...हस्ती मिटती नहीं हमारी ! (डॉ. यशवंत थोरात)

...हस्ती मिटती नहीं हमारी ! (डॉ. यशवंत थोरात)

राजकारणात स्वच्छ चारित्र्य नसलेल्यांची संख्या वाढत आहे, हे मला मान्य आहे. लोककल्याणाच्या कार्यात आलेल्या अपयशामुळं ही संख्या वाढत आहे, हेही मला मान्य आहे; पण मला एक गोष्ट सांगायची आहे, की आपला देश आणि आपली संस्कृती प्राचीन आहे. अंधकार आणि प्रकाशाची अनेक पर्व आपण पाहिली आहेत. गेल्या काही दिवसांत आपण मर्यादित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून बाहेर पडलो आहोत; पण या सगळ्या काळात आपण टिकलो, वाढलो आणि चालत राहिलो.

परदेशातल्या एका ख्यातनाम विद्यापीठातले राज्यशास्त्राचे विद्वान प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांच्याशी मी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होतो. एवढ्यात ते सगळे ठरल्याप्रमाणे आलेच. त्यांना एका बाजूला घेऊन मी म्हणालो ः ‘हे सर अचानकच आले आहेत. आम्ही राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल चर्चा करत आहोत. त्यात तुम्हाला रस असेल असं वाटत नाही. त्यामुळं आपण उद्या याच वेळी भेटायचं का?’ त्यांना ते पटलं असावं. ते निघायच्या तयारीतच होते; पण ‘आम्हाला त्या चर्चेत रस नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता?’ असं पीटर पुटपुटला आणि सगळ्यांचेच पाय अडखळले. 

‘आम्ही चर्चेत फारसं बोलू शकणार नाही; पण तरुण मतदार म्हणून तुमच्या चर्चेतून आम्हाला खूप काही समजू शकेल,’’ पीटर म्हणाला. त्याच्या आवाजात एवढा ठामपणा होता, की त्याचं म्हणणं मला नाकारता आलं नाही. सुब्रह्मण्यम सरांची परवानगी घेऊन ते सगळेजण आमच्या चर्चेत सहभागी झाले. एखाद्या निष्णात प्राध्यापकाच्या शैलीत चर्चेचा धागा पकडत सुब्रह्मण्यम म्हणाले - ‘‘तुम्ही यायच्या आधी मी डॉ. थोरातांना सांगत होतो, की दोन- अडीच वर्षांपूर्वी, म्हणजे नेमकं सांगायचं तर 2014 च्या निवडणुकीच्या वेळी, मतदारांच्या बदलत्या मानसिकतेबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झडत असे. त्यातून जणू काही असं भासत असे, की मतदार त्यांच्यावरचं जात, वंश, भाषा यांचं ओझं झुगारून प्रशासन आणि विकास यावरच लक्ष केंद्रित करत आहेत!’’ 

त्यावर यास्मिननं चांगला मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली - ‘‘माध्यमांचं म्हणणं काहीही असो; पण आपल्यासारख्या बुद्धिवाद्यांना काय वाटतं?’’ 
सुब्रह्मण्यम सरांनाही तिचा प्रश्न आवडला. ते म्हणाले - ‘‘आपल्या बुद्धिवाद्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. २०१४ च्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याचं काही गंभीर वृत्तीच्या अभ्यासकांनी नजरेस आणून दिलं होतं; पण तरीही सर्वसाधारण वातावरण आशादायक होतं. देशातल्या निवडणुकांचे रागरंग बदलत आहेत आणि त्यातून उत्तम प्रशासन आणि विकास यांचा आग्रह धरणारे राजकारणी निवडून येतील आणि ते देशाचं चित्र बदलतील, असं एक वातावरण त्या वेळी होतं. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारालाही या बदलाची चाहूल लागली आणि भारतात चांगले बदल होत आहेत, या आशेवर अनेकांनी भारतात गुंतवणूक करायचं ठरवलं.’’

‘‘मग तर ते चांगलंच आहे, नाही का?’’ यास्मिन म्हणाली. 
‘‘तसं असतं तर ते चांगलंच झालं असतं; पण आज २०१४ च्या उसळत्या उत्साहानंतर आम्ही चुकीच्या ठिकाणी आशा लावल्या होत्या, असं आता वाटायला लागलं आहे. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या, तिथल्या मतदारांनी प्रशासनाच्या आणि विकासाच्या मुद्द्याला फारसं महत्त्व दिल्याचं दिसलं नाही. जात आणि सरंजामशाहीवरच्या निष्ठांचाच प्रभाव कायम असल्याचं त्या वेळी दिसून आलं. त्याला जोडूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आणि त्यांना मिळणारं यश यांचं प्रमाणही वाढत होतं,’’ ते म्हणाले. मात्र, हा मुद्दा यास्मिनला काही पटला नसावा, असं तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते. 

‘‘पाहिजे तर तुम्ही डॉ. थोरातांना विचारा,’’ असं सुब्रह्मण्यम म्हणाले. ‘‘त्यांचं म्हणणं खरंच आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांतल्या उमेदवारांची यादी पाहिली की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची सर्वच पक्षांतली संख्या साधारणतः सारखीच असल्याचं दिसेल,’’ मी म्हणालो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी तिथल्या मासिकांच्या ढिगातून १४ फेब्रुवारीचा ‘बिझनेस स्टॅंडर्ड’चा अंक काढून दाखवला. ‘इलेक्‍शन वॉच डॉग’या संस्थेनं उत्तर प्रदेशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या ८२६ उमेदवारांपैकी ८१३ उमेदवारांची माहिती या अंकात दिली होती. त्या माहितीनुसार या ८१३ उमेदवारांपैकी ११० जणांनी त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले असल्याचं जाहीर केलं होतं, तर ८२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. 

‘बाप रे’’ राहुलनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. 
त्याला थांबवत मी म्हणालो - ‘‘केवळ त्यांची संख्या वाढत आहे एवढंच नाही, तर त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, अशा उमेदवारांची संख्या सगळ्या प्रमुख पक्षांत साधारणतः सारखीच आहे.’’ 

‘दक्षिणेतली स्थितीही फारशी वेगळी नाही,’’ सर म्हणाले, ‘‘आता आमच्याच राज्याचं उदाहरण घ्या. तिथल्या मुख्यमंत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या राजकीय वारसालाही न्यायालयानं दोषी ठरवलं; पण त्यामुळं मुख्यमंत्रिपदाची त्या व्यक्तीची लालसा काही कमी झाली नाही. उलट त्या पदासाठी ती व्यक्ती इरेला पडली. याचा अर्थ या महत्त्वाच्या दक्षिणी राज्यात सत्ताकांक्षेची पूर्वापार परंपरा सुरूच आहे.’’

माझं बोलणं ऐकून प्रदीप चांगलाच गोंधळलेला दिसला. ‘‘ सर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?’’ त्यानं विचारलं. ‘‘सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची पातळी सारखीच असल्यानं सध्याच्या मतदाराला चांगला उमेदवार निवडण्याची संधीच नाही, असं तुम्हाला म्हणायचंय का?’’ ‘‘होय, ते खरंच आहे; पण तो प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही. खरा प्रश्न आहे तो हे असं का? आणि त्याचं उत्तर माझ्याकडं नाही!’’ 

सुब्रह्मण्यम सरांनी तो धागा बरोबर पकडला. ते म्हणाले - ‘‘हा सोपा प्रश्न नाहीय; पण मीलन वैष्णव यांनी त्यांच्या When crime pays : money & muscle in Indian politics या ताज्या पुस्तकात म्हटलंय, की पैसे खाणाऱ्या राजकारण्यांनाच लोक निवडून देतात. कारण, नंतर त्यांचा ‘प्रभाव’ वापरून हे राजकारणी आपली कामं करून देतील, असं लोकांना वाटत असतं.’’ त्यांच्या प्रतिपादनानं पीटर आणखी गोंधळला. तो म्हणाला ः ‘‘म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की गुन्हेगारी पार्श्वभूमी ही एखाद्या उमेदवाराच्या पैसे खाण्याच्या वृत्तीचं निदर्शक असते?’’ 

‘कदाचित... पण म्हणूनच आपल्या देशात उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असेल, तर त्याची निवडून येण्याची शक्‍यता जास्त असते. एक लक्षात घ्या, की जिथं कायदा दुबळा असतो, जिथं राजकीय आश्वासनं पाळली जात नाहीत आणि जिथं सामाजिक भेदभाव खूप तीव्र असतो, अशा ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची मतदाराची प्रवृत्ती असते. कारण, त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी त्याच्या गुंडगिरीचा वापर करून घेता येईल, असं त्यांना खात्रीनं वाटत असतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, राजकीय नेत्यांबाबत लोक अंध नसतात, उलट त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असूनही लोक त्यांना मतं देतात,’’ सर म्हणाले. 

‘दुपारी माझं भाषण आहे आणि मला त्याची तयारी करायची आहे,’’ असं म्हणत सुब्रह्मण्यम यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांना निरोप देण्यासाठी मी बाहेरच्या दरवाजापर्यंत गेलो. परत येऊन पाहतो तर सगळेजण अगदी शांत बसलेले. त्यांच्या चेहऱ्यावरचं नैराश्‍य लपत नव्हतं. 
‘‘काय पण निराशावादी माणूस!’’ यास्मिननं सरांविषयीची प्रतिक्रिया बोलून दाखवली. 

‘का? ते केवळ सत्य बोलतात म्हणून?’’ - मी विचारलं. ‘‘कुठलंही मत बनवण्याआधी तुम्ही हे लक्षात घ्या, की अगदी इंग्लंड- अमेरिकेतही ‘राजकीय स्वच्छता’ आणि ‘प्रशासनाभिमुख राजकारण’ या दोन बाबी साधण्याच्या प्रक्रियेदरम्यान राजकारण हे काही सरळमार्गानं चाललेलं नसतं,’’ मी म्हणालो. 

त्याचवेळी आत आलेली उषाही नकळत गप्पांमध्ये सहभागी झाली. ‘‘इतरांना उपदेशाचे डोस देणाऱ्यांना मला हे विचारायचंय, की भ्रष्ट राजकारण्यांमुळं देशाचा विकास थांबतो का? जपानमध्ये शासन यंत्रणा कमालीची भ्रष्ट होती; पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ४० वर्षांत त्या देशानं नेत्रदीपक प्रगती केली आहे. तिथलं सरकार सारखं पडत होतं आणि घोडेबाजारातून पुनःपन्हा उभं राहत होतं; पण तरीही देशाचं दरडोई उत्पन्न १९६० मधल्या ४७९ अमेरिकी डॉलरवरून १९८७ पर्यंत २० हजार ३५६ अमेरिकी डॉलर इतकं वाढलं! उषानं साधार माहिती दिली. 

उषाच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य होतं. भारतातही गेल्या ४० वर्षांत हेच दिसून येतंय, की राजकीय भ्रष्टाचारामुळं आर्थिक प्रगती काही रोखली जात नसते. १९९० च्या दशकात भारताच्या आर्थिक प्रगतीनं खरा वेग घेतला. याच दशकात गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात प्रवेश केला. आश्‍चर्य म्हणजे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) याच दशकात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आश्‍चर्य म्हणजे, २०१०-२०११ मध्ये भ्रष्टाचार उघड करण्याविषयीच्या कॅगच्या (कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल) अहवालानंतर या वाढीचा वेग मंदावला. तात्पर्य हेच, की जर सरकार आपल्या गरजा भागवत नसेल, तर जो गरजा भागवील त्याच्याकडं वळण्याशिवाय लोकांपुढं पर्याय राहत नाही. यादृष्टीनं पाहिलं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते लोकशाही कार्यपद्धतीच्या संदर्भात अकार्यक्षम ठरत नाहीत किंवा ते या पद्धतीच्या अपयशाचं निदर्शक ठरत नाहीत. याचा सोपा अर्थ म्हणजे, आर्थिक प्रगती जर राजकीय भ्रष्टाचाराशी जोडली गेली नाही आणि भ्रष्टाचार हे लोकांच्या कायदा सुव्यवस्था, विकास, शिक्षण, रोजगार आदी अपेक्षा पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाचं अपत्य मानलं, तर येत्या काही वर्षांत चांगल्या प्रगतीच्या जोडीनं वाढता भ्रष्टाचारही आपल्याला पाहायला मिळेल.’’

हे ऐकताना मला माझा राग आवरता आला नाही. ‘‘हे कुठलं भयंकर तत्त्वज्ञान तू मांडते आहेस?’’ असं मी उषाला रागानं म्हणालो. 
‘‘का? तुमच्या नेहमीच्या प्रवचनांसारखं हे ऐकून तुम्हाला चांगलं वाटत नाही म्हणून ते अवास्तव थोडंच ठरतं? हे सत्य आहे आणि ते तुम्हाला आवडतं की नाही याचा त्यावर काहीच परिणाम होत नाही,’’ ती ठामपणे म्हणाली. 

‘‘ठीकंय. हेच जर सत्य असेल, तर आपल्याला त्याला सामोरं जावंच लागेल, त्याच्याशी लढावंच लागेल. प्रगती ही आवश्‍यकच आहे; नव्हे, ती अनिवार्यच आहे हे मला मान्य आहे; पण जी प्रगती गरिबी वाढवते, म्हणजे जी प्रगती काही घटकांपुरतीच मर्यादित राहते तिला मी प्रगती म्हणू शकत नाही किंवा ती स्वीकारूही शकत नाही. अत्यंत विषमता असलेल्या आपल्यासारख्या देशात प्रगती ही सगळ्यांसाठी समान आणि सगळ्यांना सामावून घेणारी असली पाहिजे. सर्वसमावेशक प्रगती किंवा वाढ ही अतार्किक कल्पना आहे, असं मी मानत नाही. प्रगती ही प्रगती असते आणि ती कशीही झाली तरी तिच्यातूनच आपण समाजातल्या वंचित वर्गाच्या आवश्‍यक त्या गरजा भागवू शकतो; पण भारतानं नेहमीच प्रगती आणि सामाजिक न्याय या दोन्ही गोष्टींचा समान आग्रह धरला आहे. या दोन्ही बाबतींत आपल्याला फारसं समाधानकारक यश मिळालं नसेल; पण संसदीय लोकशाही स्वीकारलेल्या आपल्यासारख्या मोठ्या देशात प्रगती आणि समानता या दोन्ही गोष्टी एकत्र मिळवण्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. त्यासाठी पडेल ती किंमतही द्यावी लागेल. तसं केलं नाही तर, म्हणजे मानवी दुःख आणि निराशा यांच्या विरोधात आपण झगडलो नाही तर, त्याचे भयानक परिणाम होतील. जर तुम्ही, मी आणि उषा... म्हणजे एकूणच आपण सगळे जर असेच निराश होत राहिलो, तर मग आशेला वाव तो कुठं राहिला?’’ मी विचारलं. 

मला आठवतं की मी लहान असताना माझ्या आई-वडिलांनी मला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत अल्पोपाहार घेण्यासाठी ‘त्रिमूर्तिभवन’ इथं पाठवलं होतं. तिथं काय घडलं, ही एक वेगळीच कहाणी होईल. अल्पोपाहारानंतर पंडितजींनी आम्हाला बागेत चक्कर मारण्यासाठी नेलं. त्याच वेळी त्यांच्या स्वीय साहाय्यकानं एक महत्त्वाचा संदेश त्यांना आणून दिला. पंडितजींनी कारुण्यपूर्ण नजरेनं त्याच्याकडं पाहिलं आणि ते त्याला म्हणाले ः ‘‘तुम्ही मला ‘भारताच्या भवितव्या’बरोबर अर्धा तासही घालवू देणार नाही का?’’

उषा, तू आणि मी काही पंतप्रधान नाही आहोत; पण ‘भारताचं भवितव्य’ मात्र नक्कीच इथं आपल्यासमोर बसलेलं आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंडितजींनी स्वतंत्र भारताची जी मूलभूत उद्दिष्टं मांडली होती, ती आजही माझ्या कानात गुंजत आहेत ः - ‘‘खूप वर्षांपूर्वी आपण ‘नियतीशी करार’ केला होता आणि आज त्याची सर्वांशानं का नसेना; पण पुष्कळशा अंगानं आपण पूर्ती करत आहोत.

मध्यरात्रीच्या प्रशांत समयी सगळं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण दुर्मिळ असतो. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. अनेक वर्षं दडपल्या गेलेल्या राष्ट्राला आता व्यक्त व्हायचं आहे.’’ त्याच वेळी स्वातंत्र्यलढ्याचं स्मरण करून पंडितजींनी आधुनिक भारताची उद्दिष्टं स्पष्ट केली. ते म्हणाले - ‘‘भविष्य आपल्याकडं आशेनं बघत आहे. आपल्याला कुठं जायचंय, आपलं उद्दिष्ट काय?’’ असा सवाल करून ते पुढं म्हणाले - ‘‘सामान्य माणसाला स्वातंत्र्य आणि संधी देत दारिद्य्र, अज्ञान, रोगराई यांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. एक प्रगतशील आणि लोकशाहीवादी राष्ट्र आपल्याला घडवायचं आहे. प्रत्येकाला न्याय मिळेल, भवितव्य घडवण्याची संधी मिळेल अशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. अनेक चुका आणि प्रयत्न करत आपण ही उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळंच आपल्या देशात, सामान्य माणसाच्या मनात लोकशाही प्रस्थापित झाली आहे. हा चमत्कार जसा घडला, तसाच एक ना एक दिवस दुसराही चमत्कार नक्की घडेल. राजकारणात स्वच्छ चारित्र्य नसलेल्यांची संख्या वाढत आहे हे मला मान्य आहे. लोककल्याणाच्या कार्यात आलेल्या अपयशामुळं ही संख्या वाढत आहे, हेही मला मान्य आहे; पण मला एक गोष्ट सांगायची आहे, की आपला देश आणि आपली संस्कृती प्राचीन आहे.

अंधकार आणि प्रकाशाची अनेक पर्वं आपण पाहिली आहेत. अनेक लढाया आपण हरलो, पराभूत झालो आणि अनेकदा आपल्याला गुलाम बनवलं गेलं; पण अशीही वेळ अनेकदा आली, की आपण आपला विश्वशांतीचा संदेश जगात सर्वदूर पोचवू शकलो. गेल्या काही दिवसांत आपण मर्यादित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून बाहेर पडलो आहोत; पण या सगळ्या काळात आपण टिकलो, वाढलो आणि चालत राहिलो. आशा आणि लढण्याची इच्छा याशिवाय जगात काहीच चिरंतन असत नाही. त्यामुळं रात्र कितीही अंधकारमय असली, तरी अल्लामा इकबालच्या ‘तराना-ए-हिंद’ या कवितेच्या ओळी अमर आहेत - 
युनान ओ मिस्र ओ रोमा, सब मिट गए जहॉं से 
अब तक मगर है बाकी, नामोनिशॉं हमारा 
कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी 
सदियों रहा है दुश्‍मन दौर-ए-जहॉं हमारा 
(काळाच्या ओघात ग्रीक, इजिप्शियन किंवा रोमन संस्कृती वाहून गेल्या; पण आम्ही अजून टिकून आहोत. कारण आमच्यात असं काही आहे, की सगळं जग विरोधात गेलं तरी जे मिटता मिटत नाही.) ही कविता म्हणताना मी हरवून गेलो होतो. तितक्‍यात भारावलेल्या उषानं माझा हात हातात घेतला अन्‌ ती समोर बसलेल्या मुलांना मिश्‍किलपणे म्हणाली - ‘‘हा वेडा आहे; पण तो तसा आहे म्हणूनच तर मी त्याच्याशी लग्न केलं...!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com