मन घट्ट तुझं... (डॉ. विद्याधर बापट)

dr vidyadhar bapat
dr vidyadhar bapat

कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व पौगंडावस्थेतल्या असंख्य मुलांना सध्या अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. याच चिंताग्रस्ततेतून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जाण्याच्याही अनेक घटना घडत आहेत. आत्महत्यांच्या विविध कारणांपैकी ‘चिंताग्रस्तता’ हे एक प्रमुख कारण असल्याचं एका पाहणी-अहवालातून नुकतंच पुढं आलं आहे. तेव्हा तरुणाईला आणि तरुणाईत प्रवेश करणाऱ्या कोवळ्या जिवांना वेळीच सावरणं अत्यावश्‍यक ठरतं. ‘मन सुद्ध तुझं, गोस्ट हाये पृथिवीमोलाची’, असं जुन्या काळातलं एक प्रेरक सिनेगीत आहे. त्यात थोडासा बदल करून असं म्हणता येईल की...‘मन घट्ट तुझं, गोस्ट हाये पृथिवीमोलाची.’ हा मन घट्ट करण्याचा पृथ्वीमोलाचा सकारात्मक जीवनमंत्र प्रतिकूल परिस्थितीतही आचरणात आणायलाच हवा.

फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं अचानक कोमेजून जात आहेत. चिंताग्रस्ततेतून, वैफल्यातून तरुणांनी, पौगंडावस्थेतल्या मुलांनी आत्महत्या केल्याचं किंवा तसा प्रयत्न केल्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात खूप वाढलंय. तीव्र नैराश्‍याचा आजार हे एक प्रमुख कारण या आत्महत्यांमागं असू शकतं.
चिंतेतून उद्भवणाऱ्या मानसिक आजारांचा परिणाम तरुणाईच्या सगळ्या वर्तनव्यवहारावर होत असल्याचं पुढं आलं आहे. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकानं याविषयीचा पाहणी-अहवाल अलीकडंच प्रसिद्ध केला.
स्वतःला इजा करून घेणं किंवा थेट आयुष्यच संपवून टाकण्याइतपत टोकाचाही निर्णय अशा मनःस्थितीत घेतला गेल्याची अनेक उदाहरणं घडत आहेत. अशा वेळी प्रामुख्यानं पौगंडावस्थेतच मुलांच्या मनाची काळजी घेणं अत्यंत आवश्‍यक ठरतं; जेणेकरून पुढच्या काळात संभाव्य विपरीत प्रकार घडणार नाहीत.
अस्वस्थतेचा आजार आणि नैराश्‍याचा आजार,  ही बाब आजकाल गंभीर स्वरूप धारण करत चाललेली आहे. पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये तसंच तरुणाईत हे प्रमाण चिंताजनक आहे. नैराश्‍याचा हा आजार जितक्‍या लवकर लक्षात येईल, तेवढ्या परिणामकारकरीत्या त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्यासाठी आजाराची लक्षणं समजून घेणं व वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणं ही पालक आणि शिक्षक या दोघांचीही जबाबदारी आहे.

पौगंडावस्थेत व्यक्तिमत्त्वं उमलत असत. व्यक्तिमत्वाला या काळात अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो; पण तरीही गोंधळात टाकणारे प्रश्न मुलांना पडत असतात, मनात घोंघावत असतात. उदाहरणार्थ ः  ‘मी कोण आहे?’ ‘इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का?’ ‘या सगळ्या जगरहाटीत माझ काय स्थान आहे?’ ‘प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचं वर्चस्व का?’ ‘स्त्री-पुरुष संबध म्हणजे काय?’ व इतर स्वरूपाचे लैंगिक प्रश्न...

अशा परिस्थितीत नुसताच मूड Upset आहे की अस्वस्थतेचा किंवा नैराश्‍याचा आजार आहे यातला फरक ओळखण्याचं काम फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते.
बरं, पौगंडावस्थेतली/तारुण्यातली मुलं निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं; त्यामुळं त्यांच्या नैराश्‍याच्या आजाराकडं, त्यांच्या अवस्थेकडं, त्यांच्या चिंताग्रस्ततेकडं दुर्लक्ष होऊ शकते. अशा स्थितीत बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणा ही दिसू शकतो.

‘डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेन्टल डिसॉर्डर्स’(DSM )नुसार तीव्रता, कालावधी आणि लक्षणं या तीन बाबींनुसार डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ ः  मेजर डिप्रेसिव्ह डिसॉर्डर, सायक्‍लोथिमिक डिसॉर्डर, मूड डिसॉर्डर ड्यू टू अ जनरल मेडिकल कंडिशन, सबस्टन्स-इंड्यूस्ड्‌ मूड डिसॉर्डर, डायस्थिमिक डिसॉर्डर, मॅनिक डिप्रेशन ऑर बायपोलर डिसॉर्डर, पोस्टपार्टम डिप्रेशन, सीझनल ॲफेक्‍टिव्ह डिसॉर्डर (SAD), ॲटिपिकल डिप्रेशन, सिच्युएशनल डिप्रेशन ऑर रिॲक्‍टिव्ह डिप्रेशन, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसॉर्डर, सायकोटिक डिप्रेशन...इत्यादी.या विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे. इथं सगळ्या गोष्टी मांडता येणं शक्‍य नसलं तरी मुख्य मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू या.
पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बाबतीत नैराश्‍याच्या आजारात साधारणतः पुढील लक्षणं आढळून येतात ः

  •   अस्वस्थपणा व चिडचिड करणं.
  •   अपराधीपणाची भावना, तसंच आपण निरुपयोगी असल्याची भावना.
  •   उत्साहाचा अभाव तसंच Passion नसणं.
  •   एकाग्रतेचा अभाव.
  •   अती हळवं होणं, तसेच लहानसहान गोष्टींवरून अश्रू ढाळणं, रडणं
  •   विलक्षण कंटाळा, शारीरिक हालचाली मंदावणं, ‘काही करूच नये’ असं वाटणं
  •   लहानसहान गोष्टीवरून आक्रमक होणं.
  •   जेवण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, भूक कमी होणं, वजन अचानक कमी होणं, निद्रानाश, झोप कमी होणं किंवा जास्त झोपणं.
  •   घरापासून लांब लांब राहण्याची प्रवृत्ती.
  •   अती टीव्ही पाहणं/ अती कॉम्प्युटर गेम्स खेळणं.
  •   टीका अजिबात सहन न होणं व सतत दुखावलं जाणं.   
  •   एकटं एकटं राहाणं, तसेच सार्वजनिक/कौटुंबिक समारंभ टाळणं.
  •   शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी असणं.
  •   स्वतःला इजा करून घेण्याचा किंवा आत्महत्येचा विचार (हे लक्षण अतिशय गंभीर असून, तज्ज्ञाचा सल्ला तातडीनं घ्यावा).
  •    व्यसनांच्या आहारी जाणं.

मुला-मुलींमध्ये वरील लक्षणं किती काळ व किती तीव्रतेनं जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पाहायला हवं; त्याचबरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थानं स्थित्यंतराचा कालावधी असतो; त्यामुळं काही वेळा ही लक्षणं ‘नॉर्मल’ही असू शकतात; ज्याला Growing  Pains असं म्हणतात. मात्र, ती लक्षणं तशी आहेत की आजाराचा भाग आहेत, हे तज्ज्ञच ठरवू शकतात. बऱ्याचदा अती उत्साही वागणं किंवा दुराग्रही, बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणं असू शकतात.

या वयातल्या नैराश्‍याचे परिणाम

  •   शाळेतले/कॉलेजातले प्रश्न ः नैराश्‍यामुळं एकाग्रता कमी होते, तसंच Energy Level कमी होते. अनुपस्थिती वाढायला लागते. मार्कांमध्ये घसरण होते. एकूणच, पूर्वी हुशार असणाऱ्या मुलाची गुणवत्ता घसरते.
  •   घरातून पळून जाणं ः घरातून पळून जातात किंवा तशी भाषा सुरू होते. हे सर्व मदत मिळवण्यासाठीचे भावनिक प्रयत्न असतात.
  •   दुबळी आत्मप्रतिमा ः अपयशाची, फोलपणाची, अपराधाची भावना निर्माण होते.
  •   खाण्याच्या सवयी  ः अती खाणं, कमी खाणं, गरज नसताना सतत खात राहणं हेसुद्धा कधी कधी दबलेल्या नैराश्‍यापोटी होतं.
  •   इंटरनेटचं व्यसन ः गरज नसताना व्यसन लागल्यासारखा इंटरनेटचा अती वापर. सतत एकट बसून इंटरनेट वापरणं, सतत व्हिडिओ गेम्स खेळत राहणं.
  •   शारीरिक इजा ः स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करणं. उदाहरणार्थ ः कापून घेणं, जखम करून घेणं इत्यादी.
  •   बेभान वागणं ः बऱ्याचदा अशी मुलं बेभानपणे वाहन चालवणं, बेभानपणे सामाजिक नीती-नियम झुगारणं इत्यादी गोष्टी करताना आढळतात.
  •   हिंसात्मक वर्तणूक  ः तीव्र नैराश्‍याच्या अवस्थेत जेव्हा स्वतःला त्रास देणं किंवा आत्मापीडन करून घेण्याची प्रवृत्ती असते, त्या वेळी शाळा वा महाविद्यालयात हिंसात्मक वर्तणूक घडते.
  •   आत्महत्येचे विचार ः तीव्र नैराश्‍यापोटी आत्महत्येचे विचार करणं, तसं बोलून दाखवणं किंवा प्रत्यक्ष प्रयत्न करणं घडू शकतं.

पौगंडावस्थेतलं तसंच तरुणाईतलं नैराश्‍य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळं, ‘सगळं आपोआप ठीक होईल’, ‘वयाचा दोष असेल’ वगैरे गैरसमजुतीत न राहणं चांगलं. शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं कधीही उत्तमच. पालकांनी पुढील गोष्टी अवश्‍य कराव्यात ः सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमानं पाल्याशी बोलावं. त्याच्याविषयी/तिच्याविषयी काळजी, प्रेम वाटत आहे, हे त्यांना जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा. आवश्‍यकता वाटल्यास तज्ज्ञाची मदत तत्काळ घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्‍याच्या आजारापोटी आहेत किंवा कसं हे तज्ज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळं असले तरी पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीनं ते दुरुस्त व्हायला हवेत. नैराश्‍याच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतले रासायनिक बदल/असंतुलन होय.
आजार ज्यानं बळावतो, बळावू शकतो, असे काही महत्तवाचे घटक ः

  •   कुटुंबाचा पूर्वेतिहास(-फॅमिली हिस्ट्री), आनुवंशिकता.
  •   आपत्ती तसेच इतर ताण (ट्रॉमा अँड अदर स्ट्रेस-फॅक्‍टर्स)ः परीक्षेतलं अपयश, आई-वडिलांमधल्या सततच्या भांडणांमुळं येणारा ताण, घरातलं तणावाचं वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सगळ्यातून निर्माण होणारा ताण, एकतर्फी प्रेमातलं अपयश, आयुष्यातल्या यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना; तसंच झपाट्यानं बदलणारी सामाजिक परिस्थिती, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही हव्या त्या अभ्यासक्रमाला भ्रष्टाचारामुळं नाकारला गेलेला प्रवेश.
  •   नकारामक व्यक्तिमत्त्व(पेसिमिस्टिक पर्सनॅलिटी) ः स्व-प्रतिमा क्षीण असणं व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन.
  •   आरोग्याच्या तक्रारी (-फिजिकल कंडिशन्स) ःआरोग्याच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी.
  •   बाल्यावस्थेतला आघात (अर्ली चाइल्डहूड ट्रॉमा) ः लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात.  
  •   अन्य मानसिक आजार -(अदर सायकॉलॉजिकल कंडिशन्स) ः  इतर गंभीर मानसिक आजारांबरोबरसुद्धा नैराश्‍याचाही आजार असू शकतो - उदाहरणार्थ ः स्किझोफ्रेनिया, अस्वस्थतेचे आजार, व्यसनं, इटिंग डिसॉर्डर्स इत्यादी.
  • उपाययोजना
  •   तज्ज्ञाच्या सल्ल्यानं औषधोपचार हा उपाय आहेच; पण त्याचबरोबर वेगवेगळ्या सायकोथेरपीज्‌, कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी(CBT) व माइंडफुलनेस बेस्ड्‌ कॉग्निटिव्ह थेरपी(MBCT)
  •   डिप्रेशनच्या उपचारामध्ये औषधाबरोबरच या थेरपी अतिशय महत्वाच्या आहेत.
  • सायकोथेरपी, CBTव MBCT कशी उपयोगी ठरते ? तर कशा प्रकारचे वर्तन, भावना व कल्पना हा आजार वाढण्यास कारणीभूत ठरल्या, हे जाणून घेण्यास त्यातून मदत होते.
  •   ज्या घटनांमुळं व प्रसंगांमुळं आजाराला वाढीस लागला, त्या घटना-प्रसंगांना त्या वेळी कसं सामोरं जायचं, कसं सामोरं जायला हवं हे जाणून घेणं.
  •   भावनांवर ताबा कसा मिळवावा व आनंद कसा मिळवावा आणि टिकवावा, याचं शिक्षण.
  •   परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला व समस्येतून मार्ग काढण्याची कला.
  •   तणावाचा उगम/स्रोत शोधणं.
  •   सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना करण्यास शिकवलं जातं.
  •   आयुष्यातल्या प्राथमिकता ठरवणं/बदलणं शिकवलं जातं.
  •   योजनाबद्ध पद्धतीनं, पायरीपायरीनं विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकणं. अर्थात, नकारात्मक पद्धत बदलणं. *रिलॅक्‍सेशन थेरपीज्‌, पॉझिटिव्ह रिजनरेशन इमेजरीज्‌, क्‍लिनिकल ट्रान्स, तसेच तणावनियोजनाच्या विविध पद्धती (पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य) शिकवल्या जातात.
  •   प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ  कसं राहावं, तसंच तटस्थपणे स्वतःकडं व परिस्थितीकडं कसं पाहावं हे MBCT अंतर्गत शिकवलं जातं. ज्यायोगे चित्त शांत होईल, अशा ध्यानाच्या काही पद्धत्ती शिकवल्या जातात.

नैराश्‍याच्या आजारातील स्व-मदत
औषधं व सायकोथेरपी याबरोबरच आजारातून बाहेर पडण्यासाठी पुढील गोष्टी उपयुक्त ठरतात. त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कराव्यात.

  •   योग्य व संतुलित आहार घ्यावा.
  •   ज्यायोगे भावनांना वाट  मिळेल, असं ‘डिप्रेशन जर्नल’ लिहायला सुरवात करावी.
  •   रोज भरपूर व्यायाम करावा (चल पद्धतीचा - एरोबिक). त्यामुळं शरीरात सेरोटोनिन, एंडॉर्फिन्स व नैसर्गिक अँटीडिप्रेजंट्‌स स्रवतील. तसंच योगासनं व प्राणायाम करावा.
  •   रोज संगीत ऐकावं.
  •   सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ ः ‘ही प्रतिकूल परिस्थिती बदलेल,’  ‘हेही दिवस निघून जातील’ इत्यादी.
  •   मनात उमटणारे नैराश्‍याचे विचार, भीती म्हणजे काही वास्तव नव्हे, याचं भान ठेवावं.
  •   सोपी सोपी, सहजसाध्य अशी काही लक्ष्य (टार्गेट्‌स) ठेवावीत व ती साध्य करण्याचा प्रयत्न करा.
  •   तणावनियोजनाचे मार्ग समजून घ्यावेत.
  •   परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असं लक्षात आल्याबरोबर ताबडतोब तज्ज्ञाची मदत घ्यावी
  • लहानपणापासून भावनिक समतोल मिळवण्याचं शिक्षण मनाला दिल्यास, योग्य जीवनशैली राखल्यास, मनोव्यापारांचं स्वरूप समजून घेऊन मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न केल्यास, नैराश्‍याचा आजार टाळण्यास किंवा त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (WHO) अनुमानानुसार, सन २०२० पर्यंत डिप्रेशनचा आजार हा तीव्र स्वरूप धारण करेल आणि शारिरीक व मानसिक डिस्‌ॲबिलिटीच्या दृष्टीनं तो प्रमुख गंभीर आजार ठरेल. सध्याचं एकूण चित्र पाहता, हे अनुमान वास्तवात येत असल्याचं दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत डिप्रेशनच्या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. आत्तापासूनच, त्यापासून बचावाचे प्रयत्न प्रत्येकानं करायला हवेत. योग्य प्रयत्न केल्यास हे नक्कीच घडू शकतं. फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं नैराश्‍याच्या आजारामुळं कोमेजून जात असली, तरी वेळेवर काळजी घेतली तर असं घडणं नक्कीच टाळता येऊ शकतं आणि त्यांना पुन्हा एकदा सुंदर, अर्थपूर्ण आयुष्य नक्कीच जगता येऊ शकतं. ‘मन घट्ट तुझं...’ हा मंत्र वडीलधाऱ्यांनी तरुणाईला द्यायला हवा!

-----------------------------------------------------------------------------------------
बोलतं करा; जीव वाचवा

  • आत्महत्या करणारी व्यक्ती कुणाशी तरी बोलायला उत्सुक असते. तिचं म्हणणं ऐकून घेतल्यास ती आत्महत्येपासून नक्कीच परावृत्त होऊ शकते.
  • ‘कनेक्‍टिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या एका पाहणीनुसार, आत्महत्या करण्यामागची कारणं पुढीलप्रमाणे आढळून आली आहेत:
  •   प्रत्येकाच्या आयुष्यावर कोणती तरी विशिष्ट बाब प्रभाव टाकत असते किंवा त्या बाबीचा पगडा असतो. तीमध्ये व्यक्ती, पैसा, व्यसन असं काहीही असू शकेल. त्यापैकी एखादी गोष्ट गमावल्यास आत्महत्येचा विचार बळावू शकतो. निराशा (होपलेस), हतबलता (हेल्पलेस) आणि ‘आयुष्यात आता काहीच अर्थ राहिला नाही,’ ही भावना आत्महत्येला प्रवृत्त करते.
  •   मानसिक आजार : डिप्रेशन, डिसॉर्डर, स्क्रिझोफेनिया आदी अनेक कारणांनी नैराश्‍य येऊ शकतं. व्यक्तिपरत्वे याचं प्रमाण कमी-जास्त असू शकतं. या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.

आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती कशी ओळखावी?

  •   आत्महत्येचा विचाराविषयी बोलण्यातून वारंवार चर्चा.
  •   नैराश्‍य आणि हतबलता.
  •   मन:स्थितीत वारंवार बदल, चिडचिड, संताप, एकाकीपणाची भावना.
  •   नातलगांशी निरोपाचं संभाषण आणि स्वतःकडच्या किमती वस्तूंचं वाटप.
  •   वागण्यात अचानक बदल.
  •   अमली पदार्थांचं सेवन.

कशी कराल मदत ?

  •   आत्महत्या करण्याचं कोणतंही लक्षण आढळल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
  •   स्वत:चं मत न लादता सहानूभुतिपूर्वक आणि लक्षपूर्वक संबंधित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्यावं.
  •   आत्महत्येच्या विचारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला उपदेश न करत बसता तिला सकारात्मक मदत करावी.
  •   आत्महत्येच्या विचारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला एकटं सोडू नये.
  • आत्महत्याप्रवण व्यक्तींपुढच्या अडचणी
  •   आत्महत्येच्या प्रयत्नांच्या खुणा शरीरावर दिसतात; त्यामुळं समाजाला तोंड देता येत नाही.
  •   पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागतं
  •   लोकांची दूषणं, सल्ले ऐकून घ्यावे लागतात.
  •   परिणामी, संबंधित व्यक्ती एकाकी पडत जाते.

मानसिक आधाराची गरज
भारतात पुरुषांच्या आत्महत्यांचं आणि युवकांच्या वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या २०१४ च्या अहवालानुसार, तमिळनाडू हे राज्य आत्महत्यांबाबत पहिल्या क्रमांकावर होतं. त्याच विभागाच्या २०१५ च्या अहवालानुसार, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. युवकांमध्ये म्हणजे १५ ते ३५ वयोगटापर्यंत वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परीक्षा, प्रवेशप्रक्रिया, मानसिक नैराश्‍य, आर्थिक अडचण, प्रेमभंग, शाळा-महाविद्यालयांतलं रॅगिंग, घरगुती भांडणं यांमुळं वैफल्यग्रस्तता येते.   ‘आत्महत्येचा प्रयत्न’ करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक असून, प्रत्यक्षात ‘आत्महत्या करण्याचं’ प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. आम्हाला येणाऱ्या फोनमध्येही पुरुषांच्याच फोनचं प्रमाण अधिक आहे. वैफल्यग्रस्तेतून अनेक जण फोन करत असतात. त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्‍यक असतं. त्या काळात त्यांना कुणाच्या सल्ल्याची नव्हे, तर ‘आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घ्यावं’, अशी त्यांची अपेक्षा असते. घरातलं, कार्यालयीन ठिकाणचं वातावरण दिवसेंदिवस बदलत असल्यानं वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण वाढत आहे. ताण-तणावांत वाढ होत आहे. आर्थिक कारणांमुळं, नातेसंबंधामुळं व्यक्ती वैफल्यग्रस्त होते आणि कालांतरानं आत्महत्येचा विचार तिच्या मनात येतो. यासाठी संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणं महत्त्वाचं असतं. मानसिकरीत्या हतबल झालेल्या व्यक्तीला योग्य पद्धतीनं हाताळावं लागतं. शासनानं यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. ‘आत्महत्या प्रतिबंधक दिना’च्या निमित्तानं काही काळ यावर चर्चा होते आणि पुढं काहीच होत नाही. शाळा, महाविद्यालयीन पातळीवरच्या अनेक मुलांना खूप काही बोलायचं असतं; परंतु व्यक्त होण्यासंदर्भात त्यांच्या मनात भीती असते. अशा ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती करणं आवश्‍यक आहे.- विक्रमसिंह पवार,  समन्वयक, ‘कनेक्‍टिंग एनजीओ’, पुणे

केवळ ऐकून घेतलं गेल्यामुळं वाचले माझे प्राण...
‘‘मला मरायचं नव्हतं. जगायचं होतं. एकावर मी जिवापाड प्रेम केलं. आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणा-भाका घेतल्या. मात्र, माझ्या प्रेमाचा त्यानं फायदा घेतला. काही वर्षं सोबत राहिल्यावर नातं आता नव्या वळणानं - म्हणजे अर्थातच विवाहाबद्ध होण्याच्या - जावं असं मला तीव्रतेनं वाटलं. आमचा साखरपुडा ठरला. आमच्या घरून लग्नाला विरोध असूनही केवळ माझ्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली. मी सुखी संसाराची स्वप्नं पाहत होते. मात्र, साखरपुड्याच्या आठवडाभर आधी ‘तो’ गायब झाला. वारंवार फोन करूनही त्यानं कधी फोनच उचलला नाही. मी दिवसागणिक अस्वस्थ होत गेले. अखेर एके दिवशी त्यानं फोन उचलला आणि तो मला म्हणाला ः ‘‘आज माझा साखरपुडा आहे.’’ त्याचं ते बोलणं ऐकून काय करावं, मला काहीच सुचेना. घरात कुणाशी बोलावंसं वाटेना. आत्महत्येचा विचार प्रबळ झाला. हा विचार कृतीत उतरवायची तयारी मी केली.

शेवटची इच्छा म्हणून ‘कनेक्‍टिंग एनजीओ’च्या हेल्पलाईनला फोन केला. फोन केल्यावर पहिली दोन-चार मिनिटं मला अश्रू अनावर होत होते. काय बोलावं ते सुचतच नव्हतं. फोन घेणाऱ्या व्यक्तीनं माझी कैफियत ऐकली. मन शांत झालं. आपलं दु:ख ‘शेअर’ केल्यानं हलकं होतं, याचा प्रत्यय मला आला. फोन घेणाऱ्यानं माझी समजूत काढली. आयुष्यातला तो ‘चॅप्टर’ मी आता पूर्णपणे पुसून टाकला आहे. मी सुखात आहे.
- एकेकाळची वैफल्यग्रस्त युवती

आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी काय कराल?
आत्महत्येचा विचार मनात आल्यावर शक्‍यतो आपलं म्हणणं जवळच्या व्यक्तीशी ‘शेअर’ करा. मन मोकळं करा. कुणी ऐकणारं नसेल तर ‘कनेक्‍टिंग इंडिया’शीही तुम्ही संपर्क साधू शकता.
- दूरध्वनी क्रमांक :  १८००-२०९-४३५३ (टोल फ्री)
- ९९२२००११२२ (दुपारी १२ ते रात्री १०)
(संकलन ः आशिष तागडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com