण परत मागायचा नाही.’’
नीनानं यातून तिला हवा तो अर्थ काढला. आईच्या लक्षात नंतर आलं, की आपण ठाम राहायला हवं होतं. मग पुढच्या वेळी तिनं जरा ताणून धरलं. मग नीनानं निरनिराळ्या हिकमती वापरायला सुरुवात केली. रडणं, जमिनीवर अंग टाकणं, सगळं घर डोक्‍यावर घेणं, वाद घालणं, आईबाबांना शब्दांत पकडणं, त्यांच्यापैकी एकाला आपल्या बाजूनं वळवून घेणं... असं एकापाठोपाठ क्रमानं करून आपल्याला हवं ते मिळवण्यात ती आता पटाईत झाली. तिनं तिचा तो विशिष्ट चेहरा केला, की पुढं काय रामायण घडणार ते सगळ्यांना पाठ झालं. ‘नाही’ हा शब्द तिच्यासमोर उच्चारायची चोरी झाली.

चढती भाजणी
नकार न पचवण्याची ही अशी एक चढती भाजणी असते. सुरवात अगदी साध्यासाध्या गोष्टींनी होते आणि चोरपावलांनी उग्र रूप धारण करते. एकदा का ती त्या स्थितीला पोचली, की मग काही खरं नाही. त्यातून बाहेर निघणं अवघड होऊन बसतं. पालक म्हणतात ः ‘‘आमच्या मुलांना ‘नाही’ ऐकून घ्यायची सवयच नाही हो!’’ आणि असंही म्हणतात ः ‘‘आम्ही नसलो ना, की सुतासारखी सरळ असतात. सगळे नखरे आमच्यासमोर.’’ असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा थोडा विचार करूया, की असं का बरं होत असेल? आपण सवयीनं नाही म्हणतोय का? मुलाचं ऐकून घेत नाही आहोत का? त्यांच्या मताला किंमत देत नाही आहोत का? आपलं उत्तर आपल्या सोयीनुसार, मूडनुसार, वेळेनुसार ‘हो’, ‘नाही’मध्ये हेलकावतंय का? त्यामुळं मुलं गोंधळताहेत का?
ही ‘नाही’ न ऐकण्याची सवय किती घातक ठरू शकते! नकार दिल्यामुळं ॲसिड ॲटॅक होऊन बेरूप झालेल्या मुली आठवा! नाहीतर दारूच्या पेल्यात, ड्रग्जच्या धूम्रवलयात दु:ख बुडवण्याचा असफल प्रयत्न करणारी मुलं. नकारामुळं डोकं फिरवून घेऊन तो राग सगळ्या जगावर काढणारी मुलं आणि जगाबरोबर स्वत:ही त्यात जळून खाक होणारी मुलं. आयुष्यभर स्वत:ला दोष देत राहणारी, स्वत:ची नकारात्मक प्रतिमा बाळगणारी मुलं. कुणी काय म्हणेल या भीतीनं काही करायलाच न धजणारी मुलं. इतरांच्या मताला काही किंमत न देता आपलं तेच खरं करणारी, आपल्या संसारात हिटलर बनून राहणारी आणि हाच वसा त्यांच्या मुलांपर्यंत संक्रमित करणारी मुलं!
अजून काही काळातच ही मुलं टीनएजर्स बनणार आहेत. त्यांचा मेंदू तेव्हा प्रचंड बदलांच्या आणि संप्रेरकांच्या माऱ्यात गरगरत असणार आहे, तेव्हा त्याला कुठलंही वळण लावणं सोपं राहणार नाहीये. ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील आणि ऐकलं तरी त्यांना ते पटणार नाही.

बऱ्याचदा आपण नाही म्हणायला घाबरतो- कारण आपल्यालाच काहीशी संदिग्धता असते. लोक काय म्हणतील, मुलं आक्रस्ताळेपणा करतील की काय?, आपण फारच कडक वागतोय का?...अशा शंका येत असतात. आपल्या मुलांचा रडवेला चेहरा पाहायला कुणाला आवडेल? बाळ खूष झालं, की आईबाबाही खूष! त्यामुळं नाही म्हणायला पालकांना नको वाटतं. शिवाय ‘हो’ म्हणणं त्यामानानं सोपं! पण प्रत्येक हट्टाला मान तुकवली तर काय होईल? आपल्याला हवं तसं कणखर बनू शकेल का मूल? हे खरंय, की त्या वेळी माघार घेतली की तात्पुरती आग विझते, प्रश्नावर पडदा पडतो; पण आत धुमस तशीच चालू राहते. आग केव्हाही पुन्हा भडकू शकते. म्हणजे आत्ता थोडी कळ सोसायला हवी, ध्येय जरा दूरच ठेवायला हवं.

नकार परिणामकारक ठरण्यासाठी
आपला नकार परिणामकारक ठरण्यासाठी त्याला काहीतरी ठोस कारण हवं, आपली स्वत:ची त्याबद्दल खात्री हवी. थोडी जरी आपल्या विचारांच्या चिलखतात फट असेल, तर मुलं ती लगेच टिपतात. त्यामुळं ‘नाही’ म्हणण्याआधी नीट विचार करायला लागतो. नंतर निर्णय बदलला, की मुलं गोंधळतात. त्या नकाराला काही अर्थच राहत नाही. आणखी एक, पुनःपुन्हा ‘नाही’ म्हटलं तर त्याची धार जाते. म्हणजे ठाम राहणं आणि सातत्य राखणं या दोन्ही गोष्टी हव्यात. यात आईबाबांची आणि घरातल्या इतरांची संयुक्त आघाडी हवीच. नाही तर मुलं त्याचा किती सफाईनं फायदा घेतात ते तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल. बरं, नुसते शब्द अचूक असून चालणार नाही. ते कसे म्हटले जातात, त्यावेळची देहबोली काय असते, याकडेही अगदी बारीक लक्ष असत मुलांचं. आईबाबा चुकून होकार देण्याची शक्‍यता आहे का, कुठं हल्ला करता येण्यासारखी कमकुवत जागा दिसतेय, किती ताणून धरायचं याबाबतची मुलांची रणनीती यावरूनच तर ठरते!
मुलांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं. मोठेपणी आपणहून विचार करून एखादी गोष्ट करू नये हे समजण्याची ही तयारी असते एक प्रकारची. त्याशिवाय निर्णय घेण्याची क्षमता कशी येणार?

‘नाही’ म्हणायचंच नाही
इंग्लिशच्या परीक्षेत प्रश्न असतो, अर्थ न बदलता नकारात्मक वाक्‍य होकारात्मक करा. उदाहरणार्थ ः‘मी वेडी नाही’ या नकारात्मक वाक्‍याचं सकारात्मक वाक्‍य होतं ‘मी शहाणी आहे’ किंवा ‘कार्यक्रमाला कुणीच वेळेवर पोचलं नाही’चं बनतं- ‘कार्यक्रमाला सगळे उशिरा पोचले!’ तसं काहीसं करून पाहूया. नाही हा शब्द न वापरता काम साधायचं. आपलं काम खुबीनं करून घ्यायचं. अमुक एक गोष्ट करू नको म्हणण्याऐवजी अमुक कर, किंवा दुसरं काय करता येईल यावर बोलायचं. याचा अर्थ प्रत्येक मागणीला मान तुकवायची नाही, तर शब्द बदलायचे. ‘‘आई मी खेळायला जाऊ?’’ या प्रश्नाला ‘‘नाही, आत्ता नको. आधी अभ्यास कर,’’ असं म्हणण्याऐवजी ‘‘हो, अभ्यास झाला की जा’’; ‘‘मी चिवडा खाऊ?’’ याचं उत्तर ‘‘जेवायच्या आधी सटरफटर काही खायचं नाही’’ असं म्हणण्यापेक्षा ‘‘जेवण झाल्यावर खा.’’ हे जास्त चांगलं.

‘‘सारखासारखा टीव्ही अजिबात बघायचा नाही हं’’ असं आपण म्हणतो, तेव्हा मुलांच्या मनात कुठं तरी प्रश्न उमटतो, की मग काय करू? नुसतंच ‘हे करू नको, ते करू नको’ म्हणण्याऐवजी काय करायचं हे शोधून काढायला मुलांना मदत तरी करायला हवी ना! मुलांना पर्याय देऊन पाहूया. म्हणजे, ‘‘मी खेळायला जाऊ?’’ या प्रश्नाला ‘नको’ असं पटकन उत्तर देण्यापेक्षा, ‘‘कधी जाशील? अभ्यास झाल्यावर की संध्याकाळी?’’ असं म्हणता येईल.
काही वेळा आपण म्हणतो ः ‘‘आत्ता नाही हं काही मिळणार.’’ हे ठीकच आहे, तोंडातून बाहेर पडल्यावर लगेच ते द्यायचं नाहीच आहे आपल्याला; पण कधी मिळणार हेही स्पष्ट झालं, तर पटण्याची शक्‍यता जास्त. म्हणजे ‘‘आत्ता आपण शौनकसाठी भेटवस्तू घ्यायला आलोय, पुढच्या महिन्यात दिवाळीला तुला गेम घेऊ. तू थोडा विचार करून ठेव, मी बजेट सांगेन तुला.’’

माझ्या मना, धीर धर
हा सगळा बदल व्हायला वेळ लागणार, आईबाबांनाही आणि मुलांनाही... आणि तेवढा वेळ द्यायला हवा, थोडा सराव व्हायला हवा. ही काही जादू नाहीये एका क्षणात व्हायला.कुठलीही नवीन भाषा, खेळ शिकणं आणि समजणं सोपं नसतं. शिवाय तरीही मधूनमधून चुका होणारच, त्यामुळं स्वत:ला धारेवर न धरता मध्येमध्ये माफही करायला लागतं बरं का!
आणि एवढं करून नाहीच ऐकलं मुलांनी तर? त्याविषयी पुढच्या वेळी पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com